Saturday, 11 March 2017

होळीची दुर्लक्षीत गोड गाणी


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 11 मार्च 2017

होळी आली की ‘होली आयी रे कन्हाई’ (मदर इंडिया), ‘अरे जा रे हट नट खट’ (नवरंग), ‘होली के दिन दिल खिल जाते है’ (शोले), ‘रंग बरसे भिगी चुनरवाली’ (सिलसिला)  अशा काही गाण्यांची चर्चा होते, टिव्हीवर दाखवली जातात. बस्स. संपली आमची होळीच्या गाण्यांबाबतची रसिकता. याशिवाय हिंदी चित्रपटात होळीची अतिशय गोड अशी गाणी आहेत हे आपल्या गावीच  नाही. 

होळीच्या गाण्यांमध्ये पहिल्यांदा दखल घ्यावी असं गाणं 1950 च्या ‘जोगन’ चित्रपटात आहे. बुलो सी.रानी हा सिंधी संगीतकार गीता दत्तच्या आवाजाच्या विलक्षण प्रेमात होता. या चित्रपटात एक दोन नाही तर तब्बल 13 गाणी गीताच्या आवाजात त्यानं दिली आहेत. संत मीराबाईवरचा हा चित्रपट. नर्गिस यात नायिका आहे. ‘डारो रे रंग रसिया, फागुन के दिन आये रे’ असं गीताच्या आवाजातलं गाणं आहे. गाण्याची चाल तशी पारंपरिकच आहे. कोरसचा चांगला वापर केला आहे. पण आज हे गाणं तितकं पकड घेत नाही. अगदी गीताचा आवाजही वेगळा असा जाणवत नाही. नर्गिसला तसेही नाचता येत नव्हतेच. तेंव्हा त्या दृष्टीनेही गाणं प्रभाव पाडत नाही. पण हे पहिलं गाणं आहे होळीचं ज्याची दखल घ्यावी लागते. याच वर्षी ‘हमारा घर’ चित्रपटात चित्रगुप्तने शमशाद-रफीच्या आवाजात होळीचे गाणे दिले आहे. पण ते विशेष नाही.  

होळीच्या गाण्यातलं पहिलं ‘हिट’ गाणं म्हणजे 1952 च्या ‘आन’ मधलं, ‘खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगिला आया’. शमशादच्या आवाजातनं लोकगीताचा  तर लताच्या आवाजातनं नायिकेच्या नाजूक भावनांचा रंग या गीताला चढला आहे आहे. दिलीपकुमार, प्रेमनाथ, निम्मी, नादिरा अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. नौशाद यांच्या बहुतांश गाण्यांचे बोल शकिल यांनीच लिहिले. हे गाणंही शकिल यांचंच आहे. भारतीय वाद्यांचा वापर हे तर नौशाद यांचे वैशिष्ट्यच. या गाण्याच्या आशयालाही त्याचा पोषक वापर केला गेला आहे.

यानंतर पुढच्याच वर्षी (1953) ‘राही’ चित्रपटात अनिल विश्वास यांनी अस्सल लोकगीताच्या धाटणीचे होळी गीत दिले आहेत. परत असा प्रयोग हिंदी चित्रपटात झाला नाही. पूर्णत: लोकवाद्यांचा वापर, गायकही तसेच (इरा मुजूमदार), नृत्यही तसेच. ‘होली खेले नंदलाला बिरज मे’ असे पारंपारिक बोल गाण्याचे आहेत. देव आनंदचा हा चित्रपट. हे गाणंही अतिशय वेगळं आहे. पुढे ‘रंग बरसे’ सारख्या गाण्यांनी यातील कल्पना उचलल्या. पूर्णत: लोकगीताचाच छाप जसाच्या तसा ठेवण्याचा एक व्यावसायीक धोका अनिल विश्वास यांनी घेतला यासाठी त्यांना दाद द्यावी लागेल. 

देव आनंद-दिलीप कुमार यांचा 1955 ला आलेला ‘इन्सानियत’ हा सी.रामचंद्र यांच्या एकापेक्षा एक गोड गाण्यांनी नटलेला चित्रपट. लोकवाद्यांचा अतिशय सुंदर उपयोग या गाण्यांमध्ये केला गेला आहे. नायिका बीना रॉयच्या तोंडी होळीचं एक सोज्वळ गाणं यात आहे. 
तेरे संग संग संग, 
पिया खेलती मै रंग 
हाय हाय हाय हुयी बदनाम रे 
लागे दुनिया से डर 
गयी गली घर घर 
देखो छेड मुझे लेके तेरा नाम रे 

आता हे शब्द राजेंद्रकृष्ण यांनी एकमेकांत असे गुंफले आहेत की सहजच चालीत ते ओवले जावेत. शैलेंद्र, मजरूह, राजेंद्रकृष्ण हे असे गीतकार आहेत की त्यांच्या गीतांना स्वत:च्याच अंगभूत चाली आहेत. त्यामुळे संगीतकारांसाठीचे हे फार लाडके गीतकार आहेत. लताचा आवाज ही तर सी.रामचंद्र यांची कमजोरीच. त्यामुळे साहजिकच सगळा गोडवा यात उतरला नसता तरच नवल. 

नर्गिस असो की बीना रॉय असो की निम्मी यांना नृत्याचं फारसं अंग नाही. परिणामी एका मर्यादेपलीकडे  नृत्यप्रधान गाण्यात त्यांचा प्रभाव पडत नाही. पण वैजयंतीमालाचे मात्र तसे नाही. सुंदर चाल, उत्कृष्ट शब्द यांच्या तोडीस तोड नृत्याचा आविष्कार तिच्या गाण्यात पहायला मिळतो. हेमंत कुमारचे संगीत असलेल्या ‘अंजान’ (1956) मधील होळीचे गाणे, ‘होली की आयी बहार’ हे याचेच चांगले उदाहरण. वैजयंतीमालाच्या हालचाली अगदी साध्या आहेत. पण त्यातून जो परिणाम साधल्या जातो तो फार कलात्मक. हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांचंच आहे. 
मौसम पे रंग, मेरे मन मे तरंग 
नयनों मे साजन का प्यार 
देखो होली की आयी बहार 
असे साधेच पकड घेणारे एकमेकात गुंफले गेले शब्द या गीतात आहेत. राजेंद्रकृष्णच्या गीतरचनेबद्दल स्वतंत्रच लिहायला पाहिजे.

याच वर्षी हेमंतकुमार आणि राजेंद्रकृष्ण या जोडीने अजून एका चित्रपटात होळीचे गाणे दिले आहे. चित्रपट होता ‘दुर्गेश नंदिनी’. प्रदीपकुमार बीना रॉय या जोडीचा हा चित्रपट. लताच्या आवाजात एक गाणं ‘मत मारो श्याम पिचकारी, मोरी भिगी चुनरिया सारी रे’ असे आहे तर दुसरे गाणे हेमंतकुमार लता यांच्या आवाजात, ‘प्यार के रंग मे सैंय्या मोरी रंग दे चुनरिया’ असे आहे. होळीच्या दोन गाण्यांचा असा प्रयोग आधी आणि नंतरही मग कुठल्याच चित्रपटात झाला नाही. या दोनही गाण्यांत बासरी आणि शहनाई या सुषिर वाद्यांचा प्रयोग केला आहे. पिचकारीतून हवेच्या दाबाने रंग उडवला जावा तसे हवेच्या दाबाने स्वर बाहेर पडणारी वाद्ये यासाठी निवडण्याची प्रतिभा हेमंत कुमार यांच्यापाशी होती. 

नौशाद आणि शकिल बदायुनी याच जोडीने 1960 च्या ‘कोहिनूर’ मध्ये ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ हे होळीचे गोड गाणे दिले आहे. लता रफीचा आवाज म्हणजे नौशाद यांना हवे ते खेळायला भेटलेले मैदान. 1950 ते 1960 या दशकात लता-रफीच्या आवाजावर विविध संगीतकारांनी जे आणि जसे प्रयोग केले ते तसे परत कुणाला करता आले नाहीत. कारण या दोघांच्या आवाजाची रेंज अफाट होती. पुढे जो साचा यांच्या आवाजाचा तयार झाला किंवा त्यांच्या आवाजाचाच दबाव संगीतकारांवर यायला लागला तशी स्थिती या काळात नव्हती. त्यामुळे यांची सगळ्यांत मधुर गाणी याच काळातील आहेत. या गाण्यावर नाचताना मीनाकुमारीच्या मर्यादा जाणवू नयेत म्हणून किमान हालचालीतून कॅमेरा हवा तो भाव टिपत इतरत्र सरकतो.

होळी म्हणजे मस्ती असे जे समिकरण आहे त्याला खरा न्याय देणारं एक गाणं 1966 मध्ये ‘बिरादरी’ या चित्रपटात गुणी संगीतकार चित्रगुप्त यांनी दिलं. या गाण्याची छाप पुढे इतर होळी गीतांवर आढळते. शशी कपुर आणि पुढे कॅबरे डान्सर म्हणून गाजलेली फरियाल यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. सोबत मेहमुद आणि हेलनचे धम्माल नृत्यही यात आहे. रफी-सुमन कल्याणपुर-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. ‘रंग दो सभी को आज इक रंग मे, आयी रंगीली होली रे’ या शब्दांना उत्तर प्रदेशातील मथुरेच्या परिसरातील पारंपारिकि होळीगीतांचा साज चित्रगुप्त यांनी चढवला आहे. पुढे जय जय शिवशंकर किंवा यासारख्या गाण्यांत हेच वापरल्या गेले. यात हेलनला मराठमोळ्या नववारीवर नृत्य करायला लावलं आहे.  

पुढे मात्र होळीच्या गाणी जवळपास हद्दपारच झाली. आणि जी आली त्यातही गाण्यांचा ढंग बदलला. मुळात संगीताचाच ढंग बदलला. याची सुरवात रवीच्या संगीतातील ‘फुल और पत्थर’ च्या ‘लायी है हजारो रंग होली’ या आशा भोसलेच्या गाण्यापासून दिसते. यातील ऑकेस्ट्राची हाताळणी आधुनिकतेच्या नावाखाली माधुर्य हरवत चाललेली दिसून येते. 

हृदयनाथ मंगेशकरांनी 1984 ला ‘मशाल’ चित्रपटात जे होळीचे गाणे दिले आहे ती चाल मराठी गाण्याची आहे. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’ या वर ‘ओ होली आयी होली आयी देखो होली आये रे’ असं ते गाणं आहे. गाणं चांगलं आहे पण मराठी रसिकांना जूनंच गाणं कानात बसल्यामुळे हे नवं लक्षात रहात नाही.
  
          -आफताब परभनवी.

No comments:

Post a Comment