Friday 31 March 2017

खुश है जमाना आज पेहली तारीख



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 1 एप्रिल 2017

आज 53 वर्षे होत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘खुश है जमाना आज पेहली तारीख’ हे गाणं रेडिओवर वाजतं आहे. असं भाग्य एखाद्याच गाण्याला लाभतं.  या चित्रपटाचे नावच ‘पेहली तारीख’(1954)  असं आहे. किशोर कुमार याचा नायक आणि गायक  आहे. गाण्यात तसं काव्याच्या दृष्टीनं काहीच नाही. कमर जलालाबादी यांनी किशोर कुमारला डोळ्यासमोर ठेवूनच शब्द रचले आहेत. गीताची मजेशीर चालही सुधीर फडके यांनी तशीच बांधली आहे. यातील बाकी लता रफी यांच्या आवाजातील गाणी फारशी गाजली नाहीत. 

या गाण्याला लोकप्रियता नंतर मिळत गेली पण त्या वर्षीच्या बिनाकात मात्र हे गाणं नाही. त्याला तसं कारणही आहे. 1954 हे वर्षे जबरदस्त स्पर्धेचं वर्ष होतं. हेमंतकुमार (नागिन- सगळीच गाणी हिट, शर्त- न ये चांद होगा न तारे रहेगे) सी. रामचंद्र (नास्तिक- देख तेरे संसार की हालत, सुबह का तारा- गया अंधेरा हुआ उजाला), एस.डि.बर्मन (टॅक्सी ड्रायव्हर- जाये तो जाये कहां), गुलाम मोहम्मद (मिर्झा गालिब-दिल ए नादान तुझे हुआ क्या है), ओ.पी.नय्यर (आरपार- सगळीच गाणी हिट), शंकर जयकिशन (बुट पॉलिश- नन्हे मुन्ने बच्चे तेरी), नौशाद (अमर- न मिलता गम तो बरबादी, इन्साफ का मंदिर है) असल्या स्पर्धेत हे गाणं बिनाकात टिकलं नाही. 

बिनाकात टिकलं नाही पण एक तारखेच्या पगाराच्या मानसिकतेमुळे या गाण्याची लोकप्रियता टिकून राहिली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतात शहरीकरणाचा जोर वाढत गेला.  गावगाडा सोडून लोक छोट्या मोठ्या शहरांकडे नौकरीसाठी धाव घेत होते. हे नौकरदार लोकच चित्रपटांचं मोठं ग्राहक होते. याच लोकांकडे तेंव्हा रेडिओ असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे एक तारीख म्हणजे काही फार मोठा दिवस. कारण या दिवशी महिनाभराच्या कामाचा पगार मिळणार. मग स्वाभाविकच अशा गाण्यांना उठाव मिळाला. 

हेच गाणं नव्हे तर अशा प्रकारच्या नौकरदारी मानसिकतेला ग्राहक म्हणून मोठी किंमत भारतीय बाजारपेठेत मिळायला सुरवात झाली. पार अगदी 1991 च्या जागतिकीकरण पर्वापर्यंत ही मानसिकता कायम होती. ‘मॉं मै बी.ए. पास हुआ हु’, ‘मॉं मुझे नौकरी मिल गयी’, ‘मॉं आज मेरी तनखा हो गयी’.. वगैरे वगैरे संवाद लोकप्रिय व्हायचा हाच तो काळ.

1954 लाच किशोर कुमारचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नावच होतं ‘नौकरी’. या अख्ख्या चित्रपटात ही मानसिकता बिमल रॉय यांनी मोठ्या सुरेख पद्धतीनं रेखाटली आहे. गावात म्हातारी आई, आजारी बहिण यांना ठेवून नौकरीच्या शोधात कलत्त्यात आलेला किशोर कुमार. त्याचा नौकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष. शीला रमाणीसोबतचे त्याचे प्रेम. याच चित्रपटातील एक गाणं तेंव्हा बिनाकात हिट झालं होतं.

‘छोटा सा घर होगा जी बादलों की छाव मे, 
आशा दिवानी मन मे बांसुरी बजाये.
हम ही हम चमकेंगे तारों की उस गांव मे
आंखों की रोशनी हरदम ये समझाये’

शैलेंद्र चे शब्द आणि सलिल चौधरी यांचं संगीत. शंकर जयकिशननंतर शैलेंद्र यांचे सूर खर्‍या अर्थाने जूळले ते दोनच संगीतकारांसोबत एस.डी.बर्मन आणि सलिल चौधरी. आता या गाण्यात 

‘चांदी की कुर्सी पे बैठे मेरी छोटी बहना, 
सोने के सिंहासन पे बैठे मेरी प्यारी मां’ 

या कडव्याच्या ओळी नंतर ध्रृवपदाशी जुळणारी जी ओळ येते, ‘मेरा क्या मै पडा रहूंगा अम्मी जी के पांव मे’ ही अतिशय सहज आणि गोडव्यात बुडालेली आहे. हे शैलेंद्रचे वैशिष्ट्य.

शैलेंद्रने आपल्या गाण्यांमधूनही ही मध्यमवर्गीय नौकरदाराची मानसिकता बरोबर टिपली आहे. किशोर कुमारच्या आवाजात एक गाणं या चित्रपटात आहे. 

‘एक छोटीसी नौकरी का तलबगार हू मै, 
तुमसे और कुछ मांगू तो गुनहगार हू मै’ 

आता या शब्दांच्या पलिकडे अजून काय सांगणार. तेंव्हाच्या नौकर्‍या ह्या बहुतांश कारकुनांच्याच होत्या. व.पु.काळे सारख्या लेखकांनी याच मानसिकतेवर सतत लिखाण केलं आहे. शैलेंद्रने या गाण्यात ‘मै कल कलेक्टर ना बनू और ना बनूंगा अफसर, अपना बाबू ही बना लो बेकार हू मै.’
याच चित्रपटात नौकरीसाठी अर्ज करतानाचं पण एक गाणं आहे 

‘अर्जी हमारी, ये मर्जी हमारी, 
जो सोचे बिना ठुकराओगो, 
तो देखो बडे पछताओगे’ 

त्यासाठी टाईप राईटरचा आवाज  मोठा सुरेख वापरून घेतला आहे. गाणं खास किशोर कुमार स्टाईलचं आहे. या गाण्याचा अजून एक कलात्मक वापर बिमल रॉय यांनी करून घेतला आहे. किशोर कुमार आपल्या खोलीच्या खिडकीत उभं राहून हे गाणं म्हणतो आहे. आणि पलिकडच्या खिडकित शिला रमाणी त्याची प्रेयसी पुस्तक वाचत उभी आहे. तेंव्हा ही अर्जी केवळ नौकरी साठी नसून प्रेमासाठीही आहे. मधूनच किशोर कुमार आपल्या मनाने ‘सुना है तुम्हारे यहा जगा खाली है’ असं वाक्य वापरतो. आता हे वाक्य शीला रमाणीच्या हृदयालाही लागू पडते. 

असाचा कलात्मक वापर देवआनंद वहिदाच्या गाण्यात ‘अपनी तो हर आह इक तुफान आहे’ मध्ये करण्यात आला आहे (कालाबाजार-1960). देव आनंद जेंव्हा ‘उपरवाला जान कर हैरान है’ म्हणतो तेंव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या वहिदा कडे त्याचा इशारा असतो. आणि दुसर्‍या अर्थाने उपरवाला म्हणजे देवाकडेही इशारा आहे. 

‘खुश है जमाना आज पहेली तारीख’ हे गाणं आणि ‘नौकरी’ चित्रपटातील तीन गाणी असं मिळून एक नौकरदारांची मानसिकता स्पष्टपणे समोर येते. ‘पेहली’ तारीख पेक्षाही ‘नौकरी’ मध्ये बिमल रॉय सारखा दिग्दर्शक असल्यामुळे असेल कदाचित बेकारांचा प्रश्‍न जास्त ठळकपणे समोर येतो. आणि त्याला कलात्मक रूपही प्राप्त होते.

एक एप्रिलशी अजून एका गाण्याची आठवण निगडीत आहे. 1964 मध्ये विश्वजीत, सायरा बानू यांचा ‘एप्रिल फुल’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात याच नावाचे रफीचे गाणे आहे, ‘एप्रिल फुल बनाया, उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया.’ हसरत सारख्या प्रतिभावंतांनी असं लिहायला सुरवात केली तेंव्हा पुढे गाण्याचा दर्जाच ढासळत गेला हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. याच चित्रपटातील रफीचं दुसरं गाणं ‘आ लग जा गले दिलरूबा’ थोडं तरी सुसह्य आहे. हा दोष खरं तर शंकर जयकिशन सारख्या संगीतकारांकडेही जातो. एखादा कारखाना असावा तसं यांनी ‘प्रॉडक्शन’ सुरू केलं होतं. 1960 नंतर तर अशी परिस्थिती होती की नायक नायिका दिग्दर्शक कुणीही असो, शंकर जयकिशनची गाणी म्हणजे चित्रपट बॉक्सऑफिसवर गल्ला गोळा करणार याची खात्री असायची. परिणाम एकूणच गाण्यांचा दर्जा घसरत गेला.

नौकरी मधील ‘छोटासा घर होगा’ ची आठवण पुढे घरोंदा (1977) मधील गाण्यानं परत ताजी झाली. ‘इक अकेला इस शहर मे’ या गाण्यानं मुंबईमधील घराच्या समस्येला कलात्मक तोंड फोडले. पण हे गाणं मुंबई पुरतं मर्यादित वाटते. ज्या प्रमाणे ‘छोटासा घर होगा’ असो की ‘खुश है जमाना आज पहेली तारीख’ ही गाणी भारतभरच्या छोट्या मोठ्या शहरांतील नौकरदरांची वाटतात तसं हे वाटत नाही.

-आफताब परभनवी. 

Friday 24 March 2017

पौराणिकतेचा शिक्का बसलेला गुणी संगीतकार एस.एन.त्रिपाठी



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 25 मार्च 2017

गीता दत्तचा अगदी सुरवातीचा कोवळा आवाज. तरूणपणीची देखणी मीनाकुमारी. गीताचे बोल आहेत 
‘मेने नैनों  मे प्रीत, मेरे होठों पे गीत, 
मेरे सपनों मे तुम हो समाये 
आज मन की कली फुल बनके खिली
चांदनी जैसे चंदासे हसकर मिली
बजी मुरली मोहन लगी मन मे लगन
मेरी आशा ने दीप जलाऐ’

गाण्याची चाल अतिशय मधुर. पण सगळा घोटाळा होतो तो चित्रपटाचे नाव ऐकले की. चित्रपटाचे नाव आहे ‘श्री गणेश महिमा’ (1950). बस्स मग पुढचे काहीच ऐकून न घेता रसिक पाठ फिरवतो. एस.एन.त्रिपाठी सारख्या गुणी संगीतकाराचे हे दुर्दैव. पौराणिक चित्रपटाचा शिक्का एस.एन.त्रिपाठी यांच्यावर एकदाचा पडला आणि त्यांची प्रतिभा काहीशी उपेक्षिल्या गेली.

वाराणसीत 14 मार्च 1913 ला जन्मलेल्या श्रीनाथ त्रिपाठी यांचे नशिब पौराणिक चित्रपटांशी असे काही जोडल्या गेले की त्यांना प्रचंड काम मिळाले पण सोबतच मुख्य धारेतल्या संगीतापासून ते दूर फेकल्या गेले. पंच्याहत्तर वर्षे जगलेल्या त्रिपाठींनी जवळपास तेवढ्याच चित्रपटांना (79) संगीत दिले. फक्त संगीत दिले इतकेच नाही तर 27 चित्रपटांमधून अभिनय केला, 18 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यामुळेही असावे कदाचित त्रिपाठी यांची संगीतकार म्हणून प्रतिमा रसिकांच्या मनात ठसली नाही. 
पण त्रिपाठी यांच्यातील संगीतगुणांची एका मोठ्या व्यक्तीने खुलेपणाने तारीफ करून त्यांच्यावरील हा अन्याय दूर करण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. महान संगीतकार गायक उस्ताद अमीर खांन यांनी हिंदी चित्रपट संगीतातील केवळ चारच संगीतकारांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यानी नौशाद आणि वसंत देसाई यांची नावं घेणं स्वाभाविकच होतं. कारण यांना शास्त्रीय संगीताची बारीक जाण होती. एका मर्यादेपर्यंत सी.रामचंद्र यांनाही त्यांनी गौरविलं. पण चौथं नाव त्यांनी एस.एन.त्रिपाठी यांचं घेतलं. ही बाब त्रिपाठींसाठी निश्‍चितच समाधान देणारी होती. 

त्रिपाठी यांच्या संगेताचा विचार करताना चार महत्वाच्या चित्रपटांमधील गाण्याचा विचार करावा लागेल  
1941 पासून संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या त्रिपाठी यांना व्यावसायिक यश आणि लोकप्रियता मिळायला तब्बल 16 वर्षे लागली. ‘जनम जनम के फेरे’ (1957) या चित्रपटात रफी आणि लताच्या गोड आवाजात ‘जरा सामने तो आवो छलिये, छुप छुपके चलने मे क्या राज है, ये छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है’ हे गाणं झळकलं. आणि बघता बघता त्याला लोकांनी उचलून धरलं. बिनाकात हे गाणं त्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आलं. या चित्रपटातील इतरही गाणी मधुर होती. मन्ना डेच्या आवाजात ‘तन के तंबोरे मे सासों की तार बोले जय राधेश्याम’ हे गाणं जे की पुढे अनुप जलोटानेही गायले याच चित्रपटात आहे. या भजनाची चालही गोड आहे. 

दूसरा चित्रपट ज्याने त्रिपाठींना यश मिळवून दिले तो म्हणजे ‘रानी रूपमती’ (1959). यातील मुकेशचे ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है’ बिनाकात सहाव्या क्रमांकावर होते. रानी रूपमती च्या निमित्ताने अजून एक गोष्ट घडली. बॉक्सऑफिसवर हिट ठरलेला त्रिपाठींचा हा पहिलाच चित्रपट. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शनही  त्यांचेच होते. हे यशच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीतील अडथळा बनले. कारण पुढे त्यांना दिग्दर्शनासाठी भरमसाठ पौराणिक चित्रपट मिळत गेले. परिणामी संगीतावर परिणाम झालाच. 

‘रानी रूपमती’ मधील एक निसर्ग गीत अगदी अप्रतिम आहे. ‘फुल बगिया मे बुलबुल बोले, डालपे बोले कोयलिया, प्यार करो रूत प्यार की आयी, भवरें से कहती है कलिया’ या भरत व्यासांच्या शब्दांना लता-रफीच्या आवाजाने अजूनच रंग चढला आहे. 

तिसरा चित्रपट ज्याला व्यावसायिक यश मिळालं तो म्हणजे ‘संगीत सम्राट तानसेन’ (1962). यातील मुकेशचे गाणं ‘झुमती चली हवा, याद आ गया कोई’  विशेष गाजलं. या सगळ्या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा अप्रतिम असा स्पर्श त्रिपाठी यांनी दिला होता. अर्थात ती विषयाची गरज होतीच. ‘झुमती चली हवा’ राग सोहनी वर बेतलेलं होतं. त्रिपाठी यांची ताकद म्हणजे 1960 ला प्रदर्शित झालेल्या ‘मोगल-ए-आझम’ मध्ये सोहनीचीच बंदिश ‘प्रेम जोगन बन के’ उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्या आवाजात नौशाद यांनी वापरली होती. प्रेमासाठी वापरलेला हा राग मुकेशच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्यासाठी त्रिपाठी यांनी वापरला. रागदारीचा कल्पक वापर त्रिपाठी यांनी केला आणि त्याला रसिकांनीही प्रतिसाद दिला.

त्रिपाठी यांचा अजून एक चित्रपट विशेष उल्लेख करावा असा आहे. पौराणिकतेचा शिक्का असतानाही त्यांनी लाल किला (1961) नावाचा चित्रपट केला. त्यातील बहादूरशहा जफरची प्रसिद्ध रचना ‘न किसी की आंख का नूर हू’ रफी कडून गावून घेतली. यात वाद्यांचा वापर जवळपास नाहीच. ही नज्म आहे. पण बर्‍याच ठिकाणी चुकून गझल असाच उल्लेख केला जातो.  याच चित्रपटात बहादूरशहा जफर ची दुसरी रचना ‘लगता नही दिल मेरा उजडे दयार मे’ रफीच्याच आवाजात आहे. ही जफरची सुंदर गझल आहे. 

लगता नही दिल मेरा उजडे दयार मे
किसी की बनी है आलम-ए-ना-पायेदार मे

कह दो इन हसरतों से कही और जा बसे
इतनी जगह कहां है दिल-ए-दागदार मे  

याच गझलेत तो सुप्रसिद्ध शेर आहे ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो.

उम्रे दाराज से मांग के लाये थे चार दिन
दो आरजू मे कट गये दो इंतजार मे

(याच ओळींवर पुढे प्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे यांनी कविता लिहीली होती ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले, हिशोब करतोय किती राहिलेत डोईवरती उन्हाळे’.)

जफरला ब्रह्मदेशात नजरकैदेत ठेवले गेले होते. परिणामी त्याला माहित होतं की तो आता परत हिंदुस्थानात येऊ शकत नाही. तेंव्हा जफरने लिहीलं होतं
कितना है बदनसीब जफर दफन के लिए
दो गज जमि भी न मिली कु-ए-यार मे

त्रिपाठी यांची इतर गाणी आज फारशी ऐकायला मिळत नाहीत. मराठी रसिकांसाठी त्रिपाठी यांच्याबाबतचा एक छोटा संदर्भ. काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेल्या मराठी गायिका कृष्णा कल्ले यांचं एक गीत ‘तूने मुस्कुराके देखा’ हे ‘शंकर खान’ (1966) चित्रपटात रफीसोबत त्यांनी दिलं आहे. पण ते फार विशेष नाही.

28 मार्च 1988 ला त्रिपाठी यांचं निधन झालं. पंच्याहत्तर वर्षांचा आयुष्य त्यांना लाभलं. ‘मी माझ्या कैफात नांदतो ऐश्‍वर्याचा राजा’ असं त्यांनी आपल्या पौराणिक चित्रपटाच्या क्षेत्रात धुंदीत आयुष्य घालवलं. आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचा कधी फारसा उल्लेख केला नाही. हे त्यांच्या मनाचं मोठेपणच म्हणावं लागेल.     

           -आफताब परभनवी.

Saturday 18 March 2017

साहिर-चोप्रा-रवी एक मधुर त्रिवेणी



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 18 मार्च 2017

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुककिन
उसे इक खुपसूरत मोड देकर छोडना अच्छा...

हा अतिशय गाजलेला शेर. साहिरची यावर मुद्रा उमटलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या काव्य प्रतिभेमुळे साहिर हिंदी गीतात उठून दिसतोच. त्यातील कवी गीतकाराला मागे टाकून पुढे निघून जातो (हेच शैलेंद्रच्या बाबत उलटं आहे). पण या गाण्याशी अजून दोन नावं जूळलेली आहेत. एक आहे संगीतकार रवी आणि दुसरं नाव म्हणजे निर्माते दिग्दर्शक बी.आर.चोप्रा. त्यांनी सुरवातीच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांत गीतकार म्हणून साहिरलाच घेतलं. साहिरच्या मृत्यूनंतरच ही संगत तुटली. संगीतकार बदलले पण गीतकार नाही. यावरील एक किस्सा माधव मोहोळकरांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकात लिहून ठेवलाय. चोप्रांना वाटलं आपण संगीतकार शंकर जयकिशनला एखाद्या चित्रपटात संगीतासाठी बोलावावं. तशी बोलणीही झाली. पण गाडी अडून बसली गीतकारावर. चोप्रा साहिरसाठी आग्रही तर शंकर जयकिशन शैलेंद्र-हसरतला सोडायला तयार नाही. शेवटी शंकर जयकिशनने चित्रपट सोडला. आणि चोप्रांनीही दुसरे संगीतकार निवडला. इतकं त्यांचं साहिरवर प्रेम होतं.

साहिरला आपल्या प्रतिभेबद्दल रास्त अभिमान होता. गायक संगीतकारांपेक्षाही तो स्वत:ला श्रेष्ठ समजायचा. परिणामी गुरूदत्तचा अतिशय गाजलेला ‘प्यासा’ (संगीत एस.डी.बर्मन) असो की बी.आर.चोप्रांचाच ‘नया दौर’ (संगीतकार ओ.पी.नय्यर) त्या संगीतकारांशी त्याचं परत कधीच जमलं नाही. 

शिवाय चोप्रांच्याही भलत्याच अटी. लता मंगेशकर, मोहम्मद रफीला जास्त महत्व देण्यास चोप्रा तयार नसायचे. पण रवीनं मात्र जूळवून घेतलं. या त्रिकुटानं (साहिर-रवी-चोप्रा) गुमराह (1963), वक्त (1965), हमराज (1967), आदमी और इन्सान (1970) आणि धुंद (1973) असे  तब्बल 5 चित्रपट दिले.

योगायोगानं या तिघांचे जन्मदिवस जवळपासचेच (साहिर- 8 मार्च, रवी- 3 मार्च, चोप्रा 22 एप्रिल). शिवाय रवीचा स्मृतीदिनही याच महिन्यातला (7 मार्च).

यातील पहिल्या तीन चित्रपटांचाच विचार करता येवू शकतो. कारण पुढे आहे तेच वळण तोच साचा रवीने गिरवला. नवीन काही निर्माण झाले नाही. 

‘गुमराही’, ‘वक्त’ आणि ‘हमराज’ या तिनही चित्रपटांत अजून एक बाब समान होती. आणि ती म्हणजे अभिनेता सुनील दत्त. महेंद्र कपुरचा आवाज त्याला असा काही चिकटला की याशिवाय त्याचा विचारच करता येवू नये. मराठी रसिकांची एक मोठी अडचण म्हणहे महेंद्र कपुर म्हटला की दादा कोंडके आणि ‘वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं’ हेच आमच्या कानात बसलं आहे. तेंव्हा स्वाभाविकच महेंद्रकपुरचा आवाज ऐकताना मन मोकळं स्वच्छ राहत नाही. 

‘गुमराह’ मधील ‘चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ या गाण्यानं या त्रिकुटाची किंवा अजूनच म्हणायचे तर सुनील दत्त व महेंद्र कपुर सगट विचार केला तर पंचतत्वाची मुहूर्तमेढ रोवली. गाणं फिल्मफेअर पुरस्कार विजेतं ठरलं. बिनाकातही हिट ठरलं. पण तरी जाणवत राहतं की यात साहिरचं श्रेय जास्त आहे. ओ.पी.नय्यर, एस.डी.बर्मन, रोशन अगदी मदनमोहन (कमी गाणी असली तरी) यांचं संगीत आणि साहिरचे शब्द तुल्यबळ वाटतात तसं रवीच्या बाबतीत घडत नाही. साहिरचाच वरचष्मा जाणवत राहतो. शिवाय महेंद्र कपुरचा आवाज. त्याला प्रचंड मर्यादा आहेत. रफीला डोळ्या समोर ठेवूनच चाली रचल्या गेल्या. आणि मग जेंव्हा रफी नको/ उपलब्ध नाही तेंव्हा महेंद्र कपुर वापरला गेला. 

याच वर्षी रोशनच्या संगीतानं नटलेलं ‘ताजमहाल’ हा चित्रपट आला. यातही साहिरचीच गीतं आहे. रफी लताचं ‘जो वादा किया वो’ किंवा ‘पाव छूने दो’ असा किंवा एकट्या लताचं ‘जुर्म उल्फतपे हमे लोग सजा देते है’ असो याला टक्कर देत रवीची गाणी बिनाकात टिकली. या शिवाय गुमराह मधील ‘इन हवाओ मे इन फिजाओं मे’ हे गाणंही बीनाकात हिट होतं. ‘आप आये तो खयाले दिले नाशाद आया’ हे महेंद्र कपुरचे गाणे आजही ऐकावेसे वाटते.

दुसरा चित्रपट होता ‘वक्त’. या चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं आहे. मल्टीस्टार असा हा पहिलाच चित्रपट म्हणून सतत सांगितलं/लिहिलं गेलं आहे. पण याच्या गाण्यांवर स्वतंत्र काही कुणी लिहिलं नाही. संगीतकार रवीवर मात करणारा गीतकार साहिर याचा सगळ्यात मोठा पुरावा याच चित्रपटात आहे. यात निव्वळ एक कविता किमान वाद्यांचा (जवळपास नाहीच) वापर करत महेंद्र कपुर-आशा भोसलेच्या आवाजात गाणं म्हणून समोर आली आहे. विशेष म्हणजे बीनाकाच्या त्या वर्षीच्या हिट गाण्यात हे आहे.

मैने देखा है फुलों से लदी शाखो मे
तूम लचकती हुई मेरे करीब आयी हो 
जैसे मुद्दते यु ही साथ रहा हो अपना
जैसे अबकी नही सदियों की शनासाई हो
(नेटवर चुकून शनासाई हा शब्द शहनाई पडला आहे. आता कुठे शहनाई आणि कुठे शनासाई. शनासाई म्हणजे परिचित. पण इतका बारकावा शोधत बसायला कुणाला वेळ आहे.)

साहिरच्या या शब्दांना रवीने जशाला तसेच ठेवले आहे. चाल देण्याचा कुठलाच प्रयत्न केला नाही. आशा भोसलेच्या आवाजातील पुढच्या ओळी तर अजूनच काव्यात्मक आहेत.

मैने देखा है के गाते हुये झरनों के करीब
अपनी बेताब-ए-जजबात कही है तूमने
कांपते होठों पे रूकती हुई आवाज के साथ
जो मेरे दिल मे थी वो बात कही है तूमने
हे गाणं ऐकलं की सहजच लक्षात येतं की रसिकांनी पसंती दिली आहे ती पहिले काव्यालाच.  
वक्तमधील इतर गाणी तर सुंदर आहेतच ‘ए मेरे जोहराजुबी’ (मन्ना डे), ‘आगे भी जाने न दू’ (आशा), ‘दिन है बहार के’ (आशा/महेंद्र). यातील रफीचे एकमेव गाणे जे की बीनाकात हिट झाले होते, ‘वक्त से दिन और रात’ जे की चित्रपटाचे शीर्षक गीतही होते. रफीचा आवाज ऐकताना लक्षात येत राहतं की महेंद्र कपुरच्या आवाजात आपण काय काय ‘मिस’ करतोय. 

या त्रिकुटाचा तिसरा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘हमराज’. यातील दोन गाण्यांनी निव्वळ हवाच करून टाकली. महेेंद्र कपुरचे जवळपास सर्वोत्कृष्ठ ठरावे असे गाणे ‘नीले गगन के तले, धरती का प्यार पले’ यातीलच. 1968 च्या बिनाकात ‘शागिर्द’ मधील लताचे ‘दिल वील प्यार फ्यार’ पहिल्या क्रमांकावर होतं आणि किशोर कुमारचे ‘पडोसन’ मधील ‘मेरे सामने वाली खिडकी मे’ दुसर्‍या क्रमांकावर होतं. मजरूह आणि राजेंद्रकृष्ण सारख्या तगड्या गीतकारांना टक्कर देत तिसर्‍या क्रमांकावर असलेलं साहिरचे ‘ओऽऽ नीले गगन के तले’ काव्याच्या दृष्टीने खरंच उजवं होतं. अगदी पहिल्या क्रमांकावर यावं इतकं. याच वर्षी याच चित्रपटातील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ बिनाकाच्या 19 व्या क्रमांकावर होतं. 

महेंद्रकपुरचं अजून एक गाणंही आजही लोकप्रिय आहे. ते म्हणजे ‘ना मु छुपाके जिओ, और ना सर झुकाके जिओ’ इतकं यश महेंद्र कपुरला नंतर कुठल्याच चित्रपटात मिळालं नाही. नाही त्याला इतकी एकल गाणी भेटली! आशा भोसलेचे एकच गाणे आणि तेही महेंद्र सोबत (तू हूस्न है, मै इश्क हू) यात आहे. जे फार विशेष नाही. लक्षातही रहात नाही.   

पुढे देशभक्तीपर गीतांसाठी महेंद्र कपुरचा वापर मनोज कुमार सारख्यांनी सढळ हाताने करून घेतला. किंबहुना महेंद्र कपुरचा गळा संगीतकारांनी अशा गीतांसाठी सढळपणे वापरू दिला. मेरे देश की धरती हे त्याचे सगळ्यात ठळक उदाहरण. याचं कारणही आहे. भावनेचे बारकावे, नाजुकता, हरकती महेंद्र कपुरच्या आवाजात स्पष्टपणे येत नाही. महेंद्र कपुरची अडचण म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष रफी या काळात भरात होता. तेंव्हा रफीची छाया किती चालणार?

याच काळात (1963 ते 1967) साहिर इतरही संगीतकारांसोबत अप्रतिम गीतं देतच होता. रोशन (ताजमहाल- जो वादा किया हो), सी.रामचंद्र (बहुरानी- उम्र हुई तुमसे मिले), जयदेव (मुझे जीने दो-रात भी है कुछ भीगी भीगी),   रोशन (दिल ही तो है-लागा चुनरी मे दाग), रोशन (चित्रलेखा- मन रे तु काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो), एन.दत्ता (चांदी कि दिवार- अश्कों ने जो पाया है), मदनमोहन (गझल-रंग और नुर की बारात), खय्याम (शगुन- तुम अपना रंजो गम, पर्वतों के पेडां पर). साहिर-रोशन हे नातं जास्तच अप्रतिम रित्या जुळलेलं याच काळात दिसून येतं. इतकंच काय पण रवीसाठी साहिरने चोप्राच्या चित्रपटांशिवाय हिट गाणीही याच काळात दिली आहेत. ‘ये वादीया ये फिजाये’ (आज और कल), ‘छू लेने दो नाजूक होठों को’ (काजल), ‘जिओ ऐसे जिओ’ (बहुबेटी) ही गाणी बिनाकात हिटही झाली. 

पुढे 1970 ला आलेल्या आदमी और इन्सान मधील आशाचे ‘जिंदगी इत्तेफाक है’,  ‘आगे भी जाने न दू’ की आठवण करून देतं. आशा-महेंद्रच्या ‘ओ नीले पर्बतों की धारा’ वर ‘नीले गगन के तले’ची सावली दिसते. 1973 च्या धुंद मधील ‘उलझन सुलझे ना’ कारण नसताना वक्तमधील ‘कौन आया के निगाहों मे चमक’ चा भास देतं. 

पण असं असतानाही साहिर-चोप्रा-रवी या त्रिकोणात काहीतरी वेगळं आहे. त्यांचं गाणं लगेच लक्षात येतं. एक जूळून आलेली भट्टी असंच म्हणता येईल.     
   
         

Saturday 11 March 2017

होळीची दुर्लक्षीत गोड गाणी


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 11 मार्च 2017

होळी आली की ‘होली आयी रे कन्हाई’ (मदर इंडिया), ‘अरे जा रे हट नट खट’ (नवरंग), ‘होली के दिन दिल खिल जाते है’ (शोले), ‘रंग बरसे भिगी चुनरवाली’ (सिलसिला)  अशा काही गाण्यांची चर्चा होते, टिव्हीवर दाखवली जातात. बस्स. संपली आमची होळीच्या गाण्यांबाबतची रसिकता. याशिवाय हिंदी चित्रपटात होळीची अतिशय गोड अशी गाणी आहेत हे आपल्या गावीच  नाही. 

होळीच्या गाण्यांमध्ये पहिल्यांदा दखल घ्यावी असं गाणं 1950 च्या ‘जोगन’ चित्रपटात आहे. बुलो सी.रानी हा सिंधी संगीतकार गीता दत्तच्या आवाजाच्या विलक्षण प्रेमात होता. या चित्रपटात एक दोन नाही तर तब्बल 13 गाणी गीताच्या आवाजात त्यानं दिली आहेत. संत मीराबाईवरचा हा चित्रपट. नर्गिस यात नायिका आहे. ‘डारो रे रंग रसिया, फागुन के दिन आये रे’ असं गीताच्या आवाजातलं गाणं आहे. गाण्याची चाल तशी पारंपरिकच आहे. कोरसचा चांगला वापर केला आहे. पण आज हे गाणं तितकं पकड घेत नाही. अगदी गीताचा आवाजही वेगळा असा जाणवत नाही. नर्गिसला तसेही नाचता येत नव्हतेच. तेंव्हा त्या दृष्टीनेही गाणं प्रभाव पाडत नाही. पण हे पहिलं गाणं आहे होळीचं ज्याची दखल घ्यावी लागते. याच वर्षी ‘हमारा घर’ चित्रपटात चित्रगुप्तने शमशाद-रफीच्या आवाजात होळीचे गाणे दिले आहे. पण ते विशेष नाही.  

होळीच्या गाण्यातलं पहिलं ‘हिट’ गाणं म्हणजे 1952 च्या ‘आन’ मधलं, ‘खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगिला आया’. शमशादच्या आवाजातनं लोकगीताचा  तर लताच्या आवाजातनं नायिकेच्या नाजूक भावनांचा रंग या गीताला चढला आहे आहे. दिलीपकुमार, प्रेमनाथ, निम्मी, नादिरा अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. नौशाद यांच्या बहुतांश गाण्यांचे बोल शकिल यांनीच लिहिले. हे गाणंही शकिल यांचंच आहे. भारतीय वाद्यांचा वापर हे तर नौशाद यांचे वैशिष्ट्यच. या गाण्याच्या आशयालाही त्याचा पोषक वापर केला गेला आहे.

यानंतर पुढच्याच वर्षी (1953) ‘राही’ चित्रपटात अनिल विश्वास यांनी अस्सल लोकगीताच्या धाटणीचे होळी गीत दिले आहेत. परत असा प्रयोग हिंदी चित्रपटात झाला नाही. पूर्णत: लोकवाद्यांचा वापर, गायकही तसेच (इरा मुजूमदार), नृत्यही तसेच. ‘होली खेले नंदलाला बिरज मे’ असे पारंपारिक बोल गाण्याचे आहेत. देव आनंदचा हा चित्रपट. हे गाणंही अतिशय वेगळं आहे. पुढे ‘रंग बरसे’ सारख्या गाण्यांनी यातील कल्पना उचलल्या. पूर्णत: लोकगीताचाच छाप जसाच्या तसा ठेवण्याचा एक व्यावसायीक धोका अनिल विश्वास यांनी घेतला यासाठी त्यांना दाद द्यावी लागेल. 

देव आनंद-दिलीप कुमार यांचा 1955 ला आलेला ‘इन्सानियत’ हा सी.रामचंद्र यांच्या एकापेक्षा एक गोड गाण्यांनी नटलेला चित्रपट. लोकवाद्यांचा अतिशय सुंदर उपयोग या गाण्यांमध्ये केला गेला आहे. नायिका बीना रॉयच्या तोंडी होळीचं एक सोज्वळ गाणं यात आहे. 
तेरे संग संग संग, 
पिया खेलती मै रंग 
हाय हाय हाय हुयी बदनाम रे 
लागे दुनिया से डर 
गयी गली घर घर 
देखो छेड मुझे लेके तेरा नाम रे 

आता हे शब्द राजेंद्रकृष्ण यांनी एकमेकांत असे गुंफले आहेत की सहजच चालीत ते ओवले जावेत. शैलेंद्र, मजरूह, राजेंद्रकृष्ण हे असे गीतकार आहेत की त्यांच्या गीतांना स्वत:च्याच अंगभूत चाली आहेत. त्यामुळे संगीतकारांसाठीचे हे फार लाडके गीतकार आहेत. लताचा आवाज ही तर सी.रामचंद्र यांची कमजोरीच. त्यामुळे साहजिकच सगळा गोडवा यात उतरला नसता तरच नवल. 

नर्गिस असो की बीना रॉय असो की निम्मी यांना नृत्याचं फारसं अंग नाही. परिणामी एका मर्यादेपलीकडे  नृत्यप्रधान गाण्यात त्यांचा प्रभाव पडत नाही. पण वैजयंतीमालाचे मात्र तसे नाही. सुंदर चाल, उत्कृष्ट शब्द यांच्या तोडीस तोड नृत्याचा आविष्कार तिच्या गाण्यात पहायला मिळतो. हेमंत कुमारचे संगीत असलेल्या ‘अंजान’ (1956) मधील होळीचे गाणे, ‘होली की आयी बहार’ हे याचेच चांगले उदाहरण. वैजयंतीमालाच्या हालचाली अगदी साध्या आहेत. पण त्यातून जो परिणाम साधल्या जातो तो फार कलात्मक. हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांचंच आहे. 
मौसम पे रंग, मेरे मन मे तरंग 
नयनों मे साजन का प्यार 
देखो होली की आयी बहार 
असे साधेच पकड घेणारे एकमेकात गुंफले गेले शब्द या गीतात आहेत. राजेंद्रकृष्णच्या गीतरचनेबद्दल स्वतंत्रच लिहायला पाहिजे.

याच वर्षी हेमंतकुमार आणि राजेंद्रकृष्ण या जोडीने अजून एका चित्रपटात होळीचे गाणे दिले आहे. चित्रपट होता ‘दुर्गेश नंदिनी’. प्रदीपकुमार बीना रॉय या जोडीचा हा चित्रपट. लताच्या आवाजात एक गाणं ‘मत मारो श्याम पिचकारी, मोरी भिगी चुनरिया सारी रे’ असे आहे तर दुसरे गाणे हेमंतकुमार लता यांच्या आवाजात, ‘प्यार के रंग मे सैंय्या मोरी रंग दे चुनरिया’ असे आहे. होळीच्या दोन गाण्यांचा असा प्रयोग आधी आणि नंतरही मग कुठल्याच चित्रपटात झाला नाही. या दोनही गाण्यांत बासरी आणि शहनाई या सुषिर वाद्यांचा प्रयोग केला आहे. पिचकारीतून हवेच्या दाबाने रंग उडवला जावा तसे हवेच्या दाबाने स्वर बाहेर पडणारी वाद्ये यासाठी निवडण्याची प्रतिभा हेमंत कुमार यांच्यापाशी होती. 

नौशाद आणि शकिल बदायुनी याच जोडीने 1960 च्या ‘कोहिनूर’ मध्ये ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ हे होळीचे गोड गाणे दिले आहे. लता रफीचा आवाज म्हणजे नौशाद यांना हवे ते खेळायला भेटलेले मैदान. 1950 ते 1960 या दशकात लता-रफीच्या आवाजावर विविध संगीतकारांनी जे आणि जसे प्रयोग केले ते तसे परत कुणाला करता आले नाहीत. कारण या दोघांच्या आवाजाची रेंज अफाट होती. पुढे जो साचा यांच्या आवाजाचा तयार झाला किंवा त्यांच्या आवाजाचाच दबाव संगीतकारांवर यायला लागला तशी स्थिती या काळात नव्हती. त्यामुळे यांची सगळ्यांत मधुर गाणी याच काळातील आहेत. या गाण्यावर नाचताना मीनाकुमारीच्या मर्यादा जाणवू नयेत म्हणून किमान हालचालीतून कॅमेरा हवा तो भाव टिपत इतरत्र सरकतो.

होळी म्हणजे मस्ती असे जे समिकरण आहे त्याला खरा न्याय देणारं एक गाणं 1966 मध्ये ‘बिरादरी’ या चित्रपटात गुणी संगीतकार चित्रगुप्त यांनी दिलं. या गाण्याची छाप पुढे इतर होळी गीतांवर आढळते. शशी कपुर आणि पुढे कॅबरे डान्सर म्हणून गाजलेली फरियाल यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. सोबत मेहमुद आणि हेलनचे धम्माल नृत्यही यात आहे. रफी-सुमन कल्याणपुर-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. ‘रंग दो सभी को आज इक रंग मे, आयी रंगीली होली रे’ या शब्दांना उत्तर प्रदेशातील मथुरेच्या परिसरातील पारंपारिकि होळीगीतांचा साज चित्रगुप्त यांनी चढवला आहे. पुढे जय जय शिवशंकर किंवा यासारख्या गाण्यांत हेच वापरल्या गेले. यात हेलनला मराठमोळ्या नववारीवर नृत्य करायला लावलं आहे.  

पुढे मात्र होळीच्या गाणी जवळपास हद्दपारच झाली. आणि जी आली त्यातही गाण्यांचा ढंग बदलला. मुळात संगीताचाच ढंग बदलला. याची सुरवात रवीच्या संगीतातील ‘फुल और पत्थर’ च्या ‘लायी है हजारो रंग होली’ या आशा भोसलेच्या गाण्यापासून दिसते. यातील ऑकेस्ट्राची हाताळणी आधुनिकतेच्या नावाखाली माधुर्य हरवत चाललेली दिसून येते. 

हृदयनाथ मंगेशकरांनी 1984 ला ‘मशाल’ चित्रपटात जे होळीचे गाणे दिले आहे ती चाल मराठी गाण्याची आहे. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’ या वर ‘ओ होली आयी होली आयी देखो होली आये रे’ असं ते गाणं आहे. गाणं चांगलं आहे पण मराठी रसिकांना जूनंच गाणं कानात बसल्यामुळे हे नवं लक्षात रहात नाही.
  
          -आफताब परभनवी.

Friday 3 March 2017

शाम-ए-‘तलत’ की कसम !


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 4 मार्च 2017

तो कधीही खुप लोकप्रिय असा गायक नव्हता. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धो धो पैसे कमावले नाहीत. त्याची गाणी अंताक्षरी खेळताना आठवत नाहीत. त्याच्यासाठी संगीतकार अडून बसले, नायक त्याचा आवाज हवा म्हणून हट्ट करून बसले असंही कधी घडलं नाही. सहज ओठांवर त्याची गाणी येत नाहीत. पण एखाद्या सायंकाळी दाटत जाणार्‍या अंधारासोबतच व्यक्त करावं पण व्यक्त करता येवू नये असं काही तरी काळजात दाटत जातं आणि आपल्याही नकळत त्याच्या गाण्याचे सुर आपल्या मनात भरून राहतात, 
शाम-ए-गम की कसम
आज गमगीन है हम
आ भी जा आ भी जा आज मेरे सनम
आणि मग मात्र काहीच दुसरं सुचत नाही. एका मागोमाग एक त्याची गाणी आठवत जातात. आपल्याही नकळत आपल्या मनाच्या तळाशी ती साठलेली असतात. सगळा तळ ढवळला जातो आणि मग पुढे बराचवेळ त्याचा आवाज आपली सगळी समज ताब्यात घेवून टाकतो. मग दुसरं काहीच ऐकायची मनस्थिती शिल्लक राहत नाहीत. फार तर त्याच्या सोबत अप्रतिम अशी लता आपण ऐकू शकतो. दुसरं काहीच नाही. 

हे असं घडत जातं तलत मेहमुदच्या गाण्याबाबत. माधव मोहोळकरांनी आपल्या  ‘गीतयात्री’ पुस्तकांत तलतबाबत फार उत्कटतेनं लिहिलं आहे. विशेषत: त्याच्या आवाजाचा पोत स्पष्ट करताना, ‘कंप आणि थरथर यातील फरक असा आहे की कंप हा दोष आहे तर थरथर हे मात्र वैशिष्ट्य ठरतं.’ थरथरता आवाज हेच तलतचं बलस्थान ठरलं. ज्या संगीतकारांनी हे ओळखलं त्यांनी याचा अतिशय चपखल वापर आपल्या गाण्यांमध्ये करून घेतला.

दोनच भावना प्रामुख्याने तलतच्या आवाजातून जास्त परिणामकारकतेने प्रगट होतात. एक प्रेमातलं दु:ख आणि तेही परत कुठेही आक्रस्ताळं नसलेलं. आणि दुसरं म्हणजे निखळ अशी प्रेमाची कबुली परत तीही अतिरेकी आनंदाने व्यक्त न होणारी. दोन्हीकडेही एक शांत मध्यम सुर लागलेला असतो. 

तलतच्या अगदी सुरवातीच्या काळातला बाबूल (1950) हा बॉक्स ऑफिसवर हिट झालेला चित्रपट. त्यात शमशाद सोबतचे त्याचे गाणे ‘मिलतेही आंखे दिल हुआ दिवाना किसीका, अफसाना मेरा बन गया, अफसाना किसीका’ गाजले. पण शमशाद सोबत तलतचे सुर जूळत नाहीत हे स्पष्टपणे जाणवतं. याच वर्षी  नुकत्याच गाजू लागलेल्या राज कपुर- नर्गिस च्या ‘जान पेहचान’ मध्ये तलतचे गीता दत्त सोबत गाणे आहे ‘आरमान भरी दिल की लगन तेरे लिये है’ पण तेही आज विशेष वाटत नाही. पण याच वर्षी ‘अनमोल रतन’ मध्ये गुणी संगीतकार विनोद ने तलत-लता च्या आवाजात ‘शिकवा तेरा मै गाऊ दिल मे समाने वाले, भूलेसे याद करले ओ भूल जानेवाले’ हे गाणं दिलं. आणि तलतच्या आवाजाला केवळ लताचाच आवाज जूळतो हे समिकरण सिद्ध करून दाखवलं. पुढे बहुतांश संगीतकारांनी ही जोडी यशस्वीरित्या वापरली.

प्रेमात विफल झालेला किंवा जगापासून दूर जावू पाहणारा नायक, त्याचं दु:ख व्यक्त करण्यासाठी पडद्यावर दिलीपकुमारने रंगवला, त्याची ही प्रतिमा तयार करण्यात तलतच्या आवाजाचा मोठा वाटा आहे. 

‘आरजू’ (1950) या तेंव्हाच्या यशस्वी चित्रपटात अनिल विश्वास यांनी तलतच्या आवाजात ‘ए दिल मुझे ऐसी जगा ले चल’ गावून घेतलं. गाणं तर लोकप्रिय झालंच पण दिलीप कुमारची ‘ट्रॅजेडी किंग’ ही प्रतिमा ठसली गेली.

‘दाग’ (1952) मध्य ‘ए मेरे दिल कही और चल’ (संगीत े शंकर जयकिशन) पडद्यावर आलं आणि दिलीपकुमारच्या या प्रतिमेवर शिक्कामोर्तबच झालं. प्रेमभंग झालेला नायक म्हणजे तलतचाच आवाज हेच पक्कं झालं. 

तलतचं सगळ्यात गाजलेलं गाणं ‘शाम-ए-गम की कसम’ 1953 च्या फुटपाथ मधलं आहे. तेंव्हा नुकत्याच सुरू झालेल्या बिनाका गीतमाला मध्येही हे गाणं हिट ठरलं. दिलीपकुमारच याही चित्रपटाचा नायक होता. संगीत मात्र आता खय्याम यांचं होतं. पहिल्या दोन चार वर्षांतच तलतबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली संगीतकार कुणीही असो (अनिल विश्वास, शंकर जयकिशन, खय्याम) त्याची म्हणून एक शैली तयार झाली ती बदलता येत नाही. किंवा उलटही असेल की तलतच्या या शैलीच्या मोहातच संगीतकार पडत गेले. अगदी पुढे ओ.पी.नय्यर सारखा पंजाबी ठेकावाला संगीतकारही तलतसाठी ‘प्यार पर बस तो नही मेरा लेकिन, तु बात दे के तूझे प्यार करू या ना करू’ (सोने की चिडीया, 1958) सारख्या साहिरच्या शब्दांना नाजूक चाल देतो आणि तलतही त्याचं सोनं करतो.

‘फुटपाथ’ मध्येच एक गाणं प्रेमलतासोबत खय्यामने संगीतबद्ध केलं आहे. दु:खाच्या आर्तस्वरांसोबतच तलतच्या आवाजात प्रेमाची अस्फुट भावना आनंदी सुरावटीत शोभून दिसते हे ओळखून ‘पवन चले’ सारखं आनंदी गाणं दिलं. पण ‘शाम-ए-गम’च्या प्रचंड प्रभावात ते झाकोळून गेलं.

खरं तर याही आधी ‘सीने मे सुलगते है आरमां’ (तराना, 1951) या लतासोबतच्या गाण्यानं तलतच्या आवाजात प्रेमाची भावना सुंदर फुलते हे समोर आलं होतं. दु:खी गाण्यांसारखंच तलतचा हा सुरही सर्व संगीतकारांपाशी असाच लागतो. ‘समाके दिल मे हमारे’ (अनहोनी-रोशन), ‘दिल मे समा गये सजन’ (संगदिल-सज्ज्जाद), अपनी कहो कुछ मेरी सुनो (परछाई-सी.रामचंद्र), ‘जब जब फुल खिले’ (शिकस्त- शंकर जयकिशन) ही याच काळातली काही उदाहरणं.

गझल हा तर तलतचा खास प्रांत. तलत हा गकमेव पार्श्वगायक असा आहे की ज्याच्या गैरफिल्मी रेकॉर्ड अतिशय लोकप्रिय झाल्या आणि मग तो हिंदी चित्रपटात गायक म्हणून आला. त्याच्याासरखी गैरफिल्मी गीतांना लोकप्रियता तेंव्हा कुणाही दुसर्‍या गायक गायिकेला मिळाली नव्हती. या गाण्यांमध्ये गझला जास्त होत्या. 

स्वाभाविकच 1954 मध्ये सुरैय्या-प्रदीप कुमार यांचा ‘मिर्झा गालिब’ पडद्यावर आला तेंव्हा त्यात तलतचा आवाज होता. गालिबच्या गझलांना बर्‍याचजणांनी पुढे सुंदर चाली दिल्या. त्यांना लोकप्रियताही लाभली. पण ‘मिर्झा गालिब’ मधील सुरैय्या-तलतच्या 
दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है, 
आखिर इस दर्द की दवा क्या है’
गझलेची मोहिनी काही कमी होत नाही. 

तलतच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश लाभलं नाही. 1955 ला ‘बारादरी’ पडद्यावर आला. शौकत देहलवी नाशाद (नौशाद नाही, बर्‍याच ठिकाणी ही गल्लत होते) याने तलतच्या आवाजात ‘तस्वीर बनाता हू, तस्वीर नही बनती’ हे गाणे गावून घेतले. त्याला लोकप्रियताही लाभली. चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला. पण त्यानंतर मात्र तलतचा उतरता काळ सुरू झाला. 

पुढे वसंत देसाईच्या ‘मौसी’ मधलं लता-तलतचे अप्रतिम प्रेमगीत ‘टिम टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ बिनाकात हिट झालं. ओ.पी.नय्यरच्या ‘सोने की चिडीया’ मधील ‘प्यार पर बस तो नही है मेरा लेकीन’ हेही बिनाकात गाजलं. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. 

एस.डी.बर्मन यांचा ‘सुजाता’ हा गाजलेला चित्रपट. यातील ‘जलते है जिसके लिये, तेरी आंखो के दिये, धुंड लाया हू वोही गीत मै तेरे लिये’ हे तलतचे गाणे बिनाकातही हिट ठरले. हे जवळपास तलतसाठी शेवटचे यशस्वी गाणे सिद्ध झाले. खरं तर नंतरही कितीतरी सुंदर गाणी तलतची आली. सलिल चौधरीचे सदाबहार ‘अहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’ हे 1960 ला आलेले गाणे तलत-लताच्या सर्वोत्कृष्ठ गाण्यापैकी एक आहे. 

1964 ला मदन मोहनचा ‘जहांआरा’ पडद्यावर आला. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी तलतचे ‘शाम-ए-गम की कसम’ आलं होतं. त्याची आठवण म्हणून असावं मदन मोहनला 
फिर वोही शाम, वोही गम, वोही तनहाई है 
दिल को समझाने तेरी याद चली आयी है’ 
ची चाल सुचली. राजेंद्रकृष्ण नी तसे सुंदर शब्द लिहून दिले. आणि परत तलतप्रेमींना एक त्यांच्या आवडत्या तलतशैलीतलं गाणं भेटलं. 

पिळवटून टाकणारं पण व्यक्त न करता येणारं दु:ख किंवा प्रेमाची अस्फुट गोड भावना जी अर्धवट शब्दांत मांडली जाते. किंवा जिथे शब्दच अपुरे पडतात. अशा दोनच भावनांना तलतच्या गाण्यात ठळक जागा मिळाली. इतर भावभावना त्यात व्यक्त होताना परिणाम साधत नाहीत. हेच त्याचं बलस्थानही असावं.

जेमतेम सव्वाचारशे चित्रपट गीतं, दोनशेच्या जवळपास गैरफिल्मी गझला गीतं आणि शंभराच्या आसपास आकाशवाणी आणि इतरत्र गायलेली गीतं इतकीच जायदाद मागे ठेवून गेला तलत. 
‘रूप की रानी चोरों का राजा’ (1962) मध्ये देखणा देवआनंद वहिदासाठी तलतच्या सुरात गातो 
तूम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर
चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर
तूमको निंद आयेगी तूम तो सो ही जाओगे
किसका ले लिया है दिल ये भी भूल जाओगे
शैलेंद्रकडून शकर जयकिशनने देवआनंदची प्रतिमा ओळखून हे खट्याळ शब्दांत लिहून घेतलं. तशी गोड चालही दिली. पण आज तलतच्या चाहत्यांना याच ओळी तलतसाठी आठवतात. 24 फेब्रुवारी 1924 ला जन्मलेला आणि 9 मे 1998 ला या पृथ्वीवरून निघून गेलेला तलत नावाचा तारा त्याच्या चाहत्यांना सदैव स्मरणात राहिन. 
      
      -आफताब परभनवी