Tuesday, 15 May 2018

तलतची ‘हिट’ गाणी


उद्याचा मराठवाडा मे 2018

माधव मोहोळकर यांनी आपल्या पुस्तकात तलतच्या गैरफिल्मी गझलची एक सुंदर आठवण सांगितली आहे. फैय्याजची ती गझल होती

होठों से गुलफिशां है वो, आंखो से अश्कबार हम
सावन से वो है बेखबर, बेगाना-ए-बहार हम

ही गझल हॉटेलमध्ये रेकॉर्डवरून ऐकू येत होती. एक तरूण पोरांचं टोळकं हॉटेल मध्ये शिरलं आणि मालकाला ‘ये क्या फालतू गाना लगाया  है? कोई फिल्मी गाना लगाओ!’ असं सुनावलं. हे ऐकून सिगरेट पीत बसलेला एक तलतच्या गाण्याचा आशिक उठला आणि त्या तरूण पोराच्या कानफाडीत लगावत बोलला, ‘खुदा ने जिसको दिल नही दिया, उसके लिए तलत नही है..’ (‘गीतयात्री, लेखक-माधव मोहोळकर, पृ. 70, मौज प्रकाशन)

खरंच ज्याला तलत समजून घ्यायचा त्याला कोमल हृदय असणं आवश्यकच आहे. तलतच्या आवाजातील थरथर ही प्रेमाची कोवळी भाषा, विरहाचे दु:ख व्यक्त करायला अगदी 100 टक्के योग्य होती. तलतची गाणी काही जणांनाच आवडतात पण सर्वांना नाही. तलत हा मोजक्या अभिजात लोकांचाच गायक होता. सर्वसामान्यांचा नाही. असा गैरसमज विनाकारण पसरवला जातो. तलतच्या गाण्यांचा शोध घेतला असता बॉक्स ऑफिसवर यश मिळवलेल्या चित्रपटांतील आणि बिनाकात गाजलेली अशी त्याची काही गाणी सापडतात त्यावरून त्याच्या ‘व्यवसायीक’ लोकप्रियतेची जरा कल्पना येवू शकते.

तलतचे सुरवातीच्या काळातील व्यवसायिक यश मिळवलेल्या ‘बाबुल’ (1950) चित्रपटातील गाणे ‘मिलतेही आंखे दिल हुआ दिवाना किसी का’ हे शमशाद सोबतचे आहे. तलतसोबत द्वंद्व गीत गायला लताचाच आवाज जास्त शोभून दिसला आहे. याच वर्षी ‘आरजू’ या दिलीपकुमारच्या चित्रपटात ‘ऐ दिल, मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो..’ हे सोलो गीत तलतला मिळालं आणि त्यानं त्याचे सोनं केलं. 

तलतच्या चित्रपटांना सर्वात जास्त व्यवसायिक यश लाभलं ते वर्ष म्हणजे 1952. या एकाच वर्षी पहिल्या दहा व्यवसायिक चित्रपटांपैकी ‘दाग’ (संगीत शंकर जयकिशन), ‘अनहोनी’ (संगीत रोशन), ‘संगदिल’ (सं. सज्जाद) आणि ‘बेवफा’ (सं. ए.आर कुरेशी) या चार चित्रपटांत तलतची गोड गाणी होती. 

राज कपुर बॅनरच्या सोबतच आधीपासून शंकर जयकिशननं बाहेरही बहरदार संगीत दिलं आहे. त्यातीलच एक होता ‘दाग’ (1952). दिलीपकुमारची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यात या गाण्याचा फार मोठा वाटा आहे. शैलेंद्रच्या लेखणीतून उतरलेलं हे सुंदर गाणं आहे ‘ऐ मेरे दिल कही और चल, गम की दुनिया से दिल भर गया’. शैलेंद्रचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शब्दरचना अतिशय साधी, प्रवाही, कमी अक्षरांच्या शब्दांची राहिलेली आहे. हे गाणं लताच्या आवाजातही आहे. पण तलतच्या आवाजाची मजा त्यात नाही.  दिलीप कुमारसाठी पुढे रफी मोठ्या प्रमाणात वापरला गेला. पण सुरवातील मुकेश आणि तलतने त्याच्या गीतांमध्ये अप्रतिम रंग भरले आहेत. याच चित्रपटात हसरतचे गाणेही फार गोड आहे. प्रेम विरहानं पोळलेल्या नायकासाठी ही गाणं ‘आयकॉनिक’ ठरलं आहे. ‘हम दर्द के मारों का इतनाही फसाना है, पीने को शराबे गम, दिल गम का निशाना है.’

राजकपुर-नर्गिस यांचा ‘अनहोनी’ याच वर्षी गाजलेला चित्रपट. त्याला रोशनचं संगीत आहे. राजकपुरसाठी फार थोड्या वेळा तलतचा आवाज वापरला गेला आहे. या चित्रपटासाठी चार गाणी तलतनं राजकपुरसाठी गायली आहेत. त्यातलं प्रेमाची भावना व्यक्त करणारं गोड गाणं आहे ‘मै दिल हू इक अरमान भरा, तू आके इसक पेहचान जरा’.  लतासोबतही तलतची ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ आणि ‘समा के दिल मे हमारे जरा खयाल रहे’  ही दोन  मधुर गाणी यात आहेत. ‘समा के दिल मे’ मध्ये लताचा कोवळा आवाज, तलतचा थरथरता आवाज आणि प्रेमाचे प्रतिक असलेली राज-नर्गिस ही जोडी हे सगळं अतिशय जमून आलेलं रसायन आहे. शंकर जयकिशन सोबतच रोशन सारख्या इतरही संगीतकारांनी राज-नर्गिस यांच्या जोडीला प्रेमाचे प्रतिक बनविण्यात मोठा हातभार लावला आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. 

अतिशय मोजकी (केवळ 16 चित्रपट) गाणी देणारा संगीतकार म्हणून सज्जाद परिचित आहे. त्याच्या ‘संगदिल’ मध्ये तलतची दोन गाणी उल्लेखनीय आहेत. पहिलं गाणं सोलो आहे, ‘ये हवा हे रात ये चांदनी, तेरी इक अदा पे निसार है’. अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि तरूणपणीचा दिलीपकुमार. दिलीपकुमारची प्रतिमा प्रेमाचा नायक अशी जरी झाली नाही तरी त्याची प्रेमाची अप्रतिम अशी गाणी आहेत. त्यातीलच हे एक. यातीलच दुसरं द्वंद्व गीत तलत आणि लताच्या आवाजात आहे. ‘दिल मे समा गये सजन, फुल खिले है चमन चमन’ हे गाणं ऐकताना मधुबालाच्या वेणीवरचा गजरा त्या काळच्या सगळ्याच तरूणींना आपल्याही केसांवर आहे असा भास झाला असणार. गॉगल आणि कोट घातलेल्या दिलीपकुमारमध्ये तेंव्हाचे तरूणही आपली प्रतिमा नक्कीच पाहत असणार. ही प्रेमाची गाणी खरंच अवीट आहेत. याच वर्षीच्या ‘बेवफा’ मध्ये तलतचा आवाज आहे. याला संगीत ए.आर.कुरेशी (तबला नवाज झाकिर हुसेन यांचे वडिल अल्लारखां) यांच आहे. पण गाणी तेवढी विशेष नाहीत.  

‘फुटपाथ’ (1953) हा अतिशय मोजके संगीत देणारे संगीतकार खय्याम यांचा पहिला गाजलेला सिनेमा. यातील दिलीपकुमारसाठीचे तलतचे गाणे आजही लोकप्रिय आहे. तेंव्हाच्या बिनाकातही दुसर्‍या क्रमांकावर गाजलेलं हे गाणं आहे ‘शाम-ए-गम की कसम, आज गमगीन है हम, आ भी जा आ भी जा आज मेरे सनम.’ खरं तर अशा दु:खी विरहाच्या आर्त गाण्यांनी दिलीपकुमारची प्रतिमा ‘ट्रॅजेडी किंग’ बनून गेली. ती शेवटपर्यंत त्याला पुसता आली नाही.  

याचवर्षी ‘शिकस्त’ (1953) हा शंकर जयकिशनच्या संगीतातील चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गाजला होता. दिलीपकुमार-नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित एक गाणं यात आहे- ‘जब जब फुल खिले’. शैलेंद्रने या गाण्यात एक ओळ अशी लिहीली आहे

‘मन को मैने लाख मनाया
पर अब तो है वो भी पराया
जख्म किये नासूर 
तेरी याद की मरहम ने
देख अकेला मुझे
जब घेर लिया गम ने

इतक्या सुंदर साध्या शब्दांत शैलेंद्र विरहाचे दु:ख मांडून जातो.

याच वर्षी ‘दिले नादान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर काही यश मिळालं नाही. पण यातील तलतचे गाणे बिनाकात मात्र गाजलं. शकिलच्या शब्दांतील हे गीत होतं, ‘जिंदगी देने वाले सुन’. ‘पाकिजा’, ‘मिर्झा गालिब’च्या संगीताने ओळखल्या जाणार्‍या गुलाम मोहम्मदचं संगीत या गाण्याला आहे. तलतची नायिका म्हणून यात श्यामानं काम केलं आहे. याच वर्षी ‘ठोकर’ हा शम्मी कपुर-श्यामा यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. यालाही बॉक्सऑफीसवर यश लाभलं नाही पण यातील तलतचं एक गाणं बिनाकात गाजलं. हे गाणं होतं ‘ए गमे दिल क्या करू, ए वेहशते दिल क्या करू’. या गाण्याचे बोल लिहीले होते मजाज लखनवी (गीतकार जावेद यांचा मामा) आणि संगीत होतं सरदार मलिक यांचं. मजाज यांनी अतिशय थोड्या कविता लिहील्या. त्यांच्या उत्कृष्ठ रचनांपैकी ही एक. हे गाणं म्हणजे चित्रपटासाठी लिहीलेलं गीत नसून मजाजच्या ‘अवारा’ या सुंदर कवितेतील दोन कडवी आहेत. ‘प्यासा’ मध्ये मुशायर्‍याचा जो सुंदर प्रसंग आहे त्यात साहिर शिवाय ज्यांची रचना वापरली गेली आहे तो शायर म्हणजे मजाज. मुशायर्‍याच्या त्या दृष्यानंतर ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ हे गाणं सुरू होतं. 

चिरतरूण प्रेमाचे पडद्यावरचे प्रतिक म्हणजे देवआनंद. देवआनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1954) मध्ये किशोर-रफीच्या आवाजात खुलणार्‍या देवआनंदसाठी सचिनदेव बर्मन यांना वेदना प्रकट करायला तलतच्याच आवाजाचा सहारा घ्यावा लागला. साहिरच्या शब्दकळेनं नटलेलं हे सुंदर गाणं आहे ‘जाये तो जाये कहां, समझेगा कौन यहां, दर्द भरे दिल की जुबां’. 

गालिबचे मोठेपण सगळ्यांनाच मान्य आहे पण त्याच्या गझलांना पडद्यावर चाली देवून साकार करण्याची हिंमत मात्र फारच थोड्या संगीतकारांनी केली. गुलाम मोहम्मदने हे ‘गालिब’धनुष्य बॉक्सऑफिस हिट ‘मिर्झा गालिब’ (1954) उचललं आणि यशस्वी करून दाखवलं. हा चित्रपट होता सुरैय्या-भारतभुषण यांचा. यात सुरैय्या सोबत तलतनं गालिबची अजरामर गझल ‘दिले नादान तूझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दुवा क्या है’ गायली आहे. 

बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत पण तलतच्या गाण्यांनी बिनाकात धुम केली असे तीन चित्रपट याच वर्षी पडद्यावर आले. 
1.‘कवी’- मै पीके नही आया-संगीत सी.रामचंद्र, 
2.‘सुबह का तारा’ होता- गया अंधेरा हुआ उजारा- संगीत सी.रामचंद्र, 
3.‘वारीस’- राही मतवाले तू छेड एक बार तलत/सुरैय्या- संगीत अनिल विश्वास
चित्रपटाचे यश बाजूला पण तलतचे चाहते  त्याच्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकायचे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. 

दिलीपकुमार-देवआनंद-बिना रॉय यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘इन्सानियत’ (1955). सी.रामचंद्र यांच्या अवीट संगीताने नटलेल्या या चित्रपटात लता-तलतचे एक सुंदर प्रेमगीत आहे ‘आयी झुमती बहार, लायी दिल का करार, देखो प्यार हो गया’. गुरूशर्टमधला मिशावाला देवआनंद आणि पुढे वेणी घेतलेली साडितील बिना रॉय एक वेगळीच खुमारी या गाण्याला प्राप्त करून देतात. राजेंद्रकृष्ण-सी रामचंद्र ही एक यशस्वी गीतकार-संगीतकार जोडी. त्यांच्या गाजलेल्या लोकप्रिय रचनांपैकी ही एक. 

तलतचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतकार कुणीही असो तो आपली वेगळी छाप त्या गाण्यावर सोडून जातो. शौकत देहलवी नाशाद हा तसा फारसा परिचित संगीतकार नाही. पण त्याच्या ‘बारादरी’तल्या तलतच्या गाण्यांनं आजही लोकप्रियता सांभाळली आहे. हे तलतचे गाणे आहे, ‘तस्वीर बनाता हू, तस्वीर नही बनती’. 

‘मौसी’ (1958) या वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात तलत-लताचे ‘टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ हे अजरामर गीत आहे. बिनाकात या गाण्याला रसिकांनी पसंती दिली. भरत व्यास सारखा गुणी गीतकार या गाण्याला लाभला. ‘झनक झनक पायल बाजे’ किंवा ‘नवरंग’ सारख्या चित्रपटांतील व्यासांच्या शब्दकळेला रसिक अजूनही दाद देतात. स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केलेला एक चित्रपट यावर्षी पडद्यावर झळकला ‘सोने की चिडिया’. यातील साहिरच्या नाजूक शब्दकळेचं गाणं होतं ‘प्यार पर बस तो नही है’. संगीतकार ओ.पी.नय्यर असल्याने तलत सोबत लता असण्याचा प्रश्‍नच नव्हता. लताची जागा आशा ने तेवढ्याच तोलामोलाने केवळ आलापीने भरून काढली आहे. खरं तर हे गाणं ऐकल्यावर परत परत असं वाटतं की तलत-आशा या जोडीला घेवून ओ.पी.नय्यरसारख्यांनी अजून छान गाणी का नाही दिली. 

‘सुजाता’ (1959) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश लाभलंच शिवाय तलतचे गाणे त्याच्या चाहत्यांनी बिनाकात डोक्यावर घेतलं. सुनील दत्त-नुतन वर चित्रित हे गाणं होतं, ‘जलते है जिसके लिऐ, तेरी आंखो के दिये’. तलतची अशी काही गाणी आहेत की त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाचा आवाजही आपण कल्पु शकत नाही. त्यातील हे एक अप्रतिम गाणं. एक दु:खी आर्त उदास वेदना उदबत्ती सारखी त्याच्या आवाजात जळत असते. असं म्हणतात ना ‘ना बुझती है ना जलके धुवां होती है’ तशी काहीतरी भावना तलतच्या आवाजात आहे. 

हे गाणं म्हणजे तलतच्या व्यवसायिक यशस्वी गाण्यांची भैरवीच आहे. पुढे त्याचा कुठलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. न बिनाकात त्याची गाणी गाजली. ‘हकिकत’ (1964) मध्ये ‘हो के मजबूर’ या गाण्यात  रफी-मन्ना-भुपेंद्र यांच्या सोबत त्याचा आवाज एका कडव्यात आहे इतकंच. बाकी त्याच्या वाट्याला काही आलं नाही.

हेमंतकुमार यांच्या निधनानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीले होते ‘शोर और सूर मे येही फर्क होता है, शोर खात्म होता है और सुर खो जाता है. हेमंतकुमार खो गये.’ या प्रमाणेच तलतच्याही बाबतीत असंच म्हणावं लागेल ‘तलत खो गये’.. तलतच्या पुण्यतिथी निमित्त (९ मे)  त्याला विनम्र अभिवादन !    

   -आफताब परभनवी.

Sunday, 29 April 2018

विस्मरणात गेलेला कृष्णधवल प्रेमगीतातला धर्मेंद्र..



उद्याचा मराठवाडा, २९  एप्रिल २०१८
 

‘बरसात की रात’ मधील रफीचं ‘जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात’ या गाण्यानं 1960 च्या बिनाकात धुमाकुळ घातला होता. गाणं अर्थातच त्यावर्षीच्या इतर सर्व गाण्यांना मागे ठेवत पहिल्या क्रमांकावर होतं. दुसरं गाणंही परत रफीचंच ‘चौदहवी का चांद हो’ हे होतं. याच दरम्यान आपलं संगीताचं करिअर नुकतंच सुरू करणारे कल्याणजी आनंदजी यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ मध्ये बलराज साहनी, उषा किरण यांच्यासारख्या मुरलेल्या कलाकारांसमोर उभा ठाकलेल्या कोवळ्या 25 वर्षांच्या धर्मेंद्रला त्याच्या या पहिल्याच चित्रपटात एक गाणं दिलं होतं  दिलं होतं. रसिकांनी रफीच्या दोन गाण्यांनंतर याच गाण्याला त्या वर्षी तिसर्‍या क्रमांक देत आपल्या पसंतीची पावती दिली होती. ते गाणं होतं, ‘मुझको इस रात की तनहाई मे आवाज ना दो’. हे गाणं लताच्या आवाजातही आहे. पण रसिकांना  मुकेशच्याच आवाजात जास्त भावून गेलं.

https://www.youtube.com/watch?v=pcr1Hh9OFd0

धर्मेंद्रची कारकीर्द या चित्रपटापासून सुरू झाली. त्याला काही मोजकी पण गोड गाणीही भेटत गेली. पण त्याची ही प्रेम करणार्‍या किंवा विरहाने होरपळणार्‍या नायकाची प्रतिमा काही तयार झाली नाही. 

1961 ला बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला धर्मेंद्रचा चित्रपट होता ‘शोला और शबनम’.  खय्यामच्या संगीताततील यातील दोन गाणी आजही ऐकायला लक्षणीय वाटतात. पहिलं गाणं आहे कैफी आझमी यांनी लिहीलेले रफीच्या आवाजातील  ‘जीत ही लेंगे बाजी हम तूम’ आणि दुसरं गाणंही असंच अतिशय संवेदशील मनाचं, रफीनं हळूवार गायलेलं ‘जाने क्या धुंडती है ये आंखे’. हेही कैफी आझमींचेच आहे. खय्यामचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी चित्रपटांना संगीत दिलं पण संस्मरणीय अशी गाणी दिली.

पुढे ‘अनपढ’ (1962) आणि ‘बंदिनी’ (1963) हे दोन चित्रपट धर्मेंद्रचे गाजले. बॉक्स ऑफिसवर त्यांनी उत्तम धंदा केला. यातील गाणीही गाजली. पण धर्मेंद्रच्या वाट्याला मात्र यात गाणी आली नाहीत.

पुढच्याच वर्षी धर्मेंद्रचे दोन चित्रपट ‘आयी मिलन की बेला’ (1964) आणि ‘हकिकत’ (1964) हीट झाले पण यातही त्याच्या वाट्याला गाण्याच्या दृष्टीनं काही आलं नाही. याच वर्षीच्या ‘आप की परछाई’ ने मात्र जरा हा अनुशेष भरून काढला. दोन अतिशय गोड गाणी रफीच्या आवाजातील त्याच्या वाट्याला आली. मदनमोहन आणि राजा मेहंदीअली खान हे अतिशय जमून आलेलं संगीतकार-गीतकार रसायन या चित्रपटाला लाभलं होतं. रफीचे पहिलं गाणं होतं, ‘ये ही है तमन्ना, तेरे घर के सामने, मेरी जान जाये, मेरी जान जाये’. धर्मेंद्रनं खट्याळ प्रेमीचा अभिनयही छान केलाय. आणि दुसरं रफीचंच हळूवार गाणं आहे ‘मै निगाहे तेरे चेहरे से हटावू कैसे’. खरं तर धर्मेंद्र प्रेमाच्या हळूवार गाण्यांमध्ये अतिशय संयत अभिनय करू शकतो हे सुरवातीच्या काही गाण्यांनी सिद्धही केलंय. 

https://www.youtube.com/watch?v=7_V6Os1mDWI
‘काजल’ (1965) हा धर्मेंद्रचा चित्रपट तेंव्हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. पण गाजलेली गाणी मात्र राजकुमारच्या वाट्याला गेली (छू लेने दो नाजूक होठों को). चित्रपटाचे श्रेयही मीनाकुमारीलाच जास्त गेलं.
‘ममता’ (1965) चित्रपटातील लताच्या आवाजातील ‘रहे ना रहे हम’ बिनाकात गाजलं. पण हेच गाणं परत रफी-सुमन कल्याणपुरच्या आवाजात  धर्मेंद्र-सुचित्रा सेन यांच्यावर आहे. पण त्याचं श्रेय धर्मेंद्रला तेवढं नाही मिळालं. पण दुसरं एक गाणं धर्मेंद्रच्या वाट्याला आलं. लता-आशाच्या आवाजातील हे गाणं ‘इन बहारोंमे  मे अकेली ना फिरो, राह मे काली घटा रोक ना ले’ मधुर आहे. मजरूह सारखा कसलेला गीतकार याला लाभला आहे. पण या  संपूर्ण चित्रपटावर लताच्या ‘रहे ना रहे हम’ ची दाट छाया असल्याने बाकीची गाणी झाकोळली गेली. (लता-हेमंतकुमारच्या आवजातील ‘छुपा लो यु प्यार मेरा’ यातीलच असून अशोक कुमार-सुचित्रा सेनवर आहे.)

‘पूर्णिमा’ (1965) मध्ये धर्मेंद्र शिवाय दुसरा कुणी प्रमुख नायक नव्हता. परिणामी यातील गाणी पूर्णत: त्याच्याच वाट्याला आली. मुकेश-लताच्या आवाजातील ‘हमसफर मेरे हमसफर’ गोड गाणं धर्मेंद्र मीनाकुमारीवर आहे. गुलजारच्या सुरवातीच्या काळातील ही गाणी. बंदिनी पासून गुलजारची कारकीर्द सुरू झाली. त्याचाही नायक धर्मेंद्रच होता. पण पुढे गुलजार-धर्मेंद्र असा योग फारसा आला नाही.

http://www.hindigeetmala.net/song/hamasafar_mere_hamasafar_pankh_tum.htm

 शंकर जयकिशन, रोशन यांच्यानंतर मुकेशच्या गळ्याचा नेमका वापर करणार्‍यात कल्याणजी आनंदजीचं नाव घ्यावं लागेल. (पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल या एकाच नावाची भर यात पडते). यातच अजून एक आर्त गाणं मुकेशच्या आवाजात आहे. धर्मेंद्रच्या पाच वर्षांपूर्वीच्या ‘मुझको इस रात की तनहाईमे’ ची आठवण करून देणारं हे गाणं आहे 

‘तूम्हे जिंदगी के उजाले मुबारक, 
अंधेरे हमे आज रास आ गये है
तूम्हे पाके हम खुदसे दूर हो गये थे
तूम्हे छोडकर अपने पास आ गये है

अशी गुलजारी शैलीची सुरवात सांगणारी ही शब्दरचना आहे. पण गुजलार यांची शब्दांवरची हुकुमत पुढे जाणवते तशी ती इथे जाणवत नाही. 

http://www.hindigeetmala.net/song/tumhe_zindagi_ke_ujale_mubarak.htm
‘नीला आकाश’ (1965) हा मदन मोहनच्या संगीतानं नटलेला धर्मेंद्र -माला सिन्हाचा चित्रपट. इथेही परत ‘आपकी परछाई’ मधील मदनमोहन-राजा मेहंदीअली खान हे जमून आलेलं रसायन आहेच. दोन चांगली गाणी यात रफी-आशाच्या आवाजात मदनमोहननं दिली आहेत. पहिलं गाणं आहे ‘तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है’ आणि दुसरं आहे ‘आपको प्यार छुपाने की बुरी आदत है’. या रंगीत चित्रपटांत धर्मेंद्रच्या प्रेमगीताच्या मर्यादा लक्षात यायला लागतात. कदाचित त्यामुळेच पुढे त्याची ही प्रतिमा ठसत गेली नसावी.

‘आये दिन बहार के’ (1966) मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालनी लोकप्रिय गोड गाणी दिली आहेत. त्यात धर्मेंद्रच्या वाट्याला ‘ये कली जब तलक फुल बनके खिले’ आलेलं गाणं महेंद्र कपुर-लताच्या आवाजात आहे. पण यातील रफीच्या आवाजातील गाणं रसिकांनी जास्त डोक्यावर घेतलं. त्याचे बोल होते, ‘मेरे दुष्मन तू मेरी दोस्ती से तरसे’. लक्ष्मीकांत प्यारेलालने लता आणि रफीच्या आवाजाचा एक साचा तयार करून आपल्या सुरवातीच्या संगीतात वापरला. याला चांगलीच लोकप्रियता लाभली. आनंद बक्षी तर त्याचा हक्काचाच गीतकार. पण पुढे आनंद बक्षीच्या शब्दांना उतरती कळा लागली आणि लक्ष्मी-प्यारे च्या संगीताचा ठराविक साचा अभिजाततेच्या दृष्टीने प्रभावहीन बनत गेला.

http://www.hindigeetmala.net/song/mere_dushman_tu_meri_dosti.htm

गुरूदत्तच्या माघारी पूर्ण झालेला त्याच्या प्रॉडक्शनचा चित्रपट म्हणजे ‘बहारे फिर भी आयेंगी’. चित्रपट फार चालला नाही पण ओ.पी.नय्यरच्या गाण्यांनी धमाल केली. 

बदल जाये अगर माली 
चमन होता नही खाली 
बहारे फिरभी आयी है 
बहारे फिरभी आयेंगी 

http://www.hindigeetmala.net/song/badal_jaaye_agar_maali_bahaaren.htm
या कैफी आझमींच्या रचनेने बिनाकात बाजी मारली. गुरूदत्त निघून गेला होता, गीता दत्त दु:खात बुडून गेली होती, ओ.पी.नय्यरची जादू पण संपून गेली होती पण धर्मेंद्रच्या कारकीर्दीत मात्र पुढे चालून ‘बहार’ आली.
या सोबतच अजून दोन चांगली गाणी धर्मेंद्रच्या वाट्याला आली. रफीच्या आवाजातील ‘आपके हसिन रूख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है’. या गाण्याची गंमत म्हणजे गाणे नायक पियानोवर बसून म्हणतो आहे, नायिका सलज्ज अशी समोर आहे. 1949 च्या ‘अंदाज’ पासून हेच चालू आहे. हा चित्रपट कृष्ण धवल काळाच्या अगदी शेवटच्या शेवटच्या चित्रपटांपैकी आहे. संगीतकार ओ.पी.नय्यर हा जूनाच आहे. गायक रफी जूनाच आहे. नविन आहे गीतकार अंजान, नायक धर्मेंद्र, नायिका तनूजा. म्हणजे जून्या पिढीची शैली तर आत्मसात केली आहे. जून्या प्रमाणे सर्व काही देण्याचा इथे प्रयत्न आहे. पण जायचे तर पुढे आहे. अशा द्विधा अवस्थेत सापडलेल्या या काळाचे प्रतिनिधीत्व हे गाणे करते आहे. याच पद्धतीचे दुसरं गाणं रफी-आशाच्या आवाजात आहे 

दिल तो पेहले सेही मदहोश है मतवाला है 
और कुछ आपने दिवाना बना डाला है

ओ.पी.नय्यरच्या संगीतातील तीच सगळी जूनी जादू इथे प्रकट झाली आहे. संपत चाललेल्या काळाचे अवशेष या गाण्यांमधून समोर येत आहेत.

याच वर्षी धर्मेंद्रच्या नुतन रेहमान यांच्या ‘दिल ने फिर याद किया’ (1966) मधील शिर्षक गीताला रसिकांनी बीनाकात पसंती दिली. रफी-मुकेश-सुमन कल्याणपुर यांच्या आवाजातील हे गाणं आजही ऐकू येतं. सोनिक ओमी या संगीत रचनाकाराने ज्या अगदी तूरळक चित्रपटांना संगीत दिलं त्यापैकी हा एक चित्रपट. हे गाणं होतं

दिल ने फिर याद किया
बर्क सी लहर आयी है
फिर कोई चोट मुहोब्बत की
उभर आयी है 

https://www.youtube.com/watch?v=aRnI2xb2biI
धर्मेंद्रला सुरवातीपासून साथ देणारा मुकेशचा आवाज इथे रेहमान साठी वापरला आहे. नुतनसाठी अर्थातच सुमन कल्याणपुरचा आवाज आहे. या गाण्याची ताकद म्हणजे प्रेमाच्या त्रिकोणात तिन्ही टोकांचे दु:ख समर्पकपणे प्रतित होतं. रफी-मुकेश-सुमन या तिघांचेही संयत आवाज आणि तसाच धर्मेंद्र-रेहमान-नुतनचा अभियन यानं गाणं फारच परिणामकारक ठरतं. अन्यथा प्रेमाच्या त्रिकोणात दोन प्रेमी जीव आणि तिसरा खलनायक असेच चित्र उमटत राहतं. ते तसं इथे होताना दिसत नाही. याच चित्रपटातील ‘कलियों ने घुंघट खोला, हर डाल पे भवरा डोला’ हे रफीच्या आवाजातील सुंदर गाणंही धर्मेंद्रवरच चित्रित आहे.

सुरवातीच्या काळातील धर्मेंद्रच्या सुरेल गीतांचे पर्व याच वर्षीच्या ‘अनुपमा’ (1966) मधील गाण्यानं समाप्त होते. मुळात या चित्रपटात अगदी मोजकीच गाणी आहेत. दोन लताची गाणी (धीरे धीरे मचल ए दिले बेकरार, कुछ दिल ने कहा) दोन आशाची गाणी (भिगी भिगी फिजा, क्यूं मुझे इतनी खुशी दे दी). पण या अतिशय गोड सुंदर गाण्यांशी टक्कर देत हेमंतकुमारच्या खर्जातील आवाजात एक गाणं धर्मेंद्रच्या वाट्याला आलं. कैफी आझमींच्या शब्दांना अतिशय येाग्य न्याय देत, चेहर्‍यावर संतूलीत भाव दाखवत धर्मेंद्रनेही या गाण्याचे सोनेच केले आहे. आपला चेहरा किती मार्दवयुक्त आहे हे त्यानं (म्हणजे त्या चित्रपटाच्या कॅमेरामननं) दाखवूनच दिलं आहे. हे गाणं आहे

या दिल की सुनो दुनिया वालों
या मुझको अभी चुप रहने दो
मै गम को खुशी कैसी केह दू
जो केहते है उनको केहने दो

http://www.hindigeetmala.net/song/yaa_dil_kee_suno_dooniyawalo.htm

नायिका शर्मिला टागोर, संगीतकार गायक हेमंतकुमार, दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जी या सगळ्यां कलात्मक बंगाली माणसांमध्ये धर्मेंद्रसारखा धसमुसळा पंजाबी नायक मिळून मिसळून जातो ही अभिनेता म्हणून त्याची कमालच आहे. पुढे त्याची जी प्रतिमा तयार झाली त्याच्या अगदी हे विरूद्ध आहे.

परत अशी सुंदर गोड गाणी धर्मेंद्रसाठी अपवादानेच आली. अर्थातच गाण्यांचा सुवर्णकाळच संपून गेला होता. त्याला धर्मेंद्र तरी काय करणार. धर्मेंद्रला महाराष्ट्र शासनाचा ‘राज कपुर’ पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे. त्याच्या जून्या गाण्यांची ही एक आठवण.  
       
   -आफताब परभनवी.

Wednesday, 11 April 2018

दिलीप-देव-राज : हिंदी गाण्यांचा ताज |


मोहनगरी दिवाळी २०१७ 

पियानोवर झुकलेली तारूण्याने मुसमुसणारी नर्गिस, तिच्या समोर मुकेशच्या आवाजात गाणारा देखणा तरूण दिलीपकुमार, नौशादच्या संगीतावर थिरकणारी कक्कु आणि मजरूहचे शब्द...

तू कहे अगर जीवनभर
मै गीत सुनाता जाऊ 
मन बीन बजाता जाऊ
और आग मै अपने दिल की
हर दिल मे लगाता जाऊ
दु:ख दर्द मिटाता जाऊ

दिलीपकुमार-नर्गिस-राज कपुर यांच्या ‘अंदाज’ (1949) मधले हे गाणे केवळ गाणे नव्हते तर पुढे जवळपास 18 वर्षे चाललेल्या हिंदी गाण्यांच्या सुवर्ण काळाची ही नांदी होती. 

देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. फाळणीच्या जखमा विसरून नविन काही घडवू पहाणार्‍या पिढीच्या डोळ्यात अनोखी स्वप्ने होती. हातात काही करून दाखवायची धमक होती. या पिढीला पडद्यावर कृष्ण धवल चित्रपटांतून रंगीत स्वप्नं दाखवायला पुढे आले तीन तरूण- दिलीप कुमार (जन्म 1922), देव आनंद (जन्म 1923) आणि राज कपुर (जन्म 1924). काय योगायोग आहे. सगळ्यात लहान राज कपुर तो आधीच गेला. त्यानंतरचा देव आनंद तोही 2011 ला गेला. आणि सर्वात ज्येष्ठ दिलीप कुमार त्याच्या आयुष्याची दोरी अजून बळकट आहे. 

या तिघांचा अभिनय, त्यांच्या चित्रपटांचे इतर पैलू या पेक्षाही जास्त मोहिनी पाडणारी गोष्ट म्हणजे यांची गाणी.  आपल्या हृदयातील ‘आग’ त्यांनी तेंव्हाच्या तरूणाईच्या हृदयात लावली आणि तरूणाईने ‘आह’ केले. गीतकार-संगीतकार-गायकांनी त्याला असे काही चार चांद लावले की ही गाणी अमर ठरली. 

1. 
राज कपुरच्या ‘बरसात’ (1949) पासून हिंदी गाण्यांचा सुवर्णकाळ सुरू होतो आणि संपतो तो राहूल देव बर्मनच्या ‘तिसरी मंझिल’ (1966) पाशी. नंतरच्या काळात चांगली गाणी आली. पण ती तूरळक होती. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये’ असं जे 1949 ते 1966 या काळात गाण्यांबाबत घडलं ते तसं नंतर घडलं नाही. त्यातही परत 1955 ते 1960 हा काळ म्हणजे तर कळसच.  

हिंदी चित्रपटांचे यश मोजायची एक सरळ साधी सोपी पद्धत म्हणजे त्यांना मिळालेला बॉक्स ऑफिसवरचा प्रतिसाद. या बाबतीत दिलीप-देव-राज यांना मिळालेल यश पाहता रसिकांच्या हृदयावर यांनी राज्य केलं हेच सिद्ध होतं. दरवर्षी सर्वात जास्त कमाई करणार्‍या हिंदी चित्रपटांची यादी उपलब्ध आहेत. 1949-1966 या काळात 168 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. या त्रिकुटाचे यात तब्बल 51 चित्रपट आहेत. हे प्रमाण 30 टक्के इतके आहे. 

‘अंदाज’मध्ये दिलीपकुमार साठी नौशाद यांनी मुकेश तर राज कपुरसाठी रफीचा वापर केला होता. पुढे  ‘बाबूल’ (मिलतेही आंखे दिल हुआ) आणि ‘आरजू’ (ए दिल मुझे एैसी जगा ले चल) मध्ये दिलीपकुमार साठी तलत चाही वापर झाला. राजकपुरच्या ‘सरगम’ मध्ये सी.रामंचद्र यांनी आपलाच आवाज राज कपुरसाठी वापरला (वो हमसे चुप है) राज कपुरसाठी मुकेशचा आवाज ‘बरसात’ पासून सुरू झाला होता. पण गाण्याची शैली जूनी होती. 

या काळात देव आनंदचे कुठलेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले नव्हते. 

1951 साल उजाडले आणि दिलीप-देव-रफी यांच्या गाण्यांना एक विशिष्ट दिशा सापडली. ‘आवारा’त शंकर जयकिशननं मुकेशचा अगदी चपखल वापर राज कपुरसाठी केला. शैलेंद्रचे शब्दही त्याला पोषक ठरले. पुढे राज कपुर-मुकेश असं अद्वैत निर्माण करणारं हे ऐतिहासिक गाणं होतं ‘आवारा हूं’. 

दिलीप कुमार साठी नौशाद यांनी रफीचा आवाज लता सोबत वापरला. शकिलच्या शब्दांना आर्ततेची झालर देणारं  हे गाणं ‘देख लिया मैने किस्मत का तमाशा देख लिया’ अमर ठरलं. तलतपेक्षाही जास्त रफीचा हा आवाज दिलीप कुमारची ओळख बनला.  

याच वर्षी गुरूदत्तच्या दिग्दर्शनाखाली देवआनंदचा ‘बाजी’ प्रदर्शित झाला. त्यात देव आनंदसाठी किशोर कुमार पहिल्यांदाच सैगलच्या प्रभावातून बाहेर येवून गायला. ते गाणं होतं, ‘तेरे तिरों मे छूपे प्यार के खजाने है’. याच गाण्यात किशोरनं त्याचं सुप्रसिद्ध ऑडलिंगही केलं होतं. पुढे जवळपास 20 वर्षे देव आनंदची जी चिरतरूण प्रतिमा उभी राहिली तिचा उगम याच गाण्यात आहे. 

1951 नंतर सुरू झाला एक सुरिला प्रवास.पहिलं त्रिकुट राजकपुर-मुकेश/मन्ना डे- शंकर जयकिशन, दुसरं त्रिकुट म्हणजे दिलीपकुमार-रफी/तलत-नौशाद आणि तिसरं त्रिकुट म्हणजे देवआनंद-किशोर/रफी-सचिन देव बर्मन. 

दिलीप कुमारच्या 21 गाजलेल्या चित्रपटांपैकी 9 ला नौशादचे संगीत आहे. गाण्यांचा विचार केला तर त्याची गाजलेली गाणी जवळपास सगळी यातीलच आहेत. देव आनंदच्या 17 पैकी 10 चित्रपटांना सचिन देव यांचे संगीत आहे. राज कपुरच्या 13 पैकी 8 चित्रपटांना शंकर जयकिशनचे संगीत आहे. यातून हेच सिद्ध होते की या कलाकारांची विशिष्ट सांगितिक प्रतिमा तयार करण्यात या संगितकारांचा मोठा वाटा होता. 

बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 168 चित्रपटांतील दखलपात्र 867 गाण्यांचा विचार केला तर त्यातील 261 गाणी या तिघांच्या चित्रपटांतील आहेत. म्हणज निव्वळ गाण्यांचा विचार केला तरी हे प्रमाण 30 टक्के इतके होते. 

सुवर्ण काळाच्या कळसाचा म्हणजेच 1955 ते 1960 चा विचार केल्यास दखलपात्र 372 पैकी 238 गाणी म्हणजे तर हे प्रमाण 42 टक्के इतके ठरते. तेंव्हा नि:संशय या तिघांच्या गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं हेच सिद्ध होतं. 

2.
हिंदी गाण्यांच्या सुवर्णकाळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘बरसात’ (1949) ते ‘आरपार’ (1954). ओ.पी.नय्यरच्या येण्यानं हिंदी गाण्यांना ठेक्याचं वरदान मिळालं. त्यानं लोकप्रिय केलेला टांग्याचा ठेका आधीही होताच. पण ओ.पी.नय्यरनं तो ठळक केला. त्याला लोकप्रियता मिळवून दिली.  

‘फुटपाथ’(1953) मधील तलच्या आवाजातील ‘शाम ए गम की कसम, आज गमगीन है हम’ अतिशय गाजलं. या आधीही तलतचा आवाज दिलीप कुमारला शोभून दिसला होता. सोबतच दिलीपकुमारची प्रतिमा बनत गेली ती रफीच्या ‘आन’ मधील ‘दिल मे छूपा के प्यार का तूफान’ सारख्या गाण्यांनी. याच काळात ‘जाल’ (1953) मध्ये सचिन देव बर्मन यांनी देवआनंद गीताबाली साठी एक गीत संगीतबद्ध केलं होतं. किशोर-गीता यांच्या आवाजातील हे गाणं होतं, ‘दे भी चुके हम दिल नजराना दिल का’. या गाण्यातल्या किशोरच्या हरकती, गीताच्या आवाजातील अवखळपणा पडद्यावर जिवंत करायला देवआनंद- गीता बालीच हवेत. याच चित्रपटात हेमंतकुमारचे ‘ये रात ये चांदनी फिर कहां’ सारखं अवीट गोडीचं गाणं देवआनंदच्या तोंडी आहे. पण खरी रंगत चढते ती किशोरच्याच आवाजात. 

देव आनंद- कल्पना कार्तिकचा ‘हमसफर’( संगीत सरोद वादक उस्ताद अली अकबर), देव आनंद-नलिनी जयवंत यांचा ‘राहि’(संगीत- अनिल विश्वास) हे याच वर्षीचे.  पण या दोन्ही चित्रपटांतील गाणी विशेष नाहीत. देवआनंदचे हे दोनच बॉक्स ऑफिस हिट चित्रपट असे आहेत ज्यातील गाणी विशेष गाजली नाहीत. 

राज कपुरचा ‘आह’ (1953) याच काळातला. प्रेमाच्या द्वंद्व गीतात मुकेश फारसा पोषक वाटत नाही हे राज कपुरला इथेच जाणवलं. हे गाणं होतं, ‘जाने ना जिगर’. 

या पहिल्या टप्प्यात शेवटच्या वर्षी देवआनंदचा ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि दिलीपकुमारचा ‘अमर’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. राज कपुरचा कुठलाच चित्रपट या काळात आला नाही. तलतचा आवाज देवआनंदसाठी ‘जाये तो जाये कहां’ या गाण्यासाठी वापरला गेला होता. पण याच टॅक्सी ड्रायव्हर मध्ये ‘चाहे कोई खुश हो’ सारखं अवखळ गाणं रफीच्या आवाजात सचिनदेव बर्मन यांनी घेतलं आणि देव आनंदसाठी अजून एक आवाज चपखल बसतो हे सिद्ध झालं.

1954 ला देव आनंद, राज कपुरचा कुठलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. दिलीप कुमारच्या ‘अमर’ मध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेलं गाणं ‘इन्साफ का मंदिर है’ होतं. बाकी सगळी गाणी लताची होती. ‘ना मिलता गम तो बरबादी’ सारखं गाणं यातीलच.  

3.
हिंदी गाण्यांच्या सुवर्णकाळाचा दुसरा टप्पा सुरू होतो 1955 पासून. याच वर्षी दहा पैकी सहा चित्रपट दिलीप-देव-राज यांचेच होते. 

राज कपुरला मुकेशच्या आवाजाची ताकद माहित झाली होती. त्याची एक प्रतिमा या आवाजात आणि शैलेंद्रच्या शब्दांत फुलविण्याची जादू शंकर जयकिशन यांना अवगत झाली होती. ‘आवारा हूं’ नंतरचे मुकेशचे राज कपुरसाठी आयकॉनिक ठरलेले गाणे ‘मेरा जूता है जपानी’ याच वर्षीच्या ‘श्री 420’ मध्ये होतं. या गाण्यानं तेंव्हा सर्वत्र धूम केली. पण याच चित्रपटात प्रेमाच्या द्वंद्व गीतात मुकेश ऐवजी मन्ना डे वापरण्याचा चतुरपणा राज कपुर-शंकर जयकिशन यांनी केला. प्रेमाच्या गाण्यांत अव्वल ठरणारं हे गाणं होतं, ‘प्यार हुआ इकरार हुआ है’. 

याच वर्षी दिलीप कुमारनं आपणच हिंदी चित्रपटाचे शहेनशाह आहोत हे सिद्ध केलं. कारण त्याचे एक दोन नव्हे तर ‘आझाद’, ‘उडन खटोला’, ‘इन्सानियत’ आणि ‘देवदास’ असे चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. रफी-नौशाद या जोडीनं जशी लक्षात रहावी अशी गाणी दिलीपकुमार साठी दिली ती तशी इतरांना देता आली नाहीत. आझाद, इन्सानियत मध्ये लताला अतिशय गोड अशी गाणी सी.रामचंद्र यांनी दिली. देवदास मध्येही सचिनदांनी लता, गीताला गाणी दिली. पण नायक दिलीपकुमारला अशी गाणी मिळाली नाहीत. ती मिळाली नौशादच्या ‘उडन खटोला’ मध्ये. या वर्षी दिलीपकुमारचे गाजलेले गाणे होते रफीच्या आवाजातील ‘ओ दूर के मुसाफिर’.

देव आनंदचा ‘मुनिमजी’ याच वर्षीचा बॉक्स ऑफिस हिट. लताला भरपूर गाणी असलेल्या या चित्रपटात किशोर कुमारचे एकच गाणे होते आणि तेच गाणे नेमके बिनाकात हिट ठरले. देव आनंद किशोर च्या आवाजात आपले व्यक्तिमत्व पहात होता किंवा देव आनंदच्या व्यक्तिमत्वासाठी हाच आवाज शोभत होता. पूर्वीच्या ‘बाजी’, ‘जाल’ प्रमाणे याही गाण्याचे बोल साहिरचेच होते. हे गाणे होते ‘जीवन के सफर मे राही’. 

पुढे 1956 ला देवआनंदचा ‘फंटूश’ प्रदर्शित झाला. हा पहिला चित्रपट आहे ज्यात देवआनंद साठीची सगळी गाणी एकट्या किशोरला मिळाली. ‘फंटूश’ साठीही साहिरनीच गाणी लिहीली होती. ‘ए मेरी टोपी पलट के आ’ सारखं बिनाका हिट गाणंही यातच आहे. तोपर्यंत कुठल्याच चित्रपटात किशोरकुमारवर इतका विश्वास संगीतकारांनी दाखवला नव्हता. किशोर स्वत:च्या चित्रपटांमध्येच मग्न असायचा. त्याला दुसर्‍यांसाठी गायला वेळच नव्हता. या काळात तर खुद्द अभिनेता किशोरवरची 13 गाणी अशी आहेत ज्यासाठी रफी, मन्ना डे, महेंद्र कपुर आणि चक्क शमशाद यांनी साठी आवाज दिला आहे. 

 किशोरच्या आवाजात आर्त गाणी शोभत नाहीत असा एक गैरसमज तयार झाला होता. पण सचिनदांनी या चित्रपटात ‘दुखी मन मेरे सुन मेरा केहना’ सारखं गाणं त्याच्याकडून गावून घेतलं आणि हा आरोप खोडून काढला. एरव्ही किशोर गायचा ते सैगलच्या प्रभावात. नसता ऑडलिंग करत मस्तीखोर आवाजात. पण मध्य प्रवाहात त्याचा आवाज वापरून त्याची क्षमता या चित्रपटात सिद्ध झाली. (हुस्नलाल भगतराम यांनी ‘काफिला’ (1952) मध्ये ‘वो मेरी तरफ यु चले आ रहे है’ आणि अनिल विश्वास यांनी ‘फरेब’ (1953) मध्ये ‘हुस्न भी है उदास उदास’ या गाण्यांमध्ये किशोरच्या आवाजाची ही ताकद सिद्ध केली होती. पण हे चित्रपट फारसे गाजले नाहीत. परिणामी ही गाणीही बाजूला पडली.)

राज कपुरचा ‘चोरी चोरी’ याच वर्षी आला. हा पहिलाच चित्रपट ज्यात राज कपुरसाठीची तिनही गाणी मन्नाडे नी गायली आणि तीही सगळी लता सोबतची प्रेमाची गीतं. ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’ आणि ‘ये रात भिगी भिगी’ तर बिनाकात हिट ठरली. लताची एकटीचे ‘पंछी बनू उडती फिरू’ पण बिनाकात हिट होते. याच चित्रपटातील कठपुतळ्यांच्या खेळातले ‘जहां मै जाती हूं’ तर आजही कठपुतळीचा खेळ करणारे आवर्जून वापरतात. 

‘आवारा हूं’ किंवा ‘मेरा जुता है जपानी’ यांमुळे तयार होणार्‍या प्रतिमेसोबत ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या ‘श्री 420 मधील’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील गण्यांनी राज-नर्गिस जोडी तरूणांच्या हृदयात प्रेमाचे प्रतिक बनली. 
1957 ला दिलीप कुमारचा ‘नया दौर’ अतिशय गाजला. यातील दिलीप कुमारची सगळीच गाणी रफीच्या आवाजात होती. नंतर परत कधी इतकी जास्त गाणी दिलीप कुमारला मिळाली नाहीत. हळूवार प्रेमाची गाणी दिलीपकुमारच्या वाट्याला फार थोडी आली. त्यात नया दौर मधील ‘मांग के साथ तुम्हारा’ चा क्रमांक सगळ्यात वरती लावावा लागेल. ‘उडी जब जब जुल्फे तेरी’ असो की ‘साथी हाथ बढाना’ असो. इतकंच काय पण देशप्रेमानं रंगलेलं ‘ये देश है वीर जवानों का’ सारखं गाणं असो. रफीच्या आवाजानं कमाल केली आहे. दिलीप कुमारची प्रतिमा प्रेमाचे प्रतिक म्हणून फारशी तयार झाली नाही. तरी नया दौर, गंगा जमुना, मधुमती आणि लीडर मुळे वैजयंतीमाला सोबत त्याची अशी प्रतिमा काहीशी तयार होवू शकली. 

राज-नर्गिस नंतर देवआनंद-नुतन ही प्रेमाचे प्रतिक बनलेली अजून एक जोडी. या जोडीचा पहिला चित्रपट ‘पेईंग गेस्ट’ याच वर्षीचा.  यातील सगळीच गाणी गाजली. देव आनंदसाठी किशोरचाच आवाज सचिदांनी यात सगळ्या गाण्यात वापरला आहे. ‘माना जनाब ने पुकारा नही’ अणि ‘हाय हाय हाय ये निगाहे’ सारखी नशिली गाणी किंवा आशा सोबतचे सदा बहार ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा’ आणि ‘ओ निगाहे मस्ताना’ पण यातीलच.

या वर्षी राजकपुरचा ‘शारदा’ प्रदर्शित झाली. पण त्यात राजकपुरसाठी कुठलंच विशेष गाणं नाही. यातलं गाजलेलं गाणं ‘ओ चांद जहां वो जाये’ लता-आशाच्या आवाजात आहे. 

दिलीपकुमारचा दुसरा चित्रपट ‘मुसाफिर’ याच वर्षी आला पण त्यात त्याच्यासाठी गाणी नव्हती. 

1958 हे वर्ष दिलीप कुमारसाठी मोठं गमतीचं. रफीचा/तलतचा आवाज त्याच्यासाठी पोषक ठरून गेलेला आणि या वर्षी त्याच्या गाजलेल्या दोन्ही चित्रपटात मुकेशची गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. ‘मधुमती’ मधील रफीच्या आवाजातील ‘टूटे हूये ख्वाबों ने’ पेक्षा मुकेशच्या आवाजातील ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’ आणि मुकेश-लताचे ‘दिल तडप तडप के कह रहा है’ जास्त पसंत केल्या गेलं. दुसरा चित्रपट होता शंकर जयकिशनच्या संगीतातला ‘यहूदी’ आणि त्यातलं गाणं गाजलं ते परत मुकेशच्या आवाजातलं ‘ये मेरा दिवानापन है’.

या वर्षी राज कपुरचा लाडका संगीतकार शंकर जयकिशन दिलीपकुमारच्या चित्रपटाला संगीत देत होता तर खुद्द राज कपुरसाठी खय्याम ‘फिर सुबह होगी’आणि दत्तराम ‘परवरीश’ यांनी बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिले. साहिरच्या लेखणीतून उतरलेलं अप्रतिम गाणं ‘वो सुबह कभी तो आयेगी’ आणि बिनाकात गाजलेलं ‘चिनो अरब हमारा’ ही दोन्ही गाणी मुकेशच्या आवाजात साकारली होती. ‘परवरीश’ मधील मुकेशचं सदाबहार ‘आंसू भरी है जीवन की राहे’ हसरतनी शब्दबद्ध केलं होतं. 

देव आनंदचा ‘कालापानी’ याच वर्षी बॉक्स ऑफिस हिट ठरला. किशोर सोडून परत रफीचा आवाज यात सचिनदांनी वापरला आहे. ‘हम बेखुदी मे तूमको’ सारखं गाणं रफीच्या आवाजामूळेच जास्त परिणामकारक ठरलं इतकं की रसिकांनी इतर गाण्यांपेक्षा यालाच बिनाकात पसंती दिली. रफी-आशाचं मस्तीखोर ‘अच्छा जी मै हारी चलो मान जावो ना’ आणि ‘ओ छुपने वाले सामने आ’ यातीलच. 

1958 ची कसर राज कपुरने 1959 च्या ‘अनाडी’ मधून भरून काढली. राज कपुरसाठी म्हणून खास रचल्या गेलेलं ‘सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी’ रसिकांना जास्त भावून गेलं. सदाबहार राज-मुकेश आयकॉनिक ‘किसी की मुस्कूहारटों पे हो निसार’ यातच आहे. मुकेशचा आवाज या चित्रपटात राज कपुरला इतका भावून गेला की  ‘वो चांद खिला’ सारख्या लता सोबतच्या प्रेमाच्या गाण्यातही मन्नाडे ऐवजी त्याचाच वापर करण्यात आला. दुसरंही प्रेमाचं गाणं ‘दिल की नजर से’ लतासोबतचं मुकेशलाच मिळालं. 

या दुसर्‍या टप्प्याचा शेवट होतो 1960 ला. दिलीप-देव-राज यांचे चार चित्रपट या वर्षी बॉक्स ऑफिस हिट झाले. दिलीपकुमारचा ‘मोगल-ए-आझम’ सगळ्यात गाजला. पण त्यात दिलीपकुमारला एकही गाणं नाही.  हिंदी चित्रपटातील सगळ्यात सुंदर तरल प्रेम प्रसंग या चित्रपटात होता. सलीम अनारकलीला आपल्या महालात बोलावतो. बाहेर खुल्या अंगणात झाडाखाली चांदण्या रात्रीत तो तिच्या चेहर्‍यावरून पीस फिरवत आहे. या पार्श्वभूमीवर उस्ताद बडे गुलाम अलींची सोहनीतील बंदिश ‘प्रेम जोगन बन के’ वापरली आहे. बडे गुलाम अलींचा अफलातून लागलेला आवाज. रूढ अर्थानं हे काही गाणं नाही पण हा सर्वोत्तम सांगितिक तुकडा आहे. 

पण याच वर्षीच्या दुसर्‍या चित्रपटात ‘कोहिनूर’ मध्ये मात्र दिलीपकुमारसाठी सात गाणी वापरत नौशाद यांनी सगळा अनुशेष भरून काढला आहे. यातलं ‘मधुबन मे राधिका’ तर अतिशय गाजलं. बिनाकातही ते हिट होतं. दुसरं लता सोबतचे ‘दो सितारों का जमी पर है मिलन’ अजरामर आहे. 

नर्गिस शिवायचा राज कपुरचा गाजलेला चित्रपट म्हणजे या वर्षीचा ‘जिस देश मे गंगा बेहती है’. एक दोन नाही तर मुकेशची तब्बल चार सोलो गाणी यात आहेत. राज कपुरसाठी आयकॉनिक ठरणार्‍या गाण्यांच्या पंक्तितलं ‘होठों पे सच्चाई होती है’ किंवा ‘मेरा नाम राजू घराना अनाम’ यातलंच. राज कपुरच्या कँपमध्ये कधीच न आढळणारा गीता दत्तचा आवाजही याच चित्रपटातील ‘हम भी है तूम भी हो’ या कव्वालीत रसिकांना ऐकायला मिळाला. 

किशोर सोडून देवआनंद या वर्षी परत रफीकडे वळला. सचिनदेव बर्मन आणि शैलेंद्र असं एक अतिशय वेगळंच रसायन आहे. याच रसायनाची जमलेली भट्टी म्हणजे या वर्षीचा ‘कालाबाजार’. रफीची एक दोन नाही तर चार चार गाणी त्यातही परत तीन सोलो यात आहेत. ‘खोया खोया चांद’ आणि ‘अपनी तो हर आह’ यांच्यावर तर रसिकांनी  बिनाकात शिक्कामोर्तब करूनच ठेवलं. पण त्यासोबत रफी किशोर शिवाय फार कमी वेळा देवआनंद साठी गायलेल्या मन्नादांचं लतासोबतचं सुंदर गाणं ‘सांज ढली दिल की कली’ यात आहे. रफीसोबत लताचा बेबनाव झाल्यामुळे ‘रिझझिम के तराने लेके आयी बरसात’ मध्ये रफी सोबत गीताचा आवाज सचिनदांनी वापरला आहे. गीतानंही आपलीच निवड कशी योग्य होती हे सिद्धच करून दाखवलं आहे. 

4.
1960 ला हिंदी गाण्यांच्या बहराचा दुसरा टप्पा संपतो आणि उताराला सुरवात होते. आश्‍चर्य म्हणजे दिलीप-देव-राज यांचाही उतरणीचा काळ सुरू होतो. अपवाद काहीसा फक्त देवआनंद. यानंतर त्याचे ‘हम दोनो’ (1961), ‘जब प्यार किसीसे होता है’ (1961), ‘असली नकली’ (1962), ‘तेरे घर के सामने’ (1963) आणि ‘गाईड’ (1965) हे हिट चित्रपट आले. दिलीप कुमारचा केवळ ‘गंगा जमुना’ (1961) हा आणि राज कपुरचा ‘संगम’ (1964) असे एक एकच चित्रपट आले.

आता जमाना राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, विश्वजीत, जॉय मुखर्जी, धर्मेंद्र यांचा सुरू झाला होता. मधुबाला, मीनाकुमारी, नलिनी जयवंत, गीता बाली, कल्पना कार्तिक, निम्मी, बिना रॉय, नर्गिस, वैजयंती माला यांची जागा साधना, आशा पारेख, माला सिन्हा, वहिदा रेहमान, नंदा, सायरा बानो यांनी घेतली होती. शंकर जयकिशनचा थोडा अपवाद वगळता इतर संगीतकारही मागे पडत चालले होते. आता लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राहूल देव बर्मन यांनी हिंदी गाण्यांचा पट व्यापून टाकला होता. 

1966 ला राहूल देव बर्मनचा तिसरी मंझिल आला. त्यातून नव्या संगीताची रसिकांच्या नव्या आवडीची चाहूल  स्पष्ट झाली. ‘घिर आयी घर आजा’ (छोटे नवाब-1963) सारखं शास्त्रीय संगीतावर आधरलेलं गाणं देत सचिनदांचा वारसा सिद्ध करणारा आर.डी. आता ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ म्हणायला लागला तेंव्हा जून्या गाण्यांच्या दर्दी रसिकांना पूरतं कळून चुकलं की हे ‘आजा आजा’ आपल्यासाठी नाही. हा दुसर्‍याच कुण्या लोकांचा ‘प्यार’ आहे.   

1949 ते 1966 या हिंदी गाण्यांच्या सुवर्ण काळात दिलीप देव राज यांचे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट

दिलीप कुमार - (1949- अंदाज), (1950- बाबूल,आरजू), (1951-दीदार), (1952-आन,दाग, संगदिल),  (1953-फुटपाथ, शिकस्त), (1954-अमर), (1955-देवदास,उडन खटोला, आझाद, इन्सानियत), (1957-नया दौर, मुसाफिर), (1958-मधुमती, यहूदी), (1960- कोहिनूर, मोगल-ए-आझम), (1961-गंगा जमुना)

देव आनंद - (1951-बाजी), (1952-जाल), (1953-हमसफर, राही),  (1954-टॅक्सी ड्रायव्हर), (1955-मुनिमजी, इन्सानियत), (1956-फंटूश, सी.आय.डि.), (1957-पेईंग गेस्ट), (1958-कालापानी), (1960- काला बाजार), (1961-हमदोनो, जब प्यार किसीसे होता है), (1962-असली नकली), (1963-तेरे घर के सामने),  (1965-गाईड)

राज कपुर - (1949- अंदाज, बरसात), (1950- सरगम), (1951-आवारा),  (1953-आह), (1955-श्री 420), (1956-चोरी चोरी),  (1957-शारदा), (1958-परवरीश, फिर सुबह होगी), (1959-अनाडी), (1960- जिस देश मे गंगा बेहती है), (1964-संगम)

-आफताब परभनवी.

Sunday, 11 March 2018

शम्मी- कहां हो तूम जरा आवाज दो...


अक्षरनामा, 10 मार्च  2018

शम्मी रसिकांच्या स्मरणात होती एक गोड अवखळ म्हातारी म्हणूनच. वयाच्या 88 व्या वर्षी शुभ्र म्हातारपण आनंदानं उपभोगत असताना झोपेत तिनं शेवटचा श्‍वास घेवून शांतपणे जगाचा निरोप घेतला. तिच्या उत्तर आयुष्यातल्या चरित्र भूमिका गाजल्या. टिव्ही मालिकांमध्ये तिला प्रचंड मागणी होती. (देख भाई देख, जबान संभालके, श्रीमान श्रीमती, कभी ये कभी वो, फिल्मी चक्कर ते अगदी शेवटची टिव्ही मालिका शिरी फरहाद की तो निकल पडी पर्यंत.) स्मरणशक्ती थोडी ताणली तर  चित्रपटांतील तिच्या चरित्र भूमिकाही रसिकांना आठवतात. कुली नं. 1, मर्दोवाली बात, हम साथ साथ है, गुरूदेव, गोपी किशन, हम, इम्तीहान. 

अजून मागे स्मरण शक्ती नेली तरी हाती लागतात 80 च्या दशकाती तिच्या छोट्या पण लक्षात राहणार्‍या भूमिका-आंचल, कुदरत, आवारा बाप, स्वर्ग. याहीपुढे स्मरण शक्ती ताणत नेली तर आपण जावून थांबतो थेट शशी कपुर-नंदाच्या ‘जब जब फुल खिले’ पर्यंत. शशी कपुर नंदाला घोड्यावर बसवून कश्मिरच्या अप्रतिम सौंदर्य दाखवत फिरवत आहे. नंदाच्या मागे घोड्यावर बसलेली लाल स्वेटर मधील तिची मैत्रिण म्हणजे शम्मी. बस्स... याच्यापुढे आपली स्मरणशक्ती जात नाही. 

जून्या गाण्यांचा एक प्रचंड मोठा तोटा म्हणजे ही गाणी रेडिओच्या काळातली गाणी होती. त्यामुळे ती खुप ऐकल्या गेली पण पाहिली गेली नाहीत. मग एखाद्या गाण्याचा उल्लेख केला तर गाण्याचे शब्द नी शब्द आठवतात. त्यातील संगीताचे तुकडेही लख्ख आठवतात. पण बर्‍याचदा हे गांण कुणावर चित्रित आहे ते मात्र लक्षातच येत नाही. 

आता शम्मीचंच बघा ना. गायक  मुकेशने 1951 मध्ये ‘मल्हार’ नावाचा एक चित्रपट निर्माण केला होता.  त्यातील लता-मुकेशचे अजरामर गाणं म्हणजे 

बडे आरमान से रख्खा है बलम तेरी कसम 
प्यार की दुनिया मे ये पेहला कदम  

राज कपुरसाठी सुरवातीला मुकेशचाच आवाज वापरून ट्रेंड सेट करण्यात पुढाकार घेणारा शंकर जयकिशन सोबतचा दुसरा संगीतकार म्हणजे रोशन. बावरे नैन (1950) मध्ये त्यानं मुकेशला राज कपुरसाठी वापरलं होतं. याच रोशनकडे मुकेशननं ‘मल्हार’ चं संगीत सोपवलं होतं. रोशननं या संधीचं सोनं केलं. ‘बडे आरमान से रख्खा है बलम तेरी कसम’ या गाण्यात नायक अर्जुन सोबत जी नायिका आहे ती म्हणजे शम्मी. लहानपणीचे नायक नायिका एकमेकांमागे धावत धावत पायर्‍या चढत आहे. गाण्याची सुरवात होते तेंव्हा ते पाठमोरे असतात. कॅमेरा त्यांना पकडू पहातो. धावता धावता ते मोठे होतात. लहानपणातून मोठं होण्यासाठी गाण्याची ही ट्रिक काही चित्रपटांमध्ये त्या काळात यशस्वीरित्या वापरली गेली. 

या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. गाणं तर गाजलं. मुकेशची गायक म्हणून दमदार कारकीर्द सुरू झाली. पण या चित्रपटाची शोकांतिका म्हणजे नायक अर्जून, गीतकार कैफ इरफानी आणि नायिका शम्मी यांना कुणालाच पुढे फार व्यवसायिक यश मिळालं नाही. अगदी रोशनलाही कमीच चित्रपट मिळाले.

शम्मीला कामाची गरज होती. चांगले चित्रपट वाट्याला येईपर्यंत हातावर हात ठेवून वाट बघत बसणे शक्य नव्हते. तिने शांतपणे येईल ते चित्रपट स्विकारायचा व्यवहार्य मार्ग पत्करला. 

गुरूदत्तच्या चित्रपटांमधून जॉनी वॉकरची एक विशिष्ट प्रतिमा तयार होत चालली होती. त्याच्यासाठी खास गाणी संगीतकार योजून ठेवायचे. अशाच एका चित्रपटांत ‘मुसाफिरखाना’ (1955) मध्ये त्याच्या वाट्याला एक गाणं आलं. मजरूह सुलतानपुरी- ओ.पी.नय्यर या जोडीच्या बहराचा हा काळ. 

थोडासा दिल लगा के देख 
नैनों से मुस्कुराके देख 

मेरा ना बन सके अगर 
अपना हमे बना के देख 

या गाण्यात जॉनी वॉकर सोबत फुग्याच्या बाह्या असलेला फ्रॉक घालून धमाल नाचणारी नायिका म्हणजे शम्मी. शमशाद-रफी यांच्या शब्दांतील अवखळपणा पडद्यावर साकार करण्यात जॉनी सोबत शम्मी कुठेही कमी पडली नाही.

शम्मीला दुय्यम भूमिका मिळत गेल्या पण त्या तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्मरणिय ठरवल्या. दुय्यम भूमिकांत मिळालेली गाणीही तिनं जीव ओतून रंगवली. सी. रामचंद्र यांच्या ‘राजतिलक’ (1958) मध्ये तिच्या वाट्याला चरित्र अभिनेता आगा सोबत एक गाणे आले. बैलगाडी चालविणारा आगा आणि बैलगाडीत गवताच्या गंजीवर बसून ऊस खाणारी गावाकडच्या वेशातली शम्मी. रफी-आशा च्या आवाजातील हे गाणं आहे 

चलना संभल संभल के जी चलना संभल के
हो राही हो ... हो राही हो...  

या जोडीच्या मागुन येणार्‍या गाडीत पदमिनी आहे. ती पण गात आहे. पण ती इतकी नटलेली दाखवलेली आहे की शम्मी जशी नैसर्गिक वाटते तशी ती वाटत नाही.

याच वर्षी ‘आखरी दांव’ (1958) हा नुतन-शेखर यांचा मदन मोहन च्या संगीताने नटलेला चित्रपट पडद्यावर आला. यात नुतनवरच्या दोन गाण्यांत शम्मी तिची मैत्रिण म्हणून सोबत दाखवलेली आहे. पहिलं गाणं आहे रफीच्या आवाजातील 

‘तुझे क्या सुनाऊ मै दिलरूबा 
तेरे सामने मेरा हाल है
तेरी इक निगाह की बात है
मेरी जिंदगी का सवाल है

आणि दुसरं सुंदर गाणं आशाच्या खट्याळ आवाजात आहे 

‘हाय उनकी वो निगाहे
दिल देखे जिनकी राहे
कोई उनसे जाके पुछे
हम क्यु न उनको चाहे

या गाण्यात शम्मीच्या तोंडी मदन मोहननं शिट्टीचा वापर केला आहे. शम्मीच्या शिट्टीनं गाण्याची नजाकत वाढवली आहे. गाडी चालवणारा बावरलेला नायक शेखर आणि मागे मस्ती करणार्‍या नुतन आणि शम्मी असं पडद्यावर जमून गेलेलं रसायन आहे. लताच्या आवाजाच्या प्रेमात असलेल्या मदन मोहननं गीता किंवा अशाला अशी मोजकीच पण फार सुरेख गाणी दिली आहेत.

अशोक कुमार-निरूपा रॉय यांच्या ‘कंगन’ (1960) मध्ये मा. भगवान आणि शम्मी यांच्यावरही एक मस्त गाणं संगीतकार चित्रगुप्तनं दिलं आहे. सी.रामचंद्र यांच्याशी भांडण झाल्यावर गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी चित्रगुप्त यांना आपल्याकडचे चित्रपट द्यायला सुरवात केली. हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांचच आहे. गीता-रफी यांच्या इतर गाण्यांचा उल्लेख नेहमी होतो पण या गाण्याचा फारसा होता नाही. हे गाणं आहे 

जवाब नही जवाब नही 
गोरे मुखडे पर तिल काले का 

मा. भगवान, जॉनी वॉकर पुढे चालून मेहमुद यांनी विनोदी भूमिका करताना आपल्यासाठी खास गाणी मागून घेतली आहेत. त्यांची गाणी बर्‍यापैकी गाजलीही आहेत. नायिकांमध्ये हे यश शम्मी मग शुभा खोटे यांना मिळालं. 

शम्मीच्या कारकर्दीतील उल्लेख करावा असं शेवटचं गाणं म्हणजे मीनाकुमारी-राजकुमार यांच्या गाजलेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ (1960) मधलं 

शीशा ए दिल इतना ना उछालो
ये कही टूट जायेगा ये कही फुट जायेगा

खरं तर हे गाणं काही शम्मीवर नाही. गाणं आहे मीनाकुमारीवरच. समुद्रकिनारी पाण्यात मस्ती करणार्‍या मैत्रिणींवर हे गाणं चित्रित आहे. यात शम्मी गाजली ते तिच्या बिकीनीमुळे. त्याकाळात हे धाडस कुठली नायिका करत नव्हती. शम्मी नं ते केलं.

शम्मीनं आपली कारकीर्द छोट्या छोट्या भूमिका करत पुढे नेली. तिने कधी तक्रार केली नाही. आयुष्यातील कठिण प्रसंगी अंगावरच्या कपड्यानिशी घरातून बाहेर पडून परत आपली कारकीर्द उभी करून दाखवली. जिद्दीनं शांतपणे आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावली. 

शम्मीसाठी लता-गीता-आशा-शमशाद सगळ्या आघाडीच्या गायिकांनी गाणी गायली. नायिकेची नसली तरी नंतर सहनायिकेची नंतर चरित्र नायिकेची आणि शेवटी शेवटी खट्याळ म्हातारीची भूमिका तिनं मन:पूर्वक रंगवली.  आपल्या छोट्याश्या भूमिकांच्या मोठ्या कारकिर्दीचा मनापासून आनंद लुटला आणि रसिकांनाही दिला.

शम्मीचा गाण्यासाठी जो चित्रपट गाजला त्या ‘मल्हार’ मध्ये एक आर्त गाणं आहे. 

‘कहां हो तूम जरा आवाज दो हम याद करते है, 
कभी भरते है आहे और कभी फरयाद करते है ’ 

लताच्या कोवळ्या आवाजाला अतिशय साजेसा अभिनय शम्मीनं केला होता. खरं तर तिचे गोबरे गाल, बॉब केलेले केस, खट्याळपणा दाखवणारे छोटे डोळे हे दु:ख व्यक्त करायला पोषक नाहीत. आज शम्मीच्या जाण्यानं रसिक ‘कहां हो तूम जरा आवाज दो’ असंच म्हणताहेत. 

तिला विनम्र श्रद्धांजली !      
      
   -आफताब परभनवी.

Monday, 29 January 2018

प्रेम गीत‘माला’


रविवार 28 जानेवारी  2018 दै. महाराष्ट्र टाईम्स, 

ती तशी नशिबानच. गुरूदत्त जीला पहात ‘हम आपकी आंखो मे इस दिल को बसा दे तो’ म्हणायचा. देवआनंद तिच्यामुळे चंद्राला ‘धीरे धीरे चल चांद गगन मे’ आळवायचा. नवखा राजेंद्रकुमार तिच्याकडे प्रेमाची याचना करायचा  ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’. धसमुसळा शम्मी कपुर ‘या अल्ला या अल्ला दिल ले गयी’ हे तिलाच उद्देशून म्हणायचा.  ती हिंदी नायिका म्हणजे माला सिन्हा. नुकतंच तिला फिल्म फेअरचा ‘जीवन गौरव’ देवून सन्मानित करण्यात आलं. माला सिन्हानं नुकतीच वयाची 81 वर्षे पूर्ण केली. म्हणजे तिचं सहस्त्रचंद्र दर्शन पूर्ण झालं. वयाच्या या टप्प्यावर तिला जीवन गौरव देवून सन्मानित केल्या गेलं हे खरंच उचितच झालं.  

तिची तशी कधीच उपेक्षा झाली नाही. सतत चांगले चित्रपट  मिळत गेले. तिच्या सोबतचे नायक नविन नायिकांसोबत चंदेरी पडद्यावर झळकत होते तेंव्हा तीही नविन नायकांसोबत झळकू लागली. हे भाग्य तिच्याशिवाय इतर कुठल्याच नायिकेला इतके लाभले नाही. 

माला सिन्हाची युगल प्रेम गीतं पडद्यावर विशेष गाजली. पहिलं तिचं अजरामर गीत ‘प्यासा’ (1957) तलं ‘हम आपकी आंखो मे इस दिल को बसा दे तो.’ साहिर-सचिनदेव बर्मन-रफी-गीता-गुरूदत्त हे सगळेच एकापेक्षा एक दिग्गज. यात कमी पडू शकत होती ती केवळ माला सिन्हा. कारण ती तेंव्हा नवखी होती. मधुबाला नाही म्हणाली आणि ही भूमिका माला सिन्हाच्या वाट्याला आली. या संधीचं तिनं सोनं केलं.

याचवर्षी आलेला माला सिन्हाचा ‘नौशेरवा-ए-दिल’ प्यासा च्या यशामुळे काहीसा बाजूला पडला. नवख्या राजकुमार सोबत या चित्रपटात सी. रामचंद्र यांनी लता-रफीच्या आवाजात एक अफलातून गोड गाणं दिलं आहे, ‘तारों की जुबां पर है मुहोब्बत की कहानी, ए चांद मुबारक हो तूझे रात सुहानी’. 'प्यासा'तील नखरेल पोशाखापुढे या गाण्यातील मालाचा अतिशय साधा पोशाख, देखण्या गुरूदत्तसमोर सामान्य वाटणारा राजकुमार. पण हे सामान्यपण लता-रफीच्या आवाजानं, सी.रामचंद्र यांच्या संगीतानं आणि माला सिन्हाच्या भावस्पर्शी चेहर्‍याच्या श्रीमंतीनं भरून काढलं आहे.

गीता दत्तचा भाऊ मुकूल रॉय हा एक गुणी संगीतकार. त्याच्या वाट्याला अतिशय थोडे चित्रपट आले. त्यातला एक होता माला सिन्हा- प्रदीप कुमारचा ‘डिटेक्टीव्ह’ (1958). मुकूल रॉय च्या गाण्याला शैलेंद्रची शब्दकळा लाभलेली आहे. हेमंतकुमार-गीताचे हे हळूवार प्रेमगीत आहे ‘मुझको तूम जो मिले, ये जहां मिल गया’.

ओ.पी.नय्यर शिवाय कोण कोणत्या संगीतकारांनी खास तुमच्यासाठीच गाणी रचली असा प्रश्‍न आशा भोसलेला विचारला गेला होता. त्याला अपेक्षा असणार आशा आर.डी.बर्मनचे नाव घेईल. पण आशाने दोनच नावं घेतली. एक होतं रवी आणि दुसरं नाव होतं मराठी संगीतकार एन.दत्ता याचे. एन.दत्ताने आशासाठी खरंच खास गाणी दिली आहेत. ‘जालसाज’ (1959) हा माला-किशोरकुमार यांचा चित्रपट. यात मजरूहच्या शब्दांना आशा-किशोर यांचा सुंदर स्वरजसाज एन.दत्ताने चढवला आहे. हे गाणं आहे ‘प्यार का जहां हो, छोटा सा मकां हो, जिसमे रहे हम, जिसमे रहे तूम, कोई न जहां हो’. आजच्या गीतकारांनी मजरूहची गाणी समोर ठेवून एकलव्यासारखी साधना करायला हवी. सोपेपणा आणि गोडवा मजरूह-शैलेंद्र यांच्याशिवाय आजतागायत कुणाला हिंदी गीतांत इतका प्रत्ययकारकपणे आणता आला नाही. 

गुरूदत्तच्या ‘प्यासा’ नंतर लगेचच माला सिन्हाला राज कपुर सोबत चित्रपट मिळाला. तो होता ‘फिर सुबह होगी’ (1959). खय्याम यांनी अतिशय मोजक्या अशा चित्रपटांना संगीत दिलं पण त्यांची दखल आवर्जून घेतली जाते कारण ती गाणीच तशी अभिजात आहेत. यातही मुकेश-आशा यांच्या आवाजात ‘फिर न किजीये मेरी गुस्ताख निगाही का गिला, देखिये आपने  फिर प्यार से देखा मुझको’ हे गाणं अतिशय गोड आहे. मुकेशच्या या पहिल्या ओळीला आशाच्या आवाजात साहिरनं दिलेलं उत्तर आहे ‘मै कहां तक ये निगाहों को पलटने देती, आपके दिल ने कई बार पुकारा मुझको’. हाच साहिर याच चित्रपटात देशप्रेमाचे ‘चिनो अरब हमारा’ लिहीतो आणि प्रेमाची अलवार गाणीही त्याच ताकदीनं लिहीतो ही कमाल आहे. 

याच वर्षी राजकपुर सोबत माला सिन्हाचा अजून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. तो म्हणजे दत्तराम वाडकर यांच्या संगीताने नटलेला ‘परवरीश’. या चित्रपटाचे नांव घेतले की मुकेशच्या आवाजातील लोकप्रिय गाणे ‘आंसू भरी है जीवन की राहे’ रसिकांना आठवतं. पण यात एक अतिशय सुरेल युगल  गीत मन्ना डे आणि लताच्या आवाजात आहे, ‘मस्ती भरा है समां, हम तूम है दोनो जवां’. लता-मन्नादाची अविस्मरणीय अशी मोजकीच गाणी आहेत. त्यात याही गाण्याचा समावेश करणे भाग आहे. 

गुरूदत्त-राजकपुर नंतर माला सिन्हानं शम्मी कपुर सोबत ‘उजाला’ (1959) मध्ये काम केलं. मालाचं नशिब म्हणजे यातही तीला एक लोकप्रिय गाणं मिळालं. हे गाणं होतं ‘या अल्ला या अल्ला दिल ले गयी’. नदीच्या पाण्यात म्हैस धुणारी माला सिन्हा आणि पाणी उडवत खोड्या काढणारा शम्मी कपुर. शंकर जयकिशनचं धडाकेबाज संगीत.  लता-मन्नादाचा आवाज. असा सगळा जमून आलेला मसाला या गाण्यात आहे. 

माला नशिबवान यासाठी की तीला सतत मोठे नायक आणि चांगली प्रेमगीतं मिळत गेली. आता हेच पहा ना याच उजाला सोबत याच वर्षी तिचा ‘लव्ह मॅरेज’ देखण्या देवआनंद सोबत प्रदर्शित झाला. याच शंकर जयकिशननं एक सुंदर प्रेमगीत माला-देवआनंद यांच्यावर यात बेतलं. रफी-लताच्या आवाजातील हे गाणं होतं, ‘धीरे धीरे चल चांद गगन मे, कही ढल ना जाये रात टूट ना जाये सपने’.माला सिन्हाचा गोलसर चेहरा, मोठ्या केसांचा आंबाडा, त्यावर वेणी, साधी साडी या प्रतिमेची अशी काही मोहिनी या काळी वर्षांत निर्मात्यांना दिग्दर्शकांना पडली होती की प्रत्येक चित्रपटात एक तरी प्रेमगीत तिला मिळालंच आहे. आणि आश्‍चर्य म्हणजे ही गाणी अविस्मरणीय अशीच ठरली आहेत मग नायक कुणी का असेना, संगीतकार कुणी का असेना, गीतकार कुणी का असेना. 

नवख्या राजेंद्र कुमारचा गाजलेला पहिला हिट चित्रपट म्हणजे माला सिन्हा सोबतचा ‘धुल का फुल’ (1959). आशा साठी विशेष गाणी रचणार्‍या एन. दत्ताने या चित्रपटातील गाजलेलं गाणं मात्र आशाच्या ऐवजी लताला दिलेले आहे. लता-महेंद्र कपुर यांचे हे गाणे आहे ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं, वफा कर रहा हूं वफा चाहता हूं’.या गाण्यांपासून पुढे महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातील गाण्यांची एक लाटच हिंदी चित्रपटांमध्ये आली. 

देवआनंद सोबत पुढे गाजलेला माला सिन्हाचा चित्रपट ‘माया’ (1961). खय्याम सारखंच अतिशय मोजकं पण अभिजात संगीत देणारा संगीताकार म्हणजे सलील चौधरी.  यातील गोड प्रेमगीत हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. कुठलंही प्रील्युड (शब्दांच्या आधीचं संगीत) नसतांना लताचा अप्रतिम स्वर-मजरूहचे शब्द उमटत जातात, ‘तस्वीर तेरी दिल मे, जिस दिन से उतारी है’ मग देवआनंदची मस्तभरी नजर मालासिन्हाच्या नजरेला भिडते. पार्श्वभूमीवर बासरीचे सुर अलवारपणे वाजतात. शांतपणे संगीत सुरू होतं. पुढचं स्वरवाक्य उमटतं, ‘फिर तूझे संग लेके, नये नये रंग लेके, सपनोंकी मेहफील मे’. हे गाणं सांगितिकदृष्ट्याही अतिशय आव्हानात्मक आहे. एका मुखड्यात ५ स्वर वाक्य आहेत.  लता-रफी सारखे गायकच हे पेलू शकतात. सलील चौधरींच्या रचना गायला सगळ्यात कठिण असतात असं लतानं एक मुलाखतीत सांगितलं आहे.

याचवर्षी ‘सुहाग सिंदूर’ (1961) मध्ये तलत-लताच्या आवाजात चित्रगुप्तनं एक मधुर गाणं दिलं आहे. राजेंद्रकृष्णने लिहीलेले बोल आहेत, ‘बागोंमे खिलते है फुल कसम तेरी आंखो की खांके, आयी समझमे जो भुल, गिरे तेरी कदमों पे आके’. मनोजकुमारच्या अगदी सुरवातीच्या काळातील हा चित्रपट फारसा माहित नाही. 

मनोज कुमार सोबतचा पुढचा ‘हरियाली और रास्ता’ (1962) मात्र खुप गाजला. त्यातली गाणीही हिट ठरली. शंकर जयकिशनने यात  दोन  गीते माला-मनोज जोडीला दिली होती. ही दोन्ही  गाणी लता-मुकेशच्या आवाजात आहेत. पहिलं गाजलेलं गाणं म्हणजे शिर्षक गीत ‘बोल तेरे तकदीर मे क्या है मेरे हमसफर ये तो बता, जीवन के दो पहलू है, ये हरियाली और ये रास्ता.’ हा चित्रपट ब्लॅक ऍण्ड व्हाईट आहे. पर्वतावरून दिसणारी हिरवळीतली सुंदर नागमोडी वाट केवळ लताच्या स्वर्गीय स्वरांतून आणि शैलेंद्रच्या शब्दांतूनच समजून घ्यावी लागते. डोळ्यांना काही हिरवं दिसतच नाही. पण शंकर जयकिशनची कमाल म्हणजे तंत्राची ही त्रुटी त्यांन संगीतानं भरून काढली आहे. दुसरं आर्त गाणं आहे, ‘लाखो तारे आसमान मे, एक मगर धुंडे ना मिला’. यात मुकेश सोबत लताच आहे. पण का कुणास ठाऊक हे गाणं केवळ मुकेशचचं आहे असं भासत राहतं. स्मरणातही केवळ मुकेशचाच स्वर शिल्लक राहतो. 

‘उजाला’ नंतर शम्मी सोबत माला सिन्हाचा दुसरा चित्रपट आला होता ‘दिल तेरा दिवाना’ (1962). यालाही उजाला प्रमाणेच शंकर जयकिशनचंच संगीत होतं. एक गाणं जुन्या माधुर्याच्या वळणाचं आणि दुसरं नविन भन्नाट शम्मीच्या धसमुसळ्या शैलीतलं शंकर जयकिशननं दिलं होतं. पहिलं गोड गीत होतं, ‘मुझे कितना प्यार हे तूमसे’ तर दुसरं भन्नाट उडत्या चालीचं गाणं म्हणजे चित्रपटाचे शिर्षक गीतच होतं, ‘दिल तेरा दिवाना है’. दोन्ही गाणी लता-रफीच्याच आवाजात आहेत.

याच वर्षी मालासिन्हाचा ‘अनपढ’ अतिशय गाजला. यातली मदनमोहनची ‘आपकी नजरों ने समझा’ सारखी गाणीही गाजली. पण त्यात एकही युगल गीत मालाच्या वाट्याला नाही. 

माला सिन्हा-भारत भुषणचा ‘ग्यारा हजार लडकियां’ (1963) आशाच्या लाडक्या एन.दत्ताच्या संगीतानं नटलेला चित्रपट होता. यात मजरूहच्या शब्दातलं एक गोडवा असलेलं गाणं रफी-आशाच्या आवाजात होतं, ‘दिल की तमन्ना थी मस्ती मे, मंझिल से भी दूर निकलते, अपना भी कोई साथी होता, हम भी बहकते चलते चलते.’ हेच गाणं एकट्या रफीच्या आवाजतही दु:खी स्वरात आहे. पण रफी-आशाच्या रोमँटिक गाण्याची मजा काही औरच.

नौशाद सोबत गीतकार म्हणून शकिलची जोडी सगळ्यात जास्त गाजली. पण त्या खालोखाल त्याची रास जूळली संगीतकार रवीशी. या दोघांनी ‘चौदहवी का चांद’ मध्ये कमाल केली आहे. या जोडीचा 1963 ला आलेला चित्रपट होता  माला सिन्हा-राजेंद्रकुमार चा‘गेहरा दाग’. यात आशा रफीच्या आवाजात एक छान प्रेमगीत आहे, ‘तुम्हे पाके हमने, जहां पा ली है, जमी तो जमी, आसमां पा लिया है’. रफीसोबत आशाचा आवाज कमालीचा खुलतो. रफीची जास्त गाजलेली द्वंद्व गीतं काढली तर ती आशा सोबत तसेच गीतासोबतच जास्त निघतील.

सी.रामचंद्रचं संगीत माला सिन्हाच्या चित्रपटांना फारसं लाभलं नाही. पूर्वी आलेल्या ‘नौशेरवा-ए-दिल’ नंतर हा योग जूळून आला गुरूदत्त सेाबतच्या ‘बहुरानी’ (1963) मध्ये. हेमंत कुमार-लताच्या आवाजात एक अविस्मरणीय मधुर गाणं या चित्रपटात आहे ‘उम्र हुई तूमचे मिले फिरभी जाने क्यूं. ऐसा लगे जैसे पेहली बार मिले हो’. हेमंत कुमार यांच्या आवाजाला एक खास असा लोच आहे. तो ओळखून मोठ्या तबियतीने वापरणारा संगीतकार असेल तर गाण्यात मजा येते. सी. रामचंद्र तर मोठे प्रतिभावंत होतेच. सोबत गाण्यार्‍या लताचा आवाजही छान खुलला आहे. 

महेंद्र कपुरचा आवाज रफीला पर्याय म्हणूनच वापरला गेला. पण बी.आर.चोप्राच्या काही चित्रपटांत तो असा काही चपखल बसला आहे की त्या गाण्यांची कल्पना महेंद्र कपुरशिवाय करता येत नाही. ‘गुमराह’ (1963) मध्ये माला सिन्हा- सुनील दत्तवरचं हे गाणं ‘इन हवाओ मे, इन फिजाओ मे, तुझको मेरा प्यार पुकारे’ हे महेंद्र-आशाच्या आवाजात रसिकांच्या स्मरणात कायम जावून बसलं आहे. याला संगीत रवीचं आहे. चोप्रांच्या त्या काळच्या बहुतांश चित्रपटांना रवीचं संगीत आणि साहिरची गीतं आहेत.

‘जहां आरां’ (1964) ला मदन मोहनचं अवीट गोडीचं संगीत लाभलं होतं. मालासिन्हा-भारत भुषण यांचा हा रंगीत चित्रपट. दोघांचं वाढत चाललेलं वय आता लक्षात येत होतं. पण गोड गाण्यानं त्यावर मात केली. लता-तलतच्या आवाजातील ‘ए सनम आज ये कसम खाये’ हे गाणं यातलंच. मदन मोहन सोबत गीतकार म्हणून सगळ्यात जास्त चित्रपट केले ते राजेंद्रकृष्ण यांनी. जहांआरा ला त्यांचीच गीतं आहेत. यातील दुसरं गाणं सुमन-रफीच्या आवाजात आहे. ‘बाद-ए-मुद्दत की ये घडी आयी, आप आये तो जिंदगी आयी’. सारंगीचा केलेला अप्रतिम वापर, जास्तीच्या हरकती न घेणारा सुमन कल्याणपुरचा संथ वाहत्या झर्‍यासारखा झुळ झुळता स्वर, आणि त्याला रफीच्या शांत आवाजाचे कोंदण. रफीची एक कमाल आहे की लता-गीता-आशा-सुमन-शमशाद प्रत्येकीसोबत गाताना त्याचा स्वर वेगवेगळा लागतो. हेच गाणं लतानं गायलं असतं तर रफीनं वेगळा आवाज काढला असता.   

मदन मोहननं ‘पुजा के फुल’ (1964) मध्ये रफी-आशाच्या आवाजात माला सिन्हा-धर्मेंद्र साठी ‘अब दो दिलों की मुश्किल आसां हो गयी है’ दिलं पण ते विशेष नाही. पण त्यानंच याच आवाजात ‘नीला आकाश’( 1965) मध्ये  ‘आपको प्यार छुपाने की बुरी आदत है’ दिलं जे फार गाजलं. मदन मोहनच्या लाडक्या राजा मेहंदी अली खानची गीतं या चित्रपटाला आहेत. हा चित्रपट रंगीत आहे. आपल्यापेक्षा तरूण नायकांसोबत माला सिन्हाचे चित्रपट येत गेले आणि गाजत गेले. पण आता गाण्यांचा दर्जा मात्र उतरणीला लागला होता.

माला सिन्हाचे ‘हिमालय की गोद मे’ (1965) आणि ‘बहारे फिर भी आयेगी’ (1966) हे चित्रपट गाण्यांसाठी गाजले पण यात तिच्या वाट्याला द्वंद्व गीतं नाहीत. पुढे माला सिन्हा- संजय खानच्या ‘दिल्लगी’ (1966) मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल ने  रफी-आशा कडून ‘अब जिने का मौसम’ हे गाणं गाऊन घेतलं. यातच मुकेश-लताच्या आवाजात ‘तुम मेरी जिंदगी हो’ हे गाणं पण आहे. पण ही गाणी लक्षात रहात नाहीत.

प्यासा पासून ते नीला आकाश पर्यंत जवळपास दहा वर्षे माला सिन्हाची अवीट प्रेमगीतं पडद्यावर येत गेली. रसिकांच्या कानांना तृप्त करत गेली. नंतरच्या गाण्यांनी तेवढा आनंद दिला नाही. आज सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने आणि फिल्म फेअरच्या ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या निमित्ताने माला सिन्हाच्या गाण्यांची ही मधुर आठवण.    

   -आफताब परभनवी.

Sunday, 10 December 2017

प्रेमगीतांतून कलेकलेने उमलत गेलेला ‘शशी’


अक्षरनामा, 9 डिसेंबर 2017

त्याचं वय झालं होतं. तो आजारी होता. तो जाणारच होता. पण गेला तेंव्हा ‘मॅटनी’ शो ची दूपार उदास करून गेला. मुुंबईला या काळात कधी पाऊस पडत नाही. पण त्या दिवशी सर्वत्रच उदास ढग दाटून आले होते. पाऊसही कोसळलायला लागला होता.  रवीच लोपला तेंव्हा शशी दिसायचे काही कारणच नव्हते. शशी कपुर वयाच्या 79 व्या वर्षी पंचत्वात विलीन झाला.

त्याचा पहिला चित्रपट होता ‘धर्मपुत्र’ (1961). एन.दत्ताच्या संगीतात साहिरचे शब्द शशी कपुरच्या तोंडी होते. तेंव्हा दुय्यम समजल्या गेलेल्या महेंद्र कपुरचा आवाज त्याच्यासाठी वापरला गेला. इंद्राणी मुखर्जी त्याची नायिका होती. साहिरचे शब्द अप्रतिम होते पण ना देखणी कुणी नायिका समोर होती ना रफीसारखा मधाळ आवाज होता.

भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे
रंग मे डूबी हुयी निंद से भारी आंखे

हे गाणं रसिक खरेच विसरून गेले. पुढे हीच चाल जरा घासून पुसून रवीने साहिरच्याच शब्दांत ‘गुमराह’ मध्ये वापरली तेंव्हा ती रसिकांच्या लक्षात आली. (आप आये तो खयाले दिले नाशाद आया-महेंद्र कपुर)

पुढे ‘चार दिवारी’ (1961) लगेच आला. याला सलिल चौधरीचे सुंदर संगीत होते. शैलेंद्रचे शब्दही चांगलेच होते. पण यात शशी कपुरसाठी गाणेच नव्हते. पुढे लोकप्रिय ठरलेल्या शशी-नंदा या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. नंतर याच जोडीचा दुसरा चित्रपट आला ‘मेहंदी लगे मेरे हाथ ’ (1962). याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचे. यात मुकेशचा आवाज शशी साठी वापरला गेला होता. पण यातली गाणी विशेष नव्हती. आनंद बक्षी ने गीतकार म्हणून जो कारखाना पुढे सुरू केला त्याची सुरवात इथून होते. ‘उडे पंछी टोली मे, तुझे मै ले जाऊंगा बिठलाके डोली मे’ असली शब्द रचना असल्यावर पुढे काय होणार?

शशी कपुरच्या वाट्याला आलेल्या पुढच्या चित्रपटातील अतिशय गोड गाण्यांनी रसिकांना रिझवले. हा चित्रपट होता सलिल चौधरीच्या संगीतातला ‘प्रेमपत्र’ (1962). साधना कट नसलेली गोड साधना यात शशीची नायिका होती. अंध असलेल्या शशीच्या तोंडी तलत च्या मखमली स्वरातील गाणं आहे

ये मेरे अंधेरे उजाले न होते
अगर तूम न आते मेरे जिंदगी मे

या ओळींना लताच्या गोड आवाजात साधना उत्तर देते

न जाने मेरा दिल ये क्यूं केह रहा है
तूम्हे खो न बैठू कही रोशनी मे

राजेंद्रकृष्ण यांची अतिशय सहज अशी शब्दरचना गाण्याला गोडवा प्राप्त करून देते. आधीचा संगीताचा अंधार मिटवून शशी च्या चित्रपट आयुष्यात मधुर संगीताचा उजेड इथून पडायला सुरवात होते.

यातील दुसरं गाणं मुकेश-लताच्या स्वरात आहे. इंद्राणी मुखर्जीला न शोभणारे शब्द इथे साधनासाठी मात्र अतिशय चपखल बसतात. मुकेशचा आवाज अतिशय थोड्या संगीतकारांना प्रेमगीतात चपखलपणे वापरता आलेला आहे. त्यात सलिल चौधरीचा क्रमांक वरचा लागतो. हे गाणं आहे

दो आखियां झुकी झुकी सी
कलियों से नाजूक होठों पे
कविता रूकी रूकी सी

आंघोळ करून आलेला बनियन घातलेला टॉवेल खांद्यावर असलेला मध्यमवर्गीय नोकरदार शोभणारा शशी आणि गाऊन घातलेली, न्हाऊन केस मोकळे सोडलेली साधना. शशी कपुरची घरगुती साधा माणूस हीच प्रतिमा पुढे घट्ट झाली. नंदा सेाबत त्याची जोडी जमली ती याच कारणाने. साधना-शर्मिला-राजश्री-बबिता-हेमा-राखी यांच्यापेक्षा नंदाचा साधेपणाच त्याच्यासोबत जास्त उठून दिसायचा.

‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) मध्ये शम्मी सोबत ‘तूम्हे हुस्न दे के’ या कव्वालीत शशी कपुर होता. शशी साठी रफीचा आवाज पहिल्यांदाच वापरला गेला. या कव्वालीत रफी-मन्ना-आशा सोबत लताचाही आवाज आहे. कव्वाली-मुजर्‍यांसाठी फारच कमी वेळा लताचा आवाज वापरला गेला.

याच वर्षी हैदराबादचा संगीतकार इक्बाल कुरैशीचा ‘ये दिल किसको दू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात शशी कपुर सोबत नृत्यनिपूण रागिणी नायिका म्हणून होती. रफीच्या आवाजातील

‘फिर आने लगा याद मूझे प्यार का आलम
इकरार का आलम तो कभी इन्कार का आलम’

हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात गायिका म्हणून रफी सोबत संगीतकार उषा खन्नाचा आवाज इक्बाल कुरैशी ने वापरला आहे. अर्थात उषा खन्नाला फक्त काही शब्दच आहेत. रफी-आशा च्या द्वंद्व स्वरातील ‘तेरा नाम मेरा नाम’ हे गाणं पण बर्‍यापैकी आहे. पण यावर शंकर जयकिशनच्या संगीताचा प्रभाव खुप जाणवतो. विशेषत: भरपूर व्हायोलीन्सचा वापर शंकर जयकिशनच्याच प्रमाणे करण्यात आला आहे.

सचिन देव बर्मनचे संगीत, रफीचा आवाज, शकिलचे शब्द असा सगळा सुवर्ण योग शशी साठी पहिल्यांदाच ‘बेनझीर’ (1964) मध्ये जूळून आला. पण इतकं सगळं होवूनही यातील गाण्यांची भट्टी जमलीच नाही.  त्यातल्या त्यात ‘दिल मे एक जाने तमन्ना ने जगा पायी है, आज गुलशन मे नही दिल मे बहार आयी है’ हे गाणं बर्‍यापैकी आहे. चित्रपटात अशोक कुमार-मीना कुमारी असे दिग्गज होते. त्यामुळे अपयश त्यांच्या खात्यावर जमा झाले इतकेच.

पण पुढच्याच वर्षी एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन चित्रपट शशी कपुरचे चर्चेत राहिले. पहिला चित्रपट गाजला तो म्हणजे ‘वक्त’ (1965). पण वक्त मध्ये बलराज साहनी, सुनील दत्त, राजकुमार, साधना सारखे तगडे कलाकार होते. पण या गर्दितूनही शर्मिला-शशी च्या वाट्याला एक गोड गाणं आलं. बोटीवर तरूण तरूणींची सहल निघालेली आहे. त्या प्रसंगी महेेंद्र-आशाच्या आवाजात

दिन है बहार के तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
दुष्मन है प्यार के जब लाखो गम संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करे

हे गाणं पडद्यावर साकार झालं. तेंव्हा शर्मिला-शशी कॉलेज तरूणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. दिलीप-देव-राज यांचा उतरता काळ आणि राजेश खन्नाचा अजून न आलेला जमाना या संधीकाळातील हा चित्रपट आहे. ही मधली पोकळी शशी कपुर ने भरून काढली.

खय्याम च्या संगीताने नटलेला ‘मोहब्बत इसको केहते है’ याच वर्षी आला. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ठररिये होश मे आ लू , तो चले जाईगेगा’ हे रसाळ गाणं आजही ऐकावं वाटतं. शशी कपुर-नंदा या जोडीचा राज-नर्गिस, देवआनंद-नुतन, दिलीपकुमार-वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार-साधना यांच्यासारखा विचार झाला पाहिजे.

1965 ला ‘जब जब फुल खिले है’ पडद्यावर आला आणि बघता बघता त्यानं बॉक्स ऑफिसवर धुम केली. हा पहिलाच चित्रपट आहे की ज्यानं शशी कपुरच्या पदरात निखळ यश टाकलं. या यशात वाटा मागायला दुसरा कुठलाही तगडा कलाकार चित्रपटात नव्हता. या चित्रपटानं शशी कपुर सोबत अजून दोघांच्या पदरात यशाचं माप टाकलं. नायिका नंदाचा हा सर्वात गाजलेला पहिलाच चित्रपट. तसेच संगीतकार म्हणून चाचपडणार्‍या कल्याणजी आनंदजीची कारकीर्द इथपासूनच व्यवसायीक दृष्टीने वेगवान झाली. (याच वर्षी कल्याणजी आनंदजीचा ‘हिमालय की गोद मे’ हा पण बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.)

‘जब जब फुल खिले’इतकी गाणी परत शशी कपुरला ‘शर्मिली’चा अपवाद वगळता कुठल्याच चित्रपटात मिळाली नाहीत. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ना ना करते प्यार तूम्हीसे कर बैठे’ या गाण्याला बीनाका गीतमालात स्थान भेटलं. याच चित्रपटात रफी आणि लताच्या आवाजात स्वतंत्रपणे ‘परदेसीयों से ना आखिया मिलाना’ हे गाणं आहे. पण यातील रफीच्या आवाजातील गाणंच जास्त गाजलं. बिनाकात त्या वर्षी हीट गाण्यांत हे पण होतं. पण लताच्या आवाजातील गाणं मात्र नव्हतं. ‘दो पेहलू दो रंग’ अशी जी गाणी आहेत त्यात पुरूष गायकांनी गायलेली गाणी जास्त गाजली पण त्या तूलनेत लताच्या आवाजातील गाणी मात्र गाजली नाहीत.
शशी कपुरच्या ‘बिरादरी’ (1966) मध्ये रफीच्या तोंडी एक अतिशय गोड गाणं चित्रगुप्तनं संगीतबद्ध केलं आहे.

अभी ना फेरो नजर जिंदगी सवार तो ले
के दिल के शीशे मे हम आपको उतार तो ले

यात  नायिका फरियाल पेक्षा शशी कपुरच जास्त देखणा दिसतो. विलक्षण हलता निरागस देखणा चेहरा, गालावरची खळी, एक थोडा पडका दात हे सगळे प्लस पॉईंट होते शशी कपुर साठी. याच चित्रपटात होळीचे एक भन्नाट गाणे चित्रगुप्त ने दिले आहे. रफी-सुमन-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. शशी कपुर-मेहमुद-फरियाल यांनी धमाल केली आहे पडद्यावर.

आ रा रा रंग दो सभी को इस रंग मे
आयी है रंगीली होली रे

या गाण्यापासून होळीची धिंगाणा असलेली गाणी पडद्यावर सुरू झाली. यापूर्वी ‘खेलो रंग हमारे संग’ सारखी शांत गाणी होळीची असायची होती.

या सोबतच शशी कपुरचा ‘नींद हमारी ख्वाब तूम्हारे’ (1966) हा नंदासोबतचा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाला मदनमोहनचे संगीत होते. रफीचा आवाज आता शशी कपुरसाठी रूजू लागला होता. यातही ‘यु रूठो ना हसिना’ हे गाणं रफीच्याच आवाजात आहे. पण यातलं दुसरं गाणं विशेष गाजलं. आशा-रफीचे हे गाणे होते ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’.

याच वर्षी शशी कपुर-राज़श्रीचा चित्रपट ‘प्यार किये जा’ बॉक्स ऑफिसवर तूफान चालला. नुकतीच पदार्पपण केलेली लक्ष्मीकांत प्यारेलालची जोडी या चित्रपटाची संगीतकार होती. ‘पारसमणी’ च्या गाण्यांना यश मिळालं पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. पुढच्या ‘दोस्ती’ने लक्ष्मी-प्यारे साठी कमाल केली. यानंतरचा त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘प्यार किये जा’. महेंद्र कपुर-लता च्या आजावातील ‘फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर’ चांगलंच होतं. पण बिनाकात गाजलं ते ‘गोरे हाथों पर ना जूल्म करो’ हे तूलनेनं सामान्य गाणं.

पुढे हळू हळू चित्रपट गीतांचा दर्जाच घसरायला लागला. संगीतासाठी विशेष लक्षात रहावा असा ‘शर्मिली’ (1971) हा सचिन देव बर्मनच्या शेवटच्या काळातला चित्रपट शशी कपुरला मिळाला. ‘शर्मिली’ हा त्याचा गाण्यासाठीचा शेवटचा अभिजात चित्रपट. मुकेश-रफी-तलत-महेंद्र हे आवाज शशी कपुरसाठी वापरून झाले होते. पण यात किशोर कुमारचा आवाज शशी कपुरसाठी सचिनदांनी वापरला. यातली सगळीच गाणी गाजली. चित्रपटही हिट ठरला. ‘खिलते है गुल यहा’, ‘ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली’, ‘आज मदहोश हुआ जाये रे’ किंवा ‘कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये’ सगळीची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

खरं तर मधल्या काळात इतरही चित्रपटातील त्याची गाणी गाजत होतीच.

1. राजश्री सोबत ‘दिल ने पुकारा’ (1967)- वक्त करता जो वफा
2. शर्मिला सोबत ‘आमने सामने’ (1967)-कभी रात दिन हम दूर थे
3. बबिता सोबत ‘हसिना मान जायेगी’ (1969)- बेखुदी मे सनम,
4. आशा पारेख सोबत ‘कन्यादान’ (1969)- लिखे जो खत तूझे, 
5. हेमा मालिनी सोबत ‘अभिनेत्री’ (1970)- गा रे मेरे संग मेरे साजना,
पण यांच्यातून अभिजातता हरवून गेलेली होती.

इथून पुढे सुरू होतो तो संगीतासाठी रूक्ष असा ‘दिवार’ कालखंड. शशी कपुरचा सहाय्यक अभिनेता म्हणूनचा काळ. म्हणजे दिलीप-देव-राज यांचा अस्त आणि राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांचा उदय या मधल्या काळात मैदानावर येवून बॅटिंग करण्याची नाईट वॉचमनची भूमिका त्याच्या नशिबी आली होती. ती त्याने मन:पूर्वक निभावली. थोडीशी गाणी त्याच्या वाट्याला आली. त्यातून समोर उलगडत जाते ती त्याची तरूण प्रेमिकाची भूमिका.   

     -आफताब परभनवी.