Tuesday 27 June 2017

न भूलता येणारी ‘बरसात की रात’ !


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 24 जून 2017
लताच्या आवाजात नितळ पाऊस अनुभवता येतो, गीताच्या आवाजात पावसाची मादकता जाणवते, शास्त्रीय संगीताचा आधार घेतलेली गाणी आलापीसारखी नाजूक वळण घेऊन मनाच्या कठड्यावर अलगद येऊन बसतात. पण पुरुष गायकांच्या आवाजात एक वेगळाच पाऊस हिंदी चित्रपटगीतांत उतरला आहे. हा पाऊस प्रेमाची याचना करणारा आहे, विरहात पोळलेला आहे, संहारक घनगंभीर आहे, प्रेमात पूर्ण रसरसून उपभोग घेणारा आहे.
पावसाळी युगलगीतात पुरुषांचा आवाज आहे, पण १९५८ पर्यंत स्वतंत्रपणे पुरुषाच्या आवाजात पावसाचं गाणं उल्लेख करावा असं नाही. ‘राजतिलक’ (१९५८) मध्ये सी. रामचंद्र यांनी रफीच्या आवाजात एक गाणं दिलं आहे. राजेंद्र कृष्ण यांच्याशी गीतकार म्हणून मतभेद झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच चित्रपट. लेखक व गीतकार पी.एल.संतोषी सोबत ते काम करू लागले. या गाण्याचे बोलही संतोषी यांचेच आहेत. वैजयंतीमाला, जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन, पद्ममिनी यांच्या या चित्रपटात हे नावेवरचं गाणं सहाय्यक नटावर चित्रित आहे. ‘हो देखो आयी रे काली घटा, छायी रे काली घटा, जागा दिलों का प्यार’ असे साधेच शब्द आहेत. पण रफीने ठसक्यात हे गाणं म्हटलं आहे. 

याच वर्षीच्या ‘चलती का नाम गाडी’मधलं किशोर कुमारचं ‘एक लडकी भिगी भागीसी’ मात्र अप्रतिम. या गाण्याला लोकप्रियताही भरपूर लाभली. पावसात भिजलेली मधुबाला, तिच्या केवळ केस झटकण्यापुरता यात पाऊस दिसतो. बाकी सगळा पाऊस आहे, तो किशोरच्या स्वरात आणि मधुबालाच्या अदामध्ये. 
एक लडकी भिगी भागी सी
सोती रातों मे जागी सी
मिली इक अजनबी से 
कोई आगे न पिछे
तुमही कहो कोई बात है

मजरूहच्या या ओळींना एरव्ही एखादा संगीतकार आकार देऊ शकला नसता. पण एस.डी.बर्मन यांनी किशोरचा आवाज ध्यानात ठेवूनच गाण्याची रचना अशी केली की, सगळी मस्ती फुलून यावी. पावसात भिजून आलेली एक तरुण ‘लडकी’. तिच्याबाबत एका तरुणाच्या मनात जाग्या झालेल्या तारुण्यसुलभ भावना. ही ‘लडकी’ बिगडी बिगडी आहे, धुंदलाती हुई, भुली भटकी मचली मचली अशी म्हणजे तीही प्रेमाच्या शोधातच जणू निघाली आहे. हे सगळं आपल्या खट्याळ अदात सार्थ सादर करत मधुबाला ‘दिल ही दिल में चली आती है’ अशी येते. 
उषा खन्नाचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट होता ‘दिल दे के देखो’ (१९५८). शम्मी कपूरच्या कारकिर्दीला वळण देणारा ‘तुमसा नही देखा’नंतरचा हा त्याचा दुसरा आणि आशा पारेखचा पहिला चित्रपट. यातील गाण्यांवर ओ.पी.च्या संगीताची छाया पडली आहे. यातलं पावसावरचं गाणं उषा खन्नाने वेगळ्याच धाटणीत, लोकसंगीताचा बाज देत, कोरसचा अप्रतिम वापर करत सादर केलं. रफीचा आवाज लतासारखाच कसाही फिरतो. लोकगीताचा बाज असल्याने मजरूहनेही तसेच शब्द रचले आहेत
ओ मेघा रे बोले घनन घनन
पवन चले सनन सनन
पायल बाजे छनन छनन
जियरा मोरा डोले, आजा पिया मोरे

एरव्ही गाण्यात स्त्री आपल्या प्रियकराला आभाळ दाटून आलं की बोलावत असते. इथं उषा खन्नाने ते उट्टं काढलं असावं. आभाळ भरून येताच तिनं पुरुषाला आपल्या प्रियेची आठवण काढून बोलवायला लावलं आहे. रफीचे हे चांगलं गाणं फार कमी ऐकायला मिळतं.
बाबूल हा फारसा परिचित संगीतकार नाही. १९५७ मध्ये त्याने बिपीन दत्तसोबत जोडी जमवून ‘बिपीन-बाबूल’ नावानं संगीत दिलं होतं. ‘चालीस दिन’ हा त्यांचा स्वतंत्र संगीत दिलेला पहिला सिनेमा. याच बाबूलच्या संगीतात ‘रेश्मी रूमाल’ (१९६१) मध्ये तलत मेहमुदने एक सुंदर पावसाळी गीत गायलं आहे- 
जब छाये कही सावन की घटा
रो रो के न करना याद मुझे
ए जाने तमन्ना गम तेरा
कर दे न कही बरबाद मुझे

मदनमोहनचा लाडका गीतकार राजा मेहंदी अली खान याची ही रचना आहे. तलतच्या कापर्‍या आवाजात हे दु:ख जास्तच ठळक वाटतं. मनोजकुमार आणि शकिलावर हे गाणं चित्रित आहे. मनोजकुमारचा चेहरा तसा भावविहीन आहे, पण शकिलाने फार नेमके भाव चेहर्‍यावर दाखवले आहेत. गुरुदत्तच्या चित्रपटात वहिदाच्या आधी शकिलाच असायची. शकिलाचा चेहरा विलक्षण बोलका आहे. कसबी कॅमेरामन तिच्या चेहर्‍यावरचे भाव नेमके पकडतो. 
देव आनंदचे चित्रपट म्हणजे एस.डी.बर्मनचं किंवा शंकर जयकिशनचं संगीत. फार तर ओ.पी.नय्यर. त्यामुळे इतर संगीतकारांकडचा देव आनंद फारसा लक्षात येत नाही. देव आनंद-मधुबालाच्या ‘शराबी’ (१९६४) ला मदन मोहनचं संगीत आहे. मदनमोहनचा दुसरा लाडका गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी एक गाणं यात दिलं आहे-
सावन के महिने में एक आग सी सिने में
लगती है तो पी लेता हूं दो चार घडी जी लेता हूं

देव आनंदसाठी गाताना रफी एक वेगळाच आवाज लावतो. रफीची खरंच कमाल आहे. देवआनंद-शम्मी कपूर-जॉनी वॉकर यांच्यासाठी गाताना तो आवाजात जो बारीक फरक करतो, तो अफलातून आहे. इतर वेळी त्याचा आवाज वेगळाच असतो. या गाण्यात पहिल्याच कडव्यातील ओळ आहे-
बरसो छलकाये मैने, ये शीशे और ये प्याले, 
कुछ आज पीला दे ऐसी, जो मुझको ही पी डाले
या वेळी देव आनंद रस्त्यावरच्या कुत्र्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याच्या कानांशी खेळवतो. रफीचा सूरही या वेळी जास्त खेळकर बनतो. एक कोडं उलगडत नाही. त्या काळात गायक-संगीतकार-गीतकार-नट-दिग्दर्शक यांचं इतकं घट्ट रसायन कसं काय जुळून यायचं? हे सगळे म्हणजे ‘दोन दिल धडक रहे है और आवाज एक है, नगमे जुदा जुदा है मगर साज एक है’ असं अनुभवायला येतं.
एस.डी.बर्मन यांनी गायक म्हणून बंगालीत मोठं नाव कमावलं होतं. पण हिंदीत ते संगीतकार म्हणूनच जास्त रूळले. त्यांची जी काही अतिशय थोडी गाणी आहेत ती मोठी लक्षणीय आहेत. ‘गाईड’ (१९६५) मध्ये एक अतिशय वेगळं असं भजन आहे. त्याचा स्वर स्वत: सचिन देव बर्मन यांचाच आहे. 
अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू, 
रामा मेघ दे, श्यामा मेघ दे

एरव्ही रामाला श्यामाचा अनुप्रास कुणीही जोडला असता, पण शैलेंद्रसारखा गीतकार या श्यामामध्ये पावसाळी ढगांचा श्याम रंग अपेक्षित करतो. या भजनातला पावसाचा आर्त रंग वेगळाच आहे. ना.धों. महानोरांची एक ‘पांगलेला पावसाळा’ नावाची कविता आहे. तिचा शेवट असा आहे, ‘पापण्यांच्या कातळाशी खोल विझला पावसाळा’. सचिन देव बर्मन यांच्या आवाजात अशीच एक आर्तता दाटून येते. 
पुरुषांच्या आवाजातील ही पावसाची गाणी म्हणजे तशी जंत्रीच आहेत. बर्‍याच गाण्यांत केवळ पावसाचा मेघाचा उल्लेख येतो, पण परत पावसाचा काहीच संबंध येत नाही. पण हिंदीतील सगळ्या पावसाच्या गाण्यात एक गाणं असं आहे की, ज्याचे शब्द, ज्याचे संगीत, ज्याचा सूर आणि नायिकेची अदा या सगळ्याचा मिळून पावसाचा असा काही रंग जमून आला आहे... तसा आजतागायत परत जमला नाही.
‘बरसात की रात’ (१९६०) ला आता ५७ वर्षे उलटून गेली. पण ‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात’चा ओलावा आजही रसिकांच्या कानात तसाच टिकून आहे. रफी-रोशन-साहिर-मधुबाला यांपैकी कुणी कुणासाठी हे गाणं तयार केलं/गायलं/सादर केलं कळत नाही. साहिरच्या शब्दांना पुरेपूर न्याय देत रोशननं संगीत रचलं आहे. रफीनं गाताना त्याला अजून उंचीवर नेलं आहे. आणि पडद्यावर सादर करताना मधुबालानं तर कळसच चढवला आहे. वैद्यकशास्त्रात फार आनंदानंही हृदयविकाराचा झटका येतो असं म्हणतात. अशीच परिस्थिती या गाण्यात आहे. पण नजर लागू नये किंवा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून भारत भूषणच्या तोंडी हे गाणं देऊन चोख व्यवस्था केली आहे. (भारत भूषणच्या चाहत्यांची माफी. भारतभूषणचा जन्मदिवस याच महिन्यात १४ जूनचा आहे.)

साहिर लिहीताना कधीच गीत म्हणून लिहीत नाही. त्यामुळे त्याच्या रचनांना संगीत साज चढवणं तसं आव्हानात्मक असतं. पण एखाद्या उत्तम कलाकृतीला अंगचीच लय असते, तशी या कवितेला आहे. ती नेमकी रोशनला उचलता आली-
सुर्ख आचल को दबाकर जो निचोडा उसने
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने
आग पानी में लगाती हुई हालात की रात
या ओळीत पदराशी बोटांनी खेळत मधुबाला ‘काहीतरीच काय’ असे भाव व्यक्त करत मानेला नाजूक हिसडा देते आणि पडद्यावर कविताच आपण पाहतो आहोत असा भास प्रेक्षकांना होतो. हे गाणं साहिरनं मधुबालासाठीच लिहिलंय की काय? (साहिरची प्रेयसी कवयित्री अमृता प्रितमही सुंदर दिसायची हा भाग वेगळा).
हेच गाणं लताच्याही आवाजात आहे. पण रफीची मजा त्यात नाही. पुरुषांच्या आवाजात गाजलेली गाणी लतानेही स्वतंत्रपणे गायली आहेत. (‘तुम तो दिल के तार छेड के’ (तलत- शंकर जयकिशन), ‘रूप की रानी चोरों का राजा’, १९६२, ‘कभी कभी मेरे दिल में’ (मुकेश-खय्याम,‘कभी कभी’, १९७६, ‘एहसान तेरा होगा मुझपर’ (रफी-शंकर जयकिशन, जंगली, १९६१) पण का कुणास ठाऊक, प्रत्येक वेळी पुरुषांच्याच आवाजातील गाणी जास्त गाजली आणि आजही लक्षात राहतात.     
पावसाची इतरही गाणी आहेत, ज्यात पुरुषांचा आवाज उमटला आहे. पण ती स्वतंत्र गाणी नाहीत. युगलगीतं आहेत.
हेमंतकुमारच्या ‘नास्तिक’ (१९५४) मध्ये ‘गगन झनझना रहा’ या लतासोबतच्या गाण्यात हेमंतकुमारचा सूर शिवाच्या संहारक रूपातला सूर वाटतो, तर हेमंतदाचाच आवाज सलिल चौधरीच्या ‘परिवार’ (१९५६) मध्ये लतासोबत ‘झिर झिर बदरवा बरसे’ म्हणत शृंगारात फुलून आला आहे. ‘रेश्मी रूमाल’ (१९६१) मध्ये मन्ना डे-आशा चे सुंदर पावसाळी गाणे ‘जुल्फों की घटा लेके सावन की परी आयी’ आहे.
असं परत परत वाटत राहतं की, आभाळाचा आवाज म्हणजे पुरुषाचा आवाज आणि धरतीचा सूर म्हणजे स्त्रीचा. या दोघांना सांधत कोसळत राहतो तो पाऊस. असे काहीतरी चित्र सगळ्या पावसाळी गाण्यांमधून उमटत राहते. 
(पावसाची अजून खूप गोड गाणी आहेत. शैलेंद्रचंच पदार्पणातलं ‘बरसात’ (1949)मधलं पहिलं गाणं ‘बरसात में हमसे मिले तुम’ किंवा ‘तांगावाली’ (१९५५)मधलं ‘रिमझिम झिम झिम बदरवा बरसे’, ‘झिंबो कम्स टू टाऊन’ (१९६०)मधलं ‘ठंडी हवाओ काली घटाओ’,  ‘परख’ (१९६०)मधलं ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘चित्रलेखा’ (१९६४)मधलं ‘छा गये बादल नील गगन पर’,  अशी बरीच गाणी आहेत. पण सगळ्यांवरच लिहिणं शक्य नाही. शिवाय काही गाणी या सदरात आधी येऊन गेली आहेत.)

Monday 19 June 2017

जुन्या गाण्यात सतत ‘नूतन’ वाटणारी नूतन




अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 17 जून 2017
चार जून हा नूतनचा जन्मदिवस. त्या दिवशी गुगलने तिचं डूडल बनवून दखल घेतली. नूतन म्हटलं की, कोणती गाणी आठवतात? कोणते चित्रपट डोळ्यांसमोर येतात? देवआनंद सोबतचे चार चित्रपट (‘पेईंग गेस्ट’, ‘बारिश’, ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’) किंवा राज कपूरसोबचे तीन चित्रपट (‘अनाडी’, ‘छलिया’, ‘दिल ही तो है’) किंवा सुनील दत्त सोबत (‘सुजाता’, ‘खानदान’, ‘मिलन’) किंवा इतर हिट चित्रपट (‘सीमा’, ‘बंदिनी’, ‘दिल्ली का ठग’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘सरस्वतीचंद्र’). अगदी सोनिक ओमीसारख्या दुर्मिळ संगीतकाराचे नूतनवरचे गाणे ‘दिल ने फिर याद किया’ही (चित्रपटाचे नावही तेच) आठवते.   
लोकप्रियतेच्या हमरस्त्यावरचे हे चित्रपट आणि त्यातली गाणी तसंच लोकप्रिय संगीतकार वगळून आपण जरा आडबाजूला वळलो तर काय दिसतं?
अजिंठ्यासारखं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असतं. त्याकडे जाणारा रस्ता गर्दीचा असतो. पण याच रस्त्याला अजिंठ्याच्या अलिकडे मुख्य रस्त्यापासून उजवीकडे जरा आत वळलं की, अन्व्याचं मंदिर सापडतं. त्यावरची अप्रतिम शिल्पकला पाहून आपण स्तिमित होऊन जातो. तसंच नूतनच्या लोकप्रिय चित्रपटांची वाट सोडून आडवाटेला वळलं की, काही गोड गाणी हाताला लागतात. लोकप्रिय संगीतकार वगळून इतर संगीतकारांकडे लक्ष जातं. आणि त्या गाण्यांची अवीट गोडी जाणवते.  
अगदी कोवळ्या वयातला माकडउड्या न मारणारा हळवा शम्मी कपूर रफीच्या नव्हे तर तलत मेहमूदच्या आवाजात आर्ततेनं गातो आहे, ‘चल दिया कारवां, लुट गये हम यहां तुम वहां, गिर पडी बिजलीया, उठ रहा है धुवां’. हे गाणं आहे नूतन-शम्मी कपूरच्या ‘लैला मजनु’ (१९५३) मधलं. यातलंच दुसरं अतिशय गोड गाणं लता-तलतच्या आवाजात आहे, ‘आसमांवाले तेरी दुनिया से जी घबरा गया, चार दिन की चांदनी, गम का बादल छा गया’. गुलाम मोहम्मदला तसं कधी व्यावसायिक यश लाभलं नाही. ‘मिर्झा गालिब’ (१९५४) आणि त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेला ‘पाकिजा’ (१९७२) हे दोनच चित्रपट अपवाद. पण 'लैला मजनू'सारख्या काही चित्रपटांना त्यानं अतिशय चांगलं संगीत दिलं आहे. 

अनिल विश्वासचे चित्रपट १९४०-५० दशकांत जास्त गाजले. पण नंतर चित्रपटांची संख्या रोडावत गेली. याच अनिल विश्वासने नूतन-प्रदीपकुमार यांच्या ‘हिर’ (१९५६) ला अप्रतिम संगीत दिलं आहे. नायिकेसाठी एकाच चित्रपटात लता-आशा-गीता तिघींनीही गाण्याची एकमेव घटना या चित्रपटात नूतनबाबत घडली.
गीताच्या आवाजातील ‘बुलबुल मेरे चमन के’,

लताच्या आवाजातील ‘कब तक रहेगा परदा’

आणि आशाच्या आवाजातील ‘छेडी मौत ने शहनाई’

ही तिन्ही गाणी अतिशय श्रवणीय आहेत. गीताच्या आवाजातील मस्ती, लताच्या आवाजातील आर्तता वापरताना आशाच्या आवाजातील एरव्ही न आढळणारी व्याकूळता अनिल विश्वास यांनी टिपली आहे. 
यातलं सगळ्यात चांगलं गाणं गीता-हेमंतच्या आवाजात आहे. पहिल्यांदा उमटतो गीताचा आर्त सूर -
ओ साजना, छुटा है जो दामन तेरा
मंझिल मंझिल है अंधेरा, ओ साजना
ही आर्तता नूतनच्या पारदर्शी चेहर्‍यावर उमटते. आणि लगेच येतो हेमंतकुमारचा आवाज -
जा दिलरूबा, तेरे साथ चला दिल मेरा
रहे प्यार निगहबान तेरा, जा दिलरूबा
लगेच नूतनचा चेहरा पालटतो. प्रियकराच्या आवाजानं ती आनंदून उठते. त्याचं प्रेम आपल्यासोबत असल्याची ग्वाही त्याच्याच आवाजात मिळते आहे. मग हा आपल्या उरात घुसलेला विरहाचा बाण आपण सहज सहन करू. खरंच काय लिहायचे तेव्हाचे कवी! (हे गाणं मजरूहचं आहे) ‘दिल की तमन्ना पुरी होने ना पाई, आके जिगर पे लगा तीर-ए-जुदाई, जरा देख तडपना मेरा, ओ साजना’. गीताने आपल्या आवाजात ज्या विविध छटा दाखवल्या आहेत, त्याला हेमंतकुमारच्या खर्जातल्या आवाजाचा भक्कम कॅनव्हास लाभला आहे. हे पडद्यावर सादर करणारी, कुठलेच दागिने न घातलेली, एकदम साधी नूतन. अनिल विश्वाससारखे संगीतकार ‘दादा माणूस’ का आहेत, हे अशा लोकप्रिय न ठरलेल्या, पण आजही ऐकताना हलवून सोडणार्‍या गाण्यांतून जास्त तीव्रतेनं लक्षात येतं.
शौकत देहलवी नाशाद (नौशाद नाही) याला संगीतकार म्हणून ‘बारादरी’ (१९५५) वगळता फारसं व्यावसायिक यश लाभलं नाही. नूतन-प्रदीप कुमार यांच्या ‘जिंदगी या तुफान’ (१९५८) ला त्याचं संगीत आहे. ‘आयेगा आयेगा आनेवाला’चा गीतकार म्हणून गाजलेल्या नक्क्षाब यांचं एक गीत तलतच्या आवाजात यात आहे. ‘जुल्फों की सुनहरी छांव तले, इक आग लगी दो दीप जले, जब पेहली नजर के तीर चले, मत पुछ के दिल पर क्या गुजरी’ या सुंदर शब्दांना आपल्या मुक अभिनयानं नूतनने पडद्यावर जिवंत केलं आहे. आणि प्रत्यक्ष ज्याच्या तोंडी हे गाणं आहे, तो प्रदीपकुमार हातात हार्मोनिअम घेऊन बथ्थडसारखा बसून गातो आहे. गाणं सगळं उलगडत जातं, ते तलतच्या सुरात, नाशादच्या संगीतात, नक्क्षाबच्या शब्दात आणि नूतनच्या अभिनयात केवळ.

नक्शाब सारखा गीतकार पुढे यायला हवा होता. या गाण्यात अतिशय साधे, पण ओघवते शब्द त्यानं लिहिले आहेत, 
इतनासा है दिल का अफसाना, 
अपना न हुआ एक बेगाना, 
नजरे तो मिली और दिल ना मिले, 
कुछ उनसे हमे शिकवे ना गिले, 
क्या खुब मिले उल्फत के सिले, 
मत पुछ के दिल पर क्या गुजरी
यातील शिकवे ना गिलेवर नूतन हलकेच दातांनी ओठ चावते. गाणं पडद्यावर जिवंत होतं म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण.
‘छबिली’ (१९६०) हा शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे नूतनच्या घरचाच चित्रपट. तनूजा यात बाल कलाकार म्हणून पहिल्यांदा आली आली आहे. यात स्वत: नूतननं एक-दोन नाही तर तब्बल पाच गाणी गायली आहेत. गीता दत्त, महेंद्र कपूर सोबत तसंच सोलो गाणीही आहेत. पण ती विशेष नाहीत. स्नेहल भाटकर यांचं संगीत या चित्रपटाला आहे. यातील एकमेव गाजलेलं गीत हेमंतकुमारच्या आवाजात आहे. नूतनची केवळ आलापी साथीला आहे-  
लहरों पे लहर, उल्फत है जवां
रातों की सहर चली आवो यहां
सितारे टिम टिमाते है तू आजा आजा
मचलती जा रही है हवाये आजा आजा 

हेमंतकुमारचा आवाज एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्या आवाजात जो धीरगंभीर खर्ज आहे, तो कुणाच्याच आवाजात नाही. पुरुषाचा खास आवाज म्हणून कितीतरी गाण्यांत हा आवाज परिणामकारक ठरला आहे. हे गाणंही त्याला अपवाद नाही. हेमंतकुमारच्या निवडक गाण्यात याचा समावेश नेहमीच असतो. 
एन.दत्ता (दत्ता नाईक) नी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलं. एक ‘धुल का फुल’ (१९५९) वगळता त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. ‘चांदी की दिवार’ (१९६४) हा नूतन-भारतभूषण यांचा चित्रपट याला एन. दत्ताचं संगीत आहे. यात मध्ये एन. दत्ताने आशा-तलतच्या आवाजात शास्त्रीय संगीताचा बाज असलेलं ‘लागे तोसे नैन’ आणि आशा-रफीच्या आवाजात ‘जो केहनेसे तुम शरमाती हो’ हे मस्तीखोर गाणं दिलं आहे. पण यातील जे सगळ्यात सुंदर गाणं आहे ते मात्र तलतच्या एकट्याच्या अवाजात आहे- 
अश्कों ने जो पाया है वो गीतों मे दिया है
इस पर भी सुना है के जमाने को गिला है
या गझलेतील साहिरचा एक शेर स्वतंत्रपणे गाजला. त्या ओळी अशा आहेत
जो तार से निकली है वो धून सबने सुनी है
जो साज पे गुजरी है वो किस दिल को पता है

एन. दत्ताचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने साहिरच्या कवितांवर मनापासून प्रेम केले आणि त्यांना अवघड असतानाही चित्रपटांमधून गीत म्हणून सादर केले. ताजमहाल सारखी साहिरची रचना गीत म्हणून खुपच आव्हानात्मक आहे. पण एन.दत्ताने ते ‘साहिरधनुष्य’ पेलले आहे. याही ठिकाणी या नाजूक गझलेला तलतचेच सूर न्याय देऊ शकतील, हे ओळखून तशी योजना एन.दत्ताने केली आहे. 
नंतरच्या काळातील रंगीत चित्रपटांतील नूतन फारसा प्रभाव पाडू शकत नाही. नंतरची गाणीही तशी नाहीत. ‘खानदान’, ‘मिलन, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’मधील गाणी गाजली. त्यांना लोकप्रियताही लाभली. पण त्यांचा प्रभाव आधीच्या गाण्यांइतका टिकला नाही. कृष्णधवल काळातील लोकप्रियतेच्या आडवाटेवरील गाणीही आज अवीट वाटतात. आणि नंतर लोकप्रिय ठरलेली गाणीही ऐकावीशी वाटत नाहीत. 
जुन्या गाण्यात सतत ‘नूतन’ वाटणारी नूतन नंतरच्या गाण्यांत मात्र ‘जून’ वाटत राहते.

Tuesday 13 June 2017

गीताच्या घनगर्द आवाजातील मदभरी काली घटा

अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 10 जून 2017
बहुतांश पावसाची गाणी लताच्याच आवाजात आहेत, पण पावसाचा एक शृंगारिक मादक पैलू आहे तो या गाण्यांत उमटत नाही. त्यासाठी सगळ्यात पोषक आवाज आहे गीता दत्तचा. उच्छृंखल न होता शृंगाराचं सौंदर्य प्रकट करण्याची अफलातून ताकद तिच्या आवाजात आहे. हे पहिल्यांदा ओळखलं सचिन देव बर्मन यांनी. ‘बाजी’ (१९५१) हा गीताच्या आवाजाला खऱ्या अर्थानं ‘ब्रेक’ देणारा सिनेमा. गीताबालीसारखा गीताच्या आवाजाला पडद्यावर न्याय देणारा खट्याळ चेहरा. एस.डी.बर्मनचं अतिशय वेगळं असं संगीत. चित्रपटातली आठपैकी सहा गाणी गीताच्या आवाजात आहेत. किशोर कुमार आणि शमशादला फक्त एक एक गाणं आहे. ‘बाजी’चं गाजलेलं गाणं म्हणजे ‘तदबीर से बिगडी हुयी तकदीर बना ले’ (या ‘तदबीर’ आणि ‘तकदीर’ दोन वेगवेगळ्या अर्थाच्या शब्दांमध्ये बहुतांश वेळा घोळ केला जातो.). पण याच चित्रपटात गीताचं पावसावरचं एक अफलातून गाणं आहे -
ऊईऽऽ देखके अकेली मुझे बरखा सताये
गालों को चुमे, कभी छिटें उडाये रे... टिप टिप टिप.. टिप टिप..

असली खेळकर शब्दरचना साहिरने केली असेल हे त्याची पुढची बहुतांश गाणी ऐकून पटत नाही. ‘गालों का चुमे, कभी छिटें उडाये’ या ओळीवर पाण्याचे थेंब गालांवर पडल्याचा अप्रतिम अभिनय डोळ्यांतून गीताबाली साकार करते. (‘बारादरी’ (१९५५) मध्ये नाशाद (नौशाद नाही)ने लताच्या आवाजात पावसाचं एक गाणं दिलं आहे. गीताबालीचंच गाणं आहे- ‘अब के बरस बडा जुलूम हुआ, मोरा बचपन गया हो राम’. पण लताच्या आवाजात ही तक्रार पूर्णत: खुलत नाही. नाशादच्या संगीतातही ती ‘किक’ बसत नाही. हेच गाणं गीताच्या आवाजात आणि सचिन देव बर्मन किंवा ओ.पी.नय्यरने अतिशय वेगळं करून दाखवलं असतं.) 
गीताबालीशिवाय गीता दत्तच्या आवाजाला न्याय देऊ शकणारी नायिका म्हणजे मधुबाला. गुरुदत्तचाच दुसरा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ (१९५५) मध्ये असं सुंदर गाणं आहे. ओ.पी.नय्यरनी मजरूहकडून लिहून घेतलेले बोल आहेत-
थंडी हवा काली घटा आ ही गयी झुम के
प्यार लिये डोले हसी नाचे जिया घुम के

आता या गाण्यात मधुबाला ओठांच्या ज्या हालचाली ‘घुम के’ उच्चारताना करते त्याला तोड नाही. गीताच्या आवाजाने अतिशय नेमका परिणाम साधला जातो. जसं की शैलेंद्र-लता-सलिल चौधरी असंच मजरूह-गीता-ओ.पी.नय्यर आणि त्याला जोडला गेलेला चौथा कोन म्हणजे मधुबाला. आख्ख्या गाण्यात एक टवटवीतपणा आहे.
खरं तर गीताच्या आवाजाला सचिन देव बर्मन आणि ओ.पी.नय्यर यांनी ज्या पद्धतीनं खुलवलं आहे, तसं इतरांच्या संगीतात फारसं नाही. (त्यामुळे गीताच्या पावसाळी गाण्यांसाठी केवळ या दोघांच्याच संगीताचा विचार केला आहे.)
ओ.पी.नय्यरचा ‘छूमंतर’ (१९५५) हा जॉनी वॉकर-श्यामा-अनिता गुहा यांच्यावरचा चित्रपट. यातील गीताचं ठसकेबाज गाणं आहे-
जब बादल लहराया, जिया झुम झुम के गाया
आ जा सनम, तेरी कसम मचलती रात है

हे गाणं पडद्यावर सादर करणारी श्यामा आहे. गीताच्या आवाजात तिचं सगळ्यात गाजलेलं गाणं ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है’. गीताबाली मधुबालाची मजा श्यामाच्या अदाकारीत नाही.
गीताच्या स्वरात एक नाचरेपण आहे. मोकळा सुटलेला हा स्वर नाचाला अतिशय पोषक. ‘लाजवंती’ (१९५८) मध्ये ‘आजा छाये कारे बदरा रे, छम छम बरसे नैन कजरा रे’ हे गाणं केवळ नाचासाठीचं गाणं आहे. लतापेक्षा अतिशय वेगळ्या अशा ठसक्यात गीताचा सूर लागतो. ‘मन के मेरे मोर प्यारे, पुकारू तुझे मोरनी बनके मैं’ अशा ओळी गाताना लताचा आवाज व्याकूळ लागू शकतो, पण गीताच्या आवाजात मादीने नराला दिलेलं आव्हान आहे. मजरूहनी पुढची ओळ गीता गाणार आहे हे समजून ‘मन के मेरे मोर प्यारे, जरा देखो कैसे चलू तन के मै’ अशी लिहिली. अन्यथा लताचा आवाज असता तर ही ओळ शोभली नसती. संगीतातही सचिन देव बर्मन यांनी आक्रमक तालवाद्यांचा वापर जास्त केला आहे. लता असती तर तंतूवाद्यांचा वापर वाढला असता. 
केवळ आक्रमक सूर लावल्यानेच मादकता सिद्ध होत नाही. सचिन देव बर्मन यांनी परत मजरूहलाच हाताशी धरून ‘सुजाता’ (१९५८) मध्ये गीताचं एक सुंदर पावसाळी गीत दिलं आहे. 
काली घटा छाये मोरा जिया तरसाय
ऐसे में कही कोई मिल जाय...हाय...

सगळी आक्रमकता बाजूला ठेवून, आव्हानात्मक मादकता विसरून स्त्री-पुरुषाबद्दलची सनातन ओढ व्यक्त करताना शालिनतेत आपल्या वासनेचं आव्हान समोर ठेवते. गीतानं हा भाव अप्रतिम टिपला आहे. या गाण्यासाठी गीताबाली किंवा मधुबाला यांच्यापेक्षा पडद्यावर नुतन आहे हे किती संयुक्तीक. तिच्या चेहऱ्यालाच एक शालिन चौकट आहे. गीताच्या आवाजाचं हे वैशिष्ट्यच आहे की, मादकतेसोबतच शालिनता, वेदना (‘वक्त ने किया क्या हसी सितम’), भक्ती (‘ना मै धन चहू ना रतन चाहू’) त्याच ताकदीनं तिच्या स्वरांतून प्रभावीपणे व्यक्त होते.
गीताचा आवाज आणि वहिदा रेहमानचा चेहरा यांचंही काहीतरी नातं असावं. कारण गुरुदत्तनं जेव्हा जेव्हा हा योग आपल्या चित्रपटात जूळवून आणला, तेव्हा तेव्हा ती सगळी गाणी गाजली. गुरुदत्तच नाही तर देव आनंदच्या ‘कालाबाजार’ (१९६०) मध्येही हा योग जुळून आला आहे. या गाण्यात एकटी गीता नाही, तर सोबत रफीचा मधाळ आवाजही आहे. ते अवीट गाणं आहे-
रिमझिम के तराने लेके आयी बरसात
यादी आयी किसीसे वो पहली मुलाकात

शैलेंद्र हा श्रेष्ठ गीतकार. शब्दांची ओढाताण तो कधीच होऊ देत नाही. पहिल्या भेटीत कधीच फारसे शब्द उमटत नाहीत हे त्याने इतक्या सहजतेनं लिहिलं आहे- ‘मैं ना बोलू आंखे करे आखियों से बात, रिमझिम के तराने लेके आयी बरसात’. या गाण्यावर वहिदा जी अदा पडद्यावर दाखवते ती लाजवाब! वहिदाचा चेहरा अतिशय ‘फोटोजनिक’ आहे, हे हेरणाऱ्या गुरुदत्तला सलाम. रफी-गीता ही जोडी द्वंदगीतातील जुळून आलेली जोडी आहे. जसं की लता-तलत, आशा-किशोर.
गीताचं एक अफलातून पावसाळी मदमस्त गाणं ‘मंझिल’ (१९६०) मध्ये सचिन देव बर्मन यांनी दिलं आहे. सोबत रफीचा नशिला सूर आहे. देव-नूतन हे पडद्यावर सगळ्यात जास्त जुळून आलेलं रसायन. याच जोडीवर हे गाणं आहे. 
चुपके से मिले प्यासे प्यासे कुछ तुम कुछ हम
क्या हो जो घटा खुलके बरसे रूम झुम रूम झुम

पाऊस कुठेच नाही, पण यांच्या प्रेमाचा जो पाऊस कोसळतोय त्याला तोड नाही. ‘रूम झुम’ हा शब्द रफी आणि गीता अशा काही पद्धतीनं उच्चारतात की, कुणाही ऐकणाऱ्याला हा पाऊस वेगळाच असल्याची अनुभूती सहज येते. सहसा गाण्याची एक ओळ एकानं गायची आणि दुसरी दुसऱ्यानं अशी पद्धत असते. पण सचिनदांनी इथं सगळंच बदलून टाकलं आहे. सुरुवातीला गीता केवळ शब्द उच्चारते. मग हळूच गाणं सुरू होतं. मग अर्धी ओळ रफीची, अर्धी ओळ गीताची. मग परत त्यांची आलापी. कळतच नाही काय चालू आहे. सगळ्याची मिळून अशी काही नशा तयार होते की, ज्याचं नाव ते. मजरूह-रफी-गीता-सचिनदा आणि पडद्यावर देव-नूतन यांनी माधुर्याचा अक्षरश: हल्लकल्लोळ करून टाकला आहे. गीताच्या आवाजाला सगळ्यात जास्त जुळणारा आवाज रफीचाच का आहे, ते या गाण्यात लक्षात येतं.  

एस.डी. आणि ओ.पी. सारखंच रोशनच्या संगीतातही ‘दो रोटी’ (१९५७) मध्ये ‘घिर के बरसे ये घटाये’ हे मदमस्त गाणं गीतानं गायलं आहे. हेमंतकुमारच्या ‘मिस मेरी’ (१९५७) मधलं ‘आयी रे घिर घिर’ फारसं विशेष वाटत नाही. गीताचं वैशिष्ट्य हे की, पावसाचं मदभरं रूप आपल्या आवाजात साकारतानाच ‘आनंदमठ’ (१९५२) मध्ये तिनं पावसात लहानपणीची आठवण जागवताना (‘नैनों मे सावन’) आर्त सूर लावला आहे. असाच सूर कन्नू रॉयच्या संगीतात ‘उसकी कहानी’ (१९६६) मध्ये कैफी आझमींच्या ‘आज की काली घटा’ गाण्यातही लागला आहे.
लताच्या आवाजात पाण्याचा नितळपणा अनुभवायला येतो. गीतानं आपल्या आवाजात पावसाची मादकता-शृंगार आणला आहे. 

a.parbhanvi@gmail.com

Monday 5 June 2017

गरजत बरसत सावन आयो री !


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 3 जून 2017
शास्त्रीय संगीतात मल्हार, मेघ-मल्हार, सुर-मल्हार, गौड-मल्हार या रागांतील खुप सुंदर सुंदर अवीट गोडीच्या बंदिशी आहेत. रागांवर आधारित बरीच गाणी हिंदी सिनेमांत आली आहेत. पावसाची पण खूप सुंदर गाणी रागांवर आधारित आहेत. पण शास्त्रीय संगीताचा बाज कायम ठेवून चित्रपटातही तसाच प्रसंग निर्माण करून आलेली गाणी फार थोडी आहेत.
रोशन यांनी ‘मल्हार’ (१९५१) मध्ये लताच्या आवाजात ‘गरजत बरसत भीजत आईलो’ ही पारंपरिक बंदिश घेतली आहे. कुठेही या बंदिशीचं हिंदी गाणं केलेलं नाही. केवळ तबला-पेटीच्या साथीने लताने हा गौड-मल्हार विलक्षण सादर केला आहे. पं.जसराज म्हणाले होते की, लता मंगेशकर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आल्या असत्या तर सगळ्यांची सुट्टी करून टाकली असती. 

रोशनला मल्हाराची काहीतरी विलक्षण ओढ असणार. कारण पुढे ‘बरसात की रात’ (१९६०) मध्ये सुमन कल्याणपुर-कमल बारोट यांच्या आवाजात सुंदर अशी ‘गरजत बरसत सावन आयो रे’ ही चीज साकारली आहे. साहिरने या पारंपरिक बंदिशीला परत लिहून काढलं आहे. हे करताना कुठेही बंदिशींच्या पारंपरिक शब्दकळेला धक्का पोचू दिला नाही हे विशेष. 
रिमझिम रिमझिम मेघा बरसे, 
तडपे जियरा मीन समान, 
पल पल छिन छिन पवन झकोरे, 
लागे तन पर तीर समान
अशा शब्दांतून बंदिश पुढे सरकत जाते.

शेखर आणि निम्मी यांच्या ‘हमदर्द’ (१९५३) चित्रपटांत अनिल विश्वास यांनी ‘ऋतू आये ऋतू जाये सखी रे, मन के मीत ना आये’ ही बंदिश लता-मन्ना डे यांच्या आवाजात वापरली आहे. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा अशा तीन ऋतूंची तीन कडवी यात आहेत. दुसरं कडवं पावसाचं आहे. त्याचे बोल आहेत-
बरखा ऋतू बैरन हमार 
जैसे सास ननदिया  
पी दर्शन को जियरा तरसे
आखियों से नीत सावन बरसे
रोवत है कजरारे नैंनवा
बिंदीया करे पुकार
बरखा ऋतू बैरन हमार

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत असे विलक्षण मिश्रण करून सचिन देव बर्मन यांनी ‘जीवन ज्योती’ (१९५३) मध्ये लता-आशाच्या आवाजात वेगळं असं गाणं दिलं आहे- ‘छायी कारी बदरिया बैरनिया हो राम, घन बदरा गगनवा झुकन लागी हो’. झोक्यावर बसून स्त्रिया हे गाणं म्हणत आहेत असं दृश्य आहे. लोकगीतांचा अतिशय बारीक अभ्यास करून साहीरने अशी गाणी लिहिली असावीत. नसता ‘झुलनो पर गावन की रूत आयी रे, रतिया जगावन की रूत आयी रे’ असे सुंदर सहज शब्द आलेच नसते. क्लिष्ट उर्दू शब्द किंवा अर्थाच्या गहन छटा असलेले शब्द वापरण्याची आपली सवय साहीर सहज बाजूला ठेवतो. 

आपल्या संगीतात पाश्चिमात्य वाद्यमेळ (ऑर्केस्ट्रा) जास्त वापरतो म्हणून शंकर जयकिशनवर आरोप केला जातो. पण याच शंकर जयकिशनने भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित अतिशय गोड सुंदर गाणी दिली आहेत. ‘बुट पॉलिश’ (१९५४) मध्ये मन्ना डेच्या आवाजात ‘मिया की मल्हार’ रागावर आधारित सुंदर चीज ‘लपक झपक तू आ रे बदरवा’ शंकर जयकिशनने दिली आहे. शैलेंद्रचा लोकगीतांचा अभ्यास दांडगा होताच, पण शास्त्रीय चिजांचाही होता याचा पुरावा म्हणजे या गाण्याचे बोल. पण या गाण्याचे चित्रीकरण विनोदी पद्धतीने केल्यामुळे हे गाणे गांभीर्याने घेतले जात नाही. दृश्य न बघता गाणं केवळ ऐकलं तर मन्ना डेच्या आवाजाने काय जादू केली आहे हे जास्त तीव्रतेनं लक्षात येतं.

याच वर्षी किशोर कुमार-वैजयंती माला यांचा चित्रपट ‘पेहली झलक’ (१९५४) पडद्यावर आला. त्याला सी.रामचंद्रचे गोड संगीत लाभलं होतं. तबला-पेटी-सतार-बासरी इतक्या किमान वाद्यांच्या साथीने ‘कैसी भायी सखी रूत सावन की’ हे गाणं लताने आपल्या आवाजात पेललं आहे. हातात तंबोरा घेऊन वैजयंतीमाला केवळ डोळ्यांतून गाण्याचे भाव व्यक्त करते ते मोठं गोड वाटतं. शैलेंद्र-साहीर सारखंच राजेंद्र कृष्ण यांनीही या गाण्याचे बोल लिहिताना शास्त्रीय चीजांचा अप्रतिम बाज आपल्या शब्दांत आणला आहे.

‘जेलर’ (१९५८) मध्ये मदनमोहननी पावसाचं एक गीत शास्त्रीय संगीतावर आधारीत असं रचलं आहे. अंध वादक स्टुडिओत या गाण्यासाठी वादन करताहेत असं दृश्य आहे. इसराजसारखं दुर्मिळ वाद्य यात मदनमोहनने वापरलं आहे. आवाज अर्थात लताचाच आहे. ‘बुंदनिया बरसन लागी रे, काहे शोर मचाये पपिहरा’ असे राजेंद्र कृष्णनी लिहिलेले बोल आहेत. 
उस्ताद बरकत अली खां यांची ‘बागों मे पडे झुले’ ही चीज प्रसिद्ध आहे. त्याला समांतर अशी रचना ‘सावन के झुले पडे’ हिंदी चित्रपटात वापरली गेली. वसंत देसाई यांनी ‘प्यार की प्यास’ (१९६१) मध्ये भरत व्यासकडून हे गाणं लिहून घेतलं आणि लता-तलतच्या आवाजात रेकॉर्ड केलं. ‘सावन के झुले पडे, सैंय्या जी हमे तुम कहा भूले पडे’ या लताच्या तक्रारीला तलतने दिलेले उत्तर ‘ये नैना जो तुमसे लडे, गोरी जी तोरी पलकन के नीचे खडे’ फारच गोड आहे. शास्त्रीय संगीत हळूच भावगीताकडे वळवून त्याचं हिंदी गाणं कसं बनतं याचं हे उत्तम उदाहरण.

नाझिर हुसैनचा ‘फिर वोही दिल लाया हूं’ (१९६३) जॉय मुखर्जी-आशा पारेखला घेऊन प्रदर्शित झाला होता. याला संगीत ओ.पी.नय्यरचं होतं. नय्यरचे संगीत त्याच्या पंजाबी ठेक्यासाठी जास्त गाजलं. नय्यरला शास्त्रीय संगीतात गती कमी आहे असा आरोप केला गेला होता. पण नय्यरने तो ‘रागिणी’ (१९५८) मध्ये खोडून काढला. त्याच नय्यरने ‘फिर वोही दिल लाया हूं’ मध्ये आशा-उषा यांच्या आवाजात ‘देखो बिजली डोले बीन बादल की’ ही शास्त्रीय संगीतावर आधारित रचना सादर केली आहे. मजरूह सुलतानपुरीसोबत नय्यरची जोडी ‘मि.अँड मिसेस 55’, ‘आरपार’, ‘बाज’, ‘सी.आय.डी.’मध्ये चांगलीच जमली होती. याही चित्रपटांतील जवळपास सर्वच गाणी गाजली आहेत. ‘देखो बिजली डोले’वर केलेलं नृत्यही शास्त्रीयच आहे. शैलेंद्र, साहीर, राजेंद्र कृष्ण आणि आता मजरूह यांनी शब्दरचना करताना गाण्याचा शास्त्रीय बाज काळजीपूर्वक जपला.

‘रामराज्य’ (१९६७) हा बीना रॉय यांचा शेवटचा चित्रपट. सीतेची भूमिका केल्यावर रसिकांच्या मनात तिच प्रतिमा कायम राहावी असं मनात घेऊन बीना रॉय यांनी चित्रपट संन्यास घेतला. या चित्रपटाला वसंत देसाई यांचं संगीत आहे. यात त्यांनी लताच्या आवाजात ‘सूर-मल्हार’ रागावर आधारित एक नितांत सुंदर गाणं दिलं आहे. बोल अर्थातच भरत व्यास यांचे आहेत. भरत व्यास शब्दांचा वापर करताना त्यांना असं काही रूप देतात की, विचारायची सोय नाही. या गाण्यात एक ओळ आहे, 
डर लागे गरजे बदरिया, 
चमके मतवारी बिजूरीया, 
मोरी सूनी हाय सेजरीया 
आता ‘सेज’ या शब्दाचं ‘सेजरीया’ हे रूप जे बदरिया आणि बिजूरीयाशी अनुप्रास साधतं, हे केवळ भरत व्यास यांनाच सुचू शकतं.

वरील गाण्यात जास्त करून शास्त्रीय-उपशास्त्रीय बाज जशास तसा ठेवण्याकडे संगीतकारांचा कल दिसतो. काही गाणी मात्र पूर्णपणे शास्त्रीय संगीत नाही, पण त्याचा मुख्यत: आधार घेऊन हिंदी चित्रपटांत आली आहेत. मूळ बंदिशीपासून जराशी फारकत घेऊन, पण त्या सुरांशी प्रमाणिक राहून ही गाणी रचली गेली आहेत. 
‘आझाद’ (१९५५) हा मीनाकुमारी-दिलीपकुमार यांचा गाजलेला चित्रपट. यातील गाण्यांनी मोठी धूम त्या काळात केली होती. यातील एक गाणं शास्त्रीय बाजाचं पावसावरचं आहे. सी.रामचंद्र यांचे लाडके गीतकार राजेंद्र कृष्ण यांचेच शब्द आहेत आणि आवाज अर्थातच लताचा. 
जा रे जा रे ओ कारि बदरिया
मत बरसो रे मोरी नगरिया
परदेस गये है सावरीया
मीनाकुमारीचा काहीसा बाळबोध वाटावा असा नाच या गाण्यावर आहे. लताच्या पावसाच्या गाण्यांची एक मस्त भट्टी जमून आलेली आहे. त्यातलंच हे एक गाणं. त्या काळात जवळपास एका चित्रपटात असं एक तरी गाणं आहेच.

ज्या चित्रपटाने चित्रगुप्तला सगळ्यात जास्त नाव मिळवून दिलं तो चित्रपट म्हणजे ‘भाभी’ (१९५७). ‘चल उड जा रे पंछी’ किंवा ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ ही गाणी विलक्षण लोकप्रिय झाली. पण या चित्रपटात लोकसंगीत-शास्त्रीय संगीत असं मिश्रण करून चित्रगुप्तने एक पावसाचे गाणं लताच्या आवाजात दिलं आहे. या प्रकारातलं हे सर्वात लोकप्रिय गाणं आहे. 
कारे कारे बादरा, जा रे जा रे बादरा, 
मेरी अटरिया ना शोर मचा 
श्यामावर हे गाणं चित्रित आहे. या आधी आलेल्या ‘भाई भाई’ मधल्या तिच्या लोकप्रिय ‘ए दिल मुझे बता दे’मधील नृत्याची छाया या गाण्यावरही आहे. राजेंद्र कृष्ण यांनी 
काहे को जगाया ओ बैरी मै तो सोयी थी,  
पापी तू क्या जाने मै तो सपनों मे खोयी थी, 
अखियों से मोरी ले निंद उडा 
असे साधे पण प्रवाही लोकगीताला शोभेलसे शब्द रचले आहेत. 

शास्त्रीय संगीतावर आधारित पावसाळी गाण्यानंच एका संगीतकाराची कारकीर्द सुरू झाली. त्याचे वडील महान संगीतकार. त्यांची मनापासून इच्छा की, आपल्या मुलाची कारकीर्द सुरू होते आहे, त्याचं पहिलं गाणं त्या महान गायिकेनं गावं. पण गेली पाच वर्षं त्यांचं आणि तिचं शीतयुद्ध सुरू. एकदम संवाद बंद. मग अशा स्थितीत आपल्या मुलाच्या ध्वनीमुद्रणासाठी तिने नकार दिला तर? त्याच्या करिअरवर परिणाम व्हायला नको. शेवटी त्यांनी सगळा राग विसरून पोराच्या मायेपोटी त्या महान गायिकेला स्वत:हून फोन केला. तिनंही कुठलेही आढेवेढे न घेता एका संगीतकाराची कारकीर्द आपल्या आवाजानं सुरू करण्यास होकार दिला. हे गाणं होतं ‘छोटे नवाब’ (१९६१) चित्रपटातील
घर आजा घिर आये बदरा सावरीया 
मोरा जिया धक धक रे चमके बिजुरीया
गायिका आहे अर्थातच लता मंगेशकर. संगीतकार राहुल देव बर्मन. १९५७ पासून १९६१ पर्यंत सचिनदेव बर्मनच्या संगीतात लताचा आवाज नाही. त्या दोघांत शीतयुद्ध चालू होतं. याच काळातील हे गाणं. राहून देव बर्मन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील अधिकृत असं पहिलं गाणं. गाणं अतिशय गोड आहे. मजरूह सुलतानपुरीचे शब्द आहेत. अतिशय मोजक्या वाद्यांचा वापर करत आर.डी.ने गाणं रंगवलं आहे. पुढे चालून त्याच्या संगीताचं जे स्वरूप राहिलं त्याचा आणि या गाण्याचा काडीचाही संबंध नाही असंच वाटतं. 

(‘बरसात मे हमसे मिले तुम’ या लताच्याच ‘बरसात’मधल्या गाण्यानं गीतकार शैलेंद्रची चित्रपट कारकीर्द सुरू झाली होती. संगीतकार शंकर जयकिशनचाही हा पहिलाच चित्रपट.) पण आपल्या धांगडधिंग्यात आर.डी.ने अधूनमधून अतिशय मधुर अशा चाली देत आपण सचिन देव बर्मनचा खरा सांगीतिक वारसदार आहोत हे सिद्ध केलं आहे.
मूळ शास्त्रीय संगीतापासून प्रेरणा घेऊन पावसाची गाणी स्वत:चा चेहरा घेऊन हिंदी चित्रपटांत अवतरली. पण नंतरच्या काळात त्यातील गोडवा हरवला आणि ‘आज रपट जाईयो’ म्हणत ती कानावर आदळायला लागली!
  
a.parbhanvi@gmail.com