Sunday 10 December 2017

प्रेमगीतांतून कलेकलेने उमलत गेलेला ‘शशी’


अक्षरनामा, 9 डिसेंबर 2017

त्याचं वय झालं होतं. तो आजारी होता. तो जाणारच होता. पण गेला तेंव्हा ‘मॅटनी’ शो ची दूपार उदास करून गेला. मुुंबईला या काळात कधी पाऊस पडत नाही. पण त्या दिवशी सर्वत्रच उदास ढग दाटून आले होते. पाऊसही कोसळलायला लागला होता.  रवीच लोपला तेंव्हा शशी दिसायचे काही कारणच नव्हते. शशी कपुर वयाच्या 79 व्या वर्षी पंचत्वात विलीन झाला.

त्याचा पहिला चित्रपट होता ‘धर्मपुत्र’ (1961). एन.दत्ताच्या संगीतात साहिरचे शब्द शशी कपुरच्या तोंडी होते. तेंव्हा दुय्यम समजल्या गेलेल्या महेंद्र कपुरचा आवाज त्याच्यासाठी वापरला गेला. इंद्राणी मुखर्जी त्याची नायिका होती. साहिरचे शब्द अप्रतिम होते पण ना देखणी कुणी नायिका समोर होती ना रफीसारखा मधाळ आवाज होता.

भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे
रंग मे डूबी हुयी निंद से भारी आंखे

हे गाणं रसिक खरेच विसरून गेले. पुढे हीच चाल जरा घासून पुसून रवीने साहिरच्याच शब्दांत ‘गुमराह’ मध्ये वापरली तेंव्हा ती रसिकांच्या लक्षात आली. (आप आये तो खयाले दिले नाशाद आया-महेंद्र कपुर)

पुढे ‘चार दिवारी’ (1961) लगेच आला. याला सलिल चौधरीचे सुंदर संगीत होते. शैलेंद्रचे शब्दही चांगलेच होते. पण यात शशी कपुरसाठी गाणेच नव्हते. पुढे लोकप्रिय ठरलेल्या शशी-नंदा या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. नंतर याच जोडीचा दुसरा चित्रपट आला ‘मेहंदी लगे मेरे हाथ ’ (1962). याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचे. यात मुकेशचा आवाज शशी साठी वापरला गेला होता. पण यातली गाणी विशेष नव्हती. आनंद बक्षी ने गीतकार म्हणून जो कारखाना पुढे सुरू केला त्याची सुरवात इथून होते. ‘उडे पंछी टोली मे, तुझे मै ले जाऊंगा बिठलाके डोली मे’ असली शब्द रचना असल्यावर पुढे काय होणार?

शशी कपुरच्या वाट्याला आलेल्या पुढच्या चित्रपटातील अतिशय गोड गाण्यांनी रसिकांना रिझवले. हा चित्रपट होता सलिल चौधरीच्या संगीतातला ‘प्रेमपत्र’ (1962). साधना कट नसलेली गोड साधना यात शशीची नायिका होती. अंध असलेल्या शशीच्या तोंडी तलत च्या मखमली स्वरातील गाणं आहे

ये मेरे अंधेरे उजाले न होते
अगर तूम न आते मेरे जिंदगी मे

या ओळींना लताच्या गोड आवाजात साधना उत्तर देते

न जाने मेरा दिल ये क्यूं केह रहा है
तूम्हे खो न बैठू कही रोशनी मे

राजेंद्रकृष्ण यांची अतिशय सहज अशी शब्दरचना गाण्याला गोडवा प्राप्त करून देते. आधीचा संगीताचा अंधार मिटवून शशी च्या चित्रपट आयुष्यात मधुर संगीताचा उजेड इथून पडायला सुरवात होते.

यातील दुसरं गाणं मुकेश-लताच्या स्वरात आहे. इंद्राणी मुखर्जीला न शोभणारे शब्द इथे साधनासाठी मात्र अतिशय चपखल बसतात. मुकेशचा आवाज अतिशय थोड्या संगीतकारांना प्रेमगीतात चपखलपणे वापरता आलेला आहे. त्यात सलिल चौधरीचा क्रमांक वरचा लागतो. हे गाणं आहे

दो आखियां झुकी झुकी सी
कलियों से नाजूक होठों पे
कविता रूकी रूकी सी

आंघोळ करून आलेला बनियन घातलेला टॉवेल खांद्यावर असलेला मध्यमवर्गीय नोकरदार शोभणारा शशी आणि गाऊन घातलेली, न्हाऊन केस मोकळे सोडलेली साधना. शशी कपुरची घरगुती साधा माणूस हीच प्रतिमा पुढे घट्ट झाली. नंदा सेाबत त्याची जोडी जमली ती याच कारणाने. साधना-शर्मिला-राजश्री-बबिता-हेमा-राखी यांच्यापेक्षा नंदाचा साधेपणाच त्याच्यासोबत जास्त उठून दिसायचा.

‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) मध्ये शम्मी सोबत ‘तूम्हे हुस्न दे के’ या कव्वालीत शशी कपुर होता. शशी साठी रफीचा आवाज पहिल्यांदाच वापरला गेला. या कव्वालीत रफी-मन्ना-आशा सोबत लताचाही आवाज आहे. कव्वाली-मुजर्‍यांसाठी फारच कमी वेळा लताचा आवाज वापरला गेला.

याच वर्षी हैदराबादचा संगीतकार इक्बाल कुरैशीचा ‘ये दिल किसको दू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात शशी कपुर सोबत नृत्यनिपूण रागिणी नायिका म्हणून होती. रफीच्या आवाजातील

‘फिर आने लगा याद मूझे प्यार का आलम
इकरार का आलम तो कभी इन्कार का आलम’

हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात गायिका म्हणून रफी सोबत संगीतकार उषा खन्नाचा आवाज इक्बाल कुरैशी ने वापरला आहे. अर्थात उषा खन्नाला फक्त काही शब्दच आहेत. रफी-आशा च्या द्वंद्व स्वरातील ‘तेरा नाम मेरा नाम’ हे गाणं पण बर्‍यापैकी आहे. पण यावर शंकर जयकिशनच्या संगीताचा प्रभाव खुप जाणवतो. विशेषत: भरपूर व्हायोलीन्सचा वापर शंकर जयकिशनच्याच प्रमाणे करण्यात आला आहे.

सचिन देव बर्मनचे संगीत, रफीचा आवाज, शकिलचे शब्द असा सगळा सुवर्ण योग शशी साठी पहिल्यांदाच ‘बेनझीर’ (1964) मध्ये जूळून आला. पण इतकं सगळं होवूनही यातील गाण्यांची भट्टी जमलीच नाही.  त्यातल्या त्यात ‘दिल मे एक जाने तमन्ना ने जगा पायी है, आज गुलशन मे नही दिल मे बहार आयी है’ हे गाणं बर्‍यापैकी आहे. चित्रपटात अशोक कुमार-मीना कुमारी असे दिग्गज होते. त्यामुळे अपयश त्यांच्या खात्यावर जमा झाले इतकेच.

पण पुढच्याच वर्षी एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन चित्रपट शशी कपुरचे चर्चेत राहिले. पहिला चित्रपट गाजला तो म्हणजे ‘वक्त’ (1965). पण वक्त मध्ये बलराज साहनी, सुनील दत्त, राजकुमार, साधना सारखे तगडे कलाकार होते. पण या गर्दितूनही शर्मिला-शशी च्या वाट्याला एक गोड गाणं आलं. बोटीवर तरूण तरूणींची सहल निघालेली आहे. त्या प्रसंगी महेेंद्र-आशाच्या आवाजात

दिन है बहार के तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
दुष्मन है प्यार के जब लाखो गम संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करे

हे गाणं पडद्यावर साकार झालं. तेंव्हा शर्मिला-शशी कॉलेज तरूणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. दिलीप-देव-राज यांचा उतरता काळ आणि राजेश खन्नाचा अजून न आलेला जमाना या संधीकाळातील हा चित्रपट आहे. ही मधली पोकळी शशी कपुर ने भरून काढली.

खय्याम च्या संगीताने नटलेला ‘मोहब्बत इसको केहते है’ याच वर्षी आला. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ठररिये होश मे आ लू , तो चले जाईगेगा’ हे रसाळ गाणं आजही ऐकावं वाटतं. शशी कपुर-नंदा या जोडीचा राज-नर्गिस, देवआनंद-नुतन, दिलीपकुमार-वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार-साधना यांच्यासारखा विचार झाला पाहिजे.

1965 ला ‘जब जब फुल खिले है’ पडद्यावर आला आणि बघता बघता त्यानं बॉक्स ऑफिसवर धुम केली. हा पहिलाच चित्रपट आहे की ज्यानं शशी कपुरच्या पदरात निखळ यश टाकलं. या यशात वाटा मागायला दुसरा कुठलाही तगडा कलाकार चित्रपटात नव्हता. या चित्रपटानं शशी कपुर सोबत अजून दोघांच्या पदरात यशाचं माप टाकलं. नायिका नंदाचा हा सर्वात गाजलेला पहिलाच चित्रपट. तसेच संगीतकार म्हणून चाचपडणार्‍या कल्याणजी आनंदजीची कारकीर्द इथपासूनच व्यवसायीक दृष्टीने वेगवान झाली. (याच वर्षी कल्याणजी आनंदजीचा ‘हिमालय की गोद मे’ हा पण बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.)

‘जब जब फुल खिले’इतकी गाणी परत शशी कपुरला ‘शर्मिली’चा अपवाद वगळता कुठल्याच चित्रपटात मिळाली नाहीत. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ना ना करते प्यार तूम्हीसे कर बैठे’ या गाण्याला बीनाका गीतमालात स्थान भेटलं. याच चित्रपटात रफी आणि लताच्या आवाजात स्वतंत्रपणे ‘परदेसीयों से ना आखिया मिलाना’ हे गाणं आहे. पण यातील रफीच्या आवाजातील गाणंच जास्त गाजलं. बिनाकात त्या वर्षी हीट गाण्यांत हे पण होतं. पण लताच्या आवाजातील गाणं मात्र नव्हतं. ‘दो पेहलू दो रंग’ अशी जी गाणी आहेत त्यात पुरूष गायकांनी गायलेली गाणी जास्त गाजली पण त्या तूलनेत लताच्या आवाजातील गाणी मात्र गाजली नाहीत.
शशी कपुरच्या ‘बिरादरी’ (1966) मध्ये रफीच्या तोंडी एक अतिशय गोड गाणं चित्रगुप्तनं संगीतबद्ध केलं आहे.

अभी ना फेरो नजर जिंदगी सवार तो ले
के दिल के शीशे मे हम आपको उतार तो ले

यात  नायिका फरियाल पेक्षा शशी कपुरच जास्त देखणा दिसतो. विलक्षण हलता निरागस देखणा चेहरा, गालावरची खळी, एक थोडा पडका दात हे सगळे प्लस पॉईंट होते शशी कपुर साठी. याच चित्रपटात होळीचे एक भन्नाट गाणे चित्रगुप्त ने दिले आहे. रफी-सुमन-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. शशी कपुर-मेहमुद-फरियाल यांनी धमाल केली आहे पडद्यावर.

आ रा रा रंग दो सभी को इस रंग मे
आयी है रंगीली होली रे

या गाण्यापासून होळीची धिंगाणा असलेली गाणी पडद्यावर सुरू झाली. यापूर्वी ‘खेलो रंग हमारे संग’ सारखी शांत गाणी होळीची असायची होती.

या सोबतच शशी कपुरचा ‘नींद हमारी ख्वाब तूम्हारे’ (1966) हा नंदासोबतचा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाला मदनमोहनचे संगीत होते. रफीचा आवाज आता शशी कपुरसाठी रूजू लागला होता. यातही ‘यु रूठो ना हसिना’ हे गाणं रफीच्याच आवाजात आहे. पण यातलं दुसरं गाणं विशेष गाजलं. आशा-रफीचे हे गाणे होते ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’.

याच वर्षी शशी कपुर-राज़श्रीचा चित्रपट ‘प्यार किये जा’ बॉक्स ऑफिसवर तूफान चालला. नुकतीच पदार्पपण केलेली लक्ष्मीकांत प्यारेलालची जोडी या चित्रपटाची संगीतकार होती. ‘पारसमणी’ च्या गाण्यांना यश मिळालं पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. पुढच्या ‘दोस्ती’ने लक्ष्मी-प्यारे साठी कमाल केली. यानंतरचा त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘प्यार किये जा’. महेंद्र कपुर-लता च्या आजावातील ‘फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर’ चांगलंच होतं. पण बिनाकात गाजलं ते ‘गोरे हाथों पर ना जूल्म करो’ हे तूलनेनं सामान्य गाणं.

पुढे हळू हळू चित्रपट गीतांचा दर्जाच घसरायला लागला. संगीतासाठी विशेष लक्षात रहावा असा ‘शर्मिली’ (1971) हा सचिन देव बर्मनच्या शेवटच्या काळातला चित्रपट शशी कपुरला मिळाला. ‘शर्मिली’ हा त्याचा गाण्यासाठीचा शेवटचा अभिजात चित्रपट. मुकेश-रफी-तलत-महेंद्र हे आवाज शशी कपुरसाठी वापरून झाले होते. पण यात किशोर कुमारचा आवाज शशी कपुरसाठी सचिनदांनी वापरला. यातली सगळीच गाणी गाजली. चित्रपटही हिट ठरला. ‘खिलते है गुल यहा’, ‘ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली’, ‘आज मदहोश हुआ जाये रे’ किंवा ‘कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये’ सगळीची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

खरं तर मधल्या काळात इतरही चित्रपटातील त्याची गाणी गाजत होतीच.

1. राजश्री सोबत ‘दिल ने पुकारा’ (1967)- वक्त करता जो वफा
2. शर्मिला सोबत ‘आमने सामने’ (1967)-कभी रात दिन हम दूर थे
3. बबिता सोबत ‘हसिना मान जायेगी’ (1969)- बेखुदी मे सनम,
4. आशा पारेख सोबत ‘कन्यादान’ (1969)- लिखे जो खत तूझे, 
5. हेमा मालिनी सोबत ‘अभिनेत्री’ (1970)- गा रे मेरे संग मेरे साजना,
पण यांच्यातून अभिजातता हरवून गेलेली होती.

इथून पुढे सुरू होतो तो संगीतासाठी रूक्ष असा ‘दिवार’ कालखंड. शशी कपुरचा सहाय्यक अभिनेता म्हणूनचा काळ. म्हणजे दिलीप-देव-राज यांचा अस्त आणि राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांचा उदय या मधल्या काळात मैदानावर येवून बॅटिंग करण्याची नाईट वॉचमनची भूमिका त्याच्या नशिबी आली होती. ती त्याने मन:पूर्वक निभावली. थोडीशी गाणी त्याच्या वाट्याला आली. त्यातून समोर उलगडत जाते ती त्याची तरूण प्रेमिकाची भूमिका.   

     -आफताब परभनवी.

Monday 20 November 2017

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील ‘श्यामा’ नावाचे रंगीत स्वप्न


अक्षरनामा, 18  नोव्हेंबर 2017

श्यामाचे लक्षणीय म्हणावे असे गाजलेले शेवटचे हिंदी गाणे होते, ‘तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर, हमे याद रखना’. या गाण्यालाही आता 55वर्षे उलटून गेली आहेत. आता प्रत्यक्ष शारिर रूपानेही श्यामाने या जगाचा निरोप घेतला. (वयाच्या 82 व्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन.)

श्यामाची कारकीर्द 1945 च्या ‘झीनत’ पासून सुरू होते. देवआनंद-सुरैय्याच्या ‘शेर’ (1949) मध्येपण श्यामा होती. ओ.पी.नय्यर अगदी नवखा होता तेंव्हाच्या ‘आसमान’ (1952) मध्ये पण ती होती. पण ती खरी प्रकाशात आली ती गुरूदत्तच्या ‘आरपार’ (1954) मध्ये. 

कारमध्ये रूसलेला देखणा गुरूदत्त आणि त्याला मनवणारा गीता दत्तचा अवखळ सुर ‘ये लो मै हारी पिया, हूई तेरी जीत रे, काहे का झगडा बालम, नयी नयी प्रीत रे’ हे गाणं श्यामाचंच आहे. श्यामाचा चेहरा तसा साधाच. पण तिच्या साधेपणानंच तिला जास्त संधी मिळवून दिली. मजरूहचे अतिशय साधे शब्द. त्याला कॅची असं ओ.पी.नय्यरचं संगीत. ही गाणी चटकन ओठांवर रूळली. गुरूदत्तला त्याच्या चित्रपटातील संस्मरणीय गाण्याचं श्रेय गीतकार-गायक-संगीतकार यांच्या सोबत द्यावंच लागेल.

याच चित्रपटातील शमशाद च्या आवाजातील गाजलेलं शीर्षक गीत, ‘कभी आर, कभी पार लागा तीर-ए-नजर’ हे पण श्यामावरच आहे. गीता-रफी चं सदाबहार युगलगीत ‘सुन सुन सुन सुन जालिमा, प्यार हमको तूमसे हो गया’पण श्यामाचच आहे. यातील तिचा वेगळा ड्रेस तेंव्हा चर्चेचा विषय झाला होता. नर्गिस पाठोपाठ ज्या नायिकेने आधुनिक कपडे पडद्यावर बिनधास्त परिधान केले त्यात श्यामाचा क्रमांक वरचा आहे. हे कपडे उत्तान नव्हते तर पारंपारिक स्त्री प्रतिमेहून वेगळे होते. याच चित्रपटात अवखळ गाण्यांसोबतच गीतानं आर्त स्वरात ‘जा जा बेवफा, कैसा प्यार कैसी प्रीत रे’ आळवलं तेंव्हा तो सूर पडद्यावर साकार करणारी परत श्यामाच होती. श्यामाला अभिनयात मर्यादा होत्या. पण तिनं त्या मर्यादेत राहूनच चांगल्या अभिनयाचे दर्शन घडवले.

याच वर्षी हेमंत कुमारच्या संगीतानं नटलेला ‘शर्त’ (1954) हा श्यामाचा चित्रपटही गाजला. गीताच्याच आवाजातील ‘न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तूम्हारे रहेंगे’ हे लोकप्रिय गाणं यातलंच. या चित्रपटात श्यामासाठी लता-आशा-गीता तिघींचाही आवाज हेमंतकुमार यांनी वापरला आहे. लता-हेमंत यांच्या आवाजातील युगल गीत ‘देखो वो चांद चुपके करता है क्या इशारे’ अतिशय गोड आहे. 

या चित्रपटातील आशाच्या आवाजातील एक गोड आर्त सुरातील श्यमाचं गाणं दुर्लक्षीत राहिलं. राजेंद्रकृष्ण-हेमंत कुमार ही गाजलेली गीतकार-संगीतकार अशी जोडी. ‘नागिन’ सारखं लखलखीत यश त्यांच्या नावावर आहे.  याच जोडीनं ‘शर्त’ मध्ये ‘मेरे हमसफर तुझे क्या खबर, के चला किधर मेरा कारवा’ हे गाणं दिलं आहे. चित्रपटात काही गाणी घुसडलेली असतात. पण काही गाणी मात्र चित्रपटाचाच अविभाज्य घटक म्हणून येतात. त्याच्या आशयाला समृद्ध करतात. कथानक पुढे नेतात. हे गाणं याच पठडीतलं आहे. 

पुढे ‘खानदान’ (1955) मध्ये ए.आर.कुरेशी नावानं संगीत देणारे तबला उस्ताद अल्लारखां (उस्ताद झाकिर हुसेन  यांचे वडिल) यांनी आशा भोसले च्या आवाजात ‘लाखों के बोल सहे’ ही ठुमरी वापरली आहे. ही श्यामावरच आहे. ही ठुमरी निर्मला देवी (अभिनेते गोविंदा याची आई) यांनी अतिशय लोकप्रिय केली. 

श्यामाच्या 1956 मध्ये आलेल्या ‘भाई भाई’ चित्रपटाला ला मदन मोहन यांचे संगीत होते. मदन मोहन यांची लाडकी गायिका म्हणजे लता मंगेशकर. पण या चित्रपटात गीता दत्तच्या वाट्याला एकच गाणे मदन मोहनने दिले. आणि गीताने त्याचे सोने करून दाखवले. बाकी सर्व गाण्यांपेक्षा गाजलेले हे गाणे होते ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है, वो कौन है जो आकर, ख्वाबों पे छा गया है’. या गाण्यावरचे आता काहीसे बालीश शाळकरी मुलींसारखे वाटणारे नृत्य हीच श्यामाची ओळख बनले. पुढे काही गाजलेल्या गाण्यांवर श्यामाने असेच हातवारे करत नृत्य केले आहे.

1957 ला श्यामाचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. पहिला होता चित्रगुप्तच्या संगीतातला ‘भाभी’. लता-रफी च्या आवाजातील ‘छुपाकर मेरी आंखो को’ किंवा लताच्या आवाजातील ‘जा रे जादूगर देखी तेरी जादूगरी’ ही गाणी तर अभिजातच होती. यातील ‘चल उड जा रे पंछी’ किंवा ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ या प्रचंड गाजलेल्या गाण्यांत श्यामा नव्हती. पण तिचे या गाण्यांइतके लोकप्रिय ठरलेले एक गाणे ‘भाभी’त आहे. ते आहे लताच्या आवाजातील ‘कारे कारे बादरा, जा रे जा रे बादरा, मोरे अटरिया पे शोर मचा’. चित्रपगुप्ताला इतके यश परत कुठल्याच चित्रपटात मिळाले नाही.

1957 चा श्यामाचा बॉक्स ऑफिस हिट दुसरा चित्रपट होता राज कपुर-मीना कुमारी सोबतचा ‘शारदा’. याला संगीत होतं सी.रामचंद्र यांचे. लता-आशा यांची उत्कृष्ठ अशी जी युगल गीतं आहेत त्यात वरचा क्रमांक लागतो तो ‘ओ चांद जहां वो जाये’ या गाण्याचा. साधा अंबाडा, कोपरापर्यंच्या बाह्या असलेले ब्लाऊज, साडी, मोठं कुंकू, छोटेसे कानातले अशी मीना कुमारी. तिच्यासाठी लताचा सुरेल आवाज. तर मोकळ्या केसांची, आधुनिक पंजाबी ड्रेस, मोठ मोठे झुमके असे कानातले, नखरेल डोळ्यांची श्यामा. तिच्यासाठी आशाचा खट्याळ आवाज. फार कमी गाणी अशी असतात की त्यांचे सगळेच रसायन जूळून येते. हे गाणं तसंच आहे. सी.रामचंद्र यांची ‘सिग्नेचर’ असलेला तबल्याचा स्वच्छ ठेका या गाण्यात स्पष्ट ऐकू येतो. याच चित्रपटात आशाच्याच आवाजात श्यामाचे अजून एक गाणे आहे, ‘लहराये जीया, बलखाये जीया, आयी है घडी शरमानेकी’. आशाच्या खट्याळ आवाजाला पडद्यावर श्यामाने त्याच खट्याळ अभिनयाने न्याय दिला आहे.   

1957 हे वर्षे श्यामासाठी नशिबच घेवून आले होते. याच वर्षी जॉनी वॉकर सोबत तिचा ‘जॉनी वॉकर’ याच नावाचा चित्रपटही आला. याला संगीत ओ.पी.नय्यरचे होते. यातील इतर मस्तीखोर गाण्यांसोबत गीता-आशा यांच्या युगल स्वरात एक अतिशय छान गाणं आहे. या गाण्याची वेगळी दखल घेतली गेली पाहिजे. दोन मैत्रिणी बागेत नाचत बागडत आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. आशा भोसलेचा आवाज यात श्यामासाठी वापरला आहे. एरव्ही गीतकाराबाबत हेळसांड करणार्‍या ओ.पी.ने यात प्रतिभावंत हसरतची गीतं वापरली आहेत. हे गाणं आहे ‘ठंडी ठंडी हवा, पुछे उनका पता, लाज आये सखी, कैसे दू मै बता’. एक साधा टॉप आणि खाली आजच्या भाषेतील 3/4 अशी स्लॅक्स. अशा कपड्यातील नायिका तेंव्हा पडद्यावर दिसायच्या नाहीत. बार डान्सर किंवा दुय्यम नायिका यांच्यासाठी हे कपडे असायचे. नर्गिस-श्यामा यांनी हा भेद कमी केला. 

1959 ला शंकर जयकिशनच्या संगीतातील ‘छोटी बेहन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यातील नंदाचे लोकप्रिय गाणे ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ किंवा मेहमुदचे गाजलेले सुबीर सेनच्या आवाजातील ‘मै रंगीला प्यार का राही’ किंवा रेहमानचे मुकेशच्या दर्दभर्‍या आवाजातील ‘जावू कहां बता ए दिल’ रसिकांच्या चांगलेच लक्षात आहेत. पण यातच मन्ना डे-आशाच्या आवाजात एक गोड युगल गीत आहे. हे गाणं बिनाकात टॉपला होतं. रेहमान-श्यामावरच्या या गाण्याचे बोल लिहीले होते हसरत यांनी. हे गाणं होतं, ‘ओ कली अनार की ना इतना सताओ, प्यार करने की कोई रीत बताओ’. मन्ना दाचा आवाज या गाण्यात जो लागला आहे तो पाहून एक शंका येत राहते की पुढे किशोर कुमारने जी शैली उचलली ती अशाच गाण्यांतून तर नव्हे? 

1960 ला हेमंत कुमारच्या संगीतातील ‘दुनिया झुकती है’ मधील ‘गुमसुम सा ये जहां’ (हेमंत-गीता) आणि रवीच्या संगीतातील ‘अपना घर’ मधील ‘तूमसे ही मेरी जिंदगी’ (मुकेश-गीता) ही श्यामाची गाणी चांगलीच होती. पण श्यामाचा या वर्षीचा गाजलेला चित्रपट होता रोशनच्या संगीताची बरसात असलेला ‘बरसात की रात’. 

संगीतकार रोशन, गीतकार साहिर,  गायक रफी, अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि टीका करण्यासाठी का होईना ठोकळा भरत भुषण यांची चर्चा ‘जिंदगी भर नही भुलेगी’ या गाण्यासाठी होत राहते. पण इतर गाण्यांची नाही. याच चित्रपटातील गाजलेली कव्वाली ‘ना तो कारवां की तलाश है’ ही हिंदी चित्रपटांतील उत्कृष्ट कव्वाली पैकी एक. यातील सहभागी इतर कलाकार आणि गायकांचे आवाज यात श्यामासाठी आशा भोसलेचा पण आवाज आहे हे लक्षात रहात नाही. हीच नाही तर यातील इतर कव्वाल्यांमध्येही श्यामा आहे. श्यामाने या कव्वाल्या आपल्या नखरेल अदांनी जिवंत साकारल्या आहेत. ‘मुगल-ए-आझम’ मध्ये निगार सुलतानाने जसे कव्वालीत रंग भरले तशी श्यामाची करामत आहे. या शिवाय लताचे एक अतिशय गोड गाणे याच ‘बरसात की रात’ मध्ये श्यामाच्या वाट्याला आले आहे. साहिरच्या शब्दांतील हे गाणे आहे, ‘मुझे मिल गया बहाना तेरे दीद का, कैसे खुशी लेके आया चांद ईद का’. 

‘भाभी’ च्या यशानंतर चित्रपटाला नाही पण संगीताला बर्‍यापैकी यश लाभलेला चित्रगुप्ताचा चित्रपट म्हणजे ‘जबक’ (1961). श्यामासोबत महिपाल यात नायक होता. हा पोशाखी बी.ग्रेडचा चित्रपट. पण यातील एक गाणं बिनाकात गाजलं. ते होतं लता-रफीच्या आवाजातील 

तेरी दुनिया से दूर 
चले होके मजबूर 
हमे याद रखना 
जावो कही भी सनम
तूम्ही इतनी कसम
हमे याद रखना

नंतर पुढे श्यामाचे चित्रपट येत गेले पण त्यात तिच्या भुमिका दुय्यम होत्या. शिवाय गाणीही लक्षात रहावी अशी नव्हती. पुढे चित्रपट रंगीत झाला (जबकही रंगीत होता) नविन तरूण नायिका आल्या आणि जुन्यांची सद्दी संपली. 

गुरूदत्तच्या ‘आरपार’ मधून श्यामा आणि शकिला दोघीही साधारणत: एकदाच प्रकाशात आल्या. काय विलक्षण योगायोग. दोघीनींही या जगाचा निरोपही सोबतच घेतला. सप्टेंबर मध्ये शकिलाचे निधन झाले आणि आता नोव्हेंबर मध्ये श्यामाने या जगाला अलविदा केले.  

     -आफताब परभनवी.

Thursday 5 October 2017

सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ तूमको न भूल पायेंगे



अक्षरनाम 27  सप्टेंबर 2017

शकिला गेली पण कुणी तिच्या मृत्यूची  दखलही घेतली नाही. (जन्म 1 जानेवारी 1935, मृत्यू 20 सप्टेंबर 2017)  नविन पिढीला तर शकिला म्हणजे कोण हेच कळणार नाही. पण तेच जर ‘बाबूजी धीरे चलना’चा  उल्लेख केला तर सर्वांनाच ते गाणं आठवतं. इथून पुढे बहरलेली गुरूदत्तची कारकिर्द आणि पुढची शोकांतिका लक्षात येते. पुढची दहा वर्षे हिंदी गाण्यांच्या क्षेत्रात टांगा ठेक्याने अधिराज्य गाजविणारा ओ.पि.नय्यर लक्षात राहतो. एक दोन नव्हे तर 50 वर्षांची सर्वात मोठी कारकीर्द लाभलेले गीतकार मजरूह सुलतानपुरी लक्षात राहतात. गाणं गाणारी गीता दत्त तर काळजात घुसूनच बसते. पण उपेक्षा होते ती केवळ हे गाणं जिच्यावर आहे त्या नायिकेची. तिचं नाव शकिला. 

1949 ते 1963 इतकी छोटी 14 वर्षांची तीची कारकीर्द (48 हिंदी चित्रपट). पहिले पाच वर्षे तिचे चित्रपट दुर्लक्षित राहिले. पण ती प्रकाशात आली पहिल्यांदा गुरूदत्तच्या ‘आरपार’ (1954) मध्ये. या चित्रपटातील तीची दोन्ही गाणी अतिशय गाजली. छाया प्रकाशाचा खेळ करणारा गुरूदत्तचा कॅमेरा शकिलाच्या भावपूर्ण मोठ्या डोळ्यांमधील भाव नेमके पकडण्यात यशस्वी झाला. गाण्याचा मादक भाव जसा गीताच्या स्वरांनी नेमका पकडला होता तसाच तो शकिलाच्या डोळ्यांनीही पकडला होता. हे गाणं होतं सदाबहार ‘बाबूजी धीरे चलना’.
 
याच चित्रपटात दूसरं पण एक सुंदर गाणं आहे. ‘हू अभी मै जवां ए दिल’. मजरूह यांची शब्दांवर नेहमीच पकड राहिली आहे. ओ.पी.नय्यर यांच्या संगीताला जेंव्हा जेंव्हा मजरूह, साहिर सारखे प्रतिभावंत गीताकार लाभले तेंव्हा तेंव्हा त्या गाण्यांना अभिजातता लाभली आहे. या गाण्यात शकिलाच्या डोळ्यात एक उदासिनता नशेच्या आणि मादकतेच्या खाली दडलेली समोर येते. ती कुठेतरी स्त्रीच्या सनातन दु:खाशी जावून भिडते. 
‘अलिबाबा चालीस चोर’ (1954) या चित्रपटात राजा मेहंदी अलीच्या सुंदर शब्दांतलं गाणं आहे, ‘ए सबा उनसे केह जरा, क्यू हमे बेकरार कर दिया’. रफी आणि आशाचे रेशमी स्वरधागे चित्रगुप्त/एस.एन.त्रिपाठी यांनी अतिशय नाजूकपणे गुंफले आहेत. पण हा चित्रपट बी.ग्रेडच्या यादीत गेल्याने गोड गाणंही बाजूला पडलं. शकिला सोबत  चित्रपटाचा नायक म्हणून महिपाल आहे. 

गुरूदत्तचाच पुढचा चित्रपट ‘सी.आय.डि.’ (1956) शकिलासाठी अप्रतिम अविस्मरणीय गाणी घेवून आला. परत मजरूह-ओ.पी.नय्यर-रफी-गीता ही भट्टी जमून गेली. ‘आंखो ही आखो मे इशारा हो गया, बैठ बैठ जिने का सहारा हो गया’ हे तसंही ओ.पी.च्या गाण्यातील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक. शकिलाचे भावपूर्ण डोळे पाहूनच मजरूह यांनी हे लिहीलं असावं.  देव आनंद ची जोडी नूतन सोबत विशेष गाजली. मधुबाला-वहिदा सोबतची गाणीही गोड आहेत.  साधना सोबतचे ‘अभि ना जाओ छेाड कर’ विसरताच येत नाही. पण याच यादीत शकिलासोबतच्या या गाण्याचाही क्रमांक लावावा लागेल. त्याशिवाय अशा गाण्यांची यादी पूर्णच होवू शकत नाही.

याच चित्रपटात ‘लेके पेहला पेहला प्यार’ हे शमशाद-रफीच्या आवाजातील गाणं अतिशय लोकप्रिय झालं. हे आहे शकिलावरच. याच गाण्याचा दुसरा दु:खी भाग जो की आशा च्या आवाजात आहे तो फार कमी वेळा ऐकायला अथवा पहायला मिळतो. त्या गाण्यात विरहाचे दू:ख जसे आशाच्या स्वरात आहे तसे ते शकिलाच्या अभिनयात पण उमटलं आहे. धृवपदासारख्या रफी-शमशादच्या ओळी त्यात येत राहतात तेंव्हा शकिला कानांवर हात ठेवते. हा अभिनयही गाण्याच्या आशय पुढे नेतो.  

पुढे हतिमताई (1956), रूपकुमारी (1956), आगरा रोड (1957), चोबिस घंटे (1958) मध्ये तिच्यासाठी गाणी होती. पण त्यांची फारशी दखल घ्यावी इतकी ती चांगली नव्हती. 

शकिला परत एकदा चर्चेत आली ती 1958 च्या ‘पोस्ट बॉक्स नं. 999’ मध्ये. कल्याणजी आनंदजी तेंव्हा कल्याणजी वीरजी शहा नावानं संगीत देत होते. लताचा आवाज मन्ना डे सोबत जूळून येतो हे चोरी चोरी मधून ठळकपणे लक्षात आलं होतं. तेंव्हा याचाच फायदा घेत कल्याणजीनी या चित्रपटात एक गोड गाणं दिलं आहे. ‘मेरे दिल मे है इक बात, केह दो तो बता दू मै’. तरूण सुनील दत्त आणि शकिला बागेत एकमेकांमागे बागडत गात आहेत. शंकर जयकिशनचा प्रभाव गाण्यावर जाणवतो. पण या चित्रपटातील खरं गाजलं ते हेमंतकुमार सोबतचं लताचे गाणे ‘ओ निंद न मुझको आये.’ यात हेमंतकुमारच्या खर्जातील आवाज विरहाला अतियश पोषक वाटतो. तर लताचा गोडवा त्यातील कातरता अजूनच गडद करतो.

काही गाण्यांइतकेच त्यांच्या आधी वाजणारे संगीताचे तुकडे (प्रील्युड) लोकप्रिय होतात. असं एक गाणं ‘काली टोपी लाल रूमाल’ (1959) मध्ये आहे. इतकी वर्षे झाली पण या गाण्याच्या आधीचा माऊथऑर्गनचा तुकडा आजही तितकाच ऐकावासा वाटतो. हे गाणं होतं, ‘लागी छुटे ना अब तो सनम, चाहे जाये जिया तेरी कसम’. संगीताच्या माधुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रगुप्त यांचे संगीत या चित्रपटाला होतं. लता-रफीच्या उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक.  शकिलाच्या चित्रपटांचे हे पण एक वैशिष्ट्य एक तर नायक नवखे होते किंवा बी.ग्रेड चित्रपटातील होते. परिणामी हे चित्रपट दुर्लक्षित राहिले. पण काही गाणी मात्र गाजली. या गाण्यात शकिला सोबत चंद्रशेखर आहे. या चित्रपटातील इतरही गाणी लोकप्रिय ठरली.

1960 मध्ये आलेला शकिलाचा चित्रपट ‘श्रीमान सत्यवादी’ बर्‍यापैकी चर्चेत राहिला कारण त्याचा नायक राज कपुर होता. दत्तराम वाडकरनी शकिलासाठी दोन गोड गाणी यात दिली होती. एक होतं सुमन कल्याणपुरच्या आवाजातील ‘क्युं उउा जाता है आंचल’ आणि दुसरं होतं  सुमन कल्याणपुर-मन्ना डे आवाजातील ‘भिगी हवाओं मे, तेरी अदाओं मे, कैसी बहार है, कैसा खुमार है, झुम झुम झुम ले ले मजा’. शकिलाच्या अभिनयात एक स्वाभविकता राहिलेली आहे. गाण्यांतही तिचे डोळे, चेहर्‍यावरचे हावभाव सहज विभ्रम दाखवतात.

सुनील दत्त प्रमाणेच नवख्या असलेल्या मनोज कुमार सोबत 1961 मध्ये शकिलाचा चित्रपट ‘रेश्मी रूमाल’ आला तेंव्हा त्यातील गाणी गोड असूनही दुर्लक्षीत राहिली. एक तर नायक नवखा आणि दुसरं बाबुल सारखा अपरिचित संगीतकार. राजा मेहंदी अली खां यांनी ‘जूल्फों की घटा ले कर, सावन की परी आयी, बरसेगी तेरी दिल पर हस हसके जो लहरायी’ असे सुंदर शब्द लिहीले आहेत. या गाण्यांत डोळ्यांबाबत जे जे राजा मेहंदी अली यांनी लिहीलं आहे ते ते शकिलाच्याच डोळ्यांना लागू पडतं. 

‘मचले हुये इस दिल मे आरमांन हजारो है
इन प्यासी निगाहों मे तुफान हजारो है’

लगेच दुसर्‍या कडव्यात अशीच सुंदर ओळ आहे

‘आती तो आंखो मे बिजली सी चमकती है
शायद ये मोहब्बत है आंखो से छलकती है’

शकिलाचे नशिबच खराब.  जर हा चित्रपट मोठ्या बॅनरखाली निघाला असता, दुसरा कुणी लोकप्रिय नायक असला असता तर गाणं गाजलं असतं. 

1954 च्या ‘बाबूजी धीरे चलना’ ची लोकप्रियता लाभलेलं अजून एक गाणं शकिलाला 1962 मध्ये भेटलं. चित्रपट होता शम्मी कपुरचा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला ‘चायना टाऊन’. आणि गाणं होतं ‘बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरूबा, डाली हो’. 

शम्मी कपुर म्हणजे शंकर जयकिशनचे संगीत हे समिकरण अजून पक्कं झालं नव्हतं. शम्मी कपुरची जी गाणी शंकर जयकिशन शिवाय गाजली त्यात या गाण्याचा क्रमांक लागतो. या गाण्याला मोठी लोकप्रियता लाभली याचा तोटा असा झाला की यातील दुसरी गाणी काहीशी दुर्लक्षीली गेली. ‘ये रंग ना छुटेगा, उल्फत की निशानी है’ हे रफी-आशाचं अतिशय गोड गाणं. शम्मी कपुर शकिला दोघांनीही अतिशय संयत अभिनय केला आहे. मजरूह सारखा तगडा गीतकार लाभला आहे. पण हे गाणं फारसं ऐकायला मिळतच नाही.  

याच वर्षी ‘टॉवर हाऊस’ (1962) मध्ये संगीतकार रवीने लताच्या आवाजात एक चिरवेदनेचे गाणे दिले आहे, ‘ए मेरे दिले नादान, तू गम से ना घबराना.’ अवखळ, मादक आव्हान देणार्‍या शकिलाने या गाण्यालाही योग्य तो न्याय आपल्या अभिनयाने दिला आहे. याचा विचार व्हायला हवा की वैजयंती माला (देवदास), वहिदा रेहमान (गाईड, तिसरी कसम) यांनी सोज्वळ चेहर्‍याने वेश्येच्या तवायफच्या भूमिका केल्या. पण यांच्याइतकीच ही भूमिका  बार डान्समध्ये प्रभावीपणे साकारणारी शकिला मात्र यांच्याइतकी चर्चेत राहिली नाही. 

‘उस्तादों के उस्ताद’ (1963) हा शकिलाचा शेवटचा चित्रपट. काय येागायोग आहे, शकिलाच्या अतियश गाजलेल्या गाण्यांपैकी एक गाणे हे तिचे शेवटचे गाणे ठरावे. त्या गाण्याचे बोल होते, ‘सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे, ए जाने वफा फिर भी, हम तूम ना जूदा होंगे’. रफीच्या आवाजातील हे गीत प्रदीपकुमार-शकिलावर चित्रित आहे. या गाण्याच्या आधी एक शेर असद भुपालीने लिहीला आहे

वफा के दीप जलाये हुये निगाहों मे
भटक रही हो भला क्युं उदास राहों मे
तूम्हे खयाल है तूम मुझसे दूर हो लेकिन
मै सामने हू चली आओ मेरी धून मे

खरंच आपल्या अतिशय मोजक्या अशा काही अविट गोडीच्या गाण्यांतून शकिला आपल्या समोर येत राहिल. आपल्या कानांत तिची गाणी घुमत राहतील. तिचे भावपुर्ण डोळे पडद्यावर पाहताना एखादी कविताच आपण जिवंतपणे साकर होताना पाहत आहोत असा भास होत राहिल. ‘सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ ना तुमको भूल पायेंगे’.

(शकिला 1963 ला चित्रपट सृष्टीला रामराम ठोकून लग्न करून लंडनला निघून गेली. तिची बहिण नुर सोबत जॉनी वॉकरने लग्न केले. शकिलाची एकूलती एक मुलगी 1991 मध्ये वारली. ... ही माहिती विकीपिडीया वर उपलब्ध आहे. शिवाय तिच्या 48 चित्रपटांची यादीही आहे.) 

     -आफताब परभनवी.

Wednesday 2 August 2017

जॉनी वॉकरचा चेहरा, रफीचा गळा आणि गुरुदत्तचा मेंदू



  • अक्षरनामा, गाता राहे मेरा दिल, २९ जुलै २०१७ 

  • गुरुदत्तचे सिनेमे ‘बाजी’ (१९५१) पासून हिट व्हायला सुरुवात झाली. ‘जाल’ (१९५२), ‘बाज’ (१९५३) असे सलग तीन वर्षं सिनेमे येत गेले. या सगळ्यात गुरुदत्तला सावलीसारखा सोबत होता, बद्रुद्दीन जमालोद्दीन काजी. पहिल्याच सिनेमात त्याच्या पिदक्कड माणसाच्या अभिनयावरून गुरुदत्तनं त्याला नाव दिलं, जे पुढे अतिशय लोकप्रिय ठरलं. इतकं की त्याचं मूळ नावच विसरलं गेलं. ते नाव होतं- ‘जॉनी वॉकर’. 
जॉनी वॉकर हा गुरुदत्तच्या चित्रपटाचा अभिन्न हिस्सा बनला. पहिले तीन सिनेमे झाल्यावर पुढच्या सिनेमात त्याला गाणं मिळालं. या गाण्याची लोकप्रियता पाहून, पुढे त्याच्यासाठी सिनेमात किमान एक तरी गाणं हवंच अशी रसिकांची प्रेमाची सक्तीच निर्माण झाली. 
जॉनी वॉकरच्या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मोहमद रफीचा आवाज. गुरुदत्त-रफी-जॉनी वॉकर हे समीकरण असं काही जूळून आलं की, त्या गाण्यांना एक वेगळंच स्थान प्राप्त झालं. या यशस्वी सूत्रावर पुढे इतरही दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमांत जॉनी-रफी यांची गाणी वापरली. ती गाजलीही. पण जॉनी-रफी गाण्यांची खरी रंगत आहे, ती गुरुदत्तच्याच सिनेमांत. जॉनी वॉकर-रफी-गुरूदत्त या तिघांच्या बाबतीत जुलै महिना महत्त्वाचा. ९ जुलै हा गुरुदत्तचा जन्मदिवस, २९ जुलै हा जॉनी वॉकरचा आणि ३१ जुलै हा रफीचा स्मृतीदिन. 
या सुरेल प्रवासाची सुरुवात झाली ‘आरपार’ (१९५४) पासून. गुरुदत्तसाठी गाण्याऱ्या रफीनं जॉनी वॉकरसाठी खास वेगळा आवाज लावत गायलेलं गाणं होतं, ‘अरे ना ना ना ना तौबा तौबा’. या गाण्यात रफीला तशीच ठसक्यात साथ दिली होती गीतानं. केवळ विनोदी म्हणून या गाण्यांना दुर्लक्षित करता येऊ नये, इतकी ताकद या गाण्यामध्ये होती. 

या गाण्यानं मजरूह-ओ.पी.नय्यर-रफी यांना जॉनी वॉकरची नाळ नेमकी सापडली. रफीसोबत गीताचा आवाजही चपखल बसतो हेही लक्षात आलं. पुढचाच सिनेमा होता ‘मि.अँड मिसेस. ५५’ (१९५५). या सिनेमात रफीची खरंच कमाल आहे. गुरुदत्तसाठी ‘उधर तुम हसी हो’सारखं ‘बिना का गीतमाला’ हिट गाणं गाताना, शिवाय अजून तीन गाणी विविध रंगाची गाताना परत जॉनी वॉकरसाठी वेगळा आवाज काढला. हे गाणं होतं-
जाने कहा मेरा जिगर गया जी
अभी अभी यहीं था, किधर गया जी

रफी-गीताच्या सदाबहार गाण्यात याचा समावेश नक्कीच करावा लागेल. मजरूहसारख्या गीतकारानं शब्दांचे केलेले खेळ रफी-गीताच्या तोंडी इतके चपखल बसले आहेत की, ते आपणही नकळत गुणगुणायला लागतो. एरवी या शब्दांना गीतात कुणी फारसं स्थान दिलं नसतं. ‘कहीं मारे डर के चुहा तो नहीं हो गया, कोने कोने देखा ना जाने कहाँ खो गया’ या शब्दांना तसा काय अर्थ आहे? किंवा ‘सच्ची सच्ची कह दो दिखाओ नहीं चाल रे, तुने तो नहीं है चुराया मेरा माल रे’. पण हेच शब्द ओ.पी.नय्यरच्या चालीत रफी-गीताच्या आवाजात असे काही बनून समोर येतात की, आपण आपल्याही नकळत ठेका धरतो.
पहिल्या दोन सिनेमांतील अनुभवांवरून असेल किंवा लोकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून असेल, पुढचं गाणं मजरूह-ओ.पी.नय्यर या जोडीनं अप्रतिम असं तयार केलं. जॉनी वॉकरच्या गाण्यातील हे सगळ्यात दर्जेदार गाणं आहे. गुरुदत्तने केवळ विनोद निर्मिती म्हणून नाही तर आपल्या चित्रपटाचा आशय समृद्ध करणारा घटक म्हणून या गाण्याकडे लक्ष वेधलं आहे. 
ए दिल है मुश्किल है जिना यहाँ
जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान

मजरूहसारख्या गीतकाराची कमाल आहे की, अतिशय साध्या वाटणार्‍या शब्दांमध्ये फार मोठा आशय, मुंबईच्या जगण्याचं नेमकेपण यात पकडता आलं आहे. १९५० नंतर भारतभरच्या लेखक, गायक, नट, दिग्दर्शक यांचा ओघ मुंबईकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाला. या सगळ्यांना मुंबईच्या ‘बॉलिवुड’नं आपलं मानलं. पोटाशी धरलं. मजरूहने मुंबईचं केलेलं बारीक निरीक्षण, गुरुदत्तला झालेलं मुंबईचं आकलन ओ.पी.नय्यरनं अचूक संगीतबद्ध केलं.
कहीं बिल्डिंग, कहीं ट्रामे, कहीं मोटर, कहीं मिल
मिलता है यहाँ सब कुछ, इक मिलता नहीं दिल
इतक्या साध्या शब्दांत गावांकडून आलेल्या स्थलांतरिताची मानसिकता मजरूह शब्दबद्ध करतो. इथलं व्यवसायाचं भ्रष्ट तत्त्वज्ञान सांगायलाही तसेच शब्द वापरले आहेत
बेघर को आवारा कहते हैं हस हस
खुद काटे गले सबके इसे कहते बिझिनेस
रफीची कडवी संपल्यावर त्याला गीताच्या आवाजात उत्तर आहे- ‘जो है करता वो है भरता, है यहाँ का ये चलन’. अतिशय सोपेपणानं ती मुंबईत जगण्याचं सूत्र त्याला समजावून सांगते. आणि ‘ए दिल है आसान जीना यहाँ’ म्हणत जगण्याची दिशा दाखवते. 
इथं हे गाणं केवळ गाणं उरत नाही. मजरूह-गुरुदत्त-रफी-गीता-ओ.पी.नय्यर-जॉनी वॉकर-कुमकुम सगळ्यांच्याच आयुष्याची मुंबई गाठल्यानंतरची कथा होऊन बसते. हे फार मोठं श्रेय या गाण्याला आहे. त्या वर्षी ‘बिना का गीतमाला’तही हे गाणं हिट ठरलं होतं. 
पुढचा सिनेमा होता ‘प्यासा’ (१९५७). यानं आणि यातल्या गाण्यांनी तर इतिहासच घडवला! यातली गाणी विविध कारणांनी गाजली. पण जॉनी वॉकरच्या तोंडचं गाणं गाजलं ते वेगळ्याच कारणांनी. पुढे चालून ही चाल वडिलांच्या नावावर असली तरी ती आपली आहे, असा दावा राहुल देव बर्मन यांनी केला. आणि सचिनदांनी त्यावर चूप राहून एक प्रकारे मान्यताच दिली. जॉनी वॉकरच्या तोंडचं ते गाणं होतं-
सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये
आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये 

खरं तर विनोदी गाण्यांत फार आशय शोधण्यात अर्थ नसतो. पण साहिरसारख्या प्रतिभावंताच्या हातात जेव्हा अशी गाणी येतात, तेव्हा ते यात आपल्या प्रतिभेची छाप सोडून जातात. तेव्हाचा प्रभावशाली असलेला डावा विचार नकळतपणे या मालिशवाल्याच्या तोंडी त्याच्या व्यवसायाच्या साध्या कृतीतून उमटला आहे. हे सिद्ध करणारी ‘नौकर हो या मालिक, लिडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके है, क्या राजा क्या सैनिक’ ही ओळ या गाण्यात आली आहे. या गाण्यालाही ‘बिना का गीतमाला’ हिट यादीत स्थान मिळालं होतं. (याच वर्षी ‘नया दौर’मधलं जॉनी वॉकरचे ‘मैं बंबई का बाबू नाम मेरा मस्ताना’ हे गाणंही ‘बिना का गीतमाला’त हिट ठरलं होतं.) 
पुढे ‘१२ ओ क्लॉक’ (१९५८)मध्ये ‘देख इधर ओ हसिना’ आणि ‘कागज के फुल’ (१९५९) मध्ये ‘हम तुम जिसे केहते है शादी’ ही दोन गाणी जॉनी वॉकरची आली. पण त्यात काही वेगळेपण नव्हतं. आधीच्याच पठडीतील गाणी होती. सरळच आहे व्यवसायिक गणितं डोक्यात ठेवून ती चित्रपटात आली होती. 
गुरुदत्तच्या ‘चौदहवी का चांद’ (१९६०) ची आजही आठवण निघते, ते ‘चौदहवी का चांद हो’ या रफीच्या गाण्यावरून. पण यासोबतच यातलं रफीचं दुसरं गाणं ‘मिली खांक में मुहोब्बत’ ‘बिना का गीतमाला’त गाजलं होतं. तिसरंही गाणं रफीच्या आवाजात जॉनी वॉकरसाठी होतं. तेही गाजलं. एकाच गायकाची एकाच चित्रपटातील तीन गाणी ‘बिना का गीतमाला’त हिट व्हायचा दुर्मीळ योग या वर्षी आला. जॉनी वॉकरसाठीचं रफीचं गाणं होतं-
मेरा यार बना है दुल्हा और फुल खिले है दिल के
मेरी भी शादी हो जाये दुवा करो सब मिल के

गुरुदत्तच्या गटात न बसणारा संगीतकार रवी व शायर शकिल या दोघांनीही सुंदर गाणी देऊन संधीचं सोनं केलं. गाण्याला रवीनं कव्वालीचा हलकासा रंग चढवला आहे. ‘चौदहवी का चांद हो’ गाणारा रफी इथं कमालीचा वेगळा सूर लावतो. रफीच्या आवाजात एक आश्चर्य आहे. दिलीपकुमार, देव आनंद, शम्मी कपूर, गुरुदत्त आणि जॉनी वॉकर यांच्यासाठी त्याचा आवाज असा काही लागतो की, तो आवाज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग वाटावा.
पुढे गुरुदत्तचा ‘साहब बिबी और गुलाम’ आला. पण त्यात जॉनी वॉकर नव्हता. गुरुदत्त गेल्यावर त्याचा अर्धवट राहिलेला चित्रपट ‘बहारे फिर भी आयेंगी’ (१९६६) पडद्यावर आला. त्यात मात्र जॉनी वॉकरचं गाणं होतं- ‘सुनो सुनो मिस चॅटर्जी’. गाणं अर्थातच फार विशेष नाही. ओ.पी.नय्यरनं आपल्या आधीच्याच साच्यात गाणं बसवलं आहे. 

जॉनी वॉकरच्या गुरुदत्त व्यतिरिक्त इतरांच्या चित्रपटातही गाणी आहेत. त्यातील काही तर चांगली गाजलेलीही आहेत. (मधुमती – ‘जंगल में मोर नाचा’, चोरी चोरी- ‘ऑल लाईन किलीयर’, दूर की आवाज- ‘हम भी अगर बच्चे होते’,  रेल्वे प्लॅटफॉर्म- ‘देख तेरे भगवान की हालात’, अजी बस शुक्रिया- ‘सच कहता है जॉनी वॉकर’, ‘घर की मुर्गी दाल बराबर’). ओ.पी. नय्यर किंवा सचिन देव बर्मन यांच्या शिवाय इतर संगीतकारांकडचीही यातील गाणी आहेत. पण जॉनी वॉकरच्या गाण्यांना खरा रंग चढला तो गुरुदत्तकडेच. त्यातही परत संगीतकार ओ.पी. असतानाच. 
या महिन्यात जॉनी वॉकर-रफी-गुरूदत्त तिघांच्याही आठवणी निघतात. तिघांच्याही स्मृतीला अभिवादन. 
(या सदरातील हा शेवटचा लेख आहे. आपण रसिकांनी गेली सहा महिने सदराला उत्तम दाद दिली त्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ लेखक हिंदी गाण्यांचे तज्ज्ञ विजय पाडळकर, जुन्या गाण्यांच्या अभ्यासिका नीलांबरी जोशी यांसारख्यांनी आवर्जुन मेल करून कळवलं. त्यांचे आभार. संपादक राम जगताप, मजकुराची आखणी करणारे कलाकार यांचेही आभार. हे सदर माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. रसिकांना ब्लॉगला भेट देता येईल. parbhanvi.blogspot.in असंच ब्लॉगचं नाव आहे. – अाफताब परभनवी)  
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

Friday 28 July 2017

बिमलदा-मन्नादा तीन रंगी इंद्रधनुष्य



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 22 जूलै 2017
१२ जुलै हा बिमल रॉय यांचा जन्मदिन. हे वर्षे त्यांच्या स्मृतीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. (मृत्यू ८ जानेवारी १९६६). बिमल रॉय यांच्या चित्रपटातील सामाजिक आशय जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापरही. यात मोठा वाटा अर्थातच सलिल चौधरी (‘दो बिघा जमीन’, ‘नौकरी’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘प्रेमपत्र’, ‘अपराधी कौन’, ‘परिवार’, ‘उसने कहा था’, ‘काबुलीवाला’) आणि सचिन देव बर्मन (‘देवदास’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘बेनझिर’) यांचाच राहिला आहे.
बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटांत बंगाली संगीत आणि त्यातही परत विशेषत: बाऊल संगीत, रविंद्र संगीत यांचा वापर मन्ना डेच्या आवाजात करून घेतला. हा वापर त्यांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनून राहिला आहे. भक्तीरंग-देशप्रेम-लोकसंगीत असे तीन रंग मन्ना डेच्या आवाजात बिमल रॉय यांच्या चित्रपटात दिसतात.  
बिमलदांच्या 'परिणीता'ला (१९५३) अरुण कुमार मुखर्जींचे संगीत आहे. यात एकतारीवर एक साधु गात आहे-
चली राधे रानी अखियों में पानी
अपने मोहन से मुखडा मोड के
छोड के मोहन की मिठी मुरलिया
छोड के गोकुल की ये कुंज गलिया
नैनन का नाता तोड के

भरत व्यास यांच्या शब्दांतच एक संगीत असतं. एकतारीचा आवाज, तबल्याचा साधा ठेका आणि मन्नादाचा घोटीव आवाज इतक्याच सामग्रीनं या गाण्यात पुरेपुर आर्तता भरली गेली आहे. मीनाकुमारी-अशोककुमार यांचा हा चित्रपट. यातच आशाचे लोकसंगीतावरचे लग्नसमारंभाचे गाणे ‘गोरे गोरे हाथों मे मेहंदी लगाके’ फार छान आहे. 
'देवदास' (१९५५) मध्ये सचिनदेव बर्मन यांनी मन्नादा आणि गीताचा आवाज वापरून दोन बहारदार गाणी दिली आहेत. मन्नादासोबत गीताचा जो एक अस्सल बंगाली सूर लागतो तो अफलातूनच. त्या मातीचाच काहीतरी गुण असावा. ही झाक इतरांच्या आवाजात येत नाही. एकतारीसोबत बासरीचा गोड वापर सचिनदांनी केला आहे. 
आन मिलो आन मिलो शाम सावरे
ब्रिज में अकेली राधे खोयी खोयी सी रे

पारो लहानपणी हे गाणं ऐकत आहे असा प्रसंग आहे. आधीच्याही गाण्यात राधा-कृष्णाची ताटातूट आहे. पण आधीच्या गाण्यात मिलनाची शक्यता नाही. पण या गाण्यात मात्र श्याम राधेला परत येऊन भेटेल ही आशा जिवंत आहे. हा बारकावा मन्नादांच्या गीताच्या आवाजातही दिसतो.
याच चित्रपटात अजून एक गाणं, पण अतिशय वेगळ्या भावावस्थेतील मन्नादा-गीताच्या आवाजात आहे. 
साजन की हो गयी गोरी, साजन की हो गयी
अब घर का आंगन विदेस लागे रे

लग्न ठरलेली पारो अंगणात बसली आहे. आणि ती साधु-संन्यासिनीची जोडी रस्त्यावर गाणे म्हणते आहे. अप्रतिम लावण्यवती सुचित्रा सेन हिचा चेहरा मात्र उदास आहे. ही उदासी लग्न होऊन आई-वडिलांचे घर सोडायचे आहे यापेक्षाही देवदासशी लग्न होत नाही यासाठी आहे. गाण्याचा मूड अतिशय आनंदी ठेवत त्या पार्श्वभूमीवर सुचित्रा सेनचा उदास चेहरा, शुन्यातले डोळे अशी एक वेगळी कमाल बिमल रॉय यांनी साधली आहे. गाण्याच्या शेवटी सहन न होऊन पारो (सुचित्रा सेन) पळत माडीवर जाते आणि दार बंद करून आपल्या हुंदक्याला वाट करून देते. या गाण्यात नवऱ्यासाठी ‘साजन’ शब्द वापरून साहिरनं कमाल केली आहे. म्हणजे ‘साजन की हो गयी’ असे गाण्याचे शब्द आहेत आणि प्रत्यक्षात ती साजन म्हणजेच प्रियकरापासून दूर चालली आहे. 
याच पद्धतीचे बंगाली भजन अजून एका चित्रपटात बिमलदांनी मन्नादांच्या आवाजात वापरले आहे. ‘परख’ (१९६०) मध्ये शैलेंद्रच्या शब्दांतील
क्या हवा चली रे, बाबा ऋत बदली
शोर हैं गली गली
सौ सौ चुहे खायके बिल्ली हज को चली

या गाण्याचा उपयोग मात्र कुठले वैयक्तिक दु:ख व्यक्त न करता सामाजिक परिस्थतीवर भाष्य करण्यासाठी करण्यात आला आहे. शैलेंद्रवरची डाव्या विचारांची छाप या गाण्यांत स्पष्ट दिसते. 
पहले लोग मर रहे थे भूक से, अभाव से 
अब ये मर न जाये कहीं अपने खाव खाव से 
मिठी बात कडवी लागे, गालीया भली
क्या हवा चली रे बाबा, ऋत बदली
पहिल्या तिन्ही गाण्यांत खोल कुठेतरी दु:खाची आर्तता दाखवणारा मन्नादांचा आवाज, इथे विनोदाचा सूर लावत खोल सामाजिक विषादाचा रंग आपल्या आवाजात दाखवतो. तीन संगीतकार, तीन गीतकार आणि एकच गायक यांच्याकडून आपल्या हवा तसा बंगाली भक्तिसंगीताचा वापर करून घेणे ही कमाल नक्की बिमल रॉय यांचीच. 
या बंगाली भजनांच्याप्रमाणेच मन्नादाच्या आवाजात देशप्रेमाची गाणी वापरून एक अनोखा रंग बिमलदांनी आपल्या चित्रपटात भरला आहे. पण अर्थात ही गाणी १९६० नंतरची आहेत. 
'काबुलीवाला' (१९६१) मध्ये सलिल चौधरींनी मन्नादांकडून जे गाणं गाऊन घेतलं, त्या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. एरव्ही देशप्रेमाची गाणी स्फूर्ती, जोश निर्माण करणारी, सैनिकांबद्दल आस्था निर्माण करणारी असतात. पण या गाण्यांत ‘सागरा प्राण तळमळला’सारखे एक निराळेच कारुण्य आहे. हे सुंदर गाणे आहे-
ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन
तुज पे दिल कुर्बान

देशभक्तीच्या गाण्यांसाठी हातखंडा असलेल्या प्रेम धवन यांचेच हे शब्द आहेत. रबाबसारखे अफगाणी वाद्य वापरून एक विलक्षण परिणाम सलिल चौधरींनी साधला आहे. मन्नादांच्या गळ्यातील फिरत त्या रबाबच्या सुरावटीचा पार्श्वभूमीवर वापर करत जो करुण परिणाम साधते, त्यानं अजूनच काळीज तुटते. सी.रामचंद्र, ओ.पी.नय्यर, वसंत देसाई यांच्या सारख्यांनी ताकदीने देशप्रेमाची गाणी दिली. पण जो रंग सलिल चौधरींनी यात भरला आहे, तो काहीतरी वेगळाच आहे. 
याच वर्षी आलेल्या ‘उसने कहा था’ (१९६१) मध्येही देशप्रेमाचे गाणे सलिल चौधरींनी मन्नादांच्या आवाजात दिले आहे-
जानेवाले सिपाही से पुछो
वो कहा जा रहा है

या गाण्यासाठी ट्रम्पेटचा-कोरसचा वापर करून वेगळा परिणाम साधला आहे. यात समूहमनाचा आविष्कार कसा घडेल याचा विचार केला आहे. ही रचना हैदराबादचे शायर मकदूम मोईनोद्दीन यांची आहे. मकदूम अशा मोजक्या शायरांपैकी आहेत की, त्यांच्या आठवणीत त्यांच्या गावच्या लोकांनी त्यांचे स्मारक उभारले. हैदराबादच्या निजाम सागर तळ्याच्या काठावर मकदूम यांचा देखणा पुतळा तेव्हाच्या चंद्राबाबू नायडू सरकारने उभारला आहे. 
देशप्रेमाचे तिसरे गाणे ‘बंदिनी’ (१९६३) मध्ये सचिन देव बर्मन यांनी दिले आहे. शैलेंद्रची लेखणी फासावर चढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची भावना व्यक्त करताना लिहिते-
मत रो माता लाल तेरे बहुतेरे 
जनम भूमी के काम आया मैं बडे भाग हैं मेरे 

शैलेंद्रला शब्द अतिशय वश आहेत. फासावर चढणाऱ्या शहिदाच्या तोंडी असे शब्द त्याने दिले आहेत-
फिर जन्मुंगा उस दिन जब आझाद बहेगी गंगा
उन्नत भाल हिमालय पर जब लहरायेगा तिरंगा 
एका साध्या संथ लयीत मन्नादांनी हे गाणे गायले आहे. जसा की गंगेचा प्रवाह. त्याला आपल्या प्रवासाचे प्रयोजन नीट कळलेले आहे. आता त्याला कुठलीही घाई गडबड नाही. आपण निवडलेला मार्ग बदलणार नाही, आपले प्राक्तन हेच राहणार आहे. देशासाठी लढणाऱ्या या सैनिकालाही आपल्या आयुष्याचे प्राक्तन समजले आहे. दोन पावलांवर मृत्यू उभा आहे. सगळी खळबळ संपून गंगेच्या शांत प्रवाहासारखी एक स्थिरता त्याच्या स्वरांत उमटत आहे. ही शांतताच आपल्याला ऐकताना अस्वस्थ करून जाते. जास्त तीव्र स्वरात साधला जाणार नाही असा परिणाम सचिनदेव बर्मन यांनी मन्नादांच्या आवाजात या संथ लयीत साधला आहे. 
बिमल रॉय यांच्या चित्रपटात मन्नादांच्या आवाजाचा अजून एक रंग पण फुललेला आहे. तो म्हणजे लोकसंगीताचा-शास्त्रीय संगीताचा. ‘दो बिघा जमीन’ (१९५३)मधील ‘धरती कहे पुकार के’ आणि ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ ही दोन गाणी, तसेच ‘मधुमती’ (१९५८) मधील ‘चढ गयो पापी बिछुआ’ आणि ‘परिवार’ (१९५६) मधील लतासोबतची मन्नादांची जुगलबंदी ‘जा तोसे नाही बोलत’ खूप सुंदर आहेत. पण यापूर्वीच्या लेखांत त्यांच्यावर लिहिलेले असल्याने इथे परत उल्लेख टाळले आहे.
बिमल रॉय यांना जाऊन ५० वर्षे उलटली. मन्नादांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षी सुरू होते आहे. बिमल रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त ही एक आठवण!

Monday 17 July 2017

सुमिता सन्याल- तेरे बिना जिया लागे ना!


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 15 जूलै 2017
आनंद’ हा अतिशय गाजलेला चित्रपट. राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या भूमिका तर सगळ्यांच्याच स्मरणात ताज्या आहेत. अगदी जॉनी वॉकरही लक्षात राहतो. अमिताश सोबतचा डॉक्टर मित्र म्हणून रमेश देव आणि सीमा देव ही मराठमोळी जोडीही लक्षात राहते. मुकेश (‘कहीं दूर जब दिन ढल जाये’, ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’), मन्ना डे (‘जिंदगी कैसी ये पहेली हाये’) यांचेही सूर कानात घुमत राहतात. 
या सोबतच लताच्या आवाजातील एक नितांत गोड गाणं या चित्रपटात आहे. गाणं मूळ बंगाली आहे. त्याच चालीवर गीतकार योगेश यांनी हिंदीत शब्दरचना करून दिली. ते गाणं म्हणजे,
ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कही जिया लागे ना

हे गाणं जिच्या तोंडी आहे ती नायिका हिंदी रसिकांना फारशी परिचित नव्हती. ती म्हणजे बंगाली अभिनेत्री सुमिता संन्याल (जन्म ९ ऑक्टोबर १९४५). तिचं परवा, ९ जुलैला वयाच्या ७१ व्या वर्षी कोलकात्यात हृदयविकारानं निधन झालं. 
सडपातळ अंगकाठी असलेली सुमिता अतिशय देखणी होती. बंगालीमध्ये चांगली लोकप्रियता मिळवलेल्या सुमिताचे जेमतेम चारच हिंदी चित्रपट आले.
पहिला चित्रपट होता हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आशिर्वाद’ (१९६८). सुमितासोबत या चित्रपटात अशोककुमार व संजीवकुमार यांच्या भूमिका होत्या. अशोककुमार यांचं लहान मुलांसाठीचं गाजलेलं गाणं ‘रेलगाडी’ याच चित्रपटात आहे. अजून दोन गाणी अशोककुमार यांच्याच आवाजात यात आहेत. मन्ना डे यांचं सुंदर गाणं ‘जीवन से लंबे है बंधू, ये जीवन के रस्ते’ यात आहे. 
सुमिता सन्यालच्या वाट्याला दोन गाणी लताच्या आवाजात आलेली आहेत. पहिलं गाणं आहे
इक था बचपन
छोटा सा नन्हा सा बचपन

गुलजार यांनी हे गाणं लिहिताना एक वडील आणि छोटी मुलगी/मुलगा यांच्या संबंधात अतिशय साधी, पण आशयघन ओळ लिहिली आहे -
टेहनी पर चढके जब फुल बुलाते थे
हाथ उसके वो टेहनी तक ना जाते थे
बचपन के दोन नन्हे हाथ उठाकर
वो फुलों से हात मिलाते थे
तरुणपणीचा अशोककुमार लहानग्या सुमिताला कडेवर घेऊन तिची फुलांना हाथ लावण्याची मनोकामना पूर्ण करतो. वसंत देसाईंचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. गाण्याला निसटून गेलेल्या बालपणाच्या हूरहुरीची झाक आहे. एक कारुण्य भरून राहिलं आहे. स्टुडिओत रेकॉर्डिंग म्हणून हे गाणं गाताना दाखवलं गेलंय.
याच चित्रपटातलं दुसरं पावसाचं सुंदर गाणं आहे- 
झिर झिर बरसे सावनी आखियां
सावरीया घर आ ऽऽऽ
तेरे संग सब रंग बसंती
तुझ बीन सब सुना ऽऽऽ   

गीतकार गुलजारच असल्यामुळे ‘सावनी आखियां’, ‘रंग बसंती’, ‘रेशमिया बुंदनिया’सारख्या उपमा येत राहतात. गाणं अतिशय गोड आहे. या गाण्यात लताचाच आवाज वेगळ्या ट्रॅकवर रेकॉर्ड करून लतालाच साथ म्हणून वापरला आहे. हा प्रयोगही कानाला गोड वाटतो. असा प्रयोग राहुल देव बर्मन यांनी आधी केला होता. 
सुमिताला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती ‘आनंद’मुळेच. या चित्रपटातील तिच्या वाट्याला आलेलं गाणं केवळ अफलातून आहे. लता मंगेशकरनं १९७४ ला पहिल्यांदा भारताबाहेर कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम झाला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये. पाच हजारापेक्षा जास्त क्षमता असलेला हा हॉल तेव्हा गच्च भरला होता. लताने जी काही मोजकीच गाणी या कार्यक्रमासाठी निवडली होती, त्यात या गाण्याचा समावेश होता. (‘मेंदीच्या पानावर’ हे मराठी गाणंही या कार्यक्रमात होतं.)  या गाण्याचं मूळ बंगाली गाणं या कार्यक्रमात लतानं सादर केलं होतं.
‘ना जिया लागे ना’ या पहिल्या ओळीनंतर लताचा आवाज टप्प्याटप्प्यानं जो चढत जातो, त्याला तोड नाही. हे गाणं अक्षरश: केवळ लताच आहे म्हणून गाऊ शकते. किंवा केवळ लतासाठीच हे गाणं सलिल चौधरी यांनी रचलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
गीतकार योगेश यांनी तशी फार कमी गाणी लिहिली आहेत. त्यांना दिलेल्या बंगाली गाण्याच्या चालीवर त्याच भावनेनं ओथंबलेलं हिंदी गीत लिहायचं म्हणजे खरंच कमाल होती. योगेश यांनी आपल्या प्रतिभेनं या गाण्याला पूर्ण न्याय दिला जाईल असेच शब्द लिहिले आहेत. बंगाली गाण्याची पहिली ओळ होती ‘ना मोनो लागे ना’. 
जिना भुले थे कहा याद नहीं
तुझको पाया हैं जहा सांस फिर आयी वहीं
जिंदगी हाय तेरे सिवा भाये ना

दोनच कडव्याचं छोटं गाणं आहे. दुसऱ्या कडव्यात ही उत्कटता अजूनच वाढली आहे. 
तुम अगर जावो कभी जावो कही
वक्त से कहना जरा वो ठहर जाये वोही
वो घडी वोही रेह ना जाये ना
या सगळ्या गाण्यात जी छोटी छोटी स्वरवाक्यं येत राहतात, ती आपल्या गळ्यातून काढण्यासाठी गायकाला काय कसरत करावी लागली असेल हे आपण लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येतं. अशी अतिशय थोडी गाणी आहेत, जिच्यात गायिकीचा अगदी कस लागतो. सतारीचे, व्हायोलिनचे जे तुकडे या गाण्यात येतात, ते स्वतंत्रपणे ऐकावेत इतके सुंदर आहेत. सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन आणि खय्याम हे असे संगीतकार आहेत की, ज्यांनी आपल्या संगीतात प्रचंड प्रयोग केले. विविध गायकांच्या गळ्यातून ते उत्तमरीत्या उतरवून घेतले.  
सुमिताच्या वाट्याला हे अप्रतिम गाणं आलं. ‘मेरे अपने’ (१९७१) आणि ‘गुड्डी’ (१९७१) हे दोन चित्रपट तिला मिळाले, पण यातल्या तिच्या भूमिका छोट्या होत्या. शिवाय गाणी तिच्या वाट्याला आली नाहीत. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र तिला खूप लोकप्रियता मिळाली. १९९३ पर्यंत ती बंगाली चित्रपटांत काम करत होती. 
सुमिताच्या वाट्याला तीनच हिंदी गाणी आली. ‘ना जिया लागे ना’सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनात तिला कायमस्वरूपी स्थान मिळालं. 
सुमिताच्या आत्म्याला शांती लाभो!   
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   
a.parbhanvi@gmail.com

Tuesday 11 July 2017

गीता + गीता + देवआनंद एक भन्नाट कॉकटेल


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 8 जूलै 2017

 ‘शोखियों मे घोला जाये फुलों का शबाब, उसमे फिर मिलायी जाये थोडीसी शराब, होगा युं नशा जो तय्यार, वो प्यार है’ असं नीरज यांचं गाणं  सचिनदेव बर्मन यांनी ‘प्रेम पुजारी’ (1970) मध्ये दिलं होतं. पण त्याच्या 20 वर्षे आधीच प्रेमाच्या नशे सारखीच नशा संगीताच्या बाबतीत त्यांनी घडवली होती. एक खट्याळ गीता (बाली) घ्यायची, दुसर्‍या अवखळ गीता (दत्त) चा कोवळा मस्तीवाला आवाज घ्यायचा, एक देखणा देव आनंद घ्यायचा, एकदम ताज्या तरूण रक्ताचा गुरू दत्त नावाचा दिग्दर्शक घ्यायचा, एकदम नविन कोरं करकरीत पार्श्वसंगीत वापरायचं, आपल्याच लिखाणाच्या मस्तीत बुडालेल्या साहिरचे शब्द घ्यायचे- या सगळ्याची पडद्यावर जी नशा तयार होते तिचं नाव होतं..

तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो इक दांव लगा ले

‘बाजी’ (1951) मधील या गाण्याला आता 65 वर्षे उलटून गेली. अजूनही याची नशा उतरत नाही. गीता (बाली) साठी गीता (दत्त) नं गायलेली गाणी आणि तेही देखणा देवआनंद नायक असताना हे एक अफलातूनच प्रकरण आहे.  वरच्या गाण्याची तर खुप चर्चा झाली. याशिवाय याच चित्रपटातील  दुसरं एक गाणं ‘देखके अकेली मुझे बरखा सताये’ याबाबत याच सदरात आधीच्या लेखात उल्लेख आलाही आहे (10 जून 2017). पण अजून एक मस्त गाणं यात आहे

सुनो गजर क्या गाये, समय गुजरता जाये
ओ रे जीनेवाले, ओ रे भोलेभाले
सोना ना, खोना ना

साहिर स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरूण पिढीला फाळणीच्या पारतंत्र्याच्या सगळ्या जखमा विसरून पुढे पुढे जायला सुचवतो आहे. त्या पिढीचंच तो प्रतिनिधीत्व करतो आहे. ‘बिछडा जमाना कभी हात ना आयेगा, दोष न देना मुझे फिर पछतायेगा’ असं म्हणत एक नविन दिशा दाखवतो आहे. या चित्रपटात सगळेच नविन-तरूण-ताजे होते. अगदी सचिन देव बर्मन वयानं मोठे असूनही त्यांनी एकदम नविन संगीत दिलं होतं. तोपर्यंतचा गीताचा भक्ती संगीतातला आवाज, विरही आवाज इथे वेगळाच उमटला होता. काहीतरी नविन कोर्‍या कपड्यासारखं आल्हाददायक प्रसन्न वेगळं रसिकांच्या कानावर आलं. समीक्षकांनी तेंव्हा नाकं मुरडले पण सामान्य रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. गाणी हिट झाली. सिनेमा बॉक्स ऑफिसवरही धूम चालला. किशोर कुमारची जी शैली पुढे लोकप्रिय झाली त्याच शैलीतलं पहिलं गाणंही याच चित्रपटात होतं, (तेरे तिरों मे छुपे प्यार के खजाने है). 

गीतासाठी गाणारी गीता आणि सोबत देव आनंद हे नशिलं समिकरण लगेच दुसर्‍याच वर्षी जाल (1952) मध्येही रसिकांना अनुभवायला मिळालं. अर्थात संगीत सचिनदांचंच होतं. यात लताच्या आवाजात मस्तीखोर गाणं ‘चोरी चोरी मेरी गली आना है बुरा’, निसर्गाचं अप्रतिम वर्णन असलेलं ‘पिघला है सोना दूर गगन मे’, लता-हेमंत कुमार यांच्या आवाजातील सदाबहार ‘ये रात ये चांदनी फिर कहां, सुन जा दिल की दास्तां’  पण लता-किशोरच्या गाण्याची नशा काही औरच. ते गाणं आहे

दे भी चुके हम दिल नजराना दिल का
छोडो भी ये राग पुराना दिल का   

आता यात पुराना म्हणताना जो झटका गीता (दत्त) गाताना आणि गीता (बाली) पडद्यावर देते तो निव्वळ जीवघेणा. त्याची संगीतशास्त्रात व्याख्या करणं मुश्किल. जसं की किशोर च्या गाण्यात असतं. तो मनानंच गाण्याला असं काही वळण देतो, असे काही शब्द उच्चारतो, असे काही सूर वेगळे लावतो की सचिनदासारखे संगीतकार सोडले तर इतरांची पंचाईतच व्हावी.  

गुरू दत्तनं पुढं ओ.पी.नय्यरला घेवून ‘बाज’ (1953) प्रदर्शित केला. त्यात स्वत:च नायकाची भूमिका केली. त्यातही गीतासाठी गीताची दोन गाणी आहेत. पण आधीची मजा त्यात नाही. शिवाय देव आनंद त्यात नाही.
सचिनदांच्या संगीतात परत हे सगळं जमून आलं नाही पण अनिल विश्वासनी ‘फरार’ (1955) मध्ये नायकाच्या भूमिकेत देव आनंद असताना गीतासाठी गीताचा आवाज जूळवून आणला. यातली गीताची गीतासाठीची तीन गाणी मस्त आहेत. 

‘जी भर के प्यार कर लो, अखिया दो चार कर लो
सुनो ये रात नही है एक तीन चार की
सुनो ये रात है बस दो दिलों के प्यार की

आता या गाण्यात काव्य म्हणून काहीच नाहीच. प्रेम धवनलाही गीतकार म्हणून मर्यादा आहेत. गीताच्या नृत्यालाही प्रचंड मर्यादा आहेत. या गाण्यात गीताचं नाचणं शाळकरी मुलीचं प्राथमिक वाटतं. पण गाण्यात मस्ती आहे. दुसरं गाणं अप्रतिम आहे. 

‘हर इक नजर इधर उधर, है बेकरार तेरे लिये
मेहफिल का दिल धडक रहा, है बार बार मेरे लिये’

आणि मग गीताचा आवाज जो सुटतो, 

‘हू मै इक नया तराना, एक नया फसाना, 
एक नयी कहानी हू मै, 
एक रंग रंगीली, इक छैल छबिली 
मद मस्त जवानी हू मै’ 

आणि त्यावर गीताच्या खरंचच मदमस्त अदा. क्लब मधल्या प्रत्येक टेबलापाशी जावून गीता आपल्या विभ्रमांनी तरूणांना घायाळ करते आहे आणि देव आनंद आपल्यातच मग्न एका टेबलावर एकटाच बसून आहे. 

तिसरं गाणं ‘दिल चुरा लू चुरा लू दिल मे छूपी बात, बडे बडे दिलवाले भी रेह जाये मलते हात’ छान आहे पण त्याच्या संगीतावर सी. रामचंद्रच्या ‘अलबेला’च्या संगीताची छाप जाणवत राहते. अजून एक गाणं गीताच्याच आवाजात आहे ‘इक रात की यह प्रीत’ पण ते विशेष नाही. 

गीता दत्तचा भाऊ मुकूल रॉय याच्या संगितानं नटलेल्या ‘सैलाब’ (1956) मध्ये गीतानं गायलेली एक दोन नाही तर तब्बल आठ गाणी आहेत. ओ.पी.नय्यरच्या ‘मिस कोका कोला’ (1955)  मध्येही गीता गीतासाठी गायली आहे.  पण या दोन्ही चित्रपटात देव आनंद नाही.

गीताबालीचा देव आनंद सोबतचा गीताच्या आवाजातला चौथा चित्रपट म्हणजे ‘मिलाप’ (1955). एन.दत्ताने यात गीताच्या आवाजात तीन मस्त गाणी दिली आहेत. 

‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहा
बाबूजी तूम ऐसा दिल पाओगे कहा’

साहिरसारखा प्रतिभावंत कवी असेल तर गाण्याच्या शब्दांना आपोआपच एक वजन येते. ते शब्द अगदी साधे असले तरी. साहिरच्या गीतात बर्‍याचदा आढळणारा अवघड उर्दू शब्दांचा वापर इथे नाही. परिणामी गाणं गीताच्या अवखळ आवाजात चपखल बसलं आहे. गीताबालीच्या नृत्याला मर्यादा असल्याने तिच्याकडून किमान अदांमधून  परिणाम साधायला हवा हे ओळखून तसं नृत्य या गाण्यावर बसवल्या गेलं आहे. 
दुसरं गाणं 

‘बचना जरा ये जमाना है बुरा
कभी मेरी गली मे न आना’ 

गीतानं रफी सोबत गायलं आहे. पण हा रफीचा आवाज देव आनंद साठी नसून जॉनी वॉकर साठी आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेला देव आनंद आणि त्याच्या सोबत आंधळी कोशिंबीर खेळणारी गीता बाली असा प्रसंग आहे. सोबत जॉनी वॉकर आणि मित्र-मैत्रिणींचा घोळका. जॉनी वॉकर साठी रफीनं गायलेली गाणी हे एक स्वतंत्रच प्रकरण आहे.

तिसर्‍या गाण्यात स्पॅनिश ‘ला जोटा’ नावाच्या लोकसंगीतात वापरल्या जाणार्‍या वाद्यांचा वापर फार सुरेख केला आहे. त्या काळातील काही गाण्यांमध्ये ओ.पी.नय्यर, मदन मोहन सारख्यांनी याचा अतिशय कल्पक वापर करून घेतला आहे. हे गोड गाणं आहे ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बाते’.

काळी टोपी, कोट घातलेला गरीब चेहरा करून बसलेला देव आनंद आणि त्याच्या भोवती नाचणारी गीताबाली.  या गाण्यात एन. दत्तानं गोव्याच्या लोकसंगीताचे रंग भरले आहेत. या चित्रपटातील गाण्यांवरच ऐक गोव्याची छाप आहे. साहिरच्या शब्दांतही एक वेगळेपण आहे

‘मै बहार का शौक फुल हू, अक्ल मर मिटे ऐसी भूल हू
धूली धूली है घुली घुली है राते’

या शब्दांसाठी गीताचाच खट्याळ मादक स्वर हवा. काही गाण्यांमध्ये गीताच्या आवाजात जो परिणाम साधला जातो तसा दुसर्‍या कुणाच्या अवाजात शक्य नाही. साहिर मजरूह यांच्यासारख्यांना फार चांगल्या पद्धतीनं गीतासाठी शब्द रचता आले आहेत. ओ.पी.नय्यर आणि सचिनदेव बर्मन यांना गीताच्या आवाजाचा वेगळा पैलू फार चांगला पकडता आला.   

पंकज मलिकच्या संगीतात ‘जलजला’ (1952) मध्येही गीतासाठी गीता गायली आहे. यातही देव आनंद आहे. पण यातली गाणी विशेष भावून जात नाहीत. गीताचा तो खट्याळ सूर पंकज मलिकला पकडता आला नाही म्हणूनही असावं.

दोन्ही गीता 1930 ला जन्मल्या. याच महिन्यात 20 तारखेला गीता दत्तचा स्मृतीदिन आहे. आधी 1965 ला गीता बाली गेली. आणि लगेच 1972 ला गीता दत्तही गेली. अतिशय कमी आयुष्य या दोघींना लाभले पण ‘बाजी’ पासून गीताने गीतासाठी गायलेल्या खट्याळ गाण्यांचा खळाळता झरा रसिकांसाठी मात्र आत्तापर्यंत वाहतच राहिला आहे.