Monday 20 November 2017

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील ‘श्यामा’ नावाचे रंगीत स्वप्न


अक्षरनामा, 18  नोव्हेंबर 2017

श्यामाचे लक्षणीय म्हणावे असे गाजलेले शेवटचे हिंदी गाणे होते, ‘तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर, हमे याद रखना’. या गाण्यालाही आता 55वर्षे उलटून गेली आहेत. आता प्रत्यक्ष शारिर रूपानेही श्यामाने या जगाचा निरोप घेतला. (वयाच्या 82 व्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन.)

श्यामाची कारकीर्द 1945 च्या ‘झीनत’ पासून सुरू होते. देवआनंद-सुरैय्याच्या ‘शेर’ (1949) मध्येपण श्यामा होती. ओ.पी.नय्यर अगदी नवखा होता तेंव्हाच्या ‘आसमान’ (1952) मध्ये पण ती होती. पण ती खरी प्रकाशात आली ती गुरूदत्तच्या ‘आरपार’ (1954) मध्ये. 

कारमध्ये रूसलेला देखणा गुरूदत्त आणि त्याला मनवणारा गीता दत्तचा अवखळ सुर ‘ये लो मै हारी पिया, हूई तेरी जीत रे, काहे का झगडा बालम, नयी नयी प्रीत रे’ हे गाणं श्यामाचंच आहे. श्यामाचा चेहरा तसा साधाच. पण तिच्या साधेपणानंच तिला जास्त संधी मिळवून दिली. मजरूहचे अतिशय साधे शब्द. त्याला कॅची असं ओ.पी.नय्यरचं संगीत. ही गाणी चटकन ओठांवर रूळली. गुरूदत्तला त्याच्या चित्रपटातील संस्मरणीय गाण्याचं श्रेय गीतकार-गायक-संगीतकार यांच्या सोबत द्यावंच लागेल.

याच चित्रपटातील शमशाद च्या आवाजातील गाजलेलं शीर्षक गीत, ‘कभी आर, कभी पार लागा तीर-ए-नजर’ हे पण श्यामावरच आहे. गीता-रफी चं सदाबहार युगलगीत ‘सुन सुन सुन सुन जालिमा, प्यार हमको तूमसे हो गया’पण श्यामाचच आहे. यातील तिचा वेगळा ड्रेस तेंव्हा चर्चेचा विषय झाला होता. नर्गिस पाठोपाठ ज्या नायिकेने आधुनिक कपडे पडद्यावर बिनधास्त परिधान केले त्यात श्यामाचा क्रमांक वरचा आहे. हे कपडे उत्तान नव्हते तर पारंपारिक स्त्री प्रतिमेहून वेगळे होते. याच चित्रपटात अवखळ गाण्यांसोबतच गीतानं आर्त स्वरात ‘जा जा बेवफा, कैसा प्यार कैसी प्रीत रे’ आळवलं तेंव्हा तो सूर पडद्यावर साकार करणारी परत श्यामाच होती. श्यामाला अभिनयात मर्यादा होत्या. पण तिनं त्या मर्यादेत राहूनच चांगल्या अभिनयाचे दर्शन घडवले.

याच वर्षी हेमंत कुमारच्या संगीतानं नटलेला ‘शर्त’ (1954) हा श्यामाचा चित्रपटही गाजला. गीताच्याच आवाजातील ‘न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तूम्हारे रहेंगे’ हे लोकप्रिय गाणं यातलंच. या चित्रपटात श्यामासाठी लता-आशा-गीता तिघींचाही आवाज हेमंतकुमार यांनी वापरला आहे. लता-हेमंत यांच्या आवाजातील युगल गीत ‘देखो वो चांद चुपके करता है क्या इशारे’ अतिशय गोड आहे. 

या चित्रपटातील आशाच्या आवाजातील एक गोड आर्त सुरातील श्यमाचं गाणं दुर्लक्षीत राहिलं. राजेंद्रकृष्ण-हेमंत कुमार ही गाजलेली गीतकार-संगीतकार अशी जोडी. ‘नागिन’ सारखं लखलखीत यश त्यांच्या नावावर आहे.  याच जोडीनं ‘शर्त’ मध्ये ‘मेरे हमसफर तुझे क्या खबर, के चला किधर मेरा कारवा’ हे गाणं दिलं आहे. चित्रपटात काही गाणी घुसडलेली असतात. पण काही गाणी मात्र चित्रपटाचाच अविभाज्य घटक म्हणून येतात. त्याच्या आशयाला समृद्ध करतात. कथानक पुढे नेतात. हे गाणं याच पठडीतलं आहे. 

पुढे ‘खानदान’ (1955) मध्ये ए.आर.कुरेशी नावानं संगीत देणारे तबला उस्ताद अल्लारखां (उस्ताद झाकिर हुसेन  यांचे वडिल) यांनी आशा भोसले च्या आवाजात ‘लाखों के बोल सहे’ ही ठुमरी वापरली आहे. ही श्यामावरच आहे. ही ठुमरी निर्मला देवी (अभिनेते गोविंदा याची आई) यांनी अतिशय लोकप्रिय केली. 

श्यामाच्या 1956 मध्ये आलेल्या ‘भाई भाई’ चित्रपटाला ला मदन मोहन यांचे संगीत होते. मदन मोहन यांची लाडकी गायिका म्हणजे लता मंगेशकर. पण या चित्रपटात गीता दत्तच्या वाट्याला एकच गाणे मदन मोहनने दिले. आणि गीताने त्याचे सोने करून दाखवले. बाकी सर्व गाण्यांपेक्षा गाजलेले हे गाणे होते ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है, वो कौन है जो आकर, ख्वाबों पे छा गया है’. या गाण्यावरचे आता काहीसे बालीश शाळकरी मुलींसारखे वाटणारे नृत्य हीच श्यामाची ओळख बनले. पुढे काही गाजलेल्या गाण्यांवर श्यामाने असेच हातवारे करत नृत्य केले आहे.

1957 ला श्यामाचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. पहिला होता चित्रगुप्तच्या संगीतातला ‘भाभी’. लता-रफी च्या आवाजातील ‘छुपाकर मेरी आंखो को’ किंवा लताच्या आवाजातील ‘जा रे जादूगर देखी तेरी जादूगरी’ ही गाणी तर अभिजातच होती. यातील ‘चल उड जा रे पंछी’ किंवा ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ या प्रचंड गाजलेल्या गाण्यांत श्यामा नव्हती. पण तिचे या गाण्यांइतके लोकप्रिय ठरलेले एक गाणे ‘भाभी’त आहे. ते आहे लताच्या आवाजातील ‘कारे कारे बादरा, जा रे जा रे बादरा, मोरे अटरिया पे शोर मचा’. चित्रपगुप्ताला इतके यश परत कुठल्याच चित्रपटात मिळाले नाही.

1957 चा श्यामाचा बॉक्स ऑफिस हिट दुसरा चित्रपट होता राज कपुर-मीना कुमारी सोबतचा ‘शारदा’. याला संगीत होतं सी.रामचंद्र यांचे. लता-आशा यांची उत्कृष्ठ अशी जी युगल गीतं आहेत त्यात वरचा क्रमांक लागतो तो ‘ओ चांद जहां वो जाये’ या गाण्याचा. साधा अंबाडा, कोपरापर्यंच्या बाह्या असलेले ब्लाऊज, साडी, मोठं कुंकू, छोटेसे कानातले अशी मीना कुमारी. तिच्यासाठी लताचा सुरेल आवाज. तर मोकळ्या केसांची, आधुनिक पंजाबी ड्रेस, मोठ मोठे झुमके असे कानातले, नखरेल डोळ्यांची श्यामा. तिच्यासाठी आशाचा खट्याळ आवाज. फार कमी गाणी अशी असतात की त्यांचे सगळेच रसायन जूळून येते. हे गाणं तसंच आहे. सी.रामचंद्र यांची ‘सिग्नेचर’ असलेला तबल्याचा स्वच्छ ठेका या गाण्यात स्पष्ट ऐकू येतो. याच चित्रपटात आशाच्याच आवाजात श्यामाचे अजून एक गाणे आहे, ‘लहराये जीया, बलखाये जीया, आयी है घडी शरमानेकी’. आशाच्या खट्याळ आवाजाला पडद्यावर श्यामाने त्याच खट्याळ अभिनयाने न्याय दिला आहे.   

1957 हे वर्षे श्यामासाठी नशिबच घेवून आले होते. याच वर्षी जॉनी वॉकर सोबत तिचा ‘जॉनी वॉकर’ याच नावाचा चित्रपटही आला. याला संगीत ओ.पी.नय्यरचे होते. यातील इतर मस्तीखोर गाण्यांसोबत गीता-आशा यांच्या युगल स्वरात एक अतिशय छान गाणं आहे. या गाण्याची वेगळी दखल घेतली गेली पाहिजे. दोन मैत्रिणी बागेत नाचत बागडत आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. आशा भोसलेचा आवाज यात श्यामासाठी वापरला आहे. एरव्ही गीतकाराबाबत हेळसांड करणार्‍या ओ.पी.ने यात प्रतिभावंत हसरतची गीतं वापरली आहेत. हे गाणं आहे ‘ठंडी ठंडी हवा, पुछे उनका पता, लाज आये सखी, कैसे दू मै बता’. एक साधा टॉप आणि खाली आजच्या भाषेतील 3/4 अशी स्लॅक्स. अशा कपड्यातील नायिका तेंव्हा पडद्यावर दिसायच्या नाहीत. बार डान्सर किंवा दुय्यम नायिका यांच्यासाठी हे कपडे असायचे. नर्गिस-श्यामा यांनी हा भेद कमी केला. 

1959 ला शंकर जयकिशनच्या संगीतातील ‘छोटी बेहन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यातील नंदाचे लोकप्रिय गाणे ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ किंवा मेहमुदचे गाजलेले सुबीर सेनच्या आवाजातील ‘मै रंगीला प्यार का राही’ किंवा रेहमानचे मुकेशच्या दर्दभर्‍या आवाजातील ‘जावू कहां बता ए दिल’ रसिकांच्या चांगलेच लक्षात आहेत. पण यातच मन्ना डे-आशाच्या आवाजात एक गोड युगल गीत आहे. हे गाणं बिनाकात टॉपला होतं. रेहमान-श्यामावरच्या या गाण्याचे बोल लिहीले होते हसरत यांनी. हे गाणं होतं, ‘ओ कली अनार की ना इतना सताओ, प्यार करने की कोई रीत बताओ’. मन्ना दाचा आवाज या गाण्यात जो लागला आहे तो पाहून एक शंका येत राहते की पुढे किशोर कुमारने जी शैली उचलली ती अशाच गाण्यांतून तर नव्हे? 

1960 ला हेमंत कुमारच्या संगीतातील ‘दुनिया झुकती है’ मधील ‘गुमसुम सा ये जहां’ (हेमंत-गीता) आणि रवीच्या संगीतातील ‘अपना घर’ मधील ‘तूमसे ही मेरी जिंदगी’ (मुकेश-गीता) ही श्यामाची गाणी चांगलीच होती. पण श्यामाचा या वर्षीचा गाजलेला चित्रपट होता रोशनच्या संगीताची बरसात असलेला ‘बरसात की रात’. 

संगीतकार रोशन, गीतकार साहिर,  गायक रफी, अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि टीका करण्यासाठी का होईना ठोकळा भरत भुषण यांची चर्चा ‘जिंदगी भर नही भुलेगी’ या गाण्यासाठी होत राहते. पण इतर गाण्यांची नाही. याच चित्रपटातील गाजलेली कव्वाली ‘ना तो कारवां की तलाश है’ ही हिंदी चित्रपटांतील उत्कृष्ट कव्वाली पैकी एक. यातील सहभागी इतर कलाकार आणि गायकांचे आवाज यात श्यामासाठी आशा भोसलेचा पण आवाज आहे हे लक्षात रहात नाही. हीच नाही तर यातील इतर कव्वाल्यांमध्येही श्यामा आहे. श्यामाने या कव्वाल्या आपल्या नखरेल अदांनी जिवंत साकारल्या आहेत. ‘मुगल-ए-आझम’ मध्ये निगार सुलतानाने जसे कव्वालीत रंग भरले तशी श्यामाची करामत आहे. या शिवाय लताचे एक अतिशय गोड गाणे याच ‘बरसात की रात’ मध्ये श्यामाच्या वाट्याला आले आहे. साहिरच्या शब्दांतील हे गाणे आहे, ‘मुझे मिल गया बहाना तेरे दीद का, कैसे खुशी लेके आया चांद ईद का’. 

‘भाभी’ च्या यशानंतर चित्रपटाला नाही पण संगीताला बर्‍यापैकी यश लाभलेला चित्रगुप्ताचा चित्रपट म्हणजे ‘जबक’ (1961). श्यामासोबत महिपाल यात नायक होता. हा पोशाखी बी.ग्रेडचा चित्रपट. पण यातील एक गाणं बिनाकात गाजलं. ते होतं लता-रफीच्या आवाजातील 

तेरी दुनिया से दूर 
चले होके मजबूर 
हमे याद रखना 
जावो कही भी सनम
तूम्ही इतनी कसम
हमे याद रखना

नंतर पुढे श्यामाचे चित्रपट येत गेले पण त्यात तिच्या भुमिका दुय्यम होत्या. शिवाय गाणीही लक्षात रहावी अशी नव्हती. पुढे चित्रपट रंगीत झाला (जबकही रंगीत होता) नविन तरूण नायिका आल्या आणि जुन्यांची सद्दी संपली. 

गुरूदत्तच्या ‘आरपार’ मधून श्यामा आणि शकिला दोघीही साधारणत: एकदाच प्रकाशात आल्या. काय विलक्षण योगायोग. दोघीनींही या जगाचा निरोपही सोबतच घेतला. सप्टेंबर मध्ये शकिलाचे निधन झाले आणि आता नोव्हेंबर मध्ये श्यामाने या जगाला अलविदा केले.  

     -आफताब परभनवी.