अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 6 मे 2017
शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी यांच्यापुरतेच फक्त शैलेंद्रचे शब्द आणि लताचे सुर यांची मोहिनी मर्यादित नव्हती. इतरही काही संगीतकारांना या जोडीचा वापर करण्याचा मोह पडला.
संगीतकार रोशनने ‘हिरा मोती’ (1959) मध्ये शुभा खोटेच्या तोंडी एक गाणं दिलं आहे. ‘ओ बेदर्दी आ मिल जल्दी, मिलने के दिन आये, के तूझ बीन रहा न जाये’. मराठी रसिकांना ‘लटपट लटपट तूझे चालणे’ हे गाणं चांगलं आठवत असेल. त्याच्या चालीसारखी सुरावट या गाण्याच्या सुरवातीला वापरली आहे.
महान सतारवादक भारतरत्न रवीशंकर यांनाही या जोडीचा मोह पडला होता. ‘अनुराधा’ (1960) चित्रपटात लीला नायडूवर एक गोड गाणं चित्रित आहे, ‘जाने कैसे सपनों मे खो गयी आखिया, मै तो रही जागी मोरी सो गयी आखिया’ गाण्याला अकारणच जास्तीची गती दिली गेली आहे असं ऐकताना वाटत राहतं.
सपन जगमोहन ही संगीतकार जोडी सलिल चौधरींच्या बॉम्बे युथ समुहात गायक म्हणून सहाय्यक म्हणून वावरत होती. त्यांनी फार थोड्या चित्रपटांना संगीत दिले. त्यातीलच एक चित्रपट ‘बेगाना’ (1963). धमेंंद्रच्या या चित्रपटात एक गाणे आहे ‘बुलाती है बहार, कोयल बोले कुहू कुहू, पपीहा बोले पिहू पिहू’. या गाण्यात एका कडव्यात शैलेंद्र लिहून गेला आहे
रातों के सपने दिन मे कमल बन जल पे ये फुले
कैसी सुहानी ये राहे की राही मंझिल को भुले
हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांची एक सुरेख कविता आहे
जो रास्ता भूलेगा
मै उसे भटकाव वाले रास्ते ले जाऊंगा
जो रास्ता भूलते नही
उनमे मेरी कोई दिलचस्पी नही. (पत्थर की बेंच, पृ. 9)
खरंच शैलेंद्र असाच आपल्याला हरवून टाकणार्या वाटेने नेऊ पाहतो. आपणही ओढ लागल्यागत त्याच्या मागे जात राहतो. ज्यांना रस्ते हरवायचे नाहीत त्यांनी शैलेंद्रच्या ‘वाटे’ला जाऊच नये.
शैलेंद्रची वरील तिनही गाणी तशी विशेष नाहीत. शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी शिवाय त्याची नाळ खर्या अर्थाने कुणाशी जूळली असेल तर ती सचिन देव बर्मन यांच्याशीच.
या त्रिकुटाने काही सुंदर गाणी दिली आहेत.
देव आनंद-नलिनी जयवंतच्या ‘मुनिमजी’ (1955) मध्ये हे गोड गाणे आहे
नैन खोये खोये तेरे दिल मे भी कुछ होये
प्यार ये नही तो और क्या है
या गाण्यात सचिनदा तालवाद्यांचा मोठा सुंदर वापर करतात. सलिल चौधरीसारखीच लोकसंगीताची विलक्षण डुब सचिनदांच्या गाण्यांना असते. सोन्याचा बारीक गोफ करताना सोन्याची अतिशय बारीक तार केली जाते. अशा खुप तारा एकमेकांत गुंफून त्यांचा गोफ बनतो. लताच्या आवाजातील अशा बारीक बारीक ताना आलाप विलक्षण पद्धतीनं गुुंफून त्यांना जलतरंग, बासरी, मृदंग अशा वाद्यांची साथ देत सचिनदा गाणे तयार करतात. तेंव्हा त्याचा परिणाम वेगळाच साधल्या जातो.
शैलेंद्रने डोळ्यांसाठी एक वेगळीच प्रतिमा या गाण्यात वापरली आहे.
नींबू की फाकी सी पाकी ये आखियां
तिखी तिखी ये जुल्मी पलखीया
आता याचा नेमका अर्थ काय काढायचा? हिंदी साहित्याचा अभ्यास असणार्यांनी काही माहिती असेल तर जरूर सांगावे.
किशोर कुमार- बीना राय यांच्या ‘मदभरे नैन’ (1955) या चित्रपटात लता-शैलेंद्रचे गोड गाणे आहे
मनपंछी अलबेला तारों की नगरी मे गाये
मत पुछो किसकी लाये खबरीया
नयी नयी पेहचान है उसका नाम न जाना मैने
मै कैसे कहू मेरा कौन सावरीया
आता या गाण्याचे शब्दच असे आहेत की साधं वाचायला सुरवात केली तरी त्याचं गाणं बनू शकतं. अशीच स्वाभाविक चाल लताच्या आवाजात इथे आहे.
पांव मेरी धरती पे मेरी नजर चांद को चुमे
मेरा आंचल उडे हवाओं मे मेरा तन झुमे मन झुमे
कैसी उलझी नजरीया
तिसरं गाणं ‘बंदिनी’ (1963) मधलं आहे. हा बिमल रॉय चा चित्रपट असल्याने त्यांचा कॅमेरा हा अजून एक जास्तीचा पैलू या गाण्याला जूळतो. गाण्याचे चित्रीकरण हा एक वेगळाच विषय आहे.
जोगी जबसे तू आया मेरे द्वारे
हो मेरे रंग गये सांझ सकारे
मिठी मिठी अगन ये सह ना सकुंगी
मै तो छुई-मुई अबला रे सह ना सकुंगी
मेरे और निकट मत आ रे
आता या मोजक्या शब्दांत आख्ख्या चित्रपटाचे सार शैलेंद्र सांगून जातो. ही शैलेंद्रची ताकद वेगळीच आहे. खरं तर आशा-गीता असे आवाज सचिनदांना वापरता आले असते. त्यांनी हे आवाज ताकदीने वापरलेही. मुकेशचा अतिशय कमी वापर दादांनी केला. पण या चित्रपटांत ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ साठी मुकेश परिणामकारक रित्या त्यांनी वापरून दाखवला.
एका विशिष्ट भावनेसाठी शंकर-जयकिशन, सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन या तिघांनाही शैलेंद्रच्या शब्दांची ताकद जाणवते आणि त्यासाठी लताचाच आवाज ते वापरतात हे सगळं अनोखं आहे.
सचिनदांनी अतिशय कमी गाणी या जोडीची दिली. पण अतिशय ताकदीचं गाणं असं दिलं की त्याची ताकद शंकर जयकिशन आणि सलिल चौधरी इतकी किंबहूना थोडी जास्तच जाणवते.
तो चित्रपट आहे ‘गाईड’ (1965). आणि गाणे आहे ‘आज फिर जिने की तमन्ना है’.
चित्रपट रंगीत झाला आणि रंगांचा भडक वापर सुरू झाला. त्यातील कलात्मकता, कॅमेराचा संयमानं वापर सुरवातीच्या काळात नव्हता. चित्रपट रंगीत आहे यांचेच कौतुक असायचे. पण ‘गाईड’ सारखे फार थोडे चित्रपट त्या काळातील असे आहेत की त्यांनी हा वापर अतिशय ताकदीनं करून दाखवला.
हे गाणं रंगीत आहे पण त्यातील तरलता कुठेही हरवू दिलेली नाही. शिवाय भारतीय परंपरांची एक जाण ठेवत त्यांचा कलात्मक वापरही केलेला आढळतो. रोझी आपले जुने आयुष्य टाकून राजू गाईडच्या सहाय्याने नविन काही तरी जगू पाहते. ट्रकमध्ये बसून जाताना गाण्याच्या पहिल्याच ओळीत ती हातातील मडकं खाली रस्त्यावर टाकते. ते मडकं फुटतं आणि ‘आज फिर जिने की तमन्ना है’ म्हणत जणू काही आता परत नवा जन्म झाला आहे असे सुचित करत गाणं पुढे सरकतं. आता ही कमाल दिग्दर्शक विजय आनंदची आहे.
शैलेंद्रचे शब्द तर काही विचारायची सोयच नाही. ‘कलके अंधेरों से निकल के, देखा है आंखे मलके मलके’ असे सुंदर अनुप्रास भरत व्यास सोडले तर कुणाच्याच गीतांत आढळत नाहीत. किंवा ‘प्यार का हिंडोला जहा झुल गये नैना, सपने जो देखे मुझे भूल गये नैना’. किंवा ‘सनन सनन हाय पावन झाकोरा'.
जगण्याचा प्रचंड उत्साह, तो व्यक्त करण्यासाठी निसर्गाची केलेली निवड, त्याला शोभेसा लताचा मोकळा आवाज आणि याला पोषक संगीत. हे सगळं जूळून आलेलं रसायन आहे.
याच ‘गाईड’ मध्ये अजून एक गाणं लताच्या आवाजात आहे. ‘पिया तोसे नैना लागे रे’. पण हे गाणं मोकळ्या निसर्गात नाही. विविध मंचांवर कार्यक्रमांमधून सादर केल्या गेलेलं असं त्याचं चित्रण करण्यात आलं आहे. शिवाय वहिदाचे शास्त्रशुद्ध नृत्यपण या गाण्यात आहे. पण केवळ ऐकताना मात्र त्यातील प्रेमाची आनंदाची खुमारी जाणवते.
शंकर जयकिशन सोबतची 25 गाणी, सलिल चौधरीची 9, सचिन देव बर्मनची 5 आणि इतरांची 3 अशी तब्बल 42 गाणी शैलेंद्र-लता या जोडीनं वेगळी अशी दिली. हा सगळा कालाखंड 12 वर्षांचा आहे. याची वेगळी नोंद घेतली पाहिजे.
-आफताब परभनवी.
No comments:
Post a Comment