Friday 9 November 2018

दस नंबरी नायिका सौ नंबरी गाणी


मोहनगरी दिवाळी 2018

गाणार्‍या नट नट्यांना मोठी लोकप्रियता लाभण्याचा तो काळ होता.  नायकांमध्ये सैगल आणि नायिकांमध्ये नुरजहां हे सगळ्यात गाजलेले. केवळ पार्श्वगायन करणारं तेंव्हा एक शमशाद चा सणसणीत अपवाद वगळला तर कुणी नव्हतं. इतकंच काय रेकॉर्डवर गायिका म्हणून नायिकेचेच चित्रपटातील नाव (किंवा नायकाचे) छापलेले असायचे. पण सैगलचे निधन झाले आणि नुरजहां भारत सोडून पाकिस्तानात निघून गेली. स्वत:साठी स्वत: गाणे बाजूला पडून पार्श्वगायनाची पद्धत रूजत चालली. 

पार्श्वगायिका म्हणून लताचे आगमन 45 च्या सुमारास झाले. लताच्या आवाजात ज्या नायिकांच्या पिढीला आपला सूर सापडला त्यातले पहिले मोठे नाव म्हणजे नर्गिस. तिच्या सोबत आणि पाठोपाठ आलेली नावे म्हणजे गीताबाली (बडी बेहन-49),  मधुबाला (महल-49), मीनाकुमारी (बैजू बावरा-52) आणि वैजयंतीमाला (बहार-51). या पाच नायिकांचे चित्रपट 1949 ते 1952 या काळात बॉक्स ऑफिसवर गाजायला सुरवात झाली. तेंव्हाच्या वैशिष्ट्या प्रमाणे चित्रपटांच्या यशात गाण्यांचा मोठा वाटा होता. किंबहूना आज तर असे लक्षात येते की तेंव्हाचे बरेच चित्रपट हे केवळ गाण्यांमुळे गाजले. 

या पाच नायिकांच्या पाठोपाठ 1955 च्या ‘सीमा’च्या यशापासून नुतन, वहिदा (सीआयडी-56), मालासिन्हा (प्यासा-57), आशा पारेख (दिल देके देखो-59) आणि साधना (लव्ह इन सिमला-60) अशा अजून पाच नायिका पडद्यावर राज्य करू लागल्या. 

या दहा नायिकांचा प्रभाव पुढे जवळपास 1970 पर्यंत हिंदी चित्रपटांवर राहिला. 1949 ते 1966 या काळात एकूण 178 सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या पैकी 110 म्हणजे 62 टक्के चित्रपट या दहा जणींचे आहेत. यावरून यांचा प्रभाव लक्षात येतो. बिनाकातील 414 गाण्यांपैकी 115 गाणी यांचीच आहेत.  

लताचा आवाज नायिकांसाठी वापरला जावू लागला ही बदलाची सुरवात होती. पण सुरवातीच्या पाचही नायिकांसाठी त्या काळाची सगळ्यात जास्त बिदागी घेणारी गायिका शमशाद बेगम हीच्या आवाजाचा वापर केला गेला आहे. नर्गिस- धडके मेरा दिल (बाबुल-50, सं.नौशाद), गीताबाली- चांदनी बनके आयी प्यार (दुलारी-49, सं. नौशाद), मधुबाला- मुहोब्बत मेरी रंग लाने (निराला- 50, सं. सी.रामचंद्र), मीनाकुमारी-पगडी पेहनके (मदहोश-51, सं.मदनमोहन) आणि वैजयंतीमाला- सैंय्या दिल मे आना रे (बहार-51, सं.सचिनदेव बर्मन) या गाण्यांमध्ये शमशादचा आवाज या नायिकांसाठी  वापरला गेला होता. 

पण बघता बघता हे चित्र पलटत गेलं. लताचा/गीताचा आवाज नायिकांसाठी उमटायला लागला. लताच्या ज्या गाण्यांनी सुरवातीलाच सगळ्यांना मोहून टाकले ते नर्गिससाठीचे गाणे होते बरसात मधील ‘मुझे किसीसे प्यार हो गया’. मधुबालाच्या महल मधल्या ‘आयेगा आयेगा आनेवाला’ ने तर कहरच केला. यापाठोपाठ गीताबाली साठी सचिनदेव बर्मन यांनी ‘बाजी’ (51) मध्ये गीता रॉयला गायला लावलं. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर’ म्हणत गीता जे गायली त्यानं एकूण संगीताचीच तकदीर बदलून गेली. शमशादच्या आवाजात ‘सैंय्या दिल मे आना रे’ म्हणत अप्रतिम नृत्य करणार्‍या वैजयंतीमालासाठी लता ‘मन मोर मचावे शोर’ (लडकी-53) गायला लागली होती. पुढच्याच वर्षी वैजयंतीमालाच्या ‘नागिन’ मधील लताच्या सर्वच गाण्यांनी कहरच केला.   

राज कपुरच्या ‘बरसात’ मध्ये शंकर जयकिशनने नविन संगीत देवून बदलाची सुरवात केली. या सोबतच लताचा कोवळा आवाज नविन पिढीच्या नायिकांसाठीचा सूर बनला. पूर्वीचे संगीत आणि ‘बरसात’ (1949) नंतरचे संगीत यात फरक आढळतो. लताच्या आवाजामुळे असेल कदाचित पण सुरांचे बारकावे जे पूर्वी ऐकायला मिळत नव्हते ते कानावर पडायला लागले. संगीतकार विविध प्रयोग करायला लागले. हे सगळं नविन आणि वेगळं होतं. तिकडे नायकांसाठीही रफी, मुकेश यांच्या आवाजाचे प्रयोग सुरू झाले होते. किशोर बराच काळ स्वत:साठीच गात होता. देवआनंदचा अपवाद वगळता 1960 पर्यंत त्याची गाणी इतर नायकांसाठी फारशी नाहीतच. 

गीतकारांबाबतही याच काळात बदलाचे युग सुरू झाले. जून्या गीतकारांना बाजूला ठेवत नविन गीतकारांची पिढी समोर आलेली आढळते. म्हणजे हा असा कालखंड आहे की जिथे गायक नट-नट्या यांचा जमाना संपून पार्श्वगायकांचा वापर सुरू झाला होता सोबतच संगीताचा बाज बदलत होता. गीतकारांच्याही रचनांमध्ये बदल दिसून येत होता.1949 नंतर शैलेंद्र, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, राजेंद्रकृष्ण, शकिल बदायुनी या गीतकारांची सद्दी सुरू झाली.

आधीच्या पोषाखी साचेबद्ध अभिनय करणार्‍या नायिकांपेक्षा नर्गिसच्या पिढीच्या नायिका बदलल्या. एकट्या सुरैय्याचा अपवाद मात्र होता. पुढेही मिर्झा गालिब पर्यंत सुरैय्याचे चित्रपट येत राहिले. तिच्या चाहत्यांना रिझवत राहिले. पण नंतर सुरैय्याही मागे पडली. खरं तर सुरैय्याने पार्श्वगायनासाठी इतरांचा आवाज वापरला असता तर ती अजून काही काळ पडद्यावर टिकली असती. 

लतासोबतच गीताच्या आवाजाचा वापरही सुरू झाला होता. राज-नर्गिस जोडीचा ‘जान पेहचान’ ‘बरसात’ नंतर लगेच पुढच्या वर्षी पडद्यावर आला होता. त्यात तलत-गीताच्या आवाजात खेमचंद प्रकाश यांनी सुंदर युगलगीत दिलं होतं, ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिये है’. गीताबालीसाठी ज्याप्रमाणे ‘बाजी’त गीतानं मस्तीभरे रंग भरले होते त्या सोबतच ‘आनंदमठ’ चित्रपटात ‘नैनों मे सावन’ हे व्याकुळ आर्त गीतही दिलं होतं. 

एस.एन.त्रिपाठी यांच्यावर धार्मिक चित्रपटांचा शिक्का बसला आणि त्यांचे संगीत दुर्लक्षिल्या गेलं. पण त्यांनी ‘लक्ष्मी नारायण’ (51) मध्ये मीनाकुमारीसाठी गीताच्या आवाजाचा फार सुंदर वापर करून घेतला होता. यातील ‘आज अचानक जाग उठी’ हे गाणं फार गोड आहे.    

या काळात आशाचा आवाज या पाच नायिकांसाठी फारसा वापरला गेला नाही.

‘बाजी’ पासून सचिनदेव बर्मन यांच्या संगीताला एक वेगळी झळाळी लाभली. तसेच ‘आरपार’ नंतर ओ.पी.नय्यरनं एक वेगळा ठेकाप्रधान बाज संगीतात आणला आणि लोकप्रिय करून दाखवला. या पाच नायिकांपैकी मधुबालासाठी  ‘मिस्टर ऍण्ड मिसेस 55’ मध्ये त्यानं गीताच्या आवाजाचा वेगळा अफलातून वापर सिद्ध करून दाखवला. ‘उधर तूम हसी हो’ सारखं अवखळ युगल गीत, ‘ठंडी हवा काली घटा’ सारखं खट्याळ सोलो आणि ‘प्रीतम आन मिलो’ सारखं आर्त सारं सारं गीताच्या आवाजात मधुबालासाठी पडद्यावर साकार केलं. 

हा जो बदलाचा कालखंड आहे त्यात संगीतकारांचा तर सिंहाचा वाटा आहे. जूने संगीतकार बाजूला सरकून शंकर जयकिशन आणि ओ.पी.नय्यर हे नवे संगीतकार काही एक नवा बाज घेवून आले होते. पण जून्यापैकी काही मात्र या बदलातही टिकून राहिले. नव्हे त्यांनी या नव्यांच्या बरोबरीने इतिहास रचला. जून्यापैकी जे संगीतकार नविन काळात घट्ट टिकून राहिले त्यात प्रमुख होते नौशाद, सी. रामचंद्र आणि सचिनदेव बर्मन. 
नर्गिस, मधुबाला आणि गीताबाली यांचे चित्रपट या काळात (1949 ते 1954) जास्त चालले. त्या मानाने मीनाकुमारी आणि वैजयंतीमाला यांचे फारसे चित्रपट आले नाही किंवा बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. 
या पहिल्या पाच नायिकांमध्ये केवळ वैजयंतीमालाच अशी एकटी होती की जीच्याकडे कमालीची नृत्यनिपुणता होती. केवळ तिला डोळ्यापुढे ठेवून पुढे नृत्यप्रधान गाणी रचली गेली. त्या तुलनेने नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी यांना मर्यादा होत्या. त्यांची गाणी नृत्यप्रधान नाहीत. गीताबालीसाठी एक थोडीशी वेगळी सोय पडद्यावर करून घेण्यात आली. बाजी नंतर तिच्या वाट्याला क्लब सॉंग जास्त यायला लागली. अशा खट्याळ गाण्यांसाठी किमान आवश्यक अशा नृत्य हालचाली गीताबालीनं शिकून घेतल्या. आणि ही गाणी पडद्यावर उठून दिसायला लागली. 

बिमल रॉय यांच्या ‘सीमा’ (1955) मधून नुतनला मोठा ब्रेक मिळाला. ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’ म्हणत आलेली नुतन पुढे खरंच ‘लंबा’काळ हिंदी सिनेमाचा पडदा व्यापून राहिली. तिच्या पाठोपाठ ओ.पी.नय्यरच्या ‘सीआयडी’(56) मधून वहिदा रेहमान पडद्यावर आली.  आधीच्या पाचही नायिकांची बरोबरी वहिदाने एकाबाबतीत साधली होती. वहिदासाठी या गाण्याला उसना आवाज होता शमशादचा (कही पे निगाह है कही पे निशाना).

पुढचा जो टप्पा आहे तो इथूनच सुरू होतो. ओ.पी.नय्यरच्या संगीतानं एक वेगळा रंग हिंदी चित्रपट संगीताला चढला. पूर्वीच्या पाच नायिकांसोबतच नुतन, वहिदा, मालासिन्हा, आशा पारेख आणि साधना यांचेही चित्रपट गाजायला लागले. या पाच नायिकांसोबत अजून एक गोड आवाज मोठ्या प्रमाात ऐकायला यायला लागला. तो होता आशा भोसलेचा. ओ.पी.नय्यरने आशा, गीतासोबतच जून्या शमशादचा आवाज आपल्या संगीतात वापरून एक वेगळ्या लोकप्रिय गाण्यांची शैली विकसीत केली (कही आर कही पार, बुझ मेरा क्या नाम रे, सैंय्या तेरी अखियों मे दिल खो गया, कही पे निगाह है कही पे निशाना, रेशमी सलवार कुरता जाली का, कजरा मुहोब्बत वाला). पण शमशादची गाणी जास्त करून सहाय्यक अभिनेत्रींसाठी किंवा आयटम सॉंग सारखी वापरली गेली. या दहा नायिकांसाठी तो आवाज फारसा वापरला गेला नाही. (शमशाद सारखीच अवस्था नायिका म्हणून हेलनची होती. तिची गाणी आयटम सॉंग सारखी चित्रपटात असायची. पण तिला स्वतंत्र नायिका म्हणून सिनेमे मिळाले नाहीत.)

1955 पासून नर्गिसच्या चित्रपटांची संख्या कमी कमी होत गेली. आजारामुळे 1960 नंतर मधुबालाचेही दर्शन दुर्मिळ झाले. गीताबालीही बाजूला झाली.  बाकी नायिकांचे मात्र चित्रपट मोठ्या प्रमाणात येत गेले. 
वैजयंतीमाला सोबतच आता नृत्यासाठी वहिदा रेहमानची गाणी गाजायला लागली. नर्गिस बाजूला जाताच पडद्यावरच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राज-नर्गिस या जोडी ऐवजी देवआनंद-नुतन ही जोडी पडद्यावर रसिकांना आकर्षित करू लागली. नुतनची ही देवआनंदसोबतची गाणी आजही रसिकांच्या विशेष लक्षात आहेत. (उदा. छोड दो आंचल-पेईंग गेस्ट, ओ निगाहे मस्ताना-पेईंग गेस्ट, फिर वोही चांद-बारीश, केहते है प्यार किसको-बारीश, चुपकेसे मिले प्यासे प्यासे-मंझिल, दिल तो है दिवाना ना-मंझिल,  देखो रूठा न करो-तेरे घर के सामने, तेरे घर के सामने-तेरे घर के सामने)  

खरं तर दिलीपकुमार सोबत वैजयंतीमालाची खुप प्रेमगीतं आहेत. ती अप्रतिमही आहेत (मांग के साथ तुम्हारा-नया दौर, दिल तडप तडप के केह रहा है-मधुमती, तेरे हुस्न की क्या तारीफ करू-लीडर). पण दिलीपकुमारची प्रतिमा काहीशी शोकात्म नायकाची असल्याने रसिकांनी दाद देवूनही प्रेमी युगुलाची प्रतिमा फारशी ठसली नाही. 

दिलीपकुमार सारखीच अडचण मीनाकुमारीची झाली. तिची प्रतिमाही शोकात्म अभिनय साकारणारी नायिका अशीच बनली. मग याच काळात आलेली तिची अप्रतिम अशी प्रेमगीतं गाजूनही त्या दृष्टीनं लक्षात घेतली जात नाहीत ( उदा. तू गंगा की मौज मै-बैजू बावरा, झूले मे पवन की-बैजू बावरा, सावले सलोने आये दिन बहार के-एक ही रास्ता, कहता है दिल तूम हो-मेमसाहिब, तूने मेरा दिल लिया-शरारत, दो सितारों का जमी पर-कोहिनूर, कोई प्यार की देखे जादूगरी-कोहिनूर)

माला सिन्हा गुरूदत्तच्या प्यासानं पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. तीला या पहिल्याच चित्रपटात ‘हम आपकी आंखो मे’ हे रफी-गीताच्या आवाजातील अप्रतिम प्रेमगीत मिळालं. मग पुढेही तिला अतिशय गोड अशी प्रेमगीतं मिळत गेली (फिर ना किजीये मेरे गुस्ताख निगाहों से गीला- फिर सुबह होगी, तेरे प्यार का आसरा चाहता हू-धूल का फुल, तस्वीर तेरी दिल मे-माया, इब्तेदा ए इश्क मे हम-हरियाली और रास्ता, दिल तेरा दिवाना है सनम-दिल तेरा दिवाना, इन हवाओं मे-गुमराह, तूम्हे पाके हमने-गेहरा दाग)

या काळात ‘सीआयडी’,  ‘प्यासा’, ‘कागज के फुल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहब बिबी और गुलाम’ आणि ‘12 ओ क्लॉक’ या गुरूदत्त-वहिदाच्या सिनेमांची ऐक वेगळी छाप संगीतातून पडते. वहिदाच्या वाट्याला फार सुरेख गाणी आली आहेत. सीआयडीचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्यात वहिदा नायिका आहे. साहब बिबी और गुलाम मध्ये तिची भूमिका सहनायिकेची आहे हे खरं आहे. पण ‘भवरा बडा नादान’ सारखं सुंदर गाणं तिच्या वाट्याला आलं आहेच.

कॅमेर्‍याचा अप्रतिम वापर करत वहिदाची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यात गुरूदत्त यशस्वी ठरला. कारण पुढे ‘गाईड’चा अपवाद वगळता वहिदासाठी कॅमेर्‍याचा विलक्षण वापर फारसा कुठे आढळत नाही. 
हाच फायदा देवआनंद प्रॉडक्शनच्या अगदी दोनच चित्रपटांतून नुतनलाही मिळाला (पेईंग गेस्ट, तेरे घर के सामने). चांगल्या दिग्दर्शकामुळे एक विशिष्ट प्रतिमा तयार होते. आणि सोबतीला गाणी असतील तर ही प्रतिमा कायमची ठसून जाते. 

आशा पारेख प्रकाशात आली ती धसमुसळ्या शम्मीच्या ‘दिल दे के देखो’मुळे. रफीचं ‘दिल दे के देखो’ हे शीर्षक गीत प्रचंड गाजलं आणि शम्मी, आशा पारेख यांना पुढे याचा फायदा झाला. फायदा झाला नाही तो संगीतकार उषा खन्नालाच. तिचं संगीत म्हणजे मामा ओ.पी.नय्यरच तिच्या नावानं देतो असा आरोप केल्या गेला. आणि हा गैरसमज असा काही पसरला की चांगली प्रतिभा असूनही उषा खन्ना या तेंव्हाच्या एकमेव महिला संगीतकाराला पुढे फारसे चित्रपट मिळाले नाहीत. 

आशा पारेख वैजयंतीमाला, वहिदा रेहमान यांच्या सारखी अतिशय चांगली नृत्यांगना होती. परिणामी तिला तोही एक फायदा झाला. तिच्यासाठी चांगली गाणी तयार व्हायला लागली. तिच्या चित्रपटांना व्यवसायिक यश सुरवातीपासूनच लाभत गेलं. 1966 हे एक वर्ष तर असं आहे की बॉक्स ऑफिसवर यशस्वी 10 मधील 4 चित्रपट तिचे होते. (तिसरी मंझिल, लव्ह इन टोकियो, दो बदन, आये दिन बहार के)

आशा पारेखच्या पाठोपाठ साधनाचा ‘लव्ह इन सिमला’ (60) पडद्यावर आला. एक वेगळा सुंदर टवटवीत चेहरा सिनेजगताला मिळाला. साधना आशा पारेख यांच्या मुळे एक बदल पडद्यावर जाणवायला लागला. तो म्हणजे नायिकेची केश रचना, तिचे कपडे हे बदलत गेलं. खोप्यासारखी उंचावलेली केशरचना तंग चुडीदार पंजाबी ड्रेस आणि वार्‍यावर उडणारी ओढणी हे शिवाय हे चित्रपट आता कृष्ण धवल न राहता रंगीत बनत चालले होते. जुन्यांपैकी वहिदा, वैजयंतीमाला, माला सिन्हा यांनी हा बदल तातडीने स्वीकारला आणि त्यांना तो शोभूनही दिसला. त्यामानाने नुतन मात्र फारशी खुलली नाही. एव्हाना मधुबाला, गीताबाली, नर्गिस यांचा कालखंड संपला होता.

मीनाकुमारीला केंद्रभागी ठेवून चित्रपट 1960 नंतर यायला लागले. असे भाग्य इतर कुणा नायिकेला लाभले नाही. या चित्रपटांमधुन तिच्यासाठी काहीशी वेगळी आर्त गाणीही पडद्यावर यायला लागली. त्याला रसिकांनी मोठा प्रतिसादही दिला. दिलीप कुमार बरोबरच्या ‘कोहिनूर’ सोबतच ‘दिल अपना और प्रीत पराई’ आला. यातील ‘अजीब दास्तां है ये, कहा शुरू कहां खतम’ सारख्या गाण्यांनी तिची एक शोकात्म प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा शेवटपर्यंत तिला पुसता आली नाही. 

आशा पारेख आणि साधना या नर्गिसच्या काळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या शेवटच्या नायिका. कारण यांनी जुन्या पद्धतीच्या गाण्यांमधूनही आपली अभिनयक्षमता दाखवली होती. यांची कपडेपट्टी, चेहरेपट्टी आणि गाण्याची पट्टीही जून्यांसारखी असायची. नंतर काळाप्रमाणे बदल होत गेला. किंबहूना याच दोघी आणि त्यांच्या जोडीला मालासिन्हा या बदलाच्या जनक होत्या.

आशा पारेख ‘जब प्यार किसीसे होता है’ पासून ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ पर्यंत बदलत गेली. साधना ‘ओ सजना बरखा बहार आयी’ पासून ‘ आ जा आयी बहार’ पर्यंत बदलत गेली. 

1966 नंतर संगीतच बदलत गेलं. तिसरी मंझिल मध्ये ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ म्हणत नाचणारी शम्मी सोबतची  आशा पारेख पुढे ‘आजा पिया तोसे प्यार दू’ (बहारों के सपने-67) म्हणणारी फारशी आढळत नाही. हे गाणं राहूलदेव बर्मनचं आहे हे पण त्याच्या ‘आजा आजा’ वाल्या रसिकांना पटवून सांगावे लागते. 

साधना कट नसलेली वेणीमधील साधना ‘तेरा मेरा प्यार अमर’ म्हणत लताच्या अवाजात शंकर जयकिशनच्या संगीतात शांतपणे रस्त्यावरून पौर्णिमेचा चंद्र सोबत घेवून चालायची ती आजही मोहक संवेदनक्षम बोलकी वाटते पण ती त्याच लताच्या आवाजात संजय खान सोबत नावेत बसून ‘हम तुम्हारे लिये तूम हमारे लिये’ (1969) गायला लागली तेंव्हा विलक्षण कृत्रिम कचकड्याची वाटायला लागली.

नर्गिस सोबतच  कामिनी कौशल (शबनम-49, आरजू-50), नलिनी जयवंत (आंखे-50, जादू-51), निम्मी (दीदार-51, दाग-52, आन-52, आंधिया-52, बसंत बहार-56, भाई भाई-56), बिना रॉय (अनारकली-53, इन्सानियत-55) यांचेही चित्रपट पडद्यावर गाजत होते. पुढे नुतन वहिदाच्या सोबतच श्यामा (शर्त-54, आरपार-54, भाई भाई-56, भाभी-57, शारदा-57), शकिला (आरपार-54, सीआडी-56,चायना टाऊन-62), नंदा (तुफान और दिया-56, भाभी-57, छोटी बेहन-59, कानून-60, हमदोनो-61, जब जब फुल खिले-65) यांचेही रूपेरी पडद्यावर स्वागत रसिकांनी बॉक्स ऑफिसवर मोठे कलेक्शन करून केले. 

साधना-आशा पारेख यांच्या नंतर कल्पना (देव आनंदची पत्नी कल्पना कार्तिक नव्हे, शम्मी कपुरसोबत प्रोफेसर मधील नायिका), सायरा बानो, शर्मिला टागोर, राजश्री आणि बबिता यांचा बोलबाला सुरू झाला. 
पण असं असले तरी जो दबदबा आणि हक्काचा रसिक गोळा करण्याची ताकद या दहा नायिकांमध्ये होती तशी इतरांमध्ये नव्हती. जसं नायकांमध्ये दिलीप-देव-राज यांच्या नंतर शम्मी-राजेंद्रकुमार यांनी हक्काचा रसिक तयार केला तसा इतरांना नाही करता आला.

या दस नंबरी नायिकांनी सौ (शंभर) नंबरी गाणी दिली. ‘कानुन’ या एकाच चित्रपटाचा अपवाद वगळता गाणी नसलेला आणि ती गाणीही न गाजलेला चित्रपटच या काळात आला नाही. विशेषत: बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या सगळ्याच चित्रपटांची गाणी गाजली आहेत. 

(दहा नायिका आणि त्यांचे बॉक्स ऑफिसवर गाजलेले चित्रपट तसेच किमान एक तरी गाणं ज्या चित्रपटाचे बिनाकात गाजलं आहे असे चित्रपट ही यादी सोबत दिली आहे. तसेच या दहा नायिकांच्या बिनाका गीतमालेत गाजलेल्या 110 गाण्यांची यादीही जोडली आहे. बिनाका गीतमाला 1953 पासून सुरू झाली. 1967 पर्यंतच्या बिनाकातील गाणी यासाठी विचारात घेतली आहेत.)

नर्गिस (1 जून 1929- 3 मे 1981)
हिट - बरसात (49), बाबुल (50), जोगन (50), आवारा (51), दीदार (51), अनहोनी (52), बेवफा (52), आह (53), श्री 420 (55), चोरी चोरी (56), मदर इंडिया (57)  
इतर - जागते रहो (56), मिस इंडिया (57), घर संसार (58)

गीताबाली (30 नो. 1930- 21 जाने 1965)
हिट - बडी बहेन (49), दुलारी (49), बाजी (51), अलबेला (51), आनंदमठ (51), जाल (52), झमेला (53), बारादरी (55), इन्स्पेक्टर (56)  इतर - कवी (54), वचन (55), अजी बस शुक्रिया (58)

मधुबाला (14 फेब्रु 1933- 23 फेब्रु. 1969)
हिट - महल (49), दुलारी (49), बेकसुर (50), बादल (51), संगदिल (52), अमर(54), मि.ऍण्ड मिसेस 55 (55), राजहट (56), चलती का नाम गाडी (58), कालापानी (58), फागुन (58), हावरा ब्रिज (58), बरसात की रात (60), मोगल-ए-आझम (60)   इतर - इन्सान जाग उठा (59)

मीनाकुमारी (1 ऑगस्ट 1933- 21 मार्च 1972)
हिट - बैजूबावरा (52), परिणीता (53), फुटपाथ (53), आझाद (55), इक ही रास्ता (56), शारदा (57), यहुदी (58), चिराग कहा रोशनी कहा (59), कोहिनूर (60), दिल अपना और प्रीत पराई (60), जिंदगी और ख्वाब (61), आरती (62), दिल एक मंदिर (62(, काजल (65), फुल और पत्थर (66)
इतर - बादबां (54),  मेमसाहिब (56), मिस मेरी (57), सट्टा बाजार (59), शरारत (59), मै चुप रहूंगी (62), साहब बिबी और गुलाम (62), चित्रलेखा (64), भिगी रात (65)

वैजयंतीमाला (13 ऑगस्ट 1936- )
हिट - बहार (51), लडकी (53), नागिन (54), देवदास (55), न्यु दिल्ली (56), नया दौर (57), आशा (57), मधुमती (58), साधना (58), पैगाम (59), गंगा जमूना (61), आस का पंछी (61), संगम (64), जिंदगी (64), सुरज (66)
इतर - देवता (56),  इक झलक (57), कठपुतली (57), अमरदीप (58), सितारोंसे आगे (58), नजराना (61), लिडर (64)

नुतन - (4 जून 1936 , 21 फेब्रु. 1991)
हिट - सीमा (55), पेईंग गेस्ट (57), दिल्ली का ठग (58), अनाडी (59), सुजाता (59), तेरे घर के सामने (63), बंदिनी (63), खानदान (65)
इतर - शबाब (54),  कभी अंधेरा कभी उजाला (58), सोने की चिडीया (58), कन्हैय्या (59), छलिया (60), दिल ही तो है (63), दिल ने फिर याद किया (66)

माला सिन्हा (1936- )
हिट - प्यासा (57), फिर सुबह होगी (58), परवरिश (58), धुल का फुल (59), हरियाली और रास्ता (62), दिल तेरा दिवाना (62), अनपढ (62), गुमराह (63), गेहरा दाग (63), हिमालय की गोद मे (65)  
इतर - चंदन (58), दुनिया न माने (59), लव्ह मॅरेज (59), मै नशे मे हू (59), धर्मपुत्र (61), माया (61), बॉम्बे का चोर (62), 11 हजार लडकिया (62), बहुबेटी (65), बहारे फिर भी आयेंगी (66), दिल्लगी (66)

वहिदा (3 फेब्रु. 1938- )
हिट - सी.आय.डि. (56), प्यासा (57), चाहदवी का चांद (60), काला बाजार (60), 20 साल बाद (62), मुझे जीने दो (63), गाईड (65)  
इतर - सेालवा साल (58), 1 फुल 4 कांटे (60), रूप की रानी चोरों का राजा (61), बात इक रात की (62), साहब बिबी और गुलाम (62), इक दिल सौ अफसाने (63), कोहरा (64), दिल दिया दर्द लिया (66), तिसरी कसम (66)

साधना (सप्टें 1941-  25 डि. 2015)
हिट - लव्ह इन सिमला (60), हमदोनो (61), इक मुसाफिर इक हसिना (60), असली नकली (62), मेरे मेहबुब  (63), राजकुमार (64), वो कौन थी (64), वक्त (65), आरजू (65), मेरा साया (66)  
इतर - परख (60), मनमौजी (62), दुल्हा दुल्हन (64), बदतमिझ (66)

आशा पारेख (2 ऑक्टोबर 1942- )
हिट - दिल देके देखो (59), घुंघट (60), जब प्यार किसीसे होता है (61), घराना (61), फिर वोही दिल लाया हू (63), जिद्दी (64), मेरे सनम (65), तिसरी मंझिल (66), लव्इ इन टोकियो (66), दो बदन (66), आये दिन बहार के (66)  इतर - हम हिंदुस्थानी (60), छाया (61), बीन बादल बरसात (63)


नर्गिस 
1.आजा रे अब मेरा दिल पुकारा लता/मुकेश हसरत शंकर जयकिशन आह (53)
2.इचक दाना बिचक दाना लता/मुकेश हसरत शंकर जयकिशन श्री 420 (55)
3.पंछी बनू उडके फिरू लता हसरत शंकर जयकिशन चोरी चोरी (56)
4.ये रात भिगी भिगी मन्ना/लता शैलेंद्र शंकर जयकिशन चोरी चोरी
5.आजा सनम मधुर चांदनी मन्ना/लता हसरत शंकर जयकिशन चोरी चोरी
6.जागो मोहन प्यारे लता शैलेंद्र सलिल चौधरी जागते रहो (56
7.दुनिया मे हम आये है तो लता/उषा शकिल नौशाद मदर इंडिया (57)
8.नगरी नगरी द्वारे द्वारे लता शकिल नौशाद मदर इंडिया
मधुबाला 
9.उधर तूम हसी हो रफी/गीता मजरूह ओ.पी.नय्यर मि.ऍण्ड मिसेस 55 (55)
10.इक लडकी भिगी भागीसी किशोर मजरूह एस.डि.बर्मन चलती का नाम गाडी (58)
11.हाल कैसा है जनाब का किशोर/आशा मजरूह एस.डि.बर्मन चलती का नाम गाडी
12.एक परदेसी मेरा दिल ले गया रफी/आशा कमर जलालाबादी ओ.पी.नय्यर फागुन (58)
13.चांदसा मुखडा क्यू शरमाया रफी/आशा शैलेंद्र एस.डि.बर्मन इन्सान जाग उठा (59)
14.मोहे पनघट पे नंदलाल लता शकिल नौशाद मोगल ए आझम (60)
15.प्यार किया तो लता शकिल नौशाद मोगल ए आझम
16.मुहोब्बत की झुठी कहानी पे लता शकिल नौशाद मोगल ए आझम
17.हमे काश तूमसे मुहोब्बत होती लता शकिल नौशाद मोगल ए आझम
18.जिंदगीभर नही भूलेगी  रफी/लता साहिर रोशन बरसात की रात (60)

गीताबाली 
19.सारी सारी रात तेरी याद लता फारूख कैसर रोशन अजी बस शुक्रिया (58)

मीनाकुमारी 
20.कैसे कोई जिये गीता इंदिवर तिमिर बरन बादबां (54)
21.ओ रात के मुसाफिर रफी/लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार मिस मेरी (57)
22.ये मर्द बडे बेदर्द लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार मिस मेरी
23.मेरी जा मेरी जा प्यार किसीसे लता शैलेंद्र शंकर जयकिशन यहूदी (58)
24.टिम टिम करते तारे लता रवी रवी चिराग कहा रोशनी कहा (59)
25.अजीब दास्तां है ये लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई (60)
26.मेरा दिल अब तेरा  लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
27.दिल अपना और प्रीत पराई लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
28.शीशा ए दिल इतना ना उछालो लता हसरत शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
29.दो सितारों का जमी पर रफी/लता शकिल नौशाद कोहिनूर (60)
30.ज्योती कलश झलके लता नरेंद्र शर्मा सुधीर फडके भाभी की चुडिया (61)
31.कभी तो मिलेगी लता मजरूह रोशन आरती (62)
32.आपने याद दिलाया  रफी/लता मजरूह रोशन आरती
33.रूक जा रात ठहर जा रे चंदा लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल एक मंदिर है (63)
34.दिल एक मंदिर है रफी/सुमन हसरत शंकर जयकिशन दिल एक मंदिर है
35.छू लेने दो नाजूक होठों को रफी साहिर रवी काजल (65)
36.दिल जो न कह सका लता मजरूह रोशन भिगी रात (65)

वैजयंती माला 
37.मन डोले मेरा तन लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन (54)
38.मेरा दिल ये पुकारे आजा लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन
39.जादूगर सैय्या लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन
40.मांग के साथ तूम्हारा रफी/आशा साहिर ओ.पी.नय्यर नया दौर (57)
41.आजा जरा मेरे हेमंत/गीता एस.एच.बिहारी हेमंतकुमार एक झलक (57)
42.बोल रे कठपुतली  लता शैलेंद्र शंकर जयकिशन कठपुतली (57)
43.बागड बम बागड बम लता हसरत शंकर जयकिशन कठपुतली (57)
44.आजा रे परदेसी लता शैलेंद्र सलिल चौधरी मधुमती (58)
45.ओ बिछूआ मन्ना/लता शैलेंद्र सलिल चौधरी मधुमती (58)
46.औरत ने जनम दिया  लता साहिर एन.दत्ता साधना (58)
47.कहो जी तूम क्या क्या लता साहिर एन.दत्ता साधना (58)
48.देख हमे आवाज न देना रफी/आशा राजेंद्रकृष्ण सी.रामचंद्र अमरदीप (58)
49.धुंडो धुंडो रे साजना लता शकिल नौशाद गंगा जमुना (61)
50.तूम रूठी रहो मै मनाता रहू मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन आस का पंछी (61)
51.बिखरा के जुल्फे चमन मे मुकेश/लता राजेंद्रकृष्ण रवी नजराना (61)
52.मै का करू राम मुझे लता हसरत शंकर जयकिशन संगम (64)
53.हम प्यार का सौदा  लता हसरत शंकर जयकिशन जिंदगी (64)
54.तेरे हुस्न की क्या रफी/लता शकिल नौशाद लिडर (64)
55.तितली उडी उड जो चली शारदा शैलेंद्र शंकर जयकिशन सुरज (66)

नुतन 
55.मन की बीन मतवाली बाजे रफी/लता शकिल नौशाद शबाब (54)
56.छोड दो आंचल किशोर/आशा मजरूह एस.डि.बर्मन पेईंग गेस्ट (57)
57.प्यार पर बस तो नही तलत/आशा  साहिर ओ.पी.नय्यर सोने की चिडीया (58)
58.वो चांद खिला मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन अनाडी (59)  
59.बन के पंछी गाये लता हसरत शंकर जयकिशन अनाडी (59)
60.बचपन के दिन भी गीता/आशा मजरूह एस.डि.बर्मन सुजाता (59)
61.तेरे घर के सामने रफी/लता हसरत एस.डि.बर्मन तेरे घर के सामने (63)
62.मोरा गोरा अंग  लता गुलजार एस.डि.बर्मन बंदिनी (63)
63.तूम्ही मेरे मंदिर लता राजेंद्रकृष्ण रवी खानदान (65)
64.नील गगन पर उडते बादल रफी/आशा राजेंद्रकृष्ण रवी खानदान (65)
65.दिल ने फिर याद किया मुकेश/रफी/सुमन जी.एस.रावेल सोनिक ओमी दिल ने फिर याद किया (66)

वहिदा  
66.जाने क्या तूने कही गीता साहिर एस.डि.बर्मन प्यासा (57)
67.चौदहवी का चांद हो रफी शकिल रवी चौदहवी का चांद (60)
68.तूम जो दिल के तार लता शैलेंद्र शंकर जयकिशन रूप की रानी चोरों का राजा (61)
69.कही दीप जले कही दिल लता शकिल हेमंतकुमार बीस साल बाद (62)
70.ना तूम हमे जानो हेमंत/सुमन मजरूह एस.डि.बर्मन बात एक रात की (62)
71.भंवरा बडा नादान है आशा शकिल हेमंतकुमार साहब बिबी और गुलाम (62)
72.इक दिल और सौ अफसाने लता हसरत शंकर जयकिशन एक दिल सौ अफसाने (63)
73.झूम झूम ढलती रात लता कैफी आझमी हेमंतकुमार कोहरा (64)
74.गाता रहे मेरा दिल किशोर/लता शैलेंद्र एस.डि.बर्मन गाईड (65)

माला सिन्हा 
75.तेरे प्यार का आसरा लता/महेंद्र साहिर एन.दत्ता धूल का फुल (59)
76.धडकने लगे दिल के आशा/महेंद्र साहिर एन.दत्ता धूल का फुल (59)
77.झुमता मौसम मस्त नजारा मन्ना/लता हसरत शंकर जयकिशन उजाला (59)
78.तस्वीर तेरी दिल मे रफी/लता मजरूह सलिल चौधरी माया (61)
79.बोल तेरे तकदिर मे क्या मुकेश/लता शैलेंद्र शंकर जयकिशन हरियाली और रास्ता (62)
80.इब्तदा ए इश्क मे हम मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन हरियाली और रास्ता
81.दिल तेरा दिवाना है रफी/लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल तेरा दिवाना (62)
82.आप की नजरों ने समझा लता रा.मेहदी अली मदनमोहन अनपढ (62)
83.है इसी मे प्यार की आबरू लता रा.मेहदी अली मदनमोहन अनपढ
84.दिल की तमन्ना थी मस्ती रफी/आशा मजरूह एन.दत्ता ग्यारा हजार लडकिया (62)
85.इन हवाओं मे आशा/महेंद्र साहिर रवी गुमराह (63)
86.एक तू ना मिला   लता इंदिवर  क.आनंदजी हिमालय की गोद मे (65)
87.ये आजकल के लडके उषा मजरूह लक्ष्मी प्यारे दिल्लगी (66)

आशा पारेख 
88.बडे है दिल के काले रफी/आशा मजरूह उषा खन्ना दिल दे के देखो
89.जिया हो जिया हो कुछ बोल  लता हसरत शंकर जयकिशन जब प्यार किसीसे होता है (61)
90.इतना ना मुझसे तू प्यार तलत/लता राजेंद्रकृष्ण सलिल चौधरी छाया (61)
91.जाईये आप कहा जायेंगे आशा मजरूह ओ.पी.नय्यर मेरे सनम (65)
92.ओ हसिना जुल्फोवाली रफी/आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल (66)
93.आजा आजा मै हू प्यार तेरा रफी/आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल 
94.ओ मेरे सोना रे सोना रे आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल
95.सायोनारा सायोनारा लता हसरत शंकर जयकिशन लव्ह इन टोकियो (66)
96.ये कली कब तलक फुल बनके लता/महेंद्र  आनंद बक्षी लक्ष्मी प्यारे आये दिन बहार के (66)

साधना 
97.ओ सजना बरखा बहार आयी लता शैलेंद्र सलिल चौधरी परख (60)
98.अभी ना जाओ छोड कर रफी/आशा साहिर जयदेव हमदोनो (61)  
99.आप युंही अगर मुझसे रफी/आशा रा.मेहदी अली ओ.पी.नय्यर एक मुसाफिर एक हसिना (62)
100.बहोत शुक्रिया बडी मेहरबानी रफी/आशा एस.एच.बिहारी ओ.पी.नय्यर एक मुसाफिर एक हसिना
101.तेरा मेरा प्यार अमर लता शैलेंद्र शंकर जयकिशन असली नकली (62)
102.आ जा आई बहार लता शैलेंद्र शंकर जशकिशन राजकुमार (64) 
103.नैना बरसे लता रा.मेहदी अली मदनमोहन वो कौन थी (64)
104.जो हमने दास्ता लता रा.मेहदी अली मदनमोहन वो कौन थी
105.मुझे कहते है कल्लू कवाल मुकेश/सुधा गुलशन बावरा क.आनंदजी दूल्हा दूल्हन (64)
106.मैने देखा है की फुलों से लदी आशा/महेंद्र साहिर रवी वक्त (65)
107.अजी रूठ कर अब लता हसरत शंकर जयकिशन आरजू (65)
108.झुमका गिरा रे आशा रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया (66)
109.तू जहां जहां चलेगा लता रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया
110.नैनोंवाली ने हाये दिल लूटा आशा रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया

Sunday 3 June 2018

राज-नर्गिसची दुर्लक्षीत युगल गीते


दै. उद्याचा मराठवाडा 3 जून 2018

मुकेश किंवा मन्ना डेचा आणि लताचा आवाज, शंकर जयकिशनचे संगीत, शैलेंद्र-हसरत यांची शब्दकळा हा साच्या राज-नर्गिस या जोडीच्या प्रणय गीतांसाठी अगदी पक्का बनून गेला आहे. रसिकांच्या मनातही हेच सगळं रसायन कायम आहे. पण या शिवायही या जोडीची काही सुंदर मधुर गाणी आहेत. राजकपुरची पुण्यतिथी (2 जून) आणि नर्गिसची जयंती (1 जून) या निमित्ताने त्यांच्या अशा दुर्मिळ गाण्यांना उजाळा

आर.के. बॅनरच्या बाहेर राज-नर्गिस जोडीचे दोन सिनेमे प्रचंड गाजले. एक होता 1949 चा ‘अंदाज’ आणि दुसरा 1956 चा ‘चोरी चोरी’. यातली गाणी गोड आहेतच. पण ही गाणी आजही ऐकली जातात. आणि चोरी चोरी तर आर.के. बॅनरचाच चित्रपट असल्याचा रसिकांचा पक्का गैरसमज आहे. तो दुर करण्याची गरजही नाही. 

पण आर.के.मधील सहा चित्रपट आणि बाहेरचे ‘अंदाज’ व ‘चोरी चोरी’ वगळता इतर चित्रपटात काही मधुर गाणी या जोडीवर चित्रित झाली आहेत.

यातला पहिला चित्रपट आहे ‘प्यार’ (1950). सचिन देव बर्मन यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं होतं. राजेंद्रकृष्ण सारखा गुणी गीतकार यात सचिनदांनी वापरला. जवळपास कधीच न ऐकू आलेला राज साठी किशोरचा आवाज यात आहे. किशोर-गीता यांच्या आवाजातील हे खट्याळ गाणं आहे, ‘एक हम और दुसरे तुम, तिसरा कोई कही’.  एकदम साधी शब्दकळा आहे. अजून पुढचा किशोर-गीताचा खट्याळ गाण्यांचा बहराचा काळ येण्यापूर्वीचे हे गाणे म्हणून जास्त महत्त्वाचे. हा मुड पूढे देवआनंदने जास्त वापरला. खरं तर राजकपुरसाठी किशोरचाही आवाज चांगलाच चालू शकला असता. पण त्याचा वापर करणारे संगीतकार तेंव्हा राज कपुरसोबत नव्हते. सुरवातीच्या काळात म्हणजे जवळपास 1960 पर्यंत स्वत:शिवाय देवआनंदचा अपवाद सोडल्यास आपला आवाज इतरांसाठी किशोरने फारसा दिला नाही. इतकंच काय तर खुद्द किशोरच्या 14 गाण्यांसाठी त्याचा स्वत:चा आवाज नाही.   

खेमचंद प्रकाशच्या संगीतात ‘जान पेहचान’ (1950) मध्ये गीता आणि तलच्या आवाजात एक सुंदर गाणं राज-नर्गिसवर आहे. राज-नर्गिस यांच्या प्रेमाचा हा अगदी बहराचा काळ. यात शकिलने एक अतिशय सुंदर ओळ लिहीली आहे. गीताच्या स्वरात नर्गिस विचारते आहे, 

‘क्यु प्यार की दुनिया मे न हो ‘राज’ हमारा’ 
आणि त्याला तलतच्या आवाजात राज उत्तर देतो, 
‘है दिल को तेरी ‘नर्गिसी’ आंखो का सहारा’. 

खरं तर या एका ओळीवर फिदा होवून राज कपुरने आर.के.साठी किमान एखादा तरी चित्रपट शकिलला द्यायला हवा होता. पण तसं काही घडलं नाही. शकिलने बहुतांश काम नौशाद सोबत केलं. तसंच इतर संगीतकारांमध्ये हेमंतकुमार, रवी आणि गुलाम मोहम्मद. पण हेही परत राज कपुर कँप मध्ये नव्हते.  

‘बावरे नैन’ या राजकपुरच्या चित्रपटाला रोशनचे संगीत होते. पुढे राज-नर्गिसच्या ‘अनहोनी’ (1952) ला पण रोशनचे संगीत लाभले. लता-तलत हे युगल गाण्यांतील सगळ्यात गोड मखमली स्वर जोडपं. आजही तलतच्याआवाजात लताचा आवाज मिसळत गेला की सोने पे सुहागा किंवा दुधात साखर असं काहीतरी वाटत रहातं. ‘अनहोनी’ मध्ये दोन गाणी रोशननी या आवाजात दिली आहेत. पहिलं आहे, ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ हे फोनवरचं गाणं आहे.  तेंव्हा फोनवर गाण्यांची एक फॅशनच होती (‘मेरे पिया गये रंगून’ हे असंच तेंव्हाचे गाजलेले ‘फोनगीत’). 

पण यातलं दुसरं गाणं जास्त गोड आहे. ते आहे, ‘समा के दिल मे हमारे जरा खयाल रहे’. शैलेंद्रचे नाजूक शब्द बर्‍याचदा शंकर जयकिशनच्या स्वर गोंगाटात बुजतात. सचिनदा, सलिल चौधरी आणि रोशन यांनी शैलेंद्रच्या शब्दांतील नाजुकपणाला जास्त चांगला न्याय दिला आहे. हे गाणं अशापैकीच एक. आत याच गाण्यातील ही शब्दकळा बघा

ये दिल का दर्द निगाहों की प्यास धोका है
जमी पे रेह के सितारों की आस धोका है
ये सब्जो बाग है सारे जरा खयाल रहे

ही पेलायला लता तलतचे हळवे सुर आणि रोशनचं संगीतच हवं. 

‘पाकिजा’ आणि ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटांमुळे रसिकांच्या कायम स्मरणात राहिलेला संगीतकार म्हणजे गुलाम मोहम्मद. राज-नर्गिसच्या ‘अंबर’ (1952) ला त्याचे संगीत लाभलं आहे. यात रफी-लताच्या आवाजात एक दोन नव्हे तर तीन युगल गीतं गुलाम मोहम्मदने दिली आहेत. यातलं सगळ्यात गोड गाणं म्हणजे, 

हम तूम ये बहार, देखो रंग लाया प्यार, 
बरसात के महिने मे
रिमझिम ये फुहार, दिल गाये रे मल्हार, 
एक आग लिए सिने मे

रफीची कमाल म्हणजे मुकेश/मन्नदाच्या आवाजात गाण्यार्‍या राजसाठी एक वेगळाच ठेवणीतला आवाज रफी काढतो. रफी लताची एकमेकांत मिसळून गेलेली अलापीही फार गोड आहे. ही संधी मुकेश-लताच्या आवाजात संगीतकारांना भेटत नाही. गुलाम मोहम्मद खरंच दुर्लक्षित राहिलेला गुणी संगीतकार. आजही त्याची अशी गाणी ऐकताना त्याची प्रतिभा जाणवत राहते.

मदनमोहन आणि राज-नर्गिस हा योग जूळून आला होता ‘धुन’ (1953) या चित्रपटात. यात राज कपुरसाठी मदनमोहनने हेमंतकुमारचा आवाज वापरला आहे. हेमंत-लता यांच्या आवाजातील हे गाणं आहे

‘हम प्यार करेंगे हम प्यार करेंगे
हम लडके झगड के भी प्यार करेंगे’

असे भरत व्यासांनी लिहीलेल्या गाण्याचे बोल आहेत. अगदी साध्या गुरूशर्ट पायजाम्यातला राजकपुर आणि साडीतली नर्गिस. सगळ्या गाण्यातच एक साधेपणा जाणवत राहतो.

फारच कमी चित्रपटांना संगीत दिलेला फारसा परिचित नसलेला संगीतकार म्हणजे एस.मोहिंदर. राज-नर्गिस यांच्या ‘पापी’ (1953) ला त्याचे संगीत आहे. या चित्रपटात राज कपुरचा डबल रोल आहे. सगळ्या चित्रपटात रफीचाच आवाज राज कपुरसाठी वापरला आहे. ‘ले ले गोरी’ हे अवखळ गाणं फार गाजलं यातलं. याच चित्रपटात रफी-आशाच्या युगल स्वरात राज नर्गिस साठी एक गाणं आहे, ‘मेरी जिंदगी है तू, मुझसे तेरी जुस्त जू’. आशा चा आवाज राज कपुरच्या चित्रपटांत फारच थोडा आलेला आहे. त्यापैकी हा एक चित्रपट.

या शिवाय राज नर्गिसचा आर के बाहेरचा ‘बेवफा’ (1952) हा पण एक चित्रपट आहे. याला ए.आर.कुरेशी (म्हणजे उस्ताद अल्लारखां, झाकिर हुसेन यांचे वडिल) यांचे संगीत आहे. पण यात एकही युगल गीत नाही. तलतचे एक फार गोड गाणे ‘दिल मतवाला लाख संभाला’ यातच आहे. पियानोवर बसलेला राज कपुर आणि पियानोवर झुकलेली नर्गिस अशी एक तेंव्हा चित्रपटांत आढळणारी नेहमीची चौकट या गाण्याच्या वेळेस आहे. पण हे काही युगल गीत नाही. 

केवळ गाण्यांचाच विचार केला तर राज-नर्गिसच्या गाण्यांना जास्तकरून शंकर जयकिशनचे संगीत तर आहेच पण त्यांची प्रतिमा तयार होण्यासाठी तेंव्हाचे प्रतिभावंत संगीतकार नौशाद, सचिनदेव बर्मन, रोशन, खेमचंद प्रकाश, सलिल चौधरी (‘जागते रहो’ साठी), मदनमोहन, गुलाम मोहम्मद यांनीही हातभार लावला आहे. लोकप्रिय जे आहे तेच जास्त करून समोर येत राहतं. पण त्यासाठी पार्श्वभूमी म्हणून इतरही बर्‍याच बाबी असतात.  यासाठी  ही इतर गाणी कामाला येतात.

     -आफताब परभनवी.

Tuesday 15 May 2018

तलतची ‘हिट’ गाणी


उद्याचा मराठवाडा मे 2018

माधव मोहोळकर यांनी आपल्या पुस्तकात तलतच्या गैरफिल्मी गझलची एक सुंदर आठवण सांगितली आहे. फैय्याजची ती गझल होती

होठों से गुलफिशां है वो, आंखो से अश्कबार हम
सावन से वो है बेखबर, बेगाना-ए-बहार हम

ही गझल हॉटेलमध्ये रेकॉर्डवरून ऐकू येत होती. एक तरूण पोरांचं टोळकं हॉटेल मध्ये शिरलं आणि मालकाला ‘ये क्या फालतू गाना लगाया  है? कोई फिल्मी गाना लगाओ!’ असं सुनावलं. हे ऐकून सिगरेट पीत बसलेला एक तलतच्या गाण्याचा आशिक उठला आणि त्या तरूण पोराच्या कानफाडीत लगावत बोलला, ‘खुदा ने जिसको दिल नही दिया, उसके लिए तलत नही है..’ (‘गीतयात्री, लेखक-माधव मोहोळकर, पृ. 70, मौज प्रकाशन)

खरंच ज्याला तलत समजून घ्यायचा त्याला कोमल हृदय असणं आवश्यकच आहे. तलतच्या आवाजातील थरथर ही प्रेमाची कोवळी भाषा, विरहाचे दु:ख व्यक्त करायला अगदी 100 टक्के योग्य होती. तलतची गाणी काही जणांनाच आवडतात पण सर्वांना नाही. तलत हा मोजक्या अभिजात लोकांचाच गायक होता. सर्वसामान्यांचा नाही. असा गैरसमज विनाकारण पसरवला जातो. तलतच्या गाण्यांचा शोध घेतला असता बॉक्स ऑफिसवर यश मिळवलेल्या चित्रपटांतील आणि बिनाकात गाजलेली अशी त्याची काही गाणी सापडतात त्यावरून त्याच्या ‘व्यवसायीक’ लोकप्रियतेची जरा कल्पना येवू शकते.

तलतचे सुरवातीच्या काळातील व्यवसायिक यश मिळवलेल्या ‘बाबुल’ (1950) चित्रपटातील गाणे ‘मिलतेही आंखे दिल हुआ दिवाना किसी का’ हे शमशाद सोबतचे आहे. तलतसोबत द्वंद्व गीत गायला लताचाच आवाज जास्त शोभून दिसला आहे. याच वर्षी ‘आरजू’ या दिलीपकुमारच्या चित्रपटात ‘ऐ दिल, मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो..’ हे सोलो गीत तलतला मिळालं आणि त्यानं त्याचे सोनं केलं. 

तलतच्या चित्रपटांना सर्वात जास्त व्यवसायिक यश लाभलं ते वर्ष म्हणजे 1952. या एकाच वर्षी पहिल्या दहा व्यवसायिक चित्रपटांपैकी ‘दाग’ (संगीत शंकर जयकिशन), ‘अनहोनी’ (संगीत रोशन), ‘संगदिल’ (सं. सज्जाद) आणि ‘बेवफा’ (सं. ए.आर कुरेशी) या चार चित्रपटांत तलतची गोड गाणी होती. 

राज कपुर बॅनरच्या सोबतच आधीपासून शंकर जयकिशननं बाहेरही बहरदार संगीत दिलं आहे. त्यातीलच एक होता ‘दाग’ (1952). दिलीपकुमारची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यात या गाण्याचा फार मोठा वाटा आहे. शैलेंद्रच्या लेखणीतून उतरलेलं हे सुंदर गाणं आहे ‘ऐ मेरे दिल कही और चल, गम की दुनिया से दिल भर गया’. शैलेंद्रचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शब्दरचना अतिशय साधी, प्रवाही, कमी अक्षरांच्या शब्दांची राहिलेली आहे. हे गाणं लताच्या आवाजातही आहे. पण तलतच्या आवाजाची मजा त्यात नाही.  दिलीप कुमारसाठी पुढे रफी मोठ्या प्रमाणात वापरला गेला. पण सुरवातील मुकेश आणि तलतने त्याच्या गीतांमध्ये अप्रतिम रंग भरले आहेत. याच चित्रपटात हसरतचे गाणेही फार गोड आहे. प्रेम विरहानं पोळलेल्या नायकासाठी ही गाणं ‘आयकॉनिक’ ठरलं आहे. ‘हम दर्द के मारों का इतनाही फसाना है, पीने को शराबे गम, दिल गम का निशाना है.’

राजकपुर-नर्गिस यांचा ‘अनहोनी’ याच वर्षी गाजलेला चित्रपट. त्याला रोशनचं संगीत आहे. राजकपुरसाठी फार थोड्या वेळा तलतचा आवाज वापरला गेला आहे. या चित्रपटासाठी चार गाणी तलतनं राजकपुरसाठी गायली आहेत. त्यातलं प्रेमाची भावना व्यक्त करणारं गोड गाणं आहे ‘मै दिल हू इक अरमान भरा, तू आके इसक पेहचान जरा’.  लतासोबतही तलतची ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ आणि ‘समा के दिल मे हमारे जरा खयाल रहे’  ही दोन  मधुर गाणी यात आहेत. ‘समा के दिल मे’ मध्ये लताचा कोवळा आवाज, तलतचा थरथरता आवाज आणि प्रेमाचे प्रतिक असलेली राज-नर्गिस ही जोडी हे सगळं अतिशय जमून आलेलं रसायन आहे. शंकर जयकिशन सोबतच रोशन सारख्या इतरही संगीतकारांनी राज-नर्गिस यांच्या जोडीला प्रेमाचे प्रतिक बनविण्यात मोठा हातभार लावला आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. 

अतिशय मोजकी (केवळ 16 चित्रपट) गाणी देणारा संगीतकार म्हणून सज्जाद परिचित आहे. त्याच्या ‘संगदिल’ मध्ये तलतची दोन गाणी उल्लेखनीय आहेत. पहिलं गाणं सोलो आहे, ‘ये हवा हे रात ये चांदनी, तेरी इक अदा पे निसार है’. अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि तरूणपणीचा दिलीपकुमार. दिलीपकुमारची प्रतिमा प्रेमाचा नायक अशी जरी झाली नाही तरी त्याची प्रेमाची अप्रतिम अशी गाणी आहेत. त्यातीलच हे एक. यातीलच दुसरं द्वंद्व गीत तलत आणि लताच्या आवाजात आहे. ‘दिल मे समा गये सजन, फुल खिले है चमन चमन’ हे गाणं ऐकताना मधुबालाच्या वेणीवरचा गजरा त्या काळच्या सगळ्याच तरूणींना आपल्याही केसांवर आहे असा भास झाला असणार. गॉगल आणि कोट घातलेल्या दिलीपकुमारमध्ये तेंव्हाचे तरूणही आपली प्रतिमा नक्कीच पाहत असणार. ही प्रेमाची गाणी खरंच अवीट आहेत. याच वर्षीच्या ‘बेवफा’ मध्ये तलतचा आवाज आहे. याला संगीत ए.आर.कुरेशी (तबला नवाज झाकिर हुसेन यांचे वडिल अल्लारखां) यांच आहे. पण गाणी तेवढी विशेष नाहीत.  

‘फुटपाथ’ (1953) हा अतिशय मोजके संगीत देणारे संगीतकार खय्याम यांचा पहिला गाजलेला सिनेमा. यातील दिलीपकुमारसाठीचे तलतचे गाणे आजही लोकप्रिय आहे. तेंव्हाच्या बिनाकातही दुसर्‍या क्रमांकावर गाजलेलं हे गाणं आहे ‘शाम-ए-गम की कसम, आज गमगीन है हम, आ भी जा आ भी जा आज मेरे सनम.’ खरं तर अशा दु:खी विरहाच्या आर्त गाण्यांनी दिलीपकुमारची प्रतिमा ‘ट्रॅजेडी किंग’ बनून गेली. ती शेवटपर्यंत त्याला पुसता आली नाही.  

याचवर्षी ‘शिकस्त’ (1953) हा शंकर जयकिशनच्या संगीतातील चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गाजला होता. दिलीपकुमार-नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित एक गाणं यात आहे- ‘जब जब फुल खिले’. शैलेंद्रने या गाण्यात एक ओळ अशी लिहीली आहे

‘मन को मैने लाख मनाया
पर अब तो है वो भी पराया
जख्म किये नासूर 
तेरी याद की मरहम ने
देख अकेला मुझे
जब घेर लिया गम ने

इतक्या सुंदर साध्या शब्दांत शैलेंद्र विरहाचे दु:ख मांडून जातो.

याच वर्षी ‘दिले नादान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर काही यश मिळालं नाही. पण यातील तलतचे गाणे बिनाकात मात्र गाजलं. शकिलच्या शब्दांतील हे गीत होतं, ‘जिंदगी देने वाले सुन’. ‘पाकिजा’, ‘मिर्झा गालिब’च्या संगीताने ओळखल्या जाणार्‍या गुलाम मोहम्मदचं संगीत या गाण्याला आहे. तलतची नायिका म्हणून यात श्यामानं काम केलं आहे. याच वर्षी ‘ठोकर’ हा शम्मी कपुर-श्यामा यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. यालाही बॉक्सऑफीसवर यश लाभलं नाही पण यातील तलतचं एक गाणं बिनाकात गाजलं. हे गाणं होतं ‘ए गमे दिल क्या करू, ए वेहशते दिल क्या करू’. या गाण्याचे बोल लिहीले होते मजाज लखनवी (गीतकार जावेद यांचा मामा) आणि संगीत होतं सरदार मलिक यांचं. मजाज यांनी अतिशय थोड्या कविता लिहील्या. त्यांच्या उत्कृष्ठ रचनांपैकी ही एक. हे गाणं म्हणजे चित्रपटासाठी लिहीलेलं गीत नसून मजाजच्या ‘अवारा’ या सुंदर कवितेतील दोन कडवी आहेत. ‘प्यासा’ मध्ये मुशायर्‍याचा जो सुंदर प्रसंग आहे त्यात साहिर शिवाय ज्यांची रचना वापरली गेली आहे तो शायर म्हणजे मजाज. मुशायर्‍याच्या त्या दृष्यानंतर ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ हे गाणं सुरू होतं. 

चिरतरूण प्रेमाचे पडद्यावरचे प्रतिक म्हणजे देवआनंद. देवआनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1954) मध्ये किशोर-रफीच्या आवाजात खुलणार्‍या देवआनंदसाठी सचिनदेव बर्मन यांना वेदना प्रकट करायला तलतच्याच आवाजाचा सहारा घ्यावा लागला. साहिरच्या शब्दकळेनं नटलेलं हे सुंदर गाणं आहे ‘जाये तो जाये कहां, समझेगा कौन यहां, दर्द भरे दिल की जुबां’. 

गालिबचे मोठेपण सगळ्यांनाच मान्य आहे पण त्याच्या गझलांना पडद्यावर चाली देवून साकार करण्याची हिंमत मात्र फारच थोड्या संगीतकारांनी केली. गुलाम मोहम्मदने हे ‘गालिब’धनुष्य बॉक्सऑफिस हिट ‘मिर्झा गालिब’ (1954) उचललं आणि यशस्वी करून दाखवलं. हा चित्रपट होता सुरैय्या-भारतभुषण यांचा. यात सुरैय्या सोबत तलतनं गालिबची अजरामर गझल ‘दिले नादान तूझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दुवा क्या है’ गायली आहे. 

बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत पण तलतच्या गाण्यांनी बिनाकात धुम केली असे तीन चित्रपट याच वर्षी पडद्यावर आले. 
1.‘कवी’- मै पीके नही आया-संगीत सी.रामचंद्र, 
2.‘सुबह का तारा’ होता- गया अंधेरा हुआ उजारा- संगीत सी.रामचंद्र, 
3.‘वारीस’- राही मतवाले तू छेड एक बार तलत/सुरैय्या- संगीत अनिल विश्वास
चित्रपटाचे यश बाजूला पण तलतचे चाहते  त्याच्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकायचे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. 

दिलीपकुमार-देवआनंद-बिना रॉय यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘इन्सानियत’ (1955). सी.रामचंद्र यांच्या अवीट संगीताने नटलेल्या या चित्रपटात लता-तलतचे एक सुंदर प्रेमगीत आहे ‘आयी झुमती बहार, लायी दिल का करार, देखो प्यार हो गया’. गुरूशर्टमधला मिशावाला देवआनंद आणि पुढे वेणी घेतलेली साडितील बिना रॉय एक वेगळीच खुमारी या गाण्याला प्राप्त करून देतात. राजेंद्रकृष्ण-सी रामचंद्र ही एक यशस्वी गीतकार-संगीतकार जोडी. त्यांच्या गाजलेल्या लोकप्रिय रचनांपैकी ही एक. 

तलतचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतकार कुणीही असो तो आपली वेगळी छाप त्या गाण्यावर सोडून जातो. शौकत देहलवी नाशाद हा तसा फारसा परिचित संगीतकार नाही. पण त्याच्या ‘बारादरी’तल्या तलतच्या गाण्यांनं आजही लोकप्रियता सांभाळली आहे. हे तलतचे गाणे आहे, ‘तस्वीर बनाता हू, तस्वीर नही बनती’. 

‘मौसी’ (1958) या वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात तलत-लताचे ‘टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ हे अजरामर गीत आहे. बिनाकात या गाण्याला रसिकांनी पसंती दिली. भरत व्यास सारखा गुणी गीतकार या गाण्याला लाभला. ‘झनक झनक पायल बाजे’ किंवा ‘नवरंग’ सारख्या चित्रपटांतील व्यासांच्या शब्दकळेला रसिक अजूनही दाद देतात. स्वत: तलतनेच नायक म्हणून काम केलेला एक चित्रपट यावर्षी पडद्यावर झळकला ‘सोने की चिडिया’. यातील साहिरच्या नाजूक शब्दकळेचं गाणं होतं ‘प्यार पर बस तो नही है’. संगीतकार ओ.पी.नय्यर असल्याने तलत सोबत लता असण्याचा प्रश्‍नच नव्हता. लताची जागा आशा ने तेवढ्याच तोलामोलाने केवळ आलापीने भरून काढली आहे. खरं तर हे गाणं ऐकल्यावर परत परत असं वाटतं की तलत-आशा या जोडीला घेवून ओ.पी.नय्यरसारख्यांनी अजून छान गाणी का नाही दिली. 

‘सुजाता’ (1959) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश लाभलंच शिवाय तलतचे गाणे त्याच्या चाहत्यांनी बिनाकात डोक्यावर घेतलं. सुनील दत्त-नुतन वर चित्रित हे गाणं होतं, ‘जलते है जिसके लिऐ, तेरी आंखो के दिये’. तलतची अशी काही गाणी आहेत की त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाचा आवाजही आपण कल्पु शकत नाही. त्यातील हे एक अप्रतिम गाणं. एक दु:खी आर्त उदास वेदना उदबत्ती सारखी त्याच्या आवाजात जळत असते. असं म्हणतात ना ‘ना बुझती है ना जलके धुवां होती है’ तशी काहीतरी भावना तलतच्या आवाजात आहे. 

हे गाणं म्हणजे तलतच्या व्यवसायिक यशस्वी गाण्यांची भैरवीच आहे. पुढे त्याचा कुठलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. न बिनाकात त्याची गाणी गाजली. ‘हकिकत’ (1964) मध्ये ‘हो के मजबूर’ या गाण्यात  रफी-मन्ना-भुपेंद्र यांच्या सोबत त्याचा आवाज एका कडव्यात आहे इतकंच. बाकी त्याच्या वाट्याला काही आलं नाही.

हेमंतकुमार यांच्या निधनानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीले होते ‘शोर और सूर मे येही फर्क होता है, शोर खात्म होता है और सुर खो जाता है. हेमंतकुमार खो गये.’ या प्रमाणेच तलतच्याही बाबतीत असंच म्हणावं लागेल ‘तलत खो गये’.. तलतच्या पुण्यतिथी निमित्त (९ मे)  त्याला विनम्र अभिवादन !    

   -आफताब परभनवी.