अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 13 मे 2017
देव आनंद-किशोर कुमार हे अद्वैत आपल्या इतक्या डोक्यात बसलं आहे की किशोरची अशी बरीच गाणी आहेत की ज्यात देव आनंद नाही पण आपल्याला डोक्यात तोच येत राहतो. शिवाय सचिन देव बर्मन यांचे संगीत. किशोर इतकीच देव आनंदसाठी गायलेली रफीची गाणी पण गाजली. त्यामुळे रफीचा आवाजही बर्याचदा देव आनंदच्या आठवणी जाग्या करतो. पण सचिनदा-किशोर-रफी यांच्या शिवायचा जो देवआनंद आहे तो पण खुप अवीट गोडीचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
देव आनंदच्या कारकिदीर्र्च्या सुरवातीलाच गुलाम मोहम्मदने मुकेशचा आवाज त्याच्यासाठी वापरला. पुढे कुठेच कधीच मुकेश देव आनंदसाठी गायला नाही. पण हे आश्चर्य सुरवातीला मात्र घडलं. ‘शेर’ (1949) हा देवआनंद-सुरैय्या-कामिनी कौशल यांचा सिनेमा. लता-मुकेशच्या आवाजात एक आर्त दु:खी गाणं गुलाम मोहम्मदनं दिलं आहे, ‘ये दुनिया है यहा दिल का लगाना किसको आता है, हजारो प्यार करते है निभाना किसको आता है.’ प्रेमभंगाची दु:खी गाणी गाजायचा तो काळ होता. परिणामी देवआनंदसाठीचा मुकेशचा हा दु:खी सूर तेंव्हा खपून गेला. याच चित्रपटात दुसरंही एक गोड खेळकर गाणं आहे. लता आणि जी.एम.दुर्रानीच्या आवाजातलं,
‘दो बिछडे हुये दिल,
आपस मे गये मिल,
आरमान की नगरी मे हुआ आज सवेरा,
लो तुमसे मिले हम,
सब दिलके मिटे गम,
खुश होके मुहोब्बत ने किया दिल मे बसेरा’
शकिल बदायुनीचे शब्द परत देवआनंदच्या कुठल्याच चित्रपटाला लाभले नाहीत. नौशाद, रवी, हेमंतकुमार, गुलाम मोहम्मद यांच्यासाठी जास्त करून शकिलने लिहिले. पण नेमके हे संगीतकार म्हणून देव आनंदच्या चित्रपटांना फारसे लाभले नाहीत.
सरोदवादक अली अकबर खां यांनी ‘आंधियां’ (1952) मध्ये हेमंतकुमारचा आवाज ‘वो चांद नही है, दिल है किसी दिवाने का’ या गाण्यात देवआनंदसाठी वापरला आहे. पण हे गाणं फार विशेष नाही.
‘पतिता’ (1953) हा शंकर जयकिशनचा राजकपुर प्रॉडक्शन बाहेरचा एक गाजलेला चित्रपट. देवआनंद-उषा किरण यांच्या भूमिका यात होत्या. शंकर जयकिशनने हक्काच्या मुकेश-मन्नाडे- रफी असे कोणालाच न वापरता हेमंत कुमार आणि तलत मेहमुद यांचा वापर या चित्रपटात केला आणि गाणि गाजवून दाखवली.
याद किया दिल ने कहां हो तूम
झुमती बहार हो कहां हो तूम
प्यार से पुकार लो जहां हो तूम
या लता-हेमंतच्या गाण्यानं नुकत्याच सुरू झालेल्या बिनाका गीतमालात धुम केली होती. पण तलतच्या आवाजातील ‘है सबसे मधुर वो गीत जिसे, हम दर्द के सूर मे गाते है’, आजही रसिकांच्या मनात उदबत्ती शांतपणे जळत रहावी तसे जळत राहतं. तलतच्या आवाजात जी थरथर आहे तिची ही कमाल आहे. या गाण्यासाठी खरी दाद देवआनंदलाच द्यायला हवी. त्यानंही तलतच्या आवाजाला दाद देत संयत अभिनय केला आहे. खरं तर त्याच्या स्वभावाला इतका शांतपणा शोभत नाही. याच चित्रपटात तलतची अजून दोन सुंदर गाणी आहेत पण ती देव आनंदवर चित्रित नाहीत.
देवआनंद-दिलीपकुमार या जोडीचा ‘इन्सानियत’ (1955) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. देवआनंद-दिलीप कुमार-बीना रॉय अशी तगडी स्टार कास्ट, सी.रामचंद्रचे संगीत (त्यांच्या पाठीशी आलबेला आणि अनारकलीचे लखलखीत यश होते) लता-रफी-तलत असे गोड आवाज, राजेंद्रकृष्णची गीतं असा सगळा जमून आलेला मसाला. मग पदार्थ चवदार होणारच. लता-तलचे एक मधुर गाणं यात आहे.
आयी झुमती बहार, लायी दिल का करार
देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया
सैय्या पेहली पेहली बार बाजे मन की सितार
देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया
तलवारकट मिशातला कशिदाकाम केलेला गुरू शर्ट घातलेला देव आनंद आणि परकर ओढणीतली माथ्यावर बिंदी घातलेली बीना रॉय हे पहायला मोठी गंमत वाटते.
दत्ता नाईक या मराठी माणसाने एन.दत्ता नावाने हिंदी चित्रपटात मोजकीच पण फार चांगली गाणी दिली आहेत. देवआनंद-गीता बाली यांच्या ‘मिलाप’ (1955) मध्ये एन.दत्तानं ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां, खो ना जाये आ भी जा, ये बहारों का समा’ असं गाणं हेमंत कुमारच्या आवाजात दिलं आहे. हेच गाणं लताच्या आवाजात जरा अवखळ आहे. पण हेमंतकुमारच्या खास खर्जातल्या आवाजात तसाच आशय स्पष्ट करतं. कामप्रेरणा उत्कट झाल्यावर पुरूषाचा आवाज घोगरा होतो. अशी एक पुसटशी छाया हेमंतदांच्या आवाजात वापरून एन.दत्ता यांनी कमाल केली आहे. साहिरचे शब्द तर अभिजात आहेतच. साहिरची संगीतकार रवी सारखीच नाळ एन.दत्ताशी फार चांगली जूळली होती.
मदनमोहन च्या ‘पॉकेटमार’ (1956) मध्ये छोट्या नावेवर डोलकाठीला धरून फेरी मारणार्या देवआनंद गीताबाली यांच्यावर एक सुंदर द्वंद्व गीत आहे.
ये नयी नयी प्रीत है
तूही तो मेरा मीत है
ना जाने कोई साजना
ये तेरी मेरी दास्तां
राजेंद्रकृष्ण-मदनमोहन -(मदनमोहनच्या एकूण 100 चित्रपटांपैकी राजेंद्रकृष्णची गीतं असलेले चित्रपट 36) जोडीनं सगळ्यात जास्त चित्रपट दिले. पण नाव झाले ते मदनमोहन-राजा मेहंदी अली खां (राजा मेहंदी अली खां चे चित्रपट 12) जोडीचे. तलत-लताचे हे गोड गाणे राजेंद्रकृष्णच्याच लेखणीतून उतरले आहे. प्रेमिकांचे एक सुंदर स्वप्न असते. या स्वप्नाला राजेंद्रकृष्णने या गाण्यात गोड शब्द रूप दिले आहे. ‘चलो चल दे वहां, जमी और आसमां, गले मिलते जहां, बना दे वहि आशिया’.
1957 सालात देवआनंदच्या दोन चित्रपटांनी धुम केली होती. एक होता देव आनंदचा घरचा चित्रपट, ‘नौ दो ग्यारह’ ज्यात त्याची पत्नी असलेली कल्पना कार्तिक, संगीतकार सचिनदेव बर्मन, गायक रफी-आशा-गीता, दिग्दर्शक विजय आनंद असा सगळा हक्काचा गाजलेला मसाला होता. पण दुसरा चित्रपट असा होता ज्याच्या गाण्यानंही धुम केली. तो काही देव आनंदचे होम प्रॉडक्शन नव्हता. हा चित्रपट होता ‘बारिश’. यात देवआनंद सोबत होती नुतन. मागाच्याच वर्षी या जोडीचा पेईंग गेस्ट (1956) हिट झाला होता. ‘बारिश’ ला संगीत होते सी.रामचंद्र यांचे. देवआनंद साठी तलत-हेमंतकुमार-मुकेश यांचे आवाज रफी-किशोर शिवाय वापरून झाले होते. पण या चित्रपटात देव आनंदसाठी स्वत: सी.रामचंद्र यांनीच आवाज दिला (देवआनंदसाठी चितळकरांचा आवाज चिकचॉकलेट या संगीतकाराने ‘नादान’ (1951) चित्रपटात वापरला होता). ही दोन्ही गाणी गोड आहेत, आजही ऐकाविशी वाटतात.
नुतन-देवआनंद यांचा एक अप्रतिम संवाद गाण्याआधी आहे. प्रेम कसं व्यक्त करायचं दोघांनाही कळत नाही. तेंव्हा नुतन म्हणते ‘कोई बात बीना कहे सुने भी समझ मे आती है’ आणि यानंतर गाणं सुरू होतं
केहते है प्यार जिसको, पंछी जरा बता दे
उडना खुली हवा मे, ओ बेजूबा सिखा दे
मुश्किल है इस जहां मे आजादियों से रेहना
जो बात दिल मे आये उसको जूबां से केहना
आझाद तू है जैसा वैसा हमे बना दे
उडना खुली हवा मे ओ बेजूबा सिखा दे
असं म्हणत नुतन हातातील कबुतर हवेत सोडते. राजेंद्रकृष्ण यांचे गीत आणि लताचा आवाज म्हटलं की सी.रामचंद्र यांचे संगीत बदलूनच जाते. पण या गाण्यात त्यांनी त्यांच्या आवाजापेक्षा तलत किंवा रफीचा आवाज घेतला असता तर जास्त रंगत भरली असती. कारण त्यांच्या स्वत:च्या आवाजाला मर्यादा होत्या. पण ते लताच्या इतके प्रेमात बुडाले होते की तिच्यासोबतच गायचा अट्टाहास त्यांचा असायचा अशी दंतकथा त्या काळात होती.
दुसरं गाणंही चितळकर (सी.रामचंद्र गायक म्हणून चितळकर असं नाव वापरायचे) लता यांच्याच आवाजात आहे.
फिर वोही चांद वोही तनहाई है
आज फिर दिल ने मुहोब्बत की कसम खायी है
हे गाणं म्हणजे आधीच्या गाण्याचीच पुढची पायरी आहे. यात एक ओळ राजेंद्रकृष्णने अशी लिहिली आहे, ‘दिल मे जो बात है, आंखो मे चली आयी है’. प्रेमाची तीच सुंदर परिभाषा, पडद्यावर देवआनंद-नुतन मग काय पहायलाच नको.
देवआनंद-माला सिन्हाचा ‘माया’ (1961) हा गाजलेला सिनेमा. हेमंतकुमारशी मिळता जूळता स्वर असणार्या द्विजन मुखर्जीला सलिल चौधरी यांनी यात दोन गाणी दिली आहेत. देवआनंदसाठी हेमंतकुमारचा आवाज लोकांना भावून गेला होता म्हूणून कदाचित हा प्रयोग सलिल चौधरी यांनी केला असावा. पहिलं गाणं आहे
‘ए दिल कहा तेरी मंझिल
ना कोई दिपक है ना कोई तारा है
गुम है जमी है दूर आसमां’
गाण्याच्या सुरवातीला ‘क्रॉस’ ची प्रतिमा वापरून गाण्याचा दु:खी भाव दिग्दर्शकाने गडद केला आहे. दुसरं गाणं मात्र आनंदी वृत्तीचं आहे. लतासोबत द्विजन मुखर्जीचा आवाज हेमंतकुमारसारखाच मिसळून जातो
‘फिर एक बार कहो, उसी अदा से कहो
सुनो जी साजना, मुझे तो तुमसे प्यार है’
असं म्हणत असताना गाण्यात लता ‘नही नही’ म्हणत परत ‘जी हां! जी हां!’ म्हणते हे सलिल चौधरी यांनी फार नजाकतीनं घेतलं आहे. खरं तर रूढ अर्थानं धृवपद आणि कडवं अशी सरधोपट रचना सलिल चौधरी करत नाहीत. म्हणूनच त्यांची गाणी गायला फार मुश्किल असल्याचं लता मंगेशकर यांनी नोंदवलं आहे.
शंकर जयकिशनच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ (1962) मध्ये तलते अतिशय सुंदर गाणं आहे. मिश्किल देव आनंद, लावण्यवती वहिदा रेहमानला उद्देशून म्हणतो आहे
‘तूम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर
चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर’
शैलेंद्रचे शब्द, देव आनंदचे हासरे डोळे, सुंदर वहिदा रेहमान, उसळत्या कारंज्यासारखं शंकर जयकिशनचे संगीत आणि त्यावर तलतचा थरथरचा स्वर. हेच गाणं परत लताच्या आवाजात आहे. पण तलतची सर त्याला नाही. दु:खाची आर्तता प्रकट करणारा तलतचा स्वर प्रेमाची अस्फुटतता प्रकट करतानाही कमालीचा प्रभावी वाटतो.
जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘किनारे किनारे’ (1964) मध्ये मन्ना डे यांच्या स्वरात एक गाणं आहे. देव आनंदसाठी मन्ना डे तसा फारच कमी गायला आहे. ‘चले जा रहे है मोहब्बत के मारे, किनारे किनारे किनारे किनारे’ हे गाणं तसं सरधोपट आहे. देवआनंद-मीनाकुमारीवर हे गाणं चित्रित आहे. गाणं फारसं पकड घेत नाही.
देवआनंदची पडद्यावरच्या प्रतिमेची सांगितीक बाजू साकारण्यात सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि किशोर कुमार-रफी यांचा आवाज यांचे फार मोठे योगदान आहे. पण या शिवाय इरतही संगीतकार आणि गायकांनी ही प्रतिमा सजवली. आणि त्यातून काही गाणी लोकप्रिय-अवीट गोडीची ठरली. ही त्यातीलच काही ठळक गाणी.
-आफताब परभनवी.
No comments:
Post a Comment