Saturday 25 February 2017

ओ.पी. नय्यरांच्या संगीतात किशोरकुमार कुठे आहे?

हिंदी चित्रपटांचं सुवर्णयुग कळसाला पोचलं, तो काळ म्हणजे १९५३ ते १९६३. या काळाची सुरुवात होते, ती ओ.पी.नय्यरच्या आगमनानं. चालीतलं माधुर्य, आत्यंतिक गोडवा यावर सी. रामचंद्र, नौशाद यांचा हक्क, पार्श्वसंगीताची\वाद्यवृंदाची श्रीमंती म्हणजे शंकर-जयकिशनची जहागीर, शास्त्रीय संगीत-लोकसंगीत-वाद्य संगीत-पाश्चिमात्य संगीत सगळ्यावर सारखीच हुकूमत हे सचिन देव बर्मन यांचं वैशिष्ट्य, पण पंजाबी ठेका, ताल म्हटलं की, आठवतात ते ओ.पी.नय्यरच! 
नय्यर यांना जाऊन दहा वर्षं उलटली. २८ जानेवारी ही त्यांनी पुण्यतिथी. त्यांच्या संगीतात लताचा आवाज नाही. या बाबतच्या दंतकथा वगळल्या तरी तशा जागाच त्यांच्या संगीतात नाहीत हे स्पष्ट दिसून येतं. पण किशोरकुमार बाबत मात्र असं नाही. नटखट, खट्याळ शैली नय्यरकडे ओतप्रोत होती. गीता, आशा यांचा आवाज यासाठी त्यांनी पुरेपूर वापरूनही घेतला. लोकसंगीतातल्या ठसक्यासाठी पंजाबी शमशाद बेगमला वापरलं. रफी तर त्यांचा लाडकाच, पण त्यांनी किशोर कुमारचा वापर अत्यंत कमी का केला? 
१९५२ ला ‘छम छमा छम’ या चित्रपटात पहिल्यांदा किशोर कुमारचा आवाज नय्यरकडे उमटला. तेव्हापासून १९७२ च्या ‘इक बार मुस्कारो दो’पर्यंत दोघांच्या चित्रपटांची संख्या जेमतेम १० इतकीच भरते. वीस वर्षांत दहा चित्रपट म्हणजे फारच थोडे. यातही नऊ चित्रपटांत स्वत: किशोर कुमारनेच नट म्हणून काम केलं आहे. म्हणजे त्याचा आवाज वापरणं आलंच. जेमतेम एकच चित्रपट निघतो, ज्यात किशोर कुमारचा केवळ पार्श्वगायक म्हणून नय्यर यांनी वापर केला आहे.
पहिल्या ‘छम छमा छम’ चित्रपटात तसं पाहिलं तर एकही विशेष गाणं नाही. ‘ये दुनिया है बाजार’ या गाण्यावर सगळी छाप शमशाद यांचीच आहे. थोडीफार संधी आशा भोसले यांना मिळाली, पण किशोरचा आवाज पार दबून गेलेला आहे.

१९५५ला आलेला ओ.पी.नय्यर आणि किशोर कुमार यांचा ‘बाप रे बाप’ मात्र धूम करून गेला. आशा भोसलेंसोबत किशोर कुमारचं ‘बिना का गीतमाला’मध्ये गाजलेलं गाणं ‘पिया पिया पिया मेरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैंया संग तुम्हारे’ हे यातलंच. जां निसार अख्तरसारख्या प्रतिभावंत कवी-गीतकाराने या चित्रपटाची गाणी लिहिली होती. नय्यर यांचा गाजलेला टांग्याचा ठेका या गाण्यात मस्त वापरला आहे. मुळात गाणंच टांग्यात आहे. किशोर कुमारच्या यॉडलिंगचाही सुयोग्य वापर आहे. याच चित्रपटात खास किशोर कुमारच्या मस्तीखोर शैलीतलं ‘एैसी शादीसे हम तो कुवारे भले’ गाणं ऐकल्यावर लक्षात येतं की, वरवरच्या नटखटपणातून जी एक आंतरिक मनाला भिडणारी सुरावट नय्यर मांडू पाहतात त्याला किशोर कुमार न्याय देऊ शकत नाही. हे संतुलन मोहम्मद रफी यांना चांगलं साधलं होतं. म्हणूनच पुरुष आवाजासाठी केवळ आणि केवळ रफीवरच नय्यर यांचा भर राहिला. किशोर कुमारशिवाय मन्ना डे, मुकेश, तलत मेहमूद यांचा वापर त्यांनी क्वचितच केला.

पुढच्याच वर्षी किशोर कुमार-मीना कुमारी यांचा ‘नया अंदाज’ हा चित्रपट आला. याला संगीत नय्यर यांचं होतं. याच वर्षी आलेल्या ‘सी.आय.डी.’ च्या गाण्याने हल्लकल्लोळ माजवला. नय्यर यांचाच ‘श्रीमती 420’ हाही रफी -गीता-आशाच्या आवाजानं बहरलेला चित्रपट. यात ‘नया अंदाज’मधील किशोर कुमारच्या आवाजातील गाणी बाजूलाच राहून गेली. ‘मेरी ख्वाबों मे तुम, मेरी निंदो मे तुम’ हे किशोर-शमशाद यांच्या आवाजातील गाणं ऐकताना स्वच्छपणे लक्षात येत राहतं की, नय्यर यांनी निव्वळ तडजोड केली आहे. रफी-आशा किंवा रफी-गीता अशा आवाजात हे गाणं विलक्षण गोड वाटलं असतं… संस्मरणीय ठरलं असतं. केवळ नटखटपणाशिवाय आवाजाची जी एक रेंज संगीतकाराला अपेक्षित असते, ती किशोर कुमारमध्ये या काळात दिसत नाही. शमशाद यांच्या आवाजाला तर मर्यादा होत्याच आणि त्या मर्यादेतच त्यांचा आवाज शोभायचा. दुसरं एक मजेदार गाणं ‘चना जोर गरम बाबू मैं लायी मजेदार’ यातच आहे. हे गाणं पुढे ‘क्रांती’ या चित्रपटातही वापरलं गेलं. केवळ शाब्दिक चमत्कृती व किशोरची मस्ती या शिवाय यात काही नाही. याच वर्षी ‘भागम भाग’ चित्रपटात नय्यर यांनी किशोर-रफी यांना सोबत गायला लावलं आहे, पण हेही गाणं काही विशेष नाही.

‘रागिणी’ हा १९५८ मध्ये आलेला अशोक कुमार यांचा चित्रपट. म्हणजे किशोर कुमारसाठी घरचा चित्रपट.  यातील ‘मन मोरा बावरा’ या गाण्यासाठी तर किशोर कुमारला चक्क मोहमद रफीचाच आवाज नय्यरनी वापरला आहे. (तब्बल ११ चित्रपटांतून किशोर कुमारसाठी इतर गायकांचा आवाज वापरण्यात आला.) शास्त्रीय संगीतावर आधारित चालीला किशोर न्याय देऊ शकणार नाही, असाच संगीतकार नय्यर आणि निर्माता अशोक कुमारचा ग्रह झाला. परिणामी पडद्यावरच्या किशोर कुमारसाठी आवाज मात्र रफीचा असं चित्र दिसतं. यातील आशा भोसले बरोबरची तिन्ही गाणी ‘पिया मैं हू पतंग, तू डोर’, ‘मुझको बार बार’ आणि ‘मैं बंगाली छोकरा’ चांगली आहेत. ‘मै बंगाली छोकरा’ तर ‘बिनाका…’ हिट गाण्यात आहे.

हे वर्षच नय्यर यांच्यासाठी सगळ्यात यशस्वी ठरलं. कारण ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ (‘फागुन’),  ‘मैं मैं कार्टून’ (‘मि.काटून एम.ए.’), ‘इट की दुक्की पान का इक्का’ (‘हावरा ब्रीज’), ‘प्यार पर बस तो नहीं’ (सोने की चिडीया) ही गाणी ‘बिनाका…’ हिट होती. शिवाय गीता दत्तचं ‘मेरा नाम है चीन चुन चु’ (‘हावरा ब्रीज’), गीता-रफीचं ‘तुम जो हुए मेरे हमसफर’ (‘12 ओ क्लॉक’ ) याच वर्षीचं. किशोर कुमार यांचं नय्यर सोबतचं एक गाणं याच वर्षी बिनाकात गाजलं. ‘सुरमा मेरा निराला, आँखो में जिसने डाला, जीवन हुआ उजाला, है कोई नजरवाला’ (‘कभी उजाला कधी अंधेरा’) अशी गंमतशीर शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची आहे. किशोरने यॉडलिंग आणि स्वरविकृती करून गाणं धमाकेदार बनवलं आहे. 

नंतर जवळपास दहा वर्षं नय्यर आणि किशोर कुमार यांनी एकत्र काम केलं नाही. पुढे एकदम १९६६ च्या ‘अकलमंद’मध्ये दोघे सोबत होते. त्यातही परत ‘ओ बेखबर तुझे क्या खबर’ या कव्वालीत किशोर कुमारसाठी महेंद्र कपूरचा आवाज वापरला आहे. किशोरच्या आवाजातील ‘ओ खुबसुरत साथी’ हे एक वेगळं गाणं नय्यरनी दिलं. पुढे ज्या पद्धतीनं किशोर कुमारची क्रेझ वाढत गेली, ज्या पद्धतीची गाणी येत गेली, त्याच्या खुणा या गाण्यात सापडतात. 
किशोर कुमारने काम केलेला आणि नय्यरचं संगीत असलेला ‘श्रीमानजी’ (१९६८) हा शेवटचा चित्रपट. यात आशा-किशोर याचं एक द्वंद गीत आहे. ‘पहलू में यार हो तो किस बात की कमी है’ यात आशा भोसलेंचा आवाज जसा नय्यरच्या संगीतात मिसळून जातो, तसा किशोरचा मिसळत नाही हे लक्षात येतं. किशोर कुमारच्या आवाजाचा नेमका पोत नय्यर लक्षात घेत नाहीत किंवा नय्यरचा बाज किशोर समजून घेत नाहीत. परिणामी एकसंध परिणाम ऐकताना जाणवत नाही, जो नय्यरच्या आशा-गीता-रफी यांच्यासोबत गाण्याचा जाणवतो.

नय्यरच्या चित्रपटात नायक नसताना किशोर कुमार गायला असा एकमेव चित्रपट म्हणजे ‘इक बार मुस्कुरा दो’. किशोरचं बऱ्यापैकी गाजलेलं गाणं ‘रूप तेरा ऐसा दर्पण में ना समाये’ यातीलच. मोहम्मद रफींचंच वाटावं असं यातील एक गाणं ‘तू औरो की क्यूं हो गयी’.  यात देव मुखर्जीचा अभिनय म्हणजे शम्मी कपूरची कॉपी आणि आवाज म्हणजे रफीची. ही चालच नय्यरची वाटत नाही. चित्रपट संगीतातील बदल नय्यरसारख्या प्रतिभावंतावर विलक्षण परिणाम करून गेलेले दिसतात. याच चित्रपटात एक अतिशय वेगळं गाणं नय्यरनी किशोरकडून गाऊन घेतलं. 
‘सबेरे का सुरज तुम्हारे लिये है, 
ये बुझते दिये को ना तुम याद करना, 
हुये एक बिती हुई बात हम तो, 
कोई आसू हमपर ना बरबाद करना’

देव मुखर्जी हे गाणं तनुजाला उद्देशून म्हणत आहे, पण मुळात नय्यर हेच सूर जणू काही हिंदी गाण्यांच्या रसिकांसाठी आळवत आहेत. कारण तेव्हा त्यांची कारकीर्द उताराला लागली होती. किशोरच्या आवाजाचा नेमका पोत त्यांच्या लक्षात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पण हा दोष नय्यर यांचा नसून किशोरचाच असावा. कारण त्यांनी नायक म्हणून स्वत:साठीच पार्श्वगायन करण्याचा अट्टाहास चालवला होता. परिणामी त्यांच्या आवाजातील विविध शक्यता आजमावून पाहणं संगीतकारांना शक्य झालं नाही.
कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला किशोरच्या आवाजावर सैगल यांचा प्रभाव होता. १९५२ च्या ‘काफिला’मध्ये हुस्नलाल भगतराम यांनी किशोर यांच्याकडून ‘वो मेरी तरफ यु चले आ रहे है’ हे किशोरच्या मूळच्या शैलीत गाऊन घेतलं आहे. ही सुरेख शैली परत सापडायला किशोरला २० वर्षं लागली. नय्यर यांचं ‘सबेरे का सुरज’ हे गाणं असंच आहे.  

आज नय्यर हयात असते तर ९० वर्षांचे झाले असते. १९५२ ते १९७२ इतकीच त्यांची खरी कारकीर्द. पुढे त्यांचे काही चित्रपट अधूनमधून १९९५ पर्यंत येत राहिले, पण कोणाच्याच लक्षात आले नाहीत. होमिओपॅथीची आपली प्रॅक्टिस करण्यात त्यांनी उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतित केलं. ‘विविधभारती’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, ‘तेव्हा सारंगीवादक रामनारायण, सरोदवादक अली अकबर, सतारवादक विलायत खाँ- रईस खाँ, सनईवादक बिस्मिल्ला खाँ अशा कितीतरी प्रतिभावंत वादकांचं साह्य आम्हाला मिळालं. म्हणून आम्ही सुंदर संगीत तयार करू शकलो.’ आपण काय आणि कोणतं संगीत दिलं याची पूर्ण जाणीव नय्यर यांना होती. आपल्या संगीताच्या मर्यादाही त्यांना कळत होत्या. आपला पंजाबी ठेका, तालाचं वर्चस्व, आशा-गीता-रफी यांच्या जादुई आवाजाची करामत आठवतानाच त्यांना भारतीय वाद्य संगीतातील मोठमोठ्या प्रतिभावंतांची आठवण यावी हे विलक्षण आहे. त्यातही परत तालवाद्यांची आठवण त्यांनी काढली नाही हे विशेष. त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर येतो. त्यांनी वापरलेला टांग्याचा ठेका आधीपासून म्हणजे जवळपास १९४३ पासून कसा वापरला गेला हेही त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. दिलेल्या संगीतापेक्षा न दिलेलं संगीत फार मोठं होतं, ही खंत त्यांच्या बोलण्यातून उमटत जाते.      
a.parbhanvi@gmail.com

Friday 17 February 2017

याद जगजीत की आये


अक्षरनामा, १८ फेब्रुवारी २०१७
प्रसंग फारच हृदयद्रावक असा आहे. गझलगायक जगजीत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर मोठा सांगितीक कार्यक्रम मुंबईला आयोजीत करण्यात आला होता. त्यात रामपुर घराण्याचे प्रसिद्ध गायक राशीद खांन यांना गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. राशीद यांनी जेंव्हा याद पिया की आये ही ठूमरी सुरू केली तेंव्हा सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमाचे चित्रीकरण चालू होते. ठूमरीच्या शेवटी कॅमेरा जगजीत यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्यावर स्थिरावला. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी नजर झुकवली.  

या गायक जोडप्याचा एकूलता एक मुलगा विवेक कार अपघातात मृत्यू पावला. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. आता जगजीतही निघून गेले. चित्रा यांच्या आसवांमध्ये या सगळ्या दु:खाची तीव्रता ठासून भरलेली असावी. ही ठूमरी खरं तर बडे गुलाम अली खां यांच्यासारख्यांनी लोकप्रिय केली. पण राशीद खांचा आवाज आणि चित्रासिंग यांचे डबडबलेले डोळे आणि त्या कार्यक्रमाचा संदर्भ यामुळे राशीद खांचीच ठूमरी मनात ठसून राहते. 8 फेब्रुवारी हा जगजीत सिंग यांचा जन्मदिवस. त्यांच्या आठवणीत ही राशीद खांची ठूमरी. असं वाटत आहे की राशीद खां म्हणत आहेत ‘याद जगजीत की आये’

हिंदी चित्रपटात जगजीत यांचा आवाज पहिल्यांदा उमटला तो 1974 मध्ये बासु भट्टाचार्य यांच्या ‘आविष्कार’ मध्ये. या चित्रपटाला संगीत कनु रॉय यांचे आहे. त्यांचे सूर बासुंशी चांगले जूळले होते. ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ ही सुप्रसिद्ध ठूमरी जगजीत आणि चित्रा सिंग यांच्या आवाजात कनु रॉय यांनी वापरली आहे. कलकत्ता हॅण्डलूमच्या साध्या साडीतील शर्मिला आणि सुपरस्टारपद डोक्यात न गेलेला राजेश खन्ना यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. कुठलेही वाद्य न वापरता केवळ जगजीत चित्रा यांचा आवाज वापरण्याची कल्पना परिणामाच्या दृष्टीने कमालीची यशस्वी ठरते.

1981 मध्ये जगजीत यांचेच संगीत असलेला ‘प्रेमगीत’ हा राजब्बर- अनिता राज यांचा चित्रपट पडद्यावर आला. यातील सदाबहार ‘होठों से छू लो तूम, मेरे गीत अमर कर दो’ या गीताने जगजीत सिंग यांना खुप लोकप्रियता मिळाली. गझले शौकिनांच्या वर्तुळातून जगजीत यांचे नाव सर्वांच्या ‘कानात’ साठल्या गेले. हे गाणे गझल नसून ‘गीत’ आहे हेच बर्‍याच जणांना लक्षात येत नाही. तलत, जगजीत, भुपेंद्र, गुलाम अली हे जे जे गातात त्याला गझलच म्हणायची अशी आपली समज. जगजीत चित्रा यांचे दुसरे द्वंद्व गीत ‘आओ मिल जाये हम सुगंध और सुमन की तर्‍हा’ यालाही चांगली लोकप्रियता मिळाली. आजही हे गाणे रसिकांच्या मनात आहे. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांचीही गाणी या चित्रपटात आहेत. पण ती फारशी लक्षात रहात नाहीत. जगजीत हे गायकीसोबत संगीतकार म्हणूनही ठळकपणे यातून पुढे आले. अर्थात हिंदी चित्रपटात ते फारसे रमले नाहीत ही बाब अलहिदा.

लगेच आलेल्या साथ साथ (1983) ने अजून मोठी लोकप्रियता जगजीत यांना मिळवून दिली. पण याला संगीत जगजीत यांचे नव्हते. तर ते कुलदीप सिंग यांचे होते. जावेद यांची सदाबहार गझल, ‘तूमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तूम घना साया’ यातच आहे. जगजीतच्या आवाजाला चित्रा सिंग यांची केवळ आलापी वापरली आहे साथीला. घरची कामं करणारी कमरेला साडी खोचलेली दिप्ती नवल आणि मध्यमवर्गीय चेहर्‍याचा फारूख शेख यांच्यावरचे गाणे (गझल नाही) ‘ये तेरा घर ये मेरा घर’ हेही फार छान आहे. यातील काव्यही दर्जेदार आहे. ही सगळी गीतं जावेद यांची होती. 

एच.एम.व्ही.ने ‘साथ साथ’ आणि त्याच्या पाठीमागे ‘अर्थ’ अशी रेकॉर्ड बाजारात आणली होती. खपाचे उच्चांक या रेकॉर्डने मोडले.  ‘अर्थ’ (1983) ला जगजीत आणि कुलदीप सिंग या दोघांचेही संगीत आहे. यातील कैफी आझमी यांची दोन्ही गीतं गाजली. ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो’ हे तर आजही नं.1 ला आहे. बोलक्या डोळ्याची शबाना आणि राजकिरण यांच्यावरचे गाणे परत परत ऐकायला पहायला रसिकांना आवडते. याला संगीत जगजीत यांचेच होते. दुसरे सुंदर गाणे कुलदीप सिंग यांच्या संगीतातील आहे. आवाज अर्थातच जगजीत यांचाच. 

झुकी झुकी सी नजर, बेकरार है के नही
दबा दबा सा सही दिल मे प्यार है के नही
वो पल की जिसमे मुहोब्बत जवां होती है
उस एक पल का तुझे इंतेजार है के नही
कैफी आझमी यांची प्रतिमा डाव्या चळवळीतील झुंझार कार्यकर्त्याची आहे. पण त्यांनी प्रेमाची अतिशय सुंदर कविता लिहीली आहे. हेमंतकुमार यांच्या गोड संगीतातील अनुपमा (1966) ची गाणी ऐकली तर लता/आशा यांच्या आवाजाइतकीच नजाकत कैफी आझमी यांच्या शब्दांतही आहे हे उमगते.

यानंतर मात्र संपूर्ण चित्रपटभर जगजीत यांचा आवाज आहे किंवा संगीत आहे असं घडलं नाही. त्यांची एखाद दुसरी गझल/नज्म चित्रपटात घेतल्या गेली आहे. त्यांच्या संगीताची जातकुळी तशीही हिंदी चित्रपटांशी जूळणारी नव्हतीच.  कुमार गौरव, स्मिता पाटील यांच्यावर ‘आज’ (1990) चित्रपटात जगजीत यांचे गीत ‘ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, बारीश का पानी’ आहे. पण गाण्याचा नेमका भाव दु:ख असण्यापेक्षा निसटून गेलेल्या बालपणाची हूरहूर आहे हे लक्षात घेतलं नाही. परिणामी चित्रपटात गाणं दु:खी करून टाकलं आहे. हेच गाणे जगजीत-चित्रा यांच्या द्वंद्व स्वरात त्यांच्या अल्बममध्ये आहे. ते जास्त सुरेख नेमकं आणि परिणामकारक आहे. 

नंतरच्या काळात जगजीत यांचे एकच गाणं अतिशय गाजलं. अमिरखानच्या ‘सरफरोश’  (1999) मधील निदा फाजली यांची गझल ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’ म्हणजे शब्द, संगीत, कॅमेरा, अभिनय यांचा सुरेख संगम. असं फार थोड्यावेळा हिंदी चित्रपटात जूळून आलं आहे. जतिन ललित यांचे संगीत तर जगजीत यांच्या आवाजाला अतिशय पोषक आहे. अमिर खान सोनाली बेंद्रे यांचा अभिनय आणि मुख्य म्हणजे या गाण्याचे चित्रांकन.

मम्मो (1994), दुष्मन (1998), तरकिब (2000), तुमबीन (2002), जॉगर्स पार्क (2003) यात जगजीत यांचा आवाज एखाद्या गाण्यापुरता वापरला आहे. पण एकूणच त्यांचा प्रभाव जाणवत नाही.
मिर्झा गालिब मालिका बनवित असताना गुलजार यांनी संगीताची सर्व जबाबदारी जगजीत सिंग यांच्यावर टाकली. त्यांनी ती समर्थपणे निभावलीही. गझलेचा ते किती बारीक विचार करत होते याचा तो सगळ्यात मोठा पुरावा. 

हिंदी चित्रपटांत यापूर्वीही गालिब यांच्या गझला वापरल्या आहेत. एका गझलेचे उदाहरण तर मोठे मासलेवाईक ठरेल. ‘ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता’  ही गालिब यांची गाजलेली गझल. पहिल्यांदा मिर्झा गालिब (1954) चित्रपटांत गुलाम मोहम्मद यांनी सुरैय्याच्या आवाजात गाऊन घेतली. ही चाल धावती आहे.  पुढे शंकर जयकिशनने ‘मै नशे मे हू’ (1959) मध्ये या गझलेसाठी उषा मंगेशकरचा उडता आवाज वापरला. कोठ्यावर मुजर्‍यासारखी ही गझल या चित्रपटात आहे.  अख्तरीबाई (बेगम अख्तर) यांनीही आपल्या धीम्या लयीत या गझलेला चार चांद लावले. इतकेच काय मोहम्मद रफीच्या आवाजात हीच गझल खय्याम यांनीही गाऊन घेतली आहे जी कुठल्याही चित्रपटात नाही. पण इतकं सगळं असतानाही ‘मिर्झा गालिब’ मालिकेसाठी जगजीत यांनी चित्रासिंग यांच्या आवाजात जेंव्हा ही गझल रसिकांसमोर सादर केली तेंव्हा ती सगळ्यांपेक्षा सरस ठरली. आजही आपण सगळ्यांचे आवाज ऐकून तुलना करू शकतो. 

हिंदी चित्रपटांत एकेकाळी नौशाद, मदनमोहन, रोशन, खय्याम, जयदेव यांनी गझलेचा फार सुंदर वापर करून घेतला होता. पुढे तो नंतरच्या संगीतकारांना करून घेता आला नाही. जगजीत यांची आठवण त्यांच्या गझलांसाठी तर येत राहिलच पण मोजक्याच चित्रपटांतील त्यांच्या प्रभावशाली ठरलेल्या संस्मरणीय गाण्यांसाठीही येत राहिल.

Wednesday 8 February 2017

सुमन कल्याणपूर : न फुललेलं लोकप्रियतेचं ‘सुमन’!

सुमन कल्याणपूर यांच्या वयाला ८० वर्षं (जन्म २८ जानेवारी १९३७) पूर्ण झाली. म्हणजे हे त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचं वर्ष. म्हणजेच त्यांनी आजवर एक हजार चंद्र पाहिले (हजार पौर्णिमा अनुभवल्या!). त्यांच्या हिंदी गाण्यांची संख्या जवळपास तेवढीच आहे (अधिकृत आकडा ८४०). पण त्यांच्याबाबतीत सतत अन्याय घडला. हिंदीत त्यांच्या आवाजाची जातकुळी ओळखून त्याप्रमाणे संगीत रचणारे संगीतकार त्यांना लाभले नाहीत. तशी त्यांना फारशी गाणी मिळाली नाहीत. जी गाणी मिळाली, ती लता मंगेशकर यांना पर्याय म्हणून मिळाली. काही काळ लता रफीसोबत गात नव्हत्या, त्या काळात सुमन यांना गाणी मिळाली.
मराठी भावगीतांची आवड असणाऱ्या रसिकांच्या हे लगेच लक्षात येईल. एक गोड साधेपणा हीच सुमन यांची ताकद. अवघड ताना, पलटे, हरकती, टिपेचा आवाज, आवाजातील मादकता हे सगळं टाळून संथ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं त्यांचं गाणं आहे. ज्या संगीतकारांनी हे हेरलं त्यांनी हा आवाज त्याप्रमाणे वापरला आणि संस्मरणीय अशी मराठी भावगीतं रसिकांच्या पदरात पडली. पण असं हिंदीत फारसं घडलं नाही.  
हिंदीत १९५४ ते १९८८ इतकी मोठी कारकीर्द सूमन यांच्या वाट्याला आली. यात त्यांच्या आवाजाचा योग्य वापर केलेलं ठळक उदाहरण म्हणजे खय्याम यांचे दोन चित्रपट- ‘शगुन’ (१९६४) आणि ‘मुहोब्बत इसको कहते है’ (१९६५).
खय्याम यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपटातील सर्वच ठळक आवाज वापरले, पण कुणालाही कुणाची छाया म्हणून वा बदली कलाकार म्हणून वापरलं नाही. ‘शगुन’मधील सर्वांत गाजलेलं गाणं हे त्यांची गायिका पत्नी जगजीत कौर यांच्या आवाजात आहे (तुम अपने रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो). सुमन यांच्या वाट्याला यात तीन गाणी आली आहेत. 
जिंदगी जुल्म सही जब्र सही गम ही सही
दिल की फरियाद सही, रूह का मौसम सही

असे एका गाण्याचे साहिरचे शब्द आहेत. ‘हमने हर हाल मे जिने की कसम खायी है’ असं म्हणत ज्या शांततेत सुमन यांचा आवाज पुढे जात राहतो, त्यात कुठलाही उरबडवा आक्रोश नाही. कुठलीही तक्रार नाही. शब्दांना साजेसं असं संगीत आणि त्यावर तितकाच शोभणारा मध्य सप्तकातील सुमन यांचा आवाज. हे गाणं आशा किंवा लतासाठी बांधलेलं असून त्या मिळाल्या नाहीत, म्हणून सुमन यांचा वापर केला असं आढळत नाही. जे पुढे शंकर जयकिशन यांच्या बाबतीत सतत घडत गेलं.
दुसरं अगदी उलट उदाहरण ओ.पी.नय्यर यांचं आहे. ‘आरपार’मध्ये ‘मुहोब्बत कर लो जी भरलो, अरे किसने रोका है’ या गाण्यात सुमन यांच्या आवाजात दोन ओळी आहेत. (दुसऱ्या कडव्यातील "मुहोब्बत क्या है सुनो जी हमसे, साब्कुच है इसी के दम से" ही तील ओळ आहे)  पण त्यांचं नाव ‘कोरस’मध्ये टाकलं गेलं. नंतर नय्यर यांनी त्यांचा आवाज कधीच वापरला नाही. याबाबतच्या दंतकथा बाजूला ठेवल्या तरी लक्षात येतं की, मुळात नय्यर यांच्या संगीतात लतासाठी जागाच नव्हती. परिणामी लताची छाया भासणाऱ्या सुमन यांच्यासाठी तरी कुठून असणार! शिवाय त्यांना सुमन यांचा भावगीताला शोभणारा आवाज वापरावा अशी गरज वाटली नसावी. 
‘शगुन’मधलं त्यांचं दुसरं गाणं रफी सोबतचं आहे -
पर्बतों के पेडों पर, शाम का बसेरा है
सुरमई उजाला है चंपई अंधेरा है

आता यातील ‘सुरमई उजाला’ आणि ‘चंपई अंधेरा’ हे शब्द कानावर पडले की, गुलज़ार यांच्या चाहत्यांना काहीतरी ओळखीचं वाटेल. कारण गुलज़ार अशी शब्दरचना नेहमी करतात. पण ही ताकद साहिरची आहे. कदाचित गुलज़ार यांनी साहिर यांच्यापासून प्रेरणा घेतली असावी. वहिदा आणि कमलजीत यांनी अतिशय संयतपणे हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. ‘भीगे भीगे झोकों में, खुशबुओं का डेरा है’ असे शब्द परिणामकारक ठरायला एक शांत लयच पाहिजे.
तिसरं गाणं आहे -
बुझा दिये है खुद अपने हाथों,
मुहोब्बतों के दिये जला के

एक संयत असं दु:ख यातून साहिर यांनी मांडलं आहे. खय्याम यांनी सुमन यांच्या आवाजाची जातकुळी नेमकी हेरून ही गाणी रचली आहेत. पडद्यावर गीता, आशा, लता यांच्या शब्दांना न्याय देणारा अभिनय वहिदाने केला आहे. पण इथं सुमन यांच्या शांत आवाजासाठीही तसाच संयत अभिनय पडद्यावर दिसतो, तेव्हा गाण्याची परिणामकारकता जास्त जाणवते. 
कभी मिलेगे जो रास्ते मे तो मु फिरा कर पलट पडेंगे
कही सुनेंगे जो नाम तेरा, तो चुप रहेंगे नजर झुका के 
इतक्या साध्या ओळी साहिरने लिहिल्या आहेत. पण त्यांचा साधेपणाच इतका परिणामकारक वाटतो की, तार सप्तकात जाणारा आवाज जो परिणाम साधणार नाही, तो परिणाम या साधेपणातून साधला जातो. साधेपणा हीच मोठी ताकद सुमन यांच्या आवाजाची होती (त्यांनी आता गाणं सोडलं आहे म्हणून ‘होती’ हा शब्द वापरला.) 
‘मुहोब्बत इसको कहते है’ (१९६५) हा शशी कपूर-नंदा यांचा चित्रपट. यात मजरूहची गाणी आहेत. यातील पहिलं गाणं  आहे -
जो हमपे गुजरती है, तन्हा किसे समझाये,
तूमभी तो नही मिलते, जाये तो किधर जाये

असं सोप्या भाषेत दु:ख मांडणारं आहे. मजरूह व शैलेंद्र हे दोन गीतकार अतिशय साध्या सोप्या शब्दांतून प्रभावी गीतरचना करून दाखवतात. 
आजा की मोहब्बत की मिटने को है तस्विरे
पहरे है निगाहों पे, और पावों मे जंजीरे, 
बस मे ही नही वरना, हम उडके चले आये
या शब्दांमध्ये दु:खाचा कुठेच आक्रोश नाही. आशा आणि गीताच्या आवाजातील लाडिकपणा सुमन यांच्या आवाजात आढळत नाही. पण स्वाभाविक गोडवा आणि त्यातली मर्यादित मस्ती खय्याम यांनी पुढच्या गाण्यात वापरली आहे. 
ठहरीये होश मे आ जू तो चले जाईगे गा
आपको दिल मे बिठा लू तो चले जाईये गा

या रफीच्या बोलानंतर ‘उं हू’ असा लाडिक झटका सुमनच्या आवाजात येतो. या गाण्यात रफीही अतिशय साधेपणाने गायले आहेत. रफीचं वैशिष्ट्य म्हणजे लता, आशा आणि गीतासोबतचा जो आवाज आहे, तो ते इथं काढत नाहीत. इथं मस्तीही अगदी मर्यादितच करायची अशी शिस्त त्यांनी आपल्याच आवाजाला घातलेली जाणवते.

याच चित्रपटातील तिसरं गाणं हे मुजरा आहे. हेलन आणि जयश्री गडकरवर हे गाणं चित्रित केलं गेलं आहे. ठुमरीच्या मुजऱ्याच्या शैलीत मुबारक गायल्या आहेत, तर सुमन यांनी बैठकीच्या लावणीच्या थाटात मर्यादित मादकता दाखवत आपला आवाज लावला आहे. हा सूक्ष्म फरक खय्याम यांनी चांगलाच दाखवला आहे. हेच गाणं आशाबाईंनी गायलं असतं तर ते जास्त मादकतेकडे झुकलं असतं.  
सुमन यांची तीन गाणी बिनाका टॉपच्या गाण्यात पोचली. त्यातलं पहिलं गाणं आहे १९६२ च्या ‘बात एक रात की’मधील. हेमंत कुमार यांच्या सोबतच्या या गाण्याला बीनाकात स्थान मिळालं. 
ना तूम हमे जाने, 
ना हम तूम्हे जाने, 
मगर लगता है कुछ ऐसा 
मेरा हमदम मिल गया

इथंही मोठं श्रेय संगीतकार एस.डी.बर्मन यांना द्यावं लागेल. त्यांनी ही रचना खास सुमन यांच्यासाठीच बांधली. हेमंत कुमारच्या धीरगंभीर आवाजासोबत उठून दिसणारा सुमन यांचा गोडसर साधा आवाज नेमका परिणाम साधतो.
दुसरं गाणं आहे शंकर जयकिशन यांच्या ‘दिल एक मंदिर है’ (१९६३) मधील. गाण्याचे शब्दही हेच आहेत, पण गाणं ऐकताना सतत जाणवत राहतं की, कुठेतरी लताच गात आहे. कारण शंकर जयकिशनला लतासाठीच चाली बांधायची सवय होती. परिणामी ते इतर स्त्री गायिकांसाठी तेवढ्या चांगल्या चाली बांधू शकले नाहीत. सोबत रफीचा आवाज आहे. 
तिसरं गाणं सोनिक ओमीच्या ‘दिल ने फिर याद किया’ (१९६६) मधील आहे. हेही परत चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. मुकेश-रफीसोबतचं.
क्या बताये तूम्हे हम शम्मा की किस्मत क्या है,
गम मे जलने के सिवा और मुहोब्बत क्या है,
ये वो गुलशन है के जिसमे न बहार आयी है
असे शब्द सुमन गातात. 
सुमन यांना एकदाही फिल्मफेअर अवार्ड लाभलं नाही. त्यांचं एकही गाणं कधी लोकप्रियतेच्या शिखरावर होतं असं नाही. एखाद्या गाण्यानं किंवा मोजक्याच गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवून गायब होणारे क्षणिक का होईना त्या सुखाचा आनंद घेतात. पण सुमन यांच्यासारख्यांची नियती वेगळीच राहिली. त्यांना ना कधी प्रचंड लोकप्रियता लाभली, ना कधी या क्षेत्रातून कायमचं हद्दपार व्हावं लागलं. ज्या गाण्यांना लोकप्रियता लाभली, त्यातही परत ‘लताची छाया’ ही टोचणी होती. 
खय्याम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून अजून काही गाणी गाऊन घेतली असती, तर कदाचित रसिकांच्या पदरात चांगलं माप पडलं असतं!
(या लेखासाठी हिंदी गाण्याच्या सुवर्ण पर्वातील म्हणजेच १९४९ ते १९६६ पुरताच विचार केला आहे.)
- a.parbhanvi@gmail.com