Friday, 31 March 2017

खुश है जमाना आज पेहली तारीख



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 1 एप्रिल 2017

आज 53 वर्षे होत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘खुश है जमाना आज पेहली तारीख’ हे गाणं रेडिओवर वाजतं आहे. असं भाग्य एखाद्याच गाण्याला लाभतं.  या चित्रपटाचे नावच ‘पेहली तारीख’(1954)  असं आहे. किशोर कुमार याचा नायक आणि गायक  आहे. गाण्यात तसं काव्याच्या दृष्टीनं काहीच नाही. कमर जलालाबादी यांनी किशोर कुमारला डोळ्यासमोर ठेवूनच शब्द रचले आहेत. गीताची मजेशीर चालही सुधीर फडके यांनी तशीच बांधली आहे. यातील बाकी लता रफी यांच्या आवाजातील गाणी फारशी गाजली नाहीत. 

या गाण्याला लोकप्रियता नंतर मिळत गेली पण त्या वर्षीच्या बिनाकात मात्र हे गाणं नाही. त्याला तसं कारणही आहे. 1954 हे वर्षे जबरदस्त स्पर्धेचं वर्ष होतं. हेमंतकुमार (नागिन- सगळीच गाणी हिट, शर्त- न ये चांद होगा न तारे रहेगे) सी. रामचंद्र (नास्तिक- देख तेरे संसार की हालत, सुबह का तारा- गया अंधेरा हुआ उजाला), एस.डि.बर्मन (टॅक्सी ड्रायव्हर- जाये तो जाये कहां), गुलाम मोहम्मद (मिर्झा गालिब-दिल ए नादान तुझे हुआ क्या है), ओ.पी.नय्यर (आरपार- सगळीच गाणी हिट), शंकर जयकिशन (बुट पॉलिश- नन्हे मुन्ने बच्चे तेरी), नौशाद (अमर- न मिलता गम तो बरबादी, इन्साफ का मंदिर है) असल्या स्पर्धेत हे गाणं बिनाकात टिकलं नाही. 

बिनाकात टिकलं नाही पण एक तारखेच्या पगाराच्या मानसिकतेमुळे या गाण्याची लोकप्रियता टिकून राहिली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतात शहरीकरणाचा जोर वाढत गेला.  गावगाडा सोडून लोक छोट्या मोठ्या शहरांकडे नौकरीसाठी धाव घेत होते. हे नौकरदार लोकच चित्रपटांचं मोठं ग्राहक होते. याच लोकांकडे तेंव्हा रेडिओ असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे एक तारीख म्हणजे काही फार मोठा दिवस. कारण या दिवशी महिनाभराच्या कामाचा पगार मिळणार. मग स्वाभाविकच अशा गाण्यांना उठाव मिळाला. 

हेच गाणं नव्हे तर अशा प्रकारच्या नौकरदारी मानसिकतेला ग्राहक म्हणून मोठी किंमत भारतीय बाजारपेठेत मिळायला सुरवात झाली. पार अगदी 1991 च्या जागतिकीकरण पर्वापर्यंत ही मानसिकता कायम होती. ‘मॉं मै बी.ए. पास हुआ हु’, ‘मॉं मुझे नौकरी मिल गयी’, ‘मॉं आज मेरी तनखा हो गयी’.. वगैरे वगैरे संवाद लोकप्रिय व्हायचा हाच तो काळ.

1954 लाच किशोर कुमारचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नावच होतं ‘नौकरी’. या अख्ख्या चित्रपटात ही मानसिकता बिमल रॉय यांनी मोठ्या सुरेख पद्धतीनं रेखाटली आहे. गावात म्हातारी आई, आजारी बहिण यांना ठेवून नौकरीच्या शोधात कलत्त्यात आलेला किशोर कुमार. त्याचा नौकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष. शीला रमाणीसोबतचे त्याचे प्रेम. याच चित्रपटातील एक गाणं तेंव्हा बिनाकात हिट झालं होतं.

‘छोटा सा घर होगा जी बादलों की छाव मे, 
आशा दिवानी मन मे बांसुरी बजाये.
हम ही हम चमकेंगे तारों की उस गांव मे
आंखों की रोशनी हरदम ये समझाये’

शैलेंद्र चे शब्द आणि सलिल चौधरी यांचं संगीत. शंकर जयकिशननंतर शैलेंद्र यांचे सूर खर्‍या अर्थाने जूळले ते दोनच संगीतकारांसोबत एस.डी.बर्मन आणि सलिल चौधरी. आता या गाण्यात 

‘चांदी की कुर्सी पे बैठे मेरी छोटी बहना, 
सोने के सिंहासन पे बैठे मेरी प्यारी मां’ 

या कडव्याच्या ओळी नंतर ध्रृवपदाशी जुळणारी जी ओळ येते, ‘मेरा क्या मै पडा रहूंगा अम्मी जी के पांव मे’ ही अतिशय सहज आणि गोडव्यात बुडालेली आहे. हे शैलेंद्रचे वैशिष्ट्य.

शैलेंद्रने आपल्या गाण्यांमधूनही ही मध्यमवर्गीय नौकरदाराची मानसिकता बरोबर टिपली आहे. किशोर कुमारच्या आवाजात एक गाणं या चित्रपटात आहे. 

‘एक छोटीसी नौकरी का तलबगार हू मै, 
तुमसे और कुछ मांगू तो गुनहगार हू मै’ 

आता या शब्दांच्या पलिकडे अजून काय सांगणार. तेंव्हाच्या नौकर्‍या ह्या बहुतांश कारकुनांच्याच होत्या. व.पु.काळे सारख्या लेखकांनी याच मानसिकतेवर सतत लिखाण केलं आहे. शैलेंद्रने या गाण्यात ‘मै कल कलेक्टर ना बनू और ना बनूंगा अफसर, अपना बाबू ही बना लो बेकार हू मै.’
याच चित्रपटात नौकरीसाठी अर्ज करतानाचं पण एक गाणं आहे 

‘अर्जी हमारी, ये मर्जी हमारी, 
जो सोचे बिना ठुकराओगो, 
तो देखो बडे पछताओगे’ 

त्यासाठी टाईप राईटरचा आवाज  मोठा सुरेख वापरून घेतला आहे. गाणं खास किशोर कुमार स्टाईलचं आहे. या गाण्याचा अजून एक कलात्मक वापर बिमल रॉय यांनी करून घेतला आहे. किशोर कुमार आपल्या खोलीच्या खिडकीत उभं राहून हे गाणं म्हणतो आहे. आणि पलिकडच्या खिडकित शिला रमाणी त्याची प्रेयसी पुस्तक वाचत उभी आहे. तेंव्हा ही अर्जी केवळ नौकरी साठी नसून प्रेमासाठीही आहे. मधूनच किशोर कुमार आपल्या मनाने ‘सुना है तुम्हारे यहा जगा खाली है’ असं वाक्य वापरतो. आता हे वाक्य शीला रमाणीच्या हृदयालाही लागू पडते. 

असाचा कलात्मक वापर देवआनंद वहिदाच्या गाण्यात ‘अपनी तो हर आह इक तुफान आहे’ मध्ये करण्यात आला आहे (कालाबाजार-1960). देव आनंद जेंव्हा ‘उपरवाला जान कर हैरान है’ म्हणतो तेंव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या वहिदा कडे त्याचा इशारा असतो. आणि दुसर्‍या अर्थाने उपरवाला म्हणजे देवाकडेही इशारा आहे. 

‘खुश है जमाना आज पहेली तारीख’ हे गाणं आणि ‘नौकरी’ चित्रपटातील तीन गाणी असं मिळून एक नौकरदारांची मानसिकता स्पष्टपणे समोर येते. ‘पेहली’ तारीख पेक्षाही ‘नौकरी’ मध्ये बिमल रॉय सारखा दिग्दर्शक असल्यामुळे असेल कदाचित बेकारांचा प्रश्‍न जास्त ठळकपणे समोर येतो. आणि त्याला कलात्मक रूपही प्राप्त होते.

एक एप्रिलशी अजून एका गाण्याची आठवण निगडीत आहे. 1964 मध्ये विश्वजीत, सायरा बानू यांचा ‘एप्रिल फुल’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात याच नावाचे रफीचे गाणे आहे, ‘एप्रिल फुल बनाया, उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया.’ हसरत सारख्या प्रतिभावंतांनी असं लिहायला सुरवात केली तेंव्हा पुढे गाण्याचा दर्जाच ढासळत गेला हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. याच चित्रपटातील रफीचं दुसरं गाणं ‘आ लग जा गले दिलरूबा’ थोडं तरी सुसह्य आहे. हा दोष खरं तर शंकर जयकिशन सारख्या संगीतकारांकडेही जातो. एखादा कारखाना असावा तसं यांनी ‘प्रॉडक्शन’ सुरू केलं होतं. 1960 नंतर तर अशी परिस्थिती होती की नायक नायिका दिग्दर्शक कुणीही असो, शंकर जयकिशनची गाणी म्हणजे चित्रपट बॉक्सऑफिसवर गल्ला गोळा करणार याची खात्री असायची. परिणाम एकूणच गाण्यांचा दर्जा घसरत गेला.

नौकरी मधील ‘छोटासा घर होगा’ ची आठवण पुढे घरोंदा (1977) मधील गाण्यानं परत ताजी झाली. ‘इक अकेला इस शहर मे’ या गाण्यानं मुंबईमधील घराच्या समस्येला कलात्मक तोंड फोडले. पण हे गाणं मुंबई पुरतं मर्यादित वाटते. ज्या प्रमाणे ‘छोटासा घर होगा’ असो की ‘खुश है जमाना आज पहेली तारीख’ ही गाणी भारतभरच्या छोट्या मोठ्या शहरांतील नौकरदरांची वाटतात तसं हे वाटत नाही.

-आफताब परभनवी. 

No comments:

Post a Comment