Tuesday 15 May 2018

तलतची ‘हिट’ गाणी


उद्याचा मराठवाडा मे 2018

माधव मोहोळकर यांनी आपल्या पुस्तकात तलतच्या गैरफिल्मी गझलची एक सुंदर आठवण सांगितली आहे. फैय्याजची ती गझल होती

होठों से गुलफिशां है वो, आंखो से अश्कबार हम
सावन से वो है बेखबर, बेगाना-ए-बहार हम

ही गझल हॉटेलमध्ये रेकॉर्डवरून ऐकू येत होती. एक तरूण पोरांचं टोळकं हॉटेल मध्ये शिरलं आणि मालकाला ‘ये क्या फालतू गाना लगाया  है? कोई फिल्मी गाना लगाओ!’ असं सुनावलं. हे ऐकून सिगरेट पीत बसलेला एक तलतच्या गाण्याचा आशिक उठला आणि त्या तरूण पोराच्या कानफाडीत लगावत बोलला, ‘खुदा ने जिसको दिल नही दिया, उसके लिए तलत नही है..’ (‘गीतयात्री, लेखक-माधव मोहोळकर, पृ. 70, मौज प्रकाशन)

खरंच ज्याला तलत समजून घ्यायचा त्याला कोमल हृदय असणं आवश्यकच आहे. तलतच्या आवाजातील थरथर ही प्रेमाची कोवळी भाषा, विरहाचे दु:ख व्यक्त करायला अगदी 100 टक्के योग्य होती. तलतची गाणी काही जणांनाच आवडतात पण सर्वांना नाही. तलत हा मोजक्या अभिजात लोकांचाच गायक होता. सर्वसामान्यांचा नाही. असा गैरसमज विनाकारण पसरवला जातो. तलतच्या गाण्यांचा शोध घेतला असता बॉक्स ऑफिसवर यश मिळवलेल्या चित्रपटांतील आणि बिनाकात गाजलेली अशी त्याची काही गाणी सापडतात त्यावरून त्याच्या ‘व्यवसायीक’ लोकप्रियतेची जरा कल्पना येवू शकते.

तलतचे सुरवातीच्या काळातील व्यवसायिक यश मिळवलेल्या ‘बाबुल’ (1950) चित्रपटातील गाणे ‘मिलतेही आंखे दिल हुआ दिवाना किसी का’ हे शमशाद सोबतचे आहे. तलतसोबत द्वंद्व गीत गायला लताचाच आवाज जास्त शोभून दिसला आहे. याच वर्षी ‘आरजू’ या दिलीपकुमारच्या चित्रपटात ‘ऐ दिल, मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो..’ हे सोलो गीत तलतला मिळालं आणि त्यानं त्याचे सोनं केलं. 

तलतच्या चित्रपटांना सर्वात जास्त व्यवसायिक यश लाभलं ते वर्ष म्हणजे 1952. या एकाच वर्षी पहिल्या दहा व्यवसायिक चित्रपटांपैकी ‘दाग’ (संगीत शंकर जयकिशन), ‘अनहोनी’ (संगीत रोशन), ‘संगदिल’ (सं. सज्जाद) आणि ‘बेवफा’ (सं. ए.आर कुरेशी) या चार चित्रपटांत तलतची गोड गाणी होती. 

राज कपुर बॅनरच्या सोबतच आधीपासून शंकर जयकिशननं बाहेरही बहरदार संगीत दिलं आहे. त्यातीलच एक होता ‘दाग’ (1952). दिलीपकुमारची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यात या गाण्याचा फार मोठा वाटा आहे. शैलेंद्रच्या लेखणीतून उतरलेलं हे सुंदर गाणं आहे ‘ऐ मेरे दिल कही और चल, गम की दुनिया से दिल भर गया’. शैलेंद्रचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शब्दरचना अतिशय साधी, प्रवाही, कमी अक्षरांच्या शब्दांची राहिलेली आहे. हे गाणं लताच्या आवाजातही आहे. पण तलतच्या आवाजाची मजा त्यात नाही.  दिलीप कुमारसाठी पुढे रफी मोठ्या प्रमाणात वापरला गेला. पण सुरवातील मुकेश आणि तलतने त्याच्या गीतांमध्ये अप्रतिम रंग भरले आहेत. याच चित्रपटात हसरतचे गाणेही फार गोड आहे. प्रेम विरहानं पोळलेल्या नायकासाठी ही गाणं ‘आयकॉनिक’ ठरलं आहे. ‘हम दर्द के मारों का इतनाही फसाना है, पीने को शराबे गम, दिल गम का निशाना है.’

राजकपुर-नर्गिस यांचा ‘अनहोनी’ याच वर्षी गाजलेला चित्रपट. त्याला रोशनचं संगीत आहे. राजकपुरसाठी फार थोड्या वेळा तलतचा आवाज वापरला गेला आहे. या चित्रपटासाठी चार गाणी तलतनं राजकपुरसाठी गायली आहेत. त्यातलं प्रेमाची भावना व्यक्त करणारं गोड गाणं आहे ‘मै दिल हू इक अरमान भरा, तू आके इसक पेहचान जरा’.  लतासोबतही तलतची ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ आणि ‘समा के दिल मे हमारे जरा खयाल रहे’  ही दोन  मधुर गाणी यात आहेत. ‘समा के दिल मे’ मध्ये लताचा कोवळा आवाज, तलतचा थरथरता आवाज आणि प्रेमाचे प्रतिक असलेली राज-नर्गिस ही जोडी हे सगळं अतिशय जमून आलेलं रसायन आहे. शंकर जयकिशन सोबतच रोशन सारख्या इतरही संगीतकारांनी राज-नर्गिस यांच्या जोडीला प्रेमाचे प्रतिक बनविण्यात मोठा हातभार लावला आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. 

अतिशय मोजकी (केवळ 16 चित्रपट) गाणी देणारा संगीतकार म्हणून सज्जाद परिचित आहे. त्याच्या ‘संगदिल’ मध्ये तलतची दोन गाणी उल्लेखनीय आहेत. पहिलं गाणं सोलो आहे, ‘ये हवा हे रात ये चांदनी, तेरी इक अदा पे निसार है’. अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि तरूणपणीचा दिलीपकुमार. दिलीपकुमारची प्रतिमा प्रेमाचा नायक अशी जरी झाली नाही तरी त्याची प्रेमाची अप्रतिम अशी गाणी आहेत. त्यातीलच हे एक. यातीलच दुसरं द्वंद्व गीत तलत आणि लताच्या आवाजात आहे. ‘दिल मे समा गये सजन, फुल खिले है चमन चमन’ हे गाणं ऐकताना मधुबालाच्या वेणीवरचा गजरा त्या काळच्या सगळ्याच तरूणींना आपल्याही केसांवर आहे असा भास झाला असणार. गॉगल आणि कोट घातलेल्या दिलीपकुमारमध्ये तेंव्हाचे तरूणही आपली प्रतिमा नक्कीच पाहत असणार. ही प्रेमाची गाणी खरंच अवीट आहेत. याच वर्षीच्या ‘बेवफा’ मध्ये तलतचा आवाज आहे. याला संगीत ए.आर.कुरेशी (तबला नवाज झाकिर हुसेन यांचे वडिल अल्लारखां) यांच आहे. पण गाणी तेवढी विशेष नाहीत.  

‘फुटपाथ’ (1953) हा अतिशय मोजके संगीत देणारे संगीतकार खय्याम यांचा पहिला गाजलेला सिनेमा. यातील दिलीपकुमारसाठीचे तलतचे गाणे आजही लोकप्रिय आहे. तेंव्हाच्या बिनाकातही दुसर्‍या क्रमांकावर गाजलेलं हे गाणं आहे ‘शाम-ए-गम की कसम, आज गमगीन है हम, आ भी जा आ भी जा आज मेरे सनम.’ खरं तर अशा दु:खी विरहाच्या आर्त गाण्यांनी दिलीपकुमारची प्रतिमा ‘ट्रॅजेडी किंग’ बनून गेली. ती शेवटपर्यंत त्याला पुसता आली नाही.  

याचवर्षी ‘शिकस्त’ (1953) हा शंकर जयकिशनच्या संगीतातील चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गाजला होता. दिलीपकुमार-नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित एक गाणं यात आहे- ‘जब जब फुल खिले’. शैलेंद्रने या गाण्यात एक ओळ अशी लिहीली आहे

‘मन को मैने लाख मनाया
पर अब तो है वो भी पराया
जख्म किये नासूर 
तेरी याद की मरहम ने
देख अकेला मुझे
जब घेर लिया गम ने

इतक्या सुंदर साध्या शब्दांत शैलेंद्र विरहाचे दु:ख मांडून जातो.

याच वर्षी ‘दिले नादान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर काही यश मिळालं नाही. पण यातील तलतचे गाणे बिनाकात मात्र गाजलं. शकिलच्या शब्दांतील हे गीत होतं, ‘जिंदगी देने वाले सुन’. ‘पाकिजा’, ‘मिर्झा गालिब’च्या संगीताने ओळखल्या जाणार्‍या गुलाम मोहम्मदचं संगीत या गाण्याला आहे. तलतची नायिका म्हणून यात श्यामानं काम केलं आहे. याच वर्षी ‘ठोकर’ हा शम्मी कपुर-श्यामा यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. यालाही बॉक्सऑफीसवर यश लाभलं नाही पण यातील तलतचं एक गाणं बिनाकात गाजलं. हे गाणं होतं ‘ए गमे दिल क्या करू, ए वेहशते दिल क्या करू’. या गाण्याचे बोल लिहीले होते मजाज लखनवी (गीतकार जावेद यांचा मामा) आणि संगीत होतं सरदार मलिक यांचं. मजाज यांनी अतिशय थोड्या कविता लिहील्या. त्यांच्या उत्कृष्ठ रचनांपैकी ही एक. हे गाणं म्हणजे चित्रपटासाठी लिहीलेलं गीत नसून मजाजच्या ‘अवारा’ या सुंदर कवितेतील दोन कडवी आहेत. ‘प्यासा’ मध्ये मुशायर्‍याचा जो सुंदर प्रसंग आहे त्यात साहिर शिवाय ज्यांची रचना वापरली गेली आहे तो शायर म्हणजे मजाज. मुशायर्‍याच्या त्या दृष्यानंतर ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ हे गाणं सुरू होतं. 

चिरतरूण प्रेमाचे पडद्यावरचे प्रतिक म्हणजे देवआनंद. देवआनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1954) मध्ये किशोर-रफीच्या आवाजात खुलणार्‍या देवआनंदसाठी सचिनदेव बर्मन यांना वेदना प्रकट करायला तलतच्याच आवाजाचा सहारा घ्यावा लागला. साहिरच्या शब्दकळेनं नटलेलं हे सुंदर गाणं आहे ‘जाये तो जाये कहां, समझेगा कौन यहां, दर्द भरे दिल की जुबां’. 

गालिबचे मोठेपण सगळ्यांनाच मान्य आहे पण त्याच्या गझलांना पडद्यावर चाली देवून साकार करण्याची हिंमत मात्र फारच थोड्या संगीतकारांनी केली. गुलाम मोहम्मदने हे ‘गालिब’धनुष्य बॉक्सऑफिस हिट ‘मिर्झा गालिब’ (1954) उचललं आणि यशस्वी करून दाखवलं. हा चित्रपट होता सुरैय्या-भारतभुषण यांचा. यात सुरैय्या सोबत तलतनं गालिबची अजरामर गझल ‘दिले नादान तूझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दुवा क्या है’ गायली आहे. 

बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत पण तलतच्या गाण्यांनी बिनाकात धुम केली असे तीन चित्रपट याच वर्षी पडद्यावर आले. 
1.‘कवी’- मै पीके नही आया-संगीत सी.रामचंद्र, 
2.‘सुबह का तारा’ होता- गया अंधेरा हुआ उजारा- संगीत सी.रामचंद्र, 
3.‘वारीस’- राही मतवाले तू छेड एक बार तलत/सुरैय्या- संगीत अनिल विश्वास
चित्रपटाचे यश बाजूला पण तलतचे चाहते  त्याच्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकायचे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. 

दिलीपकुमार-देवआनंद-बिना रॉय यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘इन्सानियत’ (1955). सी.रामचंद्र यांच्या अवीट संगीताने नटलेल्या या चित्रपटात लता-तलतचे एक सुंदर प्रेमगीत आहे ‘आयी झुमती बहार, लायी दिल का करार, देखो प्यार हो गया’. गुरूशर्टमधला मिशावाला देवआनंद आणि पुढे वेणी घेतलेली साडितील बिना रॉय एक वेगळीच खुमारी या गाण्याला प्राप्त करून देतात. राजेंद्रकृष्ण-सी रामचंद्र ही एक यशस्वी गीतकार-संगीतकार जोडी. त्यांच्या गाजलेल्या लोकप्रिय रचनांपैकी ही एक. 

तलतचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतकार कुणीही असो तो आपली वेगळी छाप त्या गाण्यावर सोडून जातो. शौकत देहलवी नाशाद हा तसा फारसा परिचित संगीतकार नाही. पण त्याच्या ‘बारादरी’तल्या तलतच्या गाण्यांनं आजही लोकप्रियता सांभाळली आहे. हे तलतचे गाणे आहे, ‘तस्वीर बनाता हू, तस्वीर नही बनती’. 

‘मौसी’ (1958) या वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात तलत-लताचे ‘टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ हे अजरामर गीत आहे. बिनाकात या गाण्याला रसिकांनी पसंती दिली. भरत व्यास सारखा गुणी गीतकार या गाण्याला लाभला. ‘झनक झनक पायल बाजे’ किंवा ‘नवरंग’ सारख्या चित्रपटांतील व्यासांच्या शब्दकळेला रसिक अजूनही दाद देतात. स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केलेला एक चित्रपट यावर्षी पडद्यावर झळकला ‘सोने की चिडिया’. यातील साहिरच्या नाजूक शब्दकळेचं गाणं होतं ‘प्यार पर बस तो नही है’. संगीतकार ओ.पी.नय्यर असल्याने तलत सोबत लता असण्याचा प्रश्‍नच नव्हता. लताची जागा आशा ने तेवढ्याच तोलामोलाने केवळ आलापीने भरून काढली आहे. खरं तर हे गाणं ऐकल्यावर परत परत असं वाटतं की तलत-आशा या जोडीला घेवून ओ.पी.नय्यरसारख्यांनी अजून छान गाणी का नाही दिली. 

‘सुजाता’ (1959) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश लाभलंच शिवाय तलतचे गाणे त्याच्या चाहत्यांनी बिनाकात डोक्यावर घेतलं. सुनील दत्त-नुतन वर चित्रित हे गाणं होतं, ‘जलते है जिसके लिऐ, तेरी आंखो के दिये’. तलतची अशी काही गाणी आहेत की त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाचा आवाजही आपण कल्पु शकत नाही. त्यातील हे एक अप्रतिम गाणं. एक दु:खी आर्त उदास वेदना उदबत्ती सारखी त्याच्या आवाजात जळत असते. असं म्हणतात ना ‘ना बुझती है ना जलके धुवां होती है’ तशी काहीतरी भावना तलतच्या आवाजात आहे. 

हे गाणं म्हणजे तलतच्या व्यवसायिक यशस्वी गाण्यांची भैरवीच आहे. पुढे त्याचा कुठलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. न बिनाकात त्याची गाणी गाजली. ‘हकिकत’ (1964) मध्ये ‘हो के मजबूर’ या गाण्यात  रफी-मन्ना-भुपेंद्र यांच्या सोबत त्याचा आवाज एका कडव्यात आहे इतकंच. बाकी त्याच्या वाट्याला काही आलं नाही.

हेमंतकुमार यांच्या निधनानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीले होते ‘शोर और सूर मे येही फर्क होता है, शोर खात्म होता है और सुर खो जाता है. हेमंतकुमार खो गये.’ या प्रमाणेच तलतच्याही बाबतीत असंच म्हणावं लागेल ‘तलत खो गये’.. तलतच्या पुण्यतिथी निमित्त (९ मे)  त्याला विनम्र अभिवादन !    

   -आफताब परभनवी.