Saturday 29 April 2017

सलिल-लता-शैलेंद्र : सांगितिक समभुज त्रिकोण



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 29 एप्रिल 2017

शंकर-जयकिशन सोबतच अजून एका संगीतकाराला शैलेंद्रच्या निसर्ग व प्रेम या भावनांना शब्दबद्ध करून लताच्या आवाजात सादर करण्याचा मोह पडला. आणि ती गाणीही अविस्मरणीय ठरली. त्या संगीतकाराचे नाव सलिल चौधरी. 

सलिल चौधरी आणि शैलेंद्र यांचा पहिला चित्रपट म्हणजे ‘दो बिघा जमिन’ (1953). यात निसर्गाचे अतिशय सुंदर गाणे आहे ‘धरती कहे पुकार के’. पण हे केवळ लताचे गाणे नाही. मन्नादाच्या आवाजाची अप्रतिम साथ लताला लाभली आहे. किंबहूना हे गाणे मुख्यत: मन्नादाचेच आहे. लताचे सूर त्याला साथ देतात. याच चित्रपटातील दुसरे सुंदर गाणे ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ असेच मन्नादा आणि लता या दोघांचे आहे. खरं तर ही दोन गाणी म्हणजे पावसा आधीची धरतीची आस आणि पाऊस आल्यावरचा तिला झालेला आनंद. धरती आभाळाच्या मिलनातून सृष्टीचे पुढे पुढे चाललेले चक्र. स्त्री-पुरूष प्रेमाचे हे एक प्रतिकच सलिल चौधरी दाखवू इच्छितात. पण हे गाणे आपल्या विषयाच्या चौकटीत बसत नाही.  

या त्रिकुटाचे प्रेमाचे पहिले आनंदी गाणे अतिशय गाजलेल्या ‘मधुमती’ (1958) मधले आहे. ‘जूल्मी संग आख लडी रे’. शंकर जयकिशनच्याही एक पाऊल पुढे सलिल चौधरी निघून जातात. कारण त्यांनी गीतातल्या भावनेला न्याय देण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक वाद्यांचा वापर केला आहे. शंकर जयकिशन चाल सुंदर बांधतात पण भरपूर वाद्य वापरण्याचा मोह त्यांना टाळता येत नाही. 

निसर्गात प्रेम भावना व्यक्त करताना बासरी सारख्या वाद्याचा उल्लेख आणि त्या अनुषंगाने राधा-कृष्णाच्या प्रेमाचे सुचन करत शैलेंद्र गीताला वेगळाच गोडवा प्राप्त करून देतो.

वो छुप छुप के बंसूरी बजाये रे
सुनाये मुझे मस्ती मे भरा हुआ राग रे
मोहे तारों की छाव मे बुलाये
चुराये मेरी निंदीया मै रह जाऊ जाग रे
लगे दिन छोटा रात बडी
जूल्मी संग आंख लडी रे

आता असे शब्द असल्यावर लताच्या सूरात जास्तीचा गोडवा येणार नाही तर काय! या गाण्यात अजून दोघांचे योगदान मोठे आहे. एक म्हणजे दिग्दर्शक बिमल रॉय आणि दुसरी म्हणजे नायिका वैजयंतीमाला. ज्या पद्धतीनं वैजयंती मालानं या गाण्यावर नृत्य केलंय ते वहिदा रहेमान सोडल्यास इतर कुणाला जमेल की नाही शंका येते. 
याच चित्रपटातील दुसरं गाणं ‘घडी घडी मोरा दिल धडके’. इथे नायिका निसर्गात मुक्तपणे फिरत आहे.

‘आज पपिहे तू चूप रहना, मै भी हू चुपचाप, 
दिल की बात समझ लेंगे, सावरीया अपने आप’

आपल्या सोबत पक्षालाही गृहीत धरण्याची ही कल्पना सुंदर आहे. 

‘परख’ (1960) हा बिमल रॉय यांचा महत्त्वाचा सिनेमा. ‘मधुमती’ सारखेच सलिल-लता-शैलेंद्र हे त्रिकुटही इथे आहे. खरं तर ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘उसने कहा था’ या चार चित्रपटांना बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र असा सांगितिक समभूज चौकोनच म्हटलं पाहिजे. या गाण्यांचे चित्रिकरण वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
‘परख’ मध्ये साधनाच्या तोंडी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे नितांत सुंदर गाणे आहे. या गाण्याचं चित्रण, गाण्याच्या सुरवातीपासून लताच्या स्वरांशी जूगलबंदी करत आलेली सतार, साधना कट नसलेली साधी गोड साधना या सगळ्याचं एक वेगळंच रसायन पडद्यावर जमून आलं आहे. हे गाणं नुसतं ऐकायला तर गोड आहेच पण पहायलाही देखणं आहे. शैलेंद्रने फार कमी शब्दांत ही भावना मांडली आहे.

तूमको पुकारे मेरे मन का पपिहा
मिठे मिठे अगनी जले मोरा मनवा
ऐसी रिमझिम मे ओ साजन
प्यासे प्यासे मेरे नयन
तेरे ही ख्वाब मे खो गये
सावली सलोनी घटा जब जब छायी
आखियो मे रैना गई निंदीया ना आयी

इतकंच हे गाणं आहे. 

दुसरं एक गाणं याच चित्रपटात आहे. मोकळी हवा, निसर्ग, झरे, नद्या, डोंगर, आभाळ, धरती, हिरवळ, वारा, ढगाळलेलं आभाळ या सगळ्यांची नेहमीसाठीच एक ओढ शैलेंद्रला जाणवते. सलिल चौधरी सारखा संगीतकार आणि बिमल रॉय सारखा दिग्दर्शक लाभल्यावर मग तर काही विचारायलाच नको. साधना झाडाजवळ बसली आहे. तिला एक कानातल्या झुमक्यासारखं फुल दिसतं. आणि पाठोपाठ म्हशीच्या पाठीवर बसून जाणार्‍या गुराखी मुलाचा पावा ऐकायला येतो. हा तुकडा फारच सुंदर आहे. सुरांचे असे बारकावे शंकर जयकिशन फारसे टिपत नाही. साधना त्या सुरावटीप्रमाणे गुणगुणते. परत पावा ऐकू येतो. आणि हे सुंदर गाणंच सुरू होतं

मिला है किसी का झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
ओ सच्चे मोतीवाला झुमका, ठंडे ठंड हरे हरे नीम तले
सुनो क्या कहता है झुमका 
प्यार का हिंडोला यहां झूल गये नैना
सपने जो देखे मुझे भूल गये नैना
हाय रे बेचारा झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले   

या गाण्यात गुराखी म्हशीच्या पाठीवर बसून पावा वाजवत आहे. शेळ्या धुळ उडवत निघाल्या आहेत. वासरं हुंदडत आहेत. तळ्याच्या पाण्यात कमळं डोलत आहेत. सगळं आऊट डोर शुटिंग. कुठेच सेट लावलेला नाही. कृत्रिमता कुठेच नाही. साधनाला तर जवळपास मेकअप नाहीच. गळ्यात एक साधी साखळी. हातात दोन दोन बांगड्या. गडद काठाची कलकत्ता हँडलूमची साडी. लांब हताचे गळ्यापर्यंत ब्लाऊज.  

बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र या सांगितिक समभूज चौकोनाचं पुढचं गाणं ‘उसने कहा था’ (1961) मधलं आहे. ‘उसने कहा था’ हा बिमल रॉय यांचे दिग्दर्शन नसलेला पण निर्मिती असलेला चित्रपट. इथे साधनाच्या जागी नंदा आहे. कमळं फुललेल्या तळ्याच्या काठी दोन्ही हातावर ओढणी आभाळासारखी पसरून ती म्हणते आहे

‘मचलती आरजू खडी बाहे पुकारे 
ओ मेरे साजना रे धडकता दिल पुकारे आ जा
मेरा आंचल पकड के कह रहा है मेरा दिल, 
जमाने की निगाहो से यहां छूप छूप के मिल, 
यही तनहाईयो मे दिल की कली जायेगी खिल’ 

आता हीच भावना आधीच्याही गाण्यांमध्ये आली आहे. शैलेंद्रच्या डोक्यात निसर्ग आणि प्रेम हे समिकरण काहीतरी पक्कं बसलं आहे. या गाण्यात वडाचे पिंपळाचे झाड दाखवले आहे. त्यालाही परत पुराणकथांचे संदर्भ आहेत. वडाशी तर सत्यवान सावित्रीची कथा चिकटलेलीच आहे. याच चित्रपटात तलत-लताचे अविट गोडीचे ‘आ हा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, आयी रात सुहानी देखो प्रीत लिये’ गाणे आहे. 

नंदाच्या वार्‍यावर उडणार्‍या ओढणीसोबतच वार्‍याच्या झुळूकीने गवतावर उठलल्या लाटाही जेंव्हा बिमल रॉय दाखवतात तेंव्हा खरंच शब्द, सुर, कॅमेरा सगळं सगळं कसं एकजिनसी होऊन एक काव्यच आपल्या डोळ्या समोर जिवंत करतात, आणि कानांसोबतच डोळ्यांनाही त्याचा सुखद अनुभव देऊन जातात. 

बिमल रॉय शिवाय या त्रिकुटाने अजून दोन चित्रपटांत दखल घ्यावी अशी याच आशयाची गाणी दिली आहेत. ‘चार दिवारी’ (1961) मध्ये नंदाच्याच तोंडी हे गोड गाणे आहे, 

‘झुक झुक झुक झूम घटा छायी रे, 
मन मोरा लहराये, 
पीहू पीहू पीहू पपिहा गाये रे’. 

दोरीवर वाळलेले कपडे काढताना, अंथरूण पांघरूण आवरताना हे गाणं आहे. गाण्यातल्या सगळ्या प्रतिमा परत निसर्गाच्याच आहेत. बाज उभी करून ठेवताना बाजेच्या ताणलेल्या दोर्‍यांआडून तिचा चेहरा दाखवताना केवढी कल्पकता दिग्दर्शक दाखवतो. घरातली साधी साधी कामं करतानाही कॅमेराने सौंदर्य टिपलं आहे. 
याच वर्षीच्या तनुजाच्या ‘मेमदिदि’ (1961) चित्रपटातही या त्रिकुटाने एक दोन नाही तर तब्बल तीन अशी गाणी दिली आहेत. पहिलं गाणं आहे 

‘रातों को जब नींद उड जाये, 
घडी घडी याद कोई आये’ 

यात कोरसचा अतिशय चांगला वापर केला आहे. हिंदी गाण्यात कोरसचा वापर जसा सलिल चौधरी यांनी केला तसा फार कमी संगीतकारांनी केला. 

दुसरं गाणं 

‘भूला दो जिंदगी के गम, तराना छेडो प्यार का, 
के आ रहा है आ रहा है कारवा बहार का’ 

ज्यात परत अतिशय चांगला कोरसचा आणि पाश्चिमात्य सुरावटीचा वापर केला आहे. निसर्ग तर आहेच जो की अशा गाण्यात शैलेंद्रच्या शब्दांचा अविभाज्य भागच आहे. 

‘कली कली से कह दो हमसे मुस्कूराना सीख ले, 
कहां है भवरा आके हमसे  गुनगुनाना सिख ले, 
ये दिन है सारी जिंदगी मे सिर्फ एक बार का’ 

शैलेंद्रला शब्द सहज सुचत जातात. किंवा खरं तर एखादी चाल संगीतकाराने दिली की त्याच्या डोक्यात असे शब्द फेर धरून नाचायला लागतात की काय अशी शंका येते.

तिसरं गाणं खुपच गोड आहे. तरूणपण आलं म्हणजे बालपण सोडून गेलं. आणि त्याच्या जाण्याची लाडीक तक्रार आहे

.‘बचपन ओ बचपन, प्यारे प्यारे बचपन, 
ओ लल्ला सच बतला, कहां गया तू छोड के’ 

या शब्दांना साजेशी अशी गतिमान चाल गाण्याला आहे. खरं तर हे गाणं गीता किंवा अशासाठी असावं असं वाटतं. पण लताच्या आवाजाची कमाल म्हणजे तिनं याला योग्य तो न्याय दिला आहे. तिच्या आवाजाताला अवखळपणा इथे जाणवतो.

या काही गाण्यांतून सलिल-लता-शैलेंद्र हा सांगितिक त्रिकोण समभूज आहे हे लक्षात येते. इथे शब्द-सुर-संगीत सारख्याच ताकदीनं येतात. बिमल रॉयच्या चित्रपटात तर हा त्रिकोण समभूज चौकोन बनतो. असं फार कमी वेळा घडलेलं आहे. 

शंकर जयकिशनसोबत शैलेंद्रने सगळ्यात जास्त गाणी दिली. पण त्यासोबतच शैलेंद्रच्या शब्दांची जातकुळी ओळखून त्याला न्याय देणारे सलिल चौधरी सारखे संगीतकारही होते. 

          -आफताब परभनवी.

Monday 24 April 2017

पंछी बनू उडती फिरू : निसर्गाचे प्रेम व प्रेमातील निसर्ग



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 22 एप्रिल 2017

मोकळ्या हवेत नायिका पिंजर्‍यातील पक्षी मोकळे करते. आकाशात ते स्वैर भरारी मारतात आणि पाठोपाठ तसेच संगीतही आपल्या कानावर पडते. लताचा अप्रतिम मोकळा खळाळत्या झर्‍यासारखा स्वर उमटतो, शैलेंद्रचे शब्द प्रकट होतात, 
‘पंछी बनू उडती फिरू, मस्त गगन मे
आज मै आझाद हू दुनिया की चमन मे
चोरी चोरी (1956) मधील हे केवळ एक गाणे नाही. तर शैलेंद्र-लता-शंकर जयकिशन या त्रिकुटाने जी 12 गाण्यांची मालिकाच हिंदी चित्रपटांत दिली त्यातली पहिली साखळी आहे फक्त. सगळी बंधनं तोडून नायिका बाहेर पडली आहे. ही उन्मुक्त अवस्था तिच्या मनाचीही आहे. प्रेमाला अतिशय पोषक अशी तिची मानसिकता तयार झाली आहे. निसर्गाशी तादात्म पावताना शैलेंद्रने जी उंची गाठली आहे ती केवळ अद्वितीय

ओ मै तो ओढूंगी बादल का आंचल
ओ मै तो पेहनूंगी बिजली की पायल
ओ छीन लूंगी घटाओं से काजल
ओ मेरा जीवन है नदियों की हलचल
दिल से मेरे लहेर उठी ठंडी पवन में
आज मै आझाद हू दुनिया की चमन मे

या सगळ्या गाण्यात कुठेही प्रियकाराचा उल्लेख नाही. कुठेही ती प्रेमात पडली असा संदर्भ येत नाही. पण स्वाभाविकच लक्षात येते की पुढची अवस्था प्रेम हीच असणार.

छोटी बहन (1959) मध्ये नंदाच्या तोंडी या मालिकेतील दुसरं गाणं येतं 

‘बागों मे बहारो मे इठलाता गाता आया कोई, 
नाजूक नाजूक कलियों के दिल को धडकाता आया कोई’

इथे पहिल्यांदा निसर्गाच्या सान्निध्यात प्रेयसीला प्रियकराची चाहूल लागते. कदाचित शैलेंद्रच्या डोक्यात हा विषय कायम घोळत असणार. म्हणून लता आणि शंकर-जयकिशन सोबत असले की त्याच्या शब्दांना वेगळाच रंग चढतो आणि प्रेम, निसर्ग यांतून अशा गाण्यांची निर्मिती होत राहते.

‘अपने हुये पराये’ (1964) मध्ये माला सिन्हाच्या तोंडी याच्या पुढची भावना शैलेंद्रने मांडली आहे. 

‘बहार बनके वो मुस्कुराये हमारे गुलशन मे
बाद-ए-सबा तू न आये तो क्या
काली घटा तू न छाये तो क्या’

पण 50-60 च्या दशकातील गाण्यात ज्या पद्धतीनं शंकर जयकिशनच्या संगीतात शब्दांना- लताच्या  स्वरांना न्याय देणारा नाजूकपणा होता तो आता आढळत नाही. आता पार्श्वसंगीतात वाद्यांचा गोंगाट वाढत गेलेला आढळतो. आणि एका साच्यात गाणे पुढे सरकत जाते असा भास होतो. 

पुढची भावना अर्थात प्रेमात प्रत्यक्ष पडल्याची आहे. निसर्गाच्या साक्षात्काराने निर्माण झालेली उत्फुल्लीत मनोवृत्ती, प्रेमाची लागलेली चाहूल, प्रियकराचं आयुष्यात आगमन. आता स्वाभाविकच  ‘मेरी जो मेरी जो, प्यार किसी से हो ही गया है, दिल क्या करे’ (यहूदी- 1958) हेच शब्द येणार. मीनाकुमारी-दिलीपकुमार यांचा हा गाजलेला चित्रपट. या गाण्यात एक गोड तक्रार शैलेंद्रने शब्दात मांडली आहे. ‘न होते मुकाबिल, न दिल हारते हम, ये अपनी  खता है गीला क्या करे’ यातूनच एका अल्लड प्रेयसिची मानसिकता समोर येते.  

प्रेमात पडलेली नायिका प्रेमामुळे आनंदी जगण्याचाच मंत्र शिकते. आणि मग या प्रेमाची व्याप्ती केवळ शारिर प्रेमापुरती न राहता आख्ख्या आयुष्यालाच व्यापून राहते. म्हणून मग ती आपल्या नात्याचा उल्लेख करता करता म्हणते

‘वो रंग भरते है जिंदगी मे बदल रहा है मेरा जहा
कोई सितारे लूटा रहा था किसी ने दामन बिछा दिया
किसी ने अपना बना के मुझको  मुस्कूराना सिखा दिया
अंधेरे घर को बना के रोशन चराग जैसे जला दिया’

‘पतिता’ (1953) मधले हे गाणे आजही ऐकताना प्रेमाचा टवटवीतपणा जाणवतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळे ती व्यक्त करते आहे निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्याच प्रतिमा वापरून. 
अशीच दोन गाणी ’नया घर’ (1953) मध्ये गीताबालीच्या तोंडी शंकर जयकिशनने दिली आहेत. ‘ये समां और हम तूम’ आणि ‘जा जा जारे जा रे जा, गम के अंधरे तू जा’. गीताबालीचा नखरा गाण्यातूनही व्यक्त झाला आहे. 

आत्तापर्यंतच्या या गाण्यांत नायिका एकटीच आहे. किंवा फार तर ती आपल्या मैत्रिणींना आपल्या मनातील भावना सांगत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्याच प्रतिमा वापरून प्रियकराच्या साथिनं आपल्या प्रेमाची कबुली ती देते हालाकु (1956) मध्ये. मीना कुमारी-अजीत वरचे हे सुंदर गाणे आहे

‘ये चांद और सितारे, ये साथ तेरा मेरा
शबे जिंदगी का न अब हो सबेरा
आ ऽऽऽ दिलरूबा आ ऽऽ दिलरूबा’

प्रेमाची द्वंदगीतं म्हणजे शंकर जयकिशनचा हातखंडाच. पण हे एकट्या लताचेच गाणे आहे. नायक उपस्थित आहे पण तो गात नाही. या गाण्यातही प्रेमाची भावना अतिशय सुंदर पद्धतीनं फुलवली आहे. 

दुसरं गाणं ‘लव्ह मॅरेज’ (1959) चं आहे. माला सिन्ह आणि देव आनंद वर चित्रित या गाण्यात देव आनंद नुसता हसून साथ देतो आहे पण असं वाटतं की तोही सोबत गातच आहे.

कहे झुम झुम रात ये सुहानी
पिया हौले से छेडो दोबारा
वोही कलकी रसिली कहानी

गाण्यातल्या एका कडव्यात ‘देख रही हू मै एक सपना, कुछ जागी सी कुछ सोयी सी’ असे शब्द येतात आणि पाठोपाठ पडद्यावर मालासिन्हाचे स्वप्नाळू डोळे येतात. तिचा पदर हलकेच ओढणारा देवआनंद तिला जणू स्वप्नातून जागेच करतो आहे असं वाटतं. 

जून्या गाण्यांना एका गोष्टीचा फायदा मिळाला. तो म्हणजे त्या काळी सिनेमा कृष्ण धवल होता. त्यामुळे काव्यात्मक अशा कित्येक छटा काळ्या-पांढर्‍याच्या दरम्यान पकडता येतात. ज्या की रंगीत मध्ये करकरीत होवून जातात. (म्हणूनच राजकुमार (1964) मधील ‘आ जा आयी बहार’ हे साधनाचं रंगीत गाणं या मालिकेत गृहीत धरलं नाही. शैलेंद्र-लता-शंकर जयकिशनचं असूनही. कृष्ण धवल गाण्यातली तरलता इथे नाही. )

रूप की रानी चोरों का राजा (1962) मध्ये याच मालिकेतील एक अफलातून गाणं आहे. 

‘तूम तो दिल के तार छेड करे हो गये बेखबर
चांद के तले जलेंगे हम, ए सनम रातभर’

हे गाणं तलतच्या आवाजात अतिशय सुंदर आहे. पण सोबत लताच्या आवाजातही आहे. देव आनंद-वहिदा रहमान यांच्यावर चित्रीत हे गाणं म्हणजे आधीच्या काळी ‘दो पहलू दो रंग’ अशा मालिकेतील गाण्याचा एक उत्तम नमुना. त्यात एकच गाणं गायक आणि गायिका यांच्या आवाजात स्वतंत्र असायचं. हे गाणं तसंच आहे. 

प्रेमाची पहिली अवस्था ज्यात फक्त निसर्ग आहे (पंछी बनू उडती फिरू), मग दुसरी अवस्था ज्यात नायिका एकटीच आहे आणि आपली प्रेम भावना निसर्गाच्या सान्निध्यात व्यक्त करते आहे (‘बागों मे बहारो मे’ पासून ते ‘जा जा जा रे जा रे जा’ पर्यंत). तिसरी अवस्था ज्यात नायिका एकटी नाही, सोबत नायकही आहे (‘ये चांद ये सितारे’ पासून ते  ‘तूम तो दिल के तार छेड कर’ पर्यंत). 

आता पुढची जी अवस्था आहे ती सुखाच्या परमोच्चक्षणी नायिकेला एक अनामिक अशी भिती वाटते आहे. तिला वाटते आहे की आपल्या सुखाला कुठे नजर लागते की काय? आणि तिच्या तोंडून स्वर उमटतात

‘तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यूं मुझको लगता है डर’

असली नकली (1963) मधील हे गाणं साधनावर चित्रित आहे. साधना कट नसलेली साधा अंबाडा घातलेली साधना या गाण्यात विलक्षण गोड दिसली आहे. 

प्रेमाची पुढची  अवस्था अर्थात विरहाची. 1953 च्या ‘शिकस्त’ मध्ये नलिनी जयवंतच्या तोंडी हे गाणं शैलेंद्रने दिले आहे. 

कारे बदरा तू न जा न जा बैरी तू बिदेस न जा
घननन मेघ मल्हार सुना रिमझिम रस बरसा जा

माथे का सिंदूर रूलाये लट नागिन बन जाये
लाख रचाऊ उनबिन कजरा आसुअन से धूल जाये

निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं प्रेम, निसर्गाच्या सान्निध्यातच त्याची चरमसिमा आणि निसर्गाच्या सान्निध्यातच विरहाची वेदना अशा प्रकारे प्रेमाचे रंग शैलेंद्र-लता-शंकर जयकिशन या त्रिकुटाने रंगवले आहेत.

या सगळ्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे एकातही नायिका नृत्य करताना दाखवली नाही. नर्गिस, मालासिन्हा, नंदा, मीना कुमारी या तशा नृत्यासाठी प्रसिद्ध नव्हत्याच. पण वहिदा रेहमान सारखी नृत्यनिपूण नायिका असतानाही  तिच्या वाट्याला नृत्य येत नाही. फक्त स्वाभाविक अशा हालचाली ती करते आहे. इथे प्रेमात मुग्ध झालेली हरवलेली गुंग झालेली नायिकाच पडद्यावर येत राहते. तिच्या काळजात भावनांचं नृत्य चालू आहे. शब्दांतून स्वरांतून जी स्वाभाविकता उमटते तिला योग्य तो न्याय देत नायिकाही नृत्य न करता साध्या हालचालींमधून तसे विभ्रम दाखवते फक्त.   

एखादा कवी असा काही विचार आपल्या गाण्यात करतो आणि त्याला गायिका, संगीतकार सतत 12 वर्षे साथ देत 12 गाणे देतात हे विलक्षण आहे. लताच्या आवाजात तो नैसर्गिक गोडवा आहे आणि सोबत या आवाजाला प्रीतीचे  अस्तरही आहे. वाद्यांच्या गदारोळात पुढे गाणं गुदमरून टाकणारा शंकर जयकिशन या गाण्यांसाठी मात्र कमालीचा हळवा होतो हे पण विशेष. 

अशी ही आगळी वेगळी 12 गाण्यांची 12 वर्षातील मालिका.
(या त्रिकुटाची अशी अजून काही गाणी आहेत. पण ही केवळ निसर्ग आणि प्रेम अशी गाणी नाहीत. प्रेमाची गाणी आहेत इतकंच खरं. जास्तीची गाणी रसिकांच्या नोंदीसाठी केवळ यादी)
1. बादल (1951), उनसे प्यार हो गया 
2. काली घटा (1951), इला बेली यारे 
3. पुनम (1952) दिन सुहाने मौसम प्यार का 
4. बादशहा (1954), गुल मुस्कुरा था 
5. राजहट (1956) मेरे सपनों मे आना रे, आ गयी लो आ गयी 
6. शरारत (1959) तेरा तीर ओ बे पीर 
7. जिस देश मे गंगा बेहती है (1960) ओ बसंती पवन पागल 
8. दिल अपना और प्रीत पराई (1960) मेरा दिल अब तेरा ओ साजना, अंदार मेरा मस्ताना 
9. राजकुमार (1964) आ जा आई बहार 
10. लव्ह इन टोकियो (1966) कोई मतवाला आया मेरे द्वारे 
11. आम्रपाली (1966) नील गगन की छांव मे 
12. गबन (1967) आये रे दिन सावन के.

          -आफताब परभनवी.

Friday 14 April 2017

मुमताजचा जन्मदिवस आणि ताजमहालवरची दोन गाणी



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 15 एप्रिल 2017

एकच वर्ष आहे (1964). मोहम्मद रफी हा एकच गायक आहे. ताजमहाल हा एकच विषय आहे. पण गाणी दोन टोकाची आहेत. पहिलं गाणं नौशादचं आहे ‘लीडर’ या दिलीपकुमार वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या चित्रपटात शकिलनं लिहीलेलं. चित्रपट रंगीत आहेत. ताजमहालचं त्या काळाच्या मानानं अप्रतिम असं चित्रण केलं आहे. नुसता ताजच नव्हे तर भोवतालची बाग, कारंजं हे सगळंच यात येतं. शकिलचे शब्द तसे पारंपरिक म्हणजे ताज कसं प्रेमाचं प्रतिक आहे, इथे प्रेमाला अप्रतिम रंग कसा चढला आहे, गरीब असो की श्रीमंत सगळ्यांसाठीच ही जागा म्हणजे प्रेमाचं प्रतिक आहे वगैरे वगैरे. 

लता आणि रफीने आपल्या मधुर आवाजात या गीताचं सोनं केलं आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. ललत रागातील चाल या गाण्याला नौशाद यांनी बांधलेली आहे. त्या काळात ज्या पद्धतीची गाणी असायची त्याच पठडीत हे गाणं आहे. 

इक शहेनशाह ने बनवाके हसी ताजमहल
सारी दुनिया को मुहोब्बत की निशानी दी है
इसके साये मे सदा प्यार के चर्चे होगे
खत्म जो हो न सकेगी वो कहानी दी है

हे शब्दही तसे साधेच पण लक्षात राहणारे आहेत. सोपेपणा हा शकिलच्या शायरीचा एक गुणधर्मच राहिला आहे.  नौशाद यांच्या चालीतही सोपेपणा आहे. शास्त्रीय संगीतावर आधारीत चाली हे तर त्यांचे वैशिष्ट्यच. 

देवदास (1954, सं-एस.डी.बर्मन), नया दौर (1957 सं-ओ.पी.नय्यर), मधुमती (1958 सं-सलिल चौधरी), पैगाम (1959 सं-सी.रामचंद्र), गंगा जमुना (1961 सं-नौशाद), लीडर (1964 सं-नौशाद) आणि संघर्ष (1968 सं-नौशाद) असे सात चित्रपट दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांनी दिले. या सगळ्यांतील गाणी गाजली. वेगवेगळे संगीतकार असले तरी दिलीपकुमार यांच्या चित्रपटांतील गाणी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. देवआनंद-राज कपुर-गुरूदत्त यांच्यासारखाच काहीतरी संगीताचा कान दिलीपकुमार यांना निश्‍चितच असणार. नसता संगीतकार बदलूनही त्यांच्या चित्रपटात गाणी दर्जेदार राहिली यामागे दुसरे काय कारण.  पण नौशादच्या संगीतातले दिलीपकुमारचे चित्रपटत सांगितीक दृष्ट्या जास्त गाजले हे खरं आहे. 

‘लीडर’ मध्येही इतर गाणी सुंदरच आहेत. तीन कडव्याचं ‘इक शहेनशाह ने बनवाके हसी ताजमहल’ हे मोठंच गाणं आहे. या गाण्याची रचना शकिलने सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच केली आहे. फक्त धृ्रवपद म्हणून ‘शहेनशाह ने बनवाके’ असे शब्द वापरले आहे.
याच वर्षी ‘गझल’ चित्रपटात साहिरची ताजमहाल वरची कविता मदनमोहनने गाणं म्हणून घेतली आहे. त्याचाही गायक रफीच आहे. सुनील दत्त व मीनाकुमारी यांचा हा कृष्ण धवल चित्रपट. काय योगायोग आहे, साहिरला शकिलच्या कवितेवर टीका करायची होती किंबहुना त्याच्या विरोधी भावना व्यक्त करायची होती. आणि त्या रंगीत गाण्याला उत्तर म्हणून हे गाणंच कृष्ण धवल असावं म्हणजे काय. 

मूळ साहिरची ही कविता मोठी आहे. यातील दोनच कडवे मदनमोहनने गीत म्हणून वापरले आहेत.

अनगिनत लोगों ने दुनिया मे मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नही,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे ।

ताजच्या सौंदर्याचे वर्णन करणं शकिलने टाळले होते. खरं तर शकिल पूर्णपणे चित्रपटासाठी एखादं गाणं लिहावं असं लिहून गेला आहे. त्या पातळीवर ते पूर्णत: बरोबरच आहे. त्याला आपल्या पद्धतीनं गायक, कलाकार, संगीतकार सगळ्यांनीच न्याय दिला आहे.

पण साहिरचे तसं नाही. ही कविता म्हणूनच लिहीली गेली आहे. चित्रपटात येताना ते गाणं जबरदस्ती आलं असंच वाटत राहतं. शिवाय ही चालही लक्षात रहात नाही. गाण्यात नसलेली पण कवितेतील एका कडव्यात साहिर लिहीतो

मेरे मेहबुब! उन्हे भी तो मुहोब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बक्षी है इसे शक्ले-जमीन ।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद 
आज तक उनपे  जलाई न किसीने कंदील ।

ही जी डावी विचारसरणी साहिर कलेच्या प्रांतातही मांडू पाहतो हीला तेंव्हा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या कारखान्यात काम करणार्‍या कामगारांसाठी मालकाविरूद्ध लढावं तसा साहिर ताजमहाल साठी काम करणार्‍या छोट्या छोट्या कारागिरांसाठी लढतो आहे. त्यांची बाजू मांडतो आहे असंच वाटतं. पण प्रत्यक्षात या कामासाठी प्रचंड रक्कम खर्च झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कामगारांना बिनावेतन राबवून घेतलं असं नाहीऐ. पण साहिरला कोण सांगणार.
गाण्यात जे कडवं शेवटी आलं आहे त्यात साहिर लिहीतो

ये चमनजार, ये जमना का किनारा ये महल
ये मुनोक्कश दरो-दिवार ये मेहराब ये ताक
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरिबों की मोहब्बत का उडाया है मजाक ।
मेरे मेहबूब ! कही और मिला कर मुझसे !

शोषण करणारा आणि शोषित अशी मांडणी मार्क्सने केली. त्याभोवती जगभरचे विचारवंत फिरत राहिले. पण लिखाणातही आणि विशेषत: प्रेमासारख्या विषयातही मार्क्स आणण्याचं काम हिंदी गाण्यात साहिरनं केलं. 

आज ही दोन्ही गाणी ऐकत असताना ‘लीडर’मधील गाणंच उजवं वाटतं. साहिरची कविता श्रेष्ठच आहे. तुलनाच करायची तर शकिल पेक्षा साहिर जास्तच प्रतिभावंत होता यात काही वादच नाही. पण गाणं म्हणून मनात रेंगाळतं ते शकिलचंच. कदाचित गाण्यासाठी शब्दांची जी तडजोड करावी लागते ती साहिरने केली नसावी. साहिरच्या कवितेतील शब्द गाण्यात मावत नाहीत, त्यांचे अर्थ चटकन उलगडत नाहीत. 

किंवा असंही म्हणता येईल की मदनमोहन हा आशय पोचविण्यासाठी असमर्थ ठरला. कारण प्यासा मध्ये ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ चा साहिर लिखित आशय एस.डी.बर्मनने फार परिणामकारक रित्या संगीतातून पोंचवला होता. इतकंच काय साधना चित्रपटात एन.दत्ताने ‘औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया’ ही साहिरची कविताही तिच्या दाहकतेसह पोचवली होती. त्या आशयाला उचीत न्याय दिला होता. 

पण इथे मात्र काहीतरी कमी पडलं आहे. साहिरचा आशय नीट पोचतच नाही.

जिच्यासाठी हा ताजमहाल बांधला त्या मुमताज महल हीचा 17 एप्रिल हा जन्मदिवस. म्हणून ही एक आठवण.    
   
          -आफताब परभनवी.

Sunday 9 April 2017

मीनाकुमारी : ‘कितना हसी सफर था...’


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 8 एप्रिल 2017

जळणारी एक मेणबत्ती, तिच्या भोवती पिघळलेलं मेण किंवा काजळ भरलेल्या मोठ्या डोळ्यांतून ओघळणारे आसु अशी काहीतरी एक दु:खी प्रतिमा मीनाकुमारीची आपल्या मनात तयार झालेली आहे. त्याला मीनाकुमारीसगट सगळेच जबाबदार आहेत. तिच्या शोकात्म आयुष्याचीही या प्रतिमेला एक पार्श्वभूमी आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून तिच्या कारकिर्दीकडे तटस्थपणे पाहिलं तर कितीतरी सुंदर आनंदी प्रेमाची रसरशीत गाणी तिच्या चित्रपटांत सापडतात. पण त्या गाण्यांकडे आपले लक्ष जात नाही. किंवा ही गाणी मीनाकुमारीची आहेत म्हणून मनात ठसत नाही. 

अगदी सुरवातीला ‘अनमोल रतन’ (1950) मध्ये संगीतकार विनोदने तलत-लताच्या आवाजात ‘शिकवा तेरा मै गाऊ, दिल मे समाने वाले, भूले से याद करले, ओ भूल जाने वाले’ सारखं विरहाचं आर्त गाणं दिलं आणि पुढं हाच शिक्का मीनाकुमारीवर बसला. किंवा तिनंही बसवून घेतला. वास्तविक तिच्या शेवटच्या चित्रपटात पाकिजा (1972) ‘चलो दिलदार चलो’ सारखं प्रेमाचं अप्रतिम आनंदी द्वंद गीत आहे. म्हणजे सुरवात दु:खानं करून शेवट आनंदी करणारी ही कलाकार, पण तिची प्रतिमा मात्र आपण दु:खीच करून घेतली.   

बैजू बावरा (1952) हा सगळ्याच अर्थाने मीनाकुमारीचा हिट चित्रपट. यातील गाणी गाजली, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला गोळा केला. मीनाकुमारी एक प्रमुख नायिका म्हणून पुढे आली. आपल्या आधीचा अशोक कुमार असो कि बरोबरचे राजकपुर, देव आनंद, दिलीपकुमार असो कींवा नंतरचे सुनील दत्त, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार असो कींवा त्याही नंतरचा सुपरस्टार राजेश खन्ना असो सगळ्यांबरोबर तिनं काम केलं. बैजू बावरा नंतर तिला ‘ए’ दर्जा मिळाला तो शेवटपर्यंत. यातली एक द्वंद गीत अतिशय गोड आहे. 

हे गाणं आहे ‘झुले मे पवन की आयी बहार’. झोक्यावर बसलेले लहानपणीचे भारतभुषण आणि मीनाकुमारी झोका परत चित्रपटाच्या फ्रेम मध्ये येतो तेंव्हा मोठे झालेले असतात आणि नेमकं त्याचवेळी गाणं सुरू होतं. शकिल आणि नौशाद हे एक जबरदस्त गोडवा असलेलं समिकरण. मीनाकुमारीला पहिलं फिल्मफेअर याच चित्रपटासाठी मिळालं होतं. पुढे तिला तीन फिल्मफेअर मिळाले ते तिच्या दु:खी गाण्यांसाठीच्या चित्रपटांसाठी.

ज्या चित्रपटात भरपूर गाणी होती आणि जवळपास सगळीच गाजली होती तो चित्रपट म्हणजे ‘आझाद’ (1955). या चित्रपटात सी.रामचंद्र यांनी मीनाकुमारीसाठीचं सगळ्यात सुंदर आनंदी द्वंद गीत दिलं आहे. ‘कितनी हसी है मौसम, कितना हसी सफर है, साथी है खुबसूरत ये मौसम को भी खबर है’ स्वत: सी.रामचंद्र यांनीच हे गाणं लतासोबत गायलं आहे. जशी नौशाद-शकिल अशी संगीतकार-गीतकार जोडी होती तशीच सी. रामचंद्र-राजेंद्रकृष्ण अशीही जोडी आहे. या जोडीनं कैक सुमधूर गाणी दिली आहेत. 

पुढच्या वर्षी 1956 मध्ये मीनाकुमारीची अशी काही अवखळ खट्याळ गाणी आली की डोळे झाकले तर आपण म्हणून शकतो पडद्यावर मधुबालाच असणार. ‘नया अंदाज’ (1956) मध्ये ‘मेरी नींदो मे तूम, मेरी ख्वाबों मे तूम, हो चुके हो तुम्हारी मुहोब्बत मे गुम’ असं पियानोवर बसून गाणारा किशोरकुमार. आणि मीनाकुमारी शमशादच्या आवाजात उत्तर देत आहे ‘मन की बीना की धून, तू बलम आज सून, मेरी नजरों ने तूझको लिया आज चून’. शमशाद च्या अतिशय दुर्मिळ गाण्यांपैकी हे गाणं आहे. ओ पी नय्यर चे संगीत या चित्रपटाला आहे. अशा पद्धतीनं तिचा आवाज वापरला गेला नाही. तो फारसा शोभतही नाही. त्याच वर्षीच्या ‘मेमसाहिब’ मध्ये मदन मोहनने एक अफलातून गाणं ‘केहता है दिल तूम हो मेरे लिये’ दिलं आहे. तलत-आशा असलं मस्त कॉकटेल आहे. शांत रोमँटिक भूमिकेतला सोज्वळ शम्मी कपुर पाहणं म्हणजे मजाच वाटते. पण गाणं फारच गोड आहे. ना पुढे मदनमोहनचे सुर शम्मीशी जूळले, ना आशा भोसलेला फारशी गाणी मदन मोहनकडे मिळाली. या चित्रपटासाठी राजेंद्रकृष्णची गीतं मदनमोहननं वापरली आहेत. ही जोडी मात्र सगळ्यात जास्त जमली. नाव जरी मदनमोहन- राजा मेहंदी अली खां या संगीतकार-गीतकार जोडीचं झालं असलं तरी मदनमोहन-राजेंद्रकृष्ण जोडीची गाणी जास्त आहेत.

1956 चा मीनाकुमारीचा तिसरा चित्रपट म्हणजे ‘एक ही रास्ता’. हेमंतकुमारचा धीरगंभीर आवाज आणि त्यात मिसळलेला लताचा कोवळा गोड आवाज, मजरूहचे शब्द 

‘सावले सलोने आये दिन बहार के, 
झुमते नजारे झुमे रंग डार के, 
नदीकिनारे कोयल पुकारे, 
आया जामाना, गाओ गीत प्यार के’. 

या गाण्यात माऊथ ऑर्गनचा वापर हेमंत कुमार यांनी अतिशय सुंदर केला आहे. सायकलवर बसलेला सुनील दत्त, पुढच्या बास्केटमध्ये बसलेली छोटी डेझी इरानी, मागच्या डबल सायकलच्या सीटवरची मीनाकुमारी असं हे गाणं मस्त आहे. मीनाकुमारीची सदाबहार टवटवीत गाणी निवडायची म्हटलं तर या गाण्याचा क्रमांक फार वरती लावावा लागेल.

पुढच्याच वर्षी 1957 ला ‘मिस मेरी’ मध्ये राजेंद्रकृष्ण ला हाताशी धरून (नागिनची हिट जोडी) हेमंतकुमारनं सुंदर द्वंद गीत दिलं आहे. मीनाकुमारी सोबत जेमिनी गणेशन हा दाक्षिणत्य नट आहे. ‘ओ रात के मुसाफिर, चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दे’. यातला जेमिनी गणेशनचा ठोकळेबाज अभिनय खटकतो. पण मीनाकुमारीनं गाणं सावरून घेतलं आहे. बीनाकातही हे गाणं त्यावर्षी हिट ठरलं.  

शंकर जयकिशन आणि किशोर कुमार-गीता दत्त हे सुत्र कधीच जूळलं नाही. पण ही किमया मीनाकुमारीच्या ‘शरारत’ (1959) मध्ये घडली. आणि रसिकांच्या कानी पडलं एक गोड मस्तीखोर गाणं, ‘तूने मेरा दिल लिया, तेरी बातों ने जादू किया’. गाणं ऐकताना सारखं जाणवत राहतं शंकर जयकिशन-किशोर-गीता हे तीन कोन आहेत. आणि कोणीच आपली जागा सोडायला तयार नाही. एस.डी.बर्मन जसा किशोरचा-गीताचा आवाज हवा तसा वळवून घेतो तसं शंकर जयकिशनला जमत नाही. ओ.पी.नय्यरही किशोर च्या आवाजाला न्याय देवू शकत नाही. ही एक मोठीच अडचण आहे. किंबहूना या संगीतकारांच्या, त्याकाळाच्या, गायकांच्या काही मर्यादा असतील. याच चित्रपटात अजून एक गाणं या जोडीचं आहे ‘देख आसमां मे चांद मुस्कुराये’. हे पण मस्त आहे. 

अर्धांगिनी (1959) मध्ये वसंत देसाई यांनी दोन द्वदं गीतं दिली आहेत. एक प्रत्यक्ष मीनाकुमारी आणि राजकुमारवर आहे. ‘प्यार मे मिलना सनम, होता है तकदीर से, हो अच्छी रहेगी तनहाईमे, बाते तेरी तस्वीर से’ लता आणि हेमंतकुमारच वाटावा अशा सुबीर सेनच्या आवाजात हे गाणं आहे. हे गाणं ऐकताना सारखं ‘झनक झनक पायल बाजे’ मधील नैन सो नैन या लता-हेमंतच्या गाण्याचीच आठवण येत राहते. कदाचित संगीतकार एक असेल. एकाच काळातील गाणी असल्यामुळेही असेल. 
याच चित्रपटात दुसरं लोकगीतावर आधारीत गीता-रफीच्या आवाजात एक भन्नाट गाणं वसंत देसाईंनी दिलं आहे. मीना कुमारी अणि राजकुमार दूरून रस्त्यावर गाणार्‍या या लोककलाकारांकडे पाहत आहेत. गाण्याचे बोल आहेत, 

‘अरे तूने जो इधर देखा, 
मैने भी उधर देखा,काहे को जले है कोई रे, 
नजर भर की हो गयी, नादानी नजर भर की हो गयी, 
काहे को समझ लिया, तेरी मेरी प्रीत पिया, 
दोही दिनों की हुई रे, बदनामी उमर भर की हो गयी’

लोकगीताचा ठसका, लोकवाद्यांचा वापर, लोकगीतांचा थेटपणा असा सगळाच प्रत्यय एकत्र देणारं हे गाणं. गीताचा मदमस्त आवाज. त्याला तितक्याच तोडीची रफीची साथ. हिंदी चित्रपटाच्या गाण्यांमधून लोकगीतांवर आधारीत गाणी हूडकून काढायची म्हटली तर सलिल चौधरी, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, नौशाद आणि वसंत देसाई अशा मोजक्याच संगीतकारांची गाणी  शोधावी लागतील. त्यांची यावर विलक्षण हुकूमत होती. 

1960 मध्ये आलेला ‘कोहिनूर’ हा मीनाकुमारीचा अतिशय गाजलेला सिनेमा. त्यात मीनाकुमारी-दिलीपकुमार ही जोडी होती. मीनाकुमारीच्या आख्ख्या कारकीर्दीत प्रेमाची आनंदी द्वदंगीतं इतक्या संख्येनं असणारा हा एकमेव चित्रपट. एक दोन नाही तर तब्बल चार गाणी यात अशी आहेत. लता-रफीचं ‘दो सितारों का जमी पर है मिलन आज की रात’ हे तर हिट ठरलेलं गाणं. होळीचं गोड गाणं ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ तसंच ‘कोई प्यार की देखे जादूगरी’ आणि ‘चलेंगे तीर जब दिल पे’ ही इतरही दोन गाणी चांगली आहेत. 

या नंतर मात्र पडद्यावरच्या मीनाकुमारीच्या टवटवीत रसरशीत तरूण प्रतिमेचा उतरता काळ सुरू झाला. परिणामी तिची अशी गाणी प्रभावी वाटेनाशी झाली. जिंदगी और ख्वाब -1961 (न जाने कहां तूम थे), प्यार का सागर- 1961 (मुझे प्यार की जिंदगी देने वाले), चित्रलेखा -1964 (छा गये बादल), पूर्णिमा -1965 ( हम सफर मेरे हम सफर), बहु बेगम -1967 (हम इंतजार करेंगे) ही सगळी प्रेमाची आनंदी द्वंद्व गीतं चांगलीच होती. पण याच्या आड मीनाकुमारीची प्रतिमाच येत राहिली. 

कारण 1960 च्या ‘कोहिनूर’ बरोबरच तिचा दुसरा चित्रपट आला. तो म्हणजे ‘दिल अपना और प्रीत पराई’. यातील शीर्षक गीत तिच्या दु:खी विरही प्रतिमेसाठी पोषक ठरलं. पुढे 1962 ला ‘साहब बीबी और गुलाम’ आला.  ‘न जाओ सैंय्या छूडाके बैंय्या’ सारख्या दु:खी गाण्यानं चांगलाच गडद परिणाम रसिकांवर झाला.

अजून एक गोष्ट 1960 नंतर मीनाकुमारीच्या बाबत घडत गेली. पडद्यावर ती आता थोराड वाटू लागली. तशीही आपल्याकडे 30 वर्षे वयानंतर नायिका तरूणी म्हणून स्वीकारल्या जात नाहीतच. आणि जवळपास सगळ्याच भूमिका या तरूण नायिकांच्याच असतात. धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, सुनील दत्त यांसारख्या तरूण नायकांबरोबर ती शोभेनाशी झाली. म्हणजे एकीकडे मीनाकुमारी सोबत तरूण धर्मेंद्र आणि तिकडे राजकपुर सोबत तरूण हेमा मालिनी असले विरोधाभास रसिकां समोर यायला लागले. मग रसिकांनी गुपचूप आपली पसंती यातील राजकपुर आणि मीना कुमारी यांना वगळून हेमा मालिनी सोबत धर्मेंद्र यांना दिली. 

तिचा दुदैवी अंत 31 मार्च 1972 ला झाला. मार्च एंडचा हिशोब घाईगडबडीनं मिटवावा तसा तिनं वयाच्या 39 व्या वर्षी जीवनाचा हिशोब तडकाफडकी मिटवला. सगळेच तिच्या निधनाने हळहळले. पण त्यासोबत एक कटू सत्य आम्ही ढोंगीपणाने आजतागायत कबूल केलेलं नाही. ते म्हणजे खरंच मीनाकुमारी अजून जगली असती तर आम्ही नायिका म्हणून काय न्याय दिला असता? कारण तिच्या सोबतच्या इतर नायिका बाजूला शांत बसल्या होत्या. सुरैय्या सारखी तिच्या आधीची नायिका अज्ञातवासात निघून गेली होती. नौशाद, ओ.पी.नय्यर, रवी सारखे संगीतकार गुमसूम झाले. मन्ना डे सारखा मधाळ, तलत सारखा मखमली सूर शांत झाला.यांना दीर्घ आयुष्य लाभलं पण कठोर हिंदी चित्रपट सृष्टीने यांच्यावर उतरत्या काळात दया दाखवली नाही.
तेंव्हा मीनाकुमारीच्याच शब्दांत कबुल करायचं तर

टुकडे टुकडे दीन बिता
धज्जी धज्जी रात मिली
जिसका जितना आंचल था
उतनीही सौगात मिली
तिच्या आणि आपल्या नशिबात होतं तेवढं जास्तीत जास्त आपल्या पदरात टाकून मीनाकुमारी गेली. 
(मीना कुमारीच्या चित्रपटांतील प्रेमाची आनंदी द्वंद्व गीतंच इथे विचारात घेतली आहेत. इतर गाणी नव्हे.)
         -आफताब परभनवी.