Thursday 5 October 2017

सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ तूमको न भूल पायेंगे



अक्षरनाम 27  सप्टेंबर 2017

शकिला गेली पण कुणी तिच्या मृत्यूची  दखलही घेतली नाही. (जन्म 1 जानेवारी 1935, मृत्यू 20 सप्टेंबर 2017)  नविन पिढीला तर शकिला म्हणजे कोण हेच कळणार नाही. पण तेच जर ‘बाबूजी धीरे चलना’चा  उल्लेख केला तर सर्वांनाच ते गाणं आठवतं. इथून पुढे बहरलेली गुरूदत्तची कारकिर्द आणि पुढची शोकांतिका लक्षात येते. पुढची दहा वर्षे हिंदी गाण्यांच्या क्षेत्रात टांगा ठेक्याने अधिराज्य गाजविणारा ओ.पि.नय्यर लक्षात राहतो. एक दोन नव्हे तर 50 वर्षांची सर्वात मोठी कारकीर्द लाभलेले गीतकार मजरूह सुलतानपुरी लक्षात राहतात. गाणं गाणारी गीता दत्त तर काळजात घुसूनच बसते. पण उपेक्षा होते ती केवळ हे गाणं जिच्यावर आहे त्या नायिकेची. तिचं नाव शकिला. 

1949 ते 1963 इतकी छोटी 14 वर्षांची तीची कारकीर्द (48 हिंदी चित्रपट). पहिले पाच वर्षे तिचे चित्रपट दुर्लक्षित राहिले. पण ती प्रकाशात आली पहिल्यांदा गुरूदत्तच्या ‘आरपार’ (1954) मध्ये. या चित्रपटातील तीची दोन्ही गाणी अतिशय गाजली. छाया प्रकाशाचा खेळ करणारा गुरूदत्तचा कॅमेरा शकिलाच्या भावपूर्ण मोठ्या डोळ्यांमधील भाव नेमके पकडण्यात यशस्वी झाला. गाण्याचा मादक भाव जसा गीताच्या स्वरांनी नेमका पकडला होता तसाच तो शकिलाच्या डोळ्यांनीही पकडला होता. हे गाणं होतं सदाबहार ‘बाबूजी धीरे चलना’.
 
याच चित्रपटात दूसरं पण एक सुंदर गाणं आहे. ‘हू अभी मै जवां ए दिल’. मजरूह यांची शब्दांवर नेहमीच पकड राहिली आहे. ओ.पी.नय्यर यांच्या संगीताला जेंव्हा जेंव्हा मजरूह, साहिर सारखे प्रतिभावंत गीताकार लाभले तेंव्हा तेंव्हा त्या गाण्यांना अभिजातता लाभली आहे. या गाण्यात शकिलाच्या डोळ्यात एक उदासिनता नशेच्या आणि मादकतेच्या खाली दडलेली समोर येते. ती कुठेतरी स्त्रीच्या सनातन दु:खाशी जावून भिडते. 
‘अलिबाबा चालीस चोर’ (1954) या चित्रपटात राजा मेहंदी अलीच्या सुंदर शब्दांतलं गाणं आहे, ‘ए सबा उनसे केह जरा, क्यू हमे बेकरार कर दिया’. रफी आणि आशाचे रेशमी स्वरधागे चित्रगुप्त/एस.एन.त्रिपाठी यांनी अतिशय नाजूकपणे गुंफले आहेत. पण हा चित्रपट बी.ग्रेडच्या यादीत गेल्याने गोड गाणंही बाजूला पडलं. शकिला सोबत  चित्रपटाचा नायक म्हणून महिपाल आहे. 

गुरूदत्तचाच पुढचा चित्रपट ‘सी.आय.डि.’ (1956) शकिलासाठी अप्रतिम अविस्मरणीय गाणी घेवून आला. परत मजरूह-ओ.पी.नय्यर-रफी-गीता ही भट्टी जमून गेली. ‘आंखो ही आखो मे इशारा हो गया, बैठ बैठ जिने का सहारा हो गया’ हे तसंही ओ.पी.च्या गाण्यातील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक. शकिलाचे भावपूर्ण डोळे पाहूनच मजरूह यांनी हे लिहीलं असावं.  देव आनंद ची जोडी नूतन सोबत विशेष गाजली. मधुबाला-वहिदा सोबतची गाणीही गोड आहेत.  साधना सोबतचे ‘अभि ना जाओ छेाड कर’ विसरताच येत नाही. पण याच यादीत शकिलासोबतच्या या गाण्याचाही क्रमांक लावावा लागेल. त्याशिवाय अशा गाण्यांची यादी पूर्णच होवू शकत नाही.

याच चित्रपटात ‘लेके पेहला पेहला प्यार’ हे शमशाद-रफीच्या आवाजातील गाणं अतिशय लोकप्रिय झालं. हे आहे शकिलावरच. याच गाण्याचा दुसरा दु:खी भाग जो की आशा च्या आवाजात आहे तो फार कमी वेळा ऐकायला अथवा पहायला मिळतो. त्या गाण्यात विरहाचे दू:ख जसे आशाच्या स्वरात आहे तसे ते शकिलाच्या अभिनयात पण उमटलं आहे. धृवपदासारख्या रफी-शमशादच्या ओळी त्यात येत राहतात तेंव्हा शकिला कानांवर हात ठेवते. हा अभिनयही गाण्याच्या आशय पुढे नेतो.  

पुढे हतिमताई (1956), रूपकुमारी (1956), आगरा रोड (1957), चोबिस घंटे (1958) मध्ये तिच्यासाठी गाणी होती. पण त्यांची फारशी दखल घ्यावी इतकी ती चांगली नव्हती. 

शकिला परत एकदा चर्चेत आली ती 1958 च्या ‘पोस्ट बॉक्स नं. 999’ मध्ये. कल्याणजी आनंदजी तेंव्हा कल्याणजी वीरजी शहा नावानं संगीत देत होते. लताचा आवाज मन्ना डे सोबत जूळून येतो हे चोरी चोरी मधून ठळकपणे लक्षात आलं होतं. तेंव्हा याचाच फायदा घेत कल्याणजीनी या चित्रपटात एक गोड गाणं दिलं आहे. ‘मेरे दिल मे है इक बात, केह दो तो बता दू मै’. तरूण सुनील दत्त आणि शकिला बागेत एकमेकांमागे बागडत गात आहेत. शंकर जयकिशनचा प्रभाव गाण्यावर जाणवतो. पण या चित्रपटातील खरं गाजलं ते हेमंतकुमार सोबतचं लताचे गाणे ‘ओ निंद न मुझको आये.’ यात हेमंतकुमारच्या खर्जातील आवाज विरहाला अतियश पोषक वाटतो. तर लताचा गोडवा त्यातील कातरता अजूनच गडद करतो.

काही गाण्यांइतकेच त्यांच्या आधी वाजणारे संगीताचे तुकडे (प्रील्युड) लोकप्रिय होतात. असं एक गाणं ‘काली टोपी लाल रूमाल’ (1959) मध्ये आहे. इतकी वर्षे झाली पण या गाण्याच्या आधीचा माऊथऑर्गनचा तुकडा आजही तितकाच ऐकावासा वाटतो. हे गाणं होतं, ‘लागी छुटे ना अब तो सनम, चाहे जाये जिया तेरी कसम’. संगीताच्या माधुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रगुप्त यांचे संगीत या चित्रपटाला होतं. लता-रफीच्या उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक.  शकिलाच्या चित्रपटांचे हे पण एक वैशिष्ट्य एक तर नायक नवखे होते किंवा बी.ग्रेड चित्रपटातील होते. परिणामी हे चित्रपट दुर्लक्षित राहिले. पण काही गाणी मात्र गाजली. या गाण्यात शकिला सोबत चंद्रशेखर आहे. या चित्रपटातील इतरही गाणी लोकप्रिय ठरली.

1960 मध्ये आलेला शकिलाचा चित्रपट ‘श्रीमान सत्यवादी’ बर्‍यापैकी चर्चेत राहिला कारण त्याचा नायक राज कपुर होता. दत्तराम वाडकरनी शकिलासाठी दोन गोड गाणी यात दिली होती. एक होतं सुमन कल्याणपुरच्या आवाजातील ‘क्युं उउा जाता है आंचल’ आणि दुसरं होतं  सुमन कल्याणपुर-मन्ना डे आवाजातील ‘भिगी हवाओं मे, तेरी अदाओं मे, कैसी बहार है, कैसा खुमार है, झुम झुम झुम ले ले मजा’. शकिलाच्या अभिनयात एक स्वाभविकता राहिलेली आहे. गाण्यांतही तिचे डोळे, चेहर्‍यावरचे हावभाव सहज विभ्रम दाखवतात.

सुनील दत्त प्रमाणेच नवख्या असलेल्या मनोज कुमार सोबत 1961 मध्ये शकिलाचा चित्रपट ‘रेश्मी रूमाल’ आला तेंव्हा त्यातील गाणी गोड असूनही दुर्लक्षीत राहिली. एक तर नायक नवखा आणि दुसरं बाबुल सारखा अपरिचित संगीतकार. राजा मेहंदी अली खां यांनी ‘जूल्फों की घटा ले कर, सावन की परी आयी, बरसेगी तेरी दिल पर हस हसके जो लहरायी’ असे सुंदर शब्द लिहीले आहेत. या गाण्यांत डोळ्यांबाबत जे जे राजा मेहंदी अली यांनी लिहीलं आहे ते ते शकिलाच्याच डोळ्यांना लागू पडतं. 

‘मचले हुये इस दिल मे आरमांन हजारो है
इन प्यासी निगाहों मे तुफान हजारो है’

लगेच दुसर्‍या कडव्यात अशीच सुंदर ओळ आहे

‘आती तो आंखो मे बिजली सी चमकती है
शायद ये मोहब्बत है आंखो से छलकती है’

शकिलाचे नशिबच खराब.  जर हा चित्रपट मोठ्या बॅनरखाली निघाला असता, दुसरा कुणी लोकप्रिय नायक असला असता तर गाणं गाजलं असतं. 

1954 च्या ‘बाबूजी धीरे चलना’ ची लोकप्रियता लाभलेलं अजून एक गाणं शकिलाला 1962 मध्ये भेटलं. चित्रपट होता शम्मी कपुरचा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला ‘चायना टाऊन’. आणि गाणं होतं ‘बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरूबा, डाली हो’. 

शम्मी कपुर म्हणजे शंकर जयकिशनचे संगीत हे समिकरण अजून पक्कं झालं नव्हतं. शम्मी कपुरची जी गाणी शंकर जयकिशन शिवाय गाजली त्यात या गाण्याचा क्रमांक लागतो. या गाण्याला मोठी लोकप्रियता लाभली याचा तोटा असा झाला की यातील दुसरी गाणी काहीशी दुर्लक्षीली गेली. ‘ये रंग ना छुटेगा, उल्फत की निशानी है’ हे रफी-आशाचं अतिशय गोड गाणं. शम्मी कपुर शकिला दोघांनीही अतिशय संयत अभिनय केला आहे. मजरूह सारखा तगडा गीतकार लाभला आहे. पण हे गाणं फारसं ऐकायला मिळतच नाही.  

याच वर्षी ‘टॉवर हाऊस’ (1962) मध्ये संगीतकार रवीने लताच्या आवाजात एक चिरवेदनेचे गाणे दिले आहे, ‘ए मेरे दिले नादान, तू गम से ना घबराना.’ अवखळ, मादक आव्हान देणार्‍या शकिलाने या गाण्यालाही योग्य तो न्याय आपल्या अभिनयाने दिला आहे. याचा विचार व्हायला हवा की वैजयंती माला (देवदास), वहिदा रेहमान (गाईड, तिसरी कसम) यांनी सोज्वळ चेहर्‍याने वेश्येच्या तवायफच्या भूमिका केल्या. पण यांच्याइतकीच ही भूमिका  बार डान्समध्ये प्रभावीपणे साकारणारी शकिला मात्र यांच्याइतकी चर्चेत राहिली नाही. 

‘उस्तादों के उस्ताद’ (1963) हा शकिलाचा शेवटचा चित्रपट. काय येागायोग आहे, शकिलाच्या अतियश गाजलेल्या गाण्यांपैकी एक गाणे हे तिचे शेवटचे गाणे ठरावे. त्या गाण्याचे बोल होते, ‘सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे, ए जाने वफा फिर भी, हम तूम ना जूदा होंगे’. रफीच्या आवाजातील हे गीत प्रदीपकुमार-शकिलावर चित्रित आहे. या गाण्याच्या आधी एक शेर असद भुपालीने लिहीला आहे

वफा के दीप जलाये हुये निगाहों मे
भटक रही हो भला क्युं उदास राहों मे
तूम्हे खयाल है तूम मुझसे दूर हो लेकिन
मै सामने हू चली आओ मेरी धून मे

खरंच आपल्या अतिशय मोजक्या अशा काही अविट गोडीच्या गाण्यांतून शकिला आपल्या समोर येत राहिल. आपल्या कानांत तिची गाणी घुमत राहतील. तिचे भावपुर्ण डोळे पडद्यावर पाहताना एखादी कविताच आपण जिवंतपणे साकर होताना पाहत आहोत असा भास होत राहिल. ‘सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ ना तुमको भूल पायेंगे’.

(शकिला 1963 ला चित्रपट सृष्टीला रामराम ठोकून लग्न करून लंडनला निघून गेली. तिची बहिण नुर सोबत जॉनी वॉकरने लग्न केले. शकिलाची एकूलती एक मुलगी 1991 मध्ये वारली. ... ही माहिती विकीपिडीया वर उपलब्ध आहे. शिवाय तिच्या 48 चित्रपटांची यादीही आहे.) 

     -आफताब परभनवी.