Sunday 28 May 2017

उमड घुमड कर आयी रे घटा !


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 27 मे 2017

उघडे बोडके माळ दिसताहेत. कष्टकरी शेतकरी कामावर निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर मन्ना डेचा आवाज शैलेंद्रचे शब्द घेवून उमटत जातो, ‘गंगा और यमुना की गहरी है धार, आगे या पिछे सबको जाना है पार, धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के, मौसम बीता जाय, मौसम बीता जाय.’ गेली किमान दहा हजार वर्षे मौसमी पावसाकडे डोळे लावून बसलेला माणूस मृग नक्षत्रात पेरणी करत आला आहे. शेतीचे पुरावेच आपल्याकडचे दहा हजार वर्षांपासूनचे आहेत. पहिला पाऊस पडून वाफसा आला की शेतकरी पेरणी करून मोठ्या पावसाची प्रतिक्षा करतो. पावसाचे थेंब कोसळायला लागतात आणि ‘धरती कहे पुकार के’ लिहिणारा शैलेंद्र त्याच्या पुढची भावना शब्दांत लिहून जातो 

‘हरियाला सावन ढोल बजाता आया
धिक तक तक मन के मोर नचाता आया’

लता आणि मन्नादाच्या आवाजाचा असा अप्रतिम गोफ सलिल चौधरी यांनी गुंफला आहे की त्याला तोड नाही.  हे गाणे आहे बिमल रॉय यांच्या गाजलेल्या ‘दो बिघा जमिन’ (1953) मधले आहे. 

एरव्ही हिंदी चित्रपटांतील पावसाची गाणी म्हणजे पावसाची प्रतिमा वापरून लिहिलेली प्रेमाची गाणी असंच स्वरूप राहिलेलं आहे. जवळपास सगळी गाणी अशीच आहेत. पण ‘हरियाला सावन’ सारखी काही मोजकी गाणी मात्र याला अपवाद आहेत. यात केवळ पावसाचेच वर्णन आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेमाचा उत्कट आविष्कार  म्हणजे शेती. शिकार करून खाणारा म्हणजेच मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि माणसाच्या संस्कृतिला सुरूवात झाली. 

मातीबद्दलचे प्रेम, मातीला असलेली आभाळाची ओढ हे सगळे काव्यात्म पातळीवर ‘हरियाला सावन’ मध्ये आले आहे. निसर्ग म्हटलं की एरव्हीच शैलेंद्रच्या शब्दांना वेगळीच कळा प्राप्त होते. इथे निसर्ग आहे शिवाय सृजनाचे प्रतिक असलेला पाऊस आहे. शैलेंद्र लिहितोय ‘ऐसे बीज बिछा रे, सुख चैन उगे दुख दर्द मिटे, नैनों मे नाचे रे सपनों का धान हरा’. हे खरंच आहे की शेतकरी ते हिरवं स्वप्न पाहतो म्हणूनच तर ह्या आख्ख्या जगाला खायला भेटते आहे. 

गाण्याला लताचा आवाज आहे. अविरत झुळझुळ वाहणार्‍या झर्‍यासारखा हा आवाज निसर्गाबाबत भावभावना व्यक्त करायला अतिशय पोषक आहे. त्याला जोड आहे ती मन्नाडे च्या आवाजाची. सलिल चौधरी यांनाही निसर्गाची अतिशय बारीक जाण आहे. त्यांचे संगीत निसर्गाचे वर्णन करताना विशेष फुलते. त्यांच्या इतरही गाण्यांत निसर्ग अतिशय परिणामकारक रित्या उमटला आहे.

अतिशय कमी चित्रपटांना संगीत दिलेल्या गायक संगीतकार जगमोहन याने ‘सरदार’ (1955) चित्रपटात गीता दत्तच्या आवाजात पावसाचे एक मस्तीखोर गाणं दिलं आहे. 

बरखा की रूत मे हे हो हा
रस बरसे नील गगन से
कोई कहे बादल से मोती गिरे
कोई कहे रात हाय रोती फिरे

अशी आगळी वेगळी शब्दकळा असलेलं उद्धवकुमारनी लिहिलेलं गीत. गीता दत्तच्या आवाजने पावसाची मस्ती या गाण्यात उतरलेली जाणवते. अशोक कुमार-बीना रॉय यांचा हा चित्रपट.

‘मदर इंडिया’ (1957) मध्ये ‘मेघ मल्हार’ रागावर आधारीत एक सुंदर गाणे नौशाद यांनी संगीतबद्ध केले आहे. नौशाद यांना शास्त्रीय संगीताची फार चांगली जाण होती.  ‘दुख भरे दिन बीते रे भैय्या अब सुख आयो रे’. या गाण्यात प्रत्यक्ष पाऊस नाही. पण पावसामुळे पिकलेली शेती, त्यामुळे आलेली समृद्धी याचे सुंदर वर्णन शकिल बदायुनीने केले आहे. शमशाद-रफी-मन्नादा-आशा असले चार आवाज नौशाद यांनी या गाण्यात वापरले आहेत. नर्गिस राजकुमार अशी आधीची पिढी आणि राजेंद्रकुमार-सुनील दत्त-कुमकुम अशी पुढची पिढी. आशाच्या आवाजात ‘मधुर मधुर मनवा गाये’ कुमकुम झोक्यावर बसून म्हणते तेंव्हा ते सूरही तसेच झोका घेत असल्याचा भास होतो. 

निखळ पावसाचे एक गाणे ‘बरखा’ (1959) चित्रपटात आहे. चित्रगुप्तचे संगीत आणि लताचाच आवाज आहे. हे गीत लिहिलं आहे राजेंद्रकृष्ण यांनी. 

बरखा बहार आयी बुंदो के हार लायी
रिमझिम ने छेडे तराने

अशी साधी शब्दकळा आहे. पण लिहिता लिहिता राजेंद्रकृष्ण यांनी असं लिहिलं आहे, ‘अंग निखरे रंग निखरे, जागे सपने भी सोये हुये, बन सवर के निकले भवरे, मुखडे कलिया भीगोये हुये’. पावसानंतर भुंगे बाहेर पडले आहेत. निसर्गातील सगळे घटक कसे पावसाळ्यात सगळ्याच अर्थाने भिजून गेले आहेत. त्यांचे रूप पालटत चाललं आहे. इतकी निखळ भावना फार थोड्या गाण्यात उमटली आहे. एरवी लगेच प्रेमाच्या उपमा सुरू होतात. राजेंद्रकृष्ण यांचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतकाराला सहज चाल रचता यावी गायकाला सहज गाता यावेत असे शब्द त्यांच्यात गाण्यात असतात. आता पावसाचे थेंब म्हणजे सतारीचे सूरच वाटतात असं वर्णन प्रकाश नारायण संत यांनी लंपनच्या कथेमध्ये (शारदा संगीत) केलं आहे. अशी एक ओळ या गाण्यात आहे, ‘पडता फुहार है, बजती सितार है, दिन है सुहाने सुहाने, बरखा बहार आयी बुंदो के हार लायी, रिमझिम ने छेडे तराने’. 

हेमंतकुमार यांनी ‘चांद’ (1959) चित्रपटात लताच्याच आवाजात एक अप्रतिम गाणं दिलं आहे. शैलेंद, राजेंद्रकृष्ण यांच्या नंतर ज्या गीतकाराने पावसाला निखळ स्वरूपात शब्दबद्ध केलं तो गीतकार म्हणजे भरत व्यास. हे गीत त्यांचंच आहे. 

ए बादलों रिमझिम के रंग लिये कहां चले
झुमती उमंग लिये, प्यार की पतंग लिये, 
जिया मोरे संग लिये कहां चले

यात पावसामुळे हृदयात उठणार्‍या प्रेमाच्या तरंगांबद्दल लिहिलंय. पण हे प्रेम व्यापक आहे. ते कुण्या एका व्यक्तीमध्ये अडकत नाही. आपण या संपूर्ण सृष्टीचाच एक अविभाज्य घटक आहोत आणि त्या भावनेतून निर्माण होणारी प्रेमाची व्यापक जाणीव पावसामुळे उफाळून वर येते. अशी अप्रतिम रचना भरत व्यास यांनी केली आहे. अनुप्रास वापरण्याबाबत भरत व्यास यांचा हात कुणीच गीतकार धरू शकत नाही. 

‘लचक लचक फुलों की ये डालियां, 
जाने क्यूं बजा रही है तालियां, 
दिल मे कोई आके कहे प्यार करो, 
देखो ना इनकार करो अजी कहां चले’ 

अशी ती शब्दकळा आहे. मीनाकुमारीवर हे गाणं चित्रित आहे. एरव्ही दु:खी प्रतिमा पडद्यावर रंगवणारी मीनाकुमारी अशा गाण्यांनाही पडद्यावर न्याय देवू शकते हेच हे गाणे सिद्ध करते. गाणं पावसाळी हवेबद्दल आहे पण प्रत्यक्ष पावसाबद्दल मात्र नाही. 

निखळ पावसाचे म्हणता येणार नाही पण एक वेगळा प्रयोग असं भरत व्यास यांचेच गाणे म्हणजे ‘नवरंग’ ( 1959) मधील ‘कारी कारी अंधियारी थी रात’. शब्द आणि सुर अशी एक जुगलबंदी या गाण्यात आहे. यासाठी जी शब्दकळा वापरली आहे ती सगळी पावसाळी आहे. आशा भोसले आणि स्वत: सी. रामचंद्र यांच्याच आवाजात हे गाणं आहे. नुसत्या शब्दांतही संगीत-लय कशी भिनली आहे याचं एक सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणजे हे गाणं. असे लयदार शब्द कुठे फारसे सापडत नाहीत. 

कारी कारी अंधियारी थी रात 
जब सघन गगन से गरज उठी
गरज उठी सावन की घटा 
घुुंघट मे छुपाकर चपल चपल बिजली की छटा
एक नार करके शृंगार, 
एक नार तिखी तलवार या थी वो कटार
करके शृंगार चली उस पार 
जहा थे उसके किसन मुरार
छमक छम छम छमक छम छम

हे सगळे शब्दच भरत व्यास यांनी असे रचले आहेत की शब्दांच्याच पायात घुंगरू बांधले आहेत आणि ते नाचत आहेत, त्याचाच जो ध्वनी कानावर पडतेा आहे तो म्हणजे हे गाणे. 

निखळ पावसाचे सगळ्यात अप्रतिम अद्वितिय गाणं आहे ‘दो आंखे बारा हाथ’ (1957) मधील ‘हो उमड घुमड कर आयी रे घटा’. शब्द-सुर-वाद्यमेळ अशी अनोखी जुगलबंदी अजून दुसरी निर्माण झाली नाही. लता/मन्नादाचा आवाज-वसंत देसाई यांचे संगीत -भरत व्यास यांचे जे शब्द या गाण्यात आले आहेत ते केवळ आणि केवळ अप्रतिम. असा अनुप्रास, अशी कल्पनाशक्ती फार दुर्मिळ.

हो उमड घुमड कर आयी रे घटा
काले काले बादलों की छायी छायी रे घटा
जब सनन पवन का लगा रे तीर
बादल को चीर निकला रे नीर
झिर-झिर झिर-झिर अब धार झरे
ओ धरती जल से मांग भरे

काय शब्दकळा आहे! वार्‍याचा बाण लागून ढगातून पाण्याची धार धरतीवर येते आहे. धरतीचे सौभाग्य म्हणजेच पाऊस. त्यानं तिच्या भांगात जणू कुं़कू भरले असेच वातावरण आहे. हे आख्खं गाणं म्हणजे कविता म्हणून वेगळेच प्रकरण आहे. केवळ ते शब्द आपण वाचले तरी आपल्या मनात एक अनोखं गाणं घुमायला लागतं. लताचा आवाज आणि पाऊस याचं काहीतरी वेगळंच नातं आहे. निखळ पावसाचे गाणे असो की प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरलेले गाणे असो बहुतांश गाण्यात लता आहेच. 

या गाण्यात राजस्थानमधील कोका हे लोकवाद्य वसंत देसाई यांनी वापरलं आहे. याच वाद्याचा अप्रतिम उपयोग याच चित्रपटातील ‘सैंय्या झुठों का बडा सरताज निकला’ मध्ये केलेला आहे. 

जिथे प्रेमाची आसक्ती आहे, तिथेच पाऊस बरसतो अशी एक ओळ भरत व्यास लिहून जातो. ‘सावन का संदेशा लेकर निकली अपने घरसे, जो कोई इसके प्यार को तरसे वही नवेली बरसे’. भरत व्यास यांनी एक सनातन सत्य या निमित्ताने लिहून ठेवलं आहे. विफल प्रेमाचे प्रतिक म्हणजे पाऊस नाही. पाऊस हा सफल प्रेमाचे प्रतिक आहे. ज्याला त्याची आस आहे तिथेच तो बरसतो आहे. आणि त्यातूनच नविन निर्माण होतं आहे, सृजन होतं आहे. तिथेच हिरवे कोवळे कोंब फुलणार आहेत. तिथूनच या सृष्टीचं गाडं सुरू झालं आणि जोवर पाऊस आहे तोवर ते चालू राहणार आहे. धरती आणि आभाळाच्या प्रेमाचे सनातन रूप साकारणारा असा हा पाऊस. 

हिंदी चित्रपटातील निखळ पावसाच्या गाण्यांचा  विचार केला तर ‘उमड घुमडकर आयी रे घटा’ हे गाणं सर्वोत्कृष्ठ आहे. अजून तसं गाणं बनलं नाही.  

            -आफताब परभनवी.

Sunday 21 May 2017

कैफी आझमी : वक्त ने किया क्या हसी सितम !!


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 20 मे 2017

अतिशय थोड्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली. अतिशय थोड्या चित्रपटांसाठी संवाद लिहिले, पटकथा लिहिल्या. पण त्यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. साहित्यिक म्हणून त्यांचं नाव मोठं होतंच. असे गीतकार कवी म्हणजे कैफी आझमी. 10 मे हा त्यांचा स्मृतीदिन.  14 जानेवारी 1919 हा आझमी यांचा जन्मदिवस. म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष लवकरच सुरू होईल. कैफी आझमींची प्रतिभा जाणून घ्यायला प्रातिनिधीक म्हणून त्यांचे तीन चित्रपट पुरेसे आहेत. 

पहिला आहे अर्थातच गुरूदत्तचा अतिशय महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘कागज के फुल’ (1959). या चित्रपटाच्या प्रत्येक बाबीची चर्चा झाली. चित्रपटाच्या अपयशाने गुरूदत्त कसा खचला आणि त्यातच त्याच्या आयुष्याचा अंत कसा झाला या दंतकथा अजूनही रंगवून सांगितल्या जातात. या चित्रपटाचे व्यवसायिक अपयश त्या काळात पैशात मोजल्या गेले असले तरी याची गाणी मात्र आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. 

‘प्यासा’च्या यशानंतर सचिनदेव बर्मन आणि साहिर यांचे संबंध तणावाचे बनले. परिणामी या पुढच्या चित्रपटासाठी गुरूदत्तला नवा गीतकार शोधावा लागला. खरं तर मजरूह (मि.अँड मिसेस 55, आरपार, बाज, सी.आय.डी.) साहिर (प्यासा, जाल, बाजी) पुढे शकिल  (चौदहवी का चांद, साहब बिबी और गुलाम), शैलेंद्र (सैलाब) अशा प्रतिभावंत गीतकारांनी गुरूदत्तच्या चित्रपटांतून गीतं लिहिली. पण ‘कागज के फुल’ मात्र कैफी आझमींच्या वाट्याला आला. (पुढे गुरूदत्तच्या निधनानंतर बहारे फिर भी आयेंगी हा चित्रपट पूर्ण झाला. त्याचे शिर्षक गीतही कैफी आझमी यांचेच आहे.) कैफी आझमी यांची गीतकार म्हणून निवड किती सार्थ होती ते यातील गाण्यांनीच सिद्ध केले.

तरूण तरूणींची टोळी मस्त सहलीला निघाली आहे. 

अहा सन सन सन जो चली हवा
रूक रूक कान मे कुछ कहा
नये आरमान जागे नये तूफान जागे
झोके पे झोका खाये जिया

आशा-सुधा मल्होत्रा-रफी यांच्या आवाजातील हे गाणं तारूण्याचा जोश पडद्यावर जिवंत करणारं आहे. खरं तर आशा भोसले इतकाच या गाण्यात गीताचाही आवाज शोभला असता. पण गीता-गुरूदत्त या जोडप्याच्या कौटूंबिक कलहाची छाया चित्रपटाच्या गाण्यावरही पडली. परिणामी गीताची केवळ दोनच गाणी या चित्रपटात आली आहे. या गाण्यात कोरसचा वापर सुंदरच केला आहे. सचिनदेव बर्मनच्या गाण्यात तसा कोरस इतका ठळक फार कमी आलाय.

जॉनी वॉकरचं एक मजेशीर गाणं हे गुरूदत्तच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हे पथ्य याही चित्रपटात पाळल्या गेलंय. ‘हम तूम जिसे केहते है शादी’ हे जॉनी वॉकरने त्याच्या खास स्टाईलमध्ये सादर केलंय आणि रफीनेही तसंच गायलंय.

गीता दत्तचे सदाबहार गाणं ज्यानं कैफी आझमी यांचे नाव नेहमीसाठी स्मरणात राहिल ते म्हणजे 

‘वक्त ने किया क्या हसी सितम, 
हम रहे ना हम, तूम रहे ना तू’

पुढे गुलजार यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या ओळी याच गाण्यात आहेत, ‘जायेंगे कहा सुझता नही, चल पडे मगर रास्ता नही, क्या तलाश है कुछ पता नही, बुन रहे है दिल ख्वाब दम-ब-दम’. खरं तर गुरूदत्तचा कॅमेरा, वहिदा रेहमानचा विलक्षण भावदर्शी चेहरा आणि पार्श्वभूमीवर गीताचे स्वर हे काहीतरी विलक्षण असं रसायन आहे. वहिदाच्या जागी गुरूदत्तच्या इतरही नायिका मधुबाला, माला सिन्हा, शकिला, मीना कुमारी यांचेही चेहरे आठवून पहा. हा कॅमेरा काहीतरी वेगळं शोधून काढतो. त्याला गीताचा स्वर एक विलक्षण परिमाण देवून जातो. 

रफीचे यातील गाणेही खुप गाजले. वाक्प्रचार म्हणून आजही या ओळी वापरल्या जातात

देखी जमानेकी यारी, बिछडे सभी बारी बारी’ 

ही गाणी तशी परिचयाची आहेत. लोकप्रिय आहेत. पण यातील गीताचे एक गाणे मात्र काहीसे दबून गेले. लहानमुलांसाठीचे असल्यामुळे त्याची कुणाला फारशी दखल घ्यावी वाटल नसावी. ते गाणे म्हणजे

‘एक दोन तीन, चार और पाच 
छे और सात, आठ और नौ
एक जगा पर रेहते थे
झगडे थे पर उनमे सौ’  

गाणं लहानमुलांचे जरी असलं तरी कैफी आझमी यांनी त्यात मोठ्या माणसांसाठीचा आशय ठासून भरला आहे. शिवाय गीताचा अवखळ सूर असा काही लागतो की ‘वक्त ने किया’ मधली दु:खी आर्त गीता ती हीच का अशी शंका यावी. एक ते नऊ आकड्यांची छोटी गोष्ट सांगता सांगता कैफी आझमी सनातन मानवी वृत्तीशी जाऊन भिडतात. ‘एक’ हा सगळ्यात लहान आकडा. तो एकटेपणात फिरत असताना त्याला किंमत नसलेला शुन्य (सिफर) भेटतो. दोघेही एकमेकांच्या जवळ येतात आणि दहा हा सगळ्यात मोठा आकडा तयार होतात. हे पाहून मग इतर आकड्यांची वृत्ती कशी बदलती. ते सगळे आपसात कट करतात आणि या दोघांची जोडी फोडतात. अशी मार्मिक गोष्ट या गाण्यात सांगितली आहे. पण हे गाणं काहीसं दुर्लक्षीत राहिलं आहे. 

कैफी आझमी यांचा दुसरा चित्रपट ज्याचा विचार केला पाहिजे तो म्हणजे ‘अनुपमा’ (1966). हेमंतकुमार यांचे अतिशय मधुर असे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. हृषिकेश मुखर्जी यांचा हा चित्रपट धर्मेंद्र शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित आहे. लताचे यातील गाणे 

कुछ दिल ने कहा कुछ भी नही
कुछ दिल ने सुना कुछ भी नही

हे गाणे म्हणजे एक वेगळाच सांगितिक अनुभव आहे. अतिशय संयत अशा अभिनयाने शर्मिलाने पडद्यावर हे सादर केले आहे. कैफी आझमी हे मुलत: कविच आहेत याचा परत परत अनुभव या गाण्याच्या शब्दांमध्ये येत राहतो. 

लेता है दिल अंगडाईयां, इस दिल को समझाये कोई
आरमान न आंखे खोल दे, रूसवा ना हो जाये कोई
पलकों की ठंडी सेज पर सपनों की परिया सोती है
कुछ ऐसी ही बाते होती है

याओळी परत गुलजार यांच्यावर असलेल्या कैफी आझमींच्या प्रभावाची आठवण करून देतात. या ओळी ऐकल्या की जाणवतं या केवळ चित्रपटासाठी लिहीलेल्या ओळी नाहीत. हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. 
लताचा स्वर आणि हेमंत कुमार यांचे संगीत यांनीही या शब्दांना पुरेपुर न्याय दिला आहे. केवळ हेच नाही तर या चित्रपटातील इतरही गाणी अतिशय गोड आहेत. लताचेच, ‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार, कोई आता है’ किंवा स्वत: हेमंतकुमारच्या आवाजातील ‘या दिल की सुनो दुनियावालो’, आशा भोसलेची दोन अवखळ गाणी, ‘भिगी भिगी फिजा’ आणि ‘क्यु मुझे इतनी खुशी मिली’ अतिशय गोड आहेत. 

कैफी आझमी यांचा तिसरा प्रातिनिधीक चित्रपट म्हणजे ‘हकिकत’ (1964). भारत चीन युद्धावरचा लडाखची पार्श्वभूमी असलेला हा चेतन आनंदने दिग्दर्शीत चित्रपट. गुरूदत्त, हृषिकेश मुखर्जी यांच्यासारख्या महान दिग्दर्शकांसोबतच कैफी आझमी यांना चेतन आनंद सारख्या अजून एका मोठ्या दिग्दर्शकासाठी गीतं लिहिण्याची संधी मिळाली.

देशभक्तीपर गाण्यांची एक चांगली सशक्त परंपरा हिंदीत होती. जी आता जवळपास लुप्त झाली. प्रदीप (ऐ मेरे वतन के लोगो-संगीत सी.रामचंद्र-हे चित्रपटातील गाणे नाही), शकील (अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही-संगीत नौशाद), साहिर (मेरे देश की धरती-संगीत ओ.पी.नय्यर), प्रेम धवन (छोडो कल की बाते-सं.उषा खन्ना) या मालिकेत कैफी आझमी जावून बसतात. या चित्रपटातील देशक्तीपर गाणे आहे

कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों
अब तूम्हारे हवाले वतन साथियों

रफीच्या आवाजाने गाण्याला चार चांद लावले आहेत हे वेगळे सांगायची गरजच नाही. कैफी आझमी यांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चित्रपटाच्या एका प्रसंगासाठी ते लिहित नाहीत. स्वतंत्रपणे त्यांच्या ओळी कविता म्हणून शिल्लक राहतात. या गाण्यातील ही ओळ त्याची साक्ष आहे

जिंदा रेहने के मौसम बहोत है मगर
जान देने की रूत रोज आती नही
हुस्न और इश्क दोनो को रूसवा करे
वो जवानी जो खूं मे नहाती नही
बांध लो अपने सर पे कफन साथियों

मदन मोहनच्या संगीतावर प्रेमाच्या दु:खाच्या गीतांची एक छाप पडलेली असताना त्यांनी या चित्रपटासाठी वेगळं संगीत देवून आपली प्रतिभा लखलखीत असल्याचे सिद्ध केले. 

दुसरं गाणं सैनिकांच्या कोमल भावनांचे दर्शन घडविणारं आहे. अशी गाणी हिंदी चित्रपटात फार कमी आहेत. या गाण्यात तलत, मन्ना डे, रफी आणि भुपेंद्र (त्यानं कामही केलं आहे चित्रपटात) असे चार आवाज वापरले आहेत. 

होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा

आपली प्रेयसी/पत्नी आपल्याला कसे विसरू पहात असेल अशी एक विलक्षण भावना या गाण्यात आली आहे. बर्‍याचदा सिनेमातील गाणी कृत्रिम असतात. या गाण्याचं तसं नाही. अतिशय स्वाभाविक अशी भावना गाण्यात आली आहे. मदन मोहनचे यासाठी विशेष कौतुक करावे लागेल की त्याने तलत, मन्नादा, रफी, भुपेंद्र हे चार आवाज यात वापरले पण किशोर कुमारसारखा यात न बसणारा आवाज वापरला नाही. यात वापरलेल्या चारही आवाजांची जातकुळी वेगळी आहे. पण मदनमोहनने त्यांना एकत्र गुंफून कमाल केली आहे. 

लताचे अप्रतिम ‘जरासी आहट होती है तो दिल सोचता है’ किंवा ‘खेलो ना मेरे दिल से’ तसेच रफीचे मस्तीखोर ‘मस्तीमे छेडके तराना कोई दिल का’ ही गाणीही याच चित्रपटात कैफी आझमी यांनी लिहिली आहेत. 
कैफी आझमी यांचे हे तीन वेगवेगळ्या विषयांवरचे तीन मोठ्या दिग्दर्शकांसोबतचे चित्रपट. सचिनदा, हेमंतकुमार व मदनमोहन सारखे अतिशय प्रतिभावंत संगीतकार या चित्रपटांना लाभले. कैफी यांची गाणी ऐकताना लक्षात जास्त येतं ते त्यांचं कवीत्वच. आपल्यातल्या कविवर कुठेच गीतकाराला ते स्वार होवू देत नाहीत. शिवाय कुठेही त्यांची लेखणी साचेबद्ध होत नाही. ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ किंवा ‘बिछडे सभी बारी बारी’ मधील वेदना, ‘कुछ दिल ने कहा’ मधील कोमल भावना असो की ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियोें’ मधील देशभक्ती असो कैफी आझमी यांची लेखणी आपली विविधरंगी प्रतिभा सिद्ध करत जाते. 

‘उमरावजान’ चे गीतकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उर्दू कवी शहरयार यांना पत्रकार अंबरिश मिश्र यांनी मुलाखतीत विचारले होते की तूमचा चित्रपट इतका गाजला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मग निर्मात्यांची रांग लागली असेल तुमच्या दारात चित्रपटांसाठी गीतं लिहावीत म्हणून. त्याला उत्तर म्हणून शहरयार हलकेच हसून म्हणाले, ‘पता नही. मगर किसीनेभी पुछा नही अभी तक.’ कैफी आझमी यांच्याबाबतही असंच काहीतरी झालं असावं. इतकी चांगली गाणी देवूनही त्यांच्याकडून अजून लिहून घ्यावं असं नंतरच्या निर्मात्यांना/संगीतकारांना वाटलं नाही. हे आपणा रसिकांचेच दुर्दैव. नसता अजून सुंदर गाणी आपल्या पदरात पडली असती. 

या चित्रपटांशिवाय इतरही चित्रपटांतील कैफी आझमींच्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.  कैफी आझमी यांची काही संस्मरणीय गाणी (एका चित्रपटातील एकच गाणं नमुना म्हणून घेतलं आहे) 

1. जीत ही लेंगे बाजी हम तूम- रफी/लता (शोला और शबनम 1962, सं. खय्याम)
2. ये नयन डरे डरे -हेमंतकुमार (कोहरा 1964, सं. हेमंतकुमार)
3. बहारे फिर भी आयी है-महेंद्र कपुर (बहारे फिरी आयेंगी 1966, सं. ओ.पी.नय्यर)
4. आज की काली घटा-गीता (उसकी कहानी 1966, सं. कन्नु रॉय)  
5. बहारो मेरा जीवन ही सम्भालो-लता (आखरी खत 1967, सं. खय्याम)
6. मेरी आवाज सुनो-रफी (नौनिहाल 1967, सं. मदन मोहन)
(पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं या चित्रपटात घेतलं आहे)
7. ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही- रफी (हिर रांझा 1970, सं. मदन मोहन)
(ह्या चित्रपटाचे संवाद ही कैफी आझमी यांनी लिहिले आहेत आणि ते सगळे काव्यात्म आहेत) 
8. सिमटीसी शर्मायीसी किसी दुनिया से तूम आयी हो-किशोर (परवाना 1971, सं. मदन मोहन)
9. चलते चलते मुझे कोई मिल गया था -लता (पाकिजा 1972, सं. गुलाम मोहम्मद)
10. तूम बीन जीवन कैसे बीता-मन्ना डे (बावर्ची 1972, सं. मदन मोहन)
11.तूम जो मिल गये हो-रफी/लता (हसते जख्म 1973, सं. मदन मोहन)
12.माना हो तूम हो बेहद हसीन- येसूदास (तुटे खिलोने 1978, सं. बप्पी लहरी) 
13.शीशा हो या दिल हो आखिर तूट जाता है-लता (आशा 1980, सं. लक्ष्मीकांत प्यारेलाल)
14.तूम इतना जो मुस्कूरा रही हो-जगजीत (अर्थ 1983, सं. जगजीत सिंग)
15.जलता है बदन-लता (रझिया सुलतान 1983, सं. खय्याम)  

             -आफताब परभनवी.

Tuesday 16 May 2017

देव आनंदच पण जरा वेगळा । ना सचिनदांचे संगीत ना किशोर-रफीचा गळा ||


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 13 मे 2017

देव आनंद-किशोर कुमार हे अद्वैत आपल्या इतक्या डोक्यात बसलं आहे की किशोरची अशी बरीच गाणी आहेत की ज्यात देव आनंद नाही पण आपल्याला डोक्यात तोच येत राहतो. शिवाय सचिन देव बर्मन यांचे संगीत. किशोर इतकीच देव आनंदसाठी गायलेली रफीची गाणी पण गाजली. त्यामुळे रफीचा आवाजही बर्‍याचदा देव आनंदच्या आठवणी जाग्या करतो. पण सचिनदा-किशोर-रफी यांच्या शिवायचा जो देवआनंद आहे तो पण खुप अवीट गोडीचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.

देव आनंदच्या कारकिदीर्र्च्या सुरवातीलाच गुलाम मोहम्मदने मुकेशचा आवाज त्याच्यासाठी वापरला. पुढे कुठेच कधीच मुकेश देव आनंदसाठी गायला नाही. पण हे आश्चर्य सुरवातीला मात्र घडलं. ‘शेर’ (1949) हा देवआनंद-सुरैय्या-कामिनी कौशल यांचा सिनेमा. लता-मुकेशच्या आवाजात एक आर्त दु:खी गाणं गुलाम मोहम्मदनं दिलं आहे, ‘ये दुनिया है यहा दिल का लगाना किसको आता है, हजारो प्यार करते है निभाना किसको आता है.’ प्रेमभंगाची दु:खी गाणी गाजायचा तो काळ होता. परिणामी देवआनंदसाठीचा मुकेशचा हा दु:खी सूर तेंव्हा खपून गेला. याच चित्रपटात दुसरंही एक गोड खेळकर गाणं आहे. लता आणि जी.एम.दुर्रानीच्या आवाजातलं,

‘दो बिछडे हुये दिल, 
आपस मे गये मिल, 
आरमान की नगरी मे हुआ आज सवेरा, 
लो तुमसे मिले हम, 
सब दिलके मिटे गम, 
खुश होके मुहोब्बत ने किया दिल मे बसेरा’

शकिल बदायुनीचे शब्द परत देवआनंदच्या कुठल्याच चित्रपटाला लाभले नाहीत. नौशाद, रवी, हेमंतकुमार, गुलाम मोहम्मद यांच्यासाठी जास्त करून शकिलने लिहिले. पण नेमके हे संगीतकार म्हणून देव आनंदच्या चित्रपटांना फारसे लाभले नाहीत. 

सरोदवादक अली अकबर खां यांनी ‘आंधियां’ (1952) मध्ये हेमंतकुमारचा आवाज ‘वो चांद नही है, दिल है किसी दिवाने का’ या गाण्यात देवआनंदसाठी वापरला आहे. पण हे गाणं फार विशेष नाही. 

‘पतिता’ (1953) हा शंकर जयकिशनचा राजकपुर प्रॉडक्शन बाहेरचा एक गाजलेला चित्रपट. देवआनंद-उषा किरण यांच्या भूमिका यात होत्या. शंकर जयकिशनने हक्काच्या  मुकेश-मन्नाडे- रफी असे कोणालाच न वापरता हेमंत कुमार आणि तलत मेहमुद यांचा वापर या चित्रपटात केला आणि गाणि गाजवून दाखवली. 

याद किया दिल ने कहां हो तूम
झुमती बहार हो कहां हो तूम
प्यार से पुकार लो जहां हो तूम

या लता-हेमंतच्या गाण्यानं नुकत्याच सुरू झालेल्या बिनाका गीतमालात धुम केली होती. पण तलतच्या आवाजातील ‘है सबसे मधुर वो गीत जिसे, हम दर्द के सूर मे गाते है’, आजही रसिकांच्या मनात उदबत्ती शांतपणे जळत रहावी तसे जळत राहतं. तलतच्या आवाजात जी थरथर आहे तिची ही कमाल आहे. या गाण्यासाठी खरी दाद देवआनंदलाच द्यायला हवी. त्यानंही तलतच्या आवाजाला दाद देत संयत अभिनय केला आहे. खरं तर त्याच्या स्वभावाला इतका शांतपणा शोभत नाही. याच चित्रपटात तलतची अजून दोन सुंदर गाणी आहेत पण ती देव आनंदवर चित्रित नाहीत.

देवआनंद-दिलीपकुमार या जोडीचा ‘इन्सानियत’ (1955) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. देवआनंद-दिलीप कुमार-बीना रॉय अशी तगडी स्टार कास्ट, सी.रामचंद्रचे संगीत (त्यांच्या पाठीशी आलबेला आणि अनारकलीचे लखलखीत यश होते) लता-रफी-तलत असे गोड आवाज, राजेंद्रकृष्णची गीतं असा सगळा जमून आलेला मसाला. मग पदार्थ चवदार होणारच. लता-तलचे एक मधुर गाणं यात आहे. 

आयी झुमती बहार, लायी दिल का करार
देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया
सैय्या पेहली पेहली बार बाजे मन की सितार
देखो प्यार हो गया, देखो प्यार हो गया

तलवारकट मिशातला कशिदाकाम केलेला गुरू शर्ट घातलेला देव आनंद आणि परकर ओढणीतली माथ्यावर बिंदी घातलेली बीना रॉय हे पहायला मोठी गंमत वाटते.

दत्ता नाईक या मराठी माणसाने एन.दत्ता नावाने हिंदी चित्रपटात मोजकीच पण फार चांगली गाणी दिली आहेत. देवआनंद-गीता बाली यांच्या ‘मिलाप’ (1955) मध्ये एन.दत्तानं ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां, खो ना जाये आ भी जा, ये बहारों का समा’ असं गाणं हेमंत कुमारच्या आवाजात दिलं आहे. हेच गाणं लताच्या आवाजात जरा अवखळ आहे. पण हेमंतकुमारच्या खास खर्जातल्या आवाजात तसाच आशय स्पष्ट करतं. कामप्रेरणा उत्कट झाल्यावर पुरूषाचा आवाज घोगरा होतो. अशी एक पुसटशी छाया हेमंतदांच्या आवाजात वापरून एन.दत्ता यांनी कमाल केली आहे. साहिरचे शब्द तर अभिजात आहेतच. साहिरची संगीतकार रवी सारखीच नाळ एन.दत्ताशी फार चांगली जूळली होती.

मदनमोहन च्या ‘पॉकेटमार’ (1956) मध्ये छोट्या नावेवर डोलकाठीला धरून फेरी मारणार्‍या देवआनंद गीताबाली यांच्यावर एक सुंदर द्वंद्व गीत आहे. 

ये नयी नयी प्रीत है
तूही तो मेरा मीत है
ना जाने कोई साजना
ये तेरी मेरी दास्तां

राजेंद्रकृष्ण-मदनमोहन -(मदनमोहनच्या एकूण 100 चित्रपटांपैकी राजेंद्रकृष्णची गीतं असलेले चित्रपट 36) जोडीनं सगळ्यात जास्त चित्रपट दिले. पण नाव झाले ते मदनमोहन-राजा मेहंदी अली खां (राजा मेहंदी अली खां चे चित्रपट 12) जोडीचे. तलत-लताचे हे गोड गाणे राजेंद्रकृष्णच्याच लेखणीतून उतरले आहे. प्रेमिकांचे एक सुंदर स्वप्न असते. या स्वप्नाला राजेंद्रकृष्णने या गाण्यात गोड शब्द रूप दिले आहे. ‘चलो चल दे वहां, जमी और आसमां, गले मिलते जहां, बना दे वहि आशिया’.  

1957 सालात देवआनंदच्या दोन चित्रपटांनी धुम केली होती. एक होता देव आनंदचा घरचा चित्रपट, ‘नौ दो ग्यारह’ ज्यात त्याची पत्नी असलेली कल्पना कार्तिक, संगीतकार सचिनदेव बर्मन, गायक रफी-आशा-गीता, दिग्दर्शक विजय आनंद असा सगळा हक्काचा गाजलेला मसाला होता. पण दुसरा चित्रपट असा होता ज्याच्या गाण्यानंही धुम केली. तो काही देव आनंदचे होम प्रॉडक्शन नव्हता. हा चित्रपट होता ‘बारिश’. यात देवआनंद सोबत होती नुतन. मागाच्याच वर्षी या जोडीचा पेईंग गेस्ट (1956) हिट झाला होता. ‘बारिश’ ला संगीत होते सी.रामचंद्र यांचे. देवआनंद साठी तलत-हेमंतकुमार-मुकेश यांचे आवाज रफी-किशोर शिवाय वापरून झाले होते. पण या चित्रपटात देव आनंदसाठी स्वत:  सी.रामचंद्र यांनीच आवाज दिला (देवआनंदसाठी चितळकरांचा आवाज चिकचॉकलेट या संगीतकाराने ‘नादान’ (1951) चित्रपटात वापरला होता). ही दोन्ही गाणी गोड आहेत, आजही ऐकाविशी वाटतात.

नुतन-देवआनंद यांचा एक अप्रतिम संवाद गाण्याआधी आहे. प्रेम कसं व्यक्त करायचं दोघांनाही कळत नाही. तेंव्हा नुतन म्हणते ‘कोई बात बीना कहे सुने भी समझ मे आती है’ आणि यानंतर गाणं सुरू होतं

केहते है प्यार जिसको, पंछी जरा बता दे
उडना खुली हवा मे, ओ बेजूबा सिखा दे
मुश्किल है इस जहां मे आजादियों से रेहना
जो बात दिल मे आये उसको जूबां से केहना
आझाद तू है जैसा वैसा हमे बना दे
उडना खुली हवा मे ओ बेजूबा सिखा दे

असं म्हणत नुतन हातातील कबुतर हवेत सोडते. राजेंद्रकृष्ण यांचे गीत आणि लताचा आवाज म्हटलं की सी.रामचंद्र यांचे संगीत बदलूनच जाते. पण या गाण्यात त्यांनी त्यांच्या आवाजापेक्षा तलत किंवा रफीचा आवाज घेतला असता तर जास्त रंगत भरली असती. कारण त्यांच्या स्वत:च्या आवाजाला मर्यादा होत्या. पण ते लताच्या इतके प्रेमात बुडाले होते की तिच्यासोबतच गायचा अट्टाहास त्यांचा असायचा अशी दंतकथा त्या काळात होती. 

दुसरं गाणंही चितळकर (सी.रामचंद्र गायक म्हणून चितळकर असं नाव वापरायचे) लता यांच्याच आवाजात आहे.

फिर वोही चांद वोही तनहाई है
आज फिर दिल ने मुहोब्बत की कसम खायी है

हे गाणं म्हणजे आधीच्या गाण्याचीच पुढची पायरी आहे. यात एक ओळ राजेंद्रकृष्णने अशी लिहिली आहे, ‘दिल मे जो बात है, आंखो मे चली आयी है’. प्रेमाची तीच सुंदर परिभाषा, पडद्यावर देवआनंद-नुतन मग काय पहायलाच नको.

देवआनंद-माला सिन्हाचा ‘माया’ (1961) हा गाजलेला सिनेमा. हेमंतकुमारशी मिळता जूळता स्वर असणार्‍या द्विजन मुखर्जीला सलिल चौधरी यांनी यात दोन गाणी दिली आहेत. देवआनंदसाठी हेमंतकुमारचा आवाज लोकांना भावून गेला होता म्हूणून कदाचित हा प्रयोग सलिल चौधरी यांनी केला असावा. पहिलं गाणं आहे

‘ए दिल कहा तेरी मंझिल
ना कोई दिपक है ना कोई तारा है
गुम है जमी है दूर आसमां’

गाण्याच्या सुरवातीला ‘क्रॉस’ ची प्रतिमा वापरून गाण्याचा दु:खी भाव दिग्दर्शकाने गडद केला आहे. दुसरं गाणं मात्र आनंदी वृत्तीचं आहे. लतासोबत द्विजन मुखर्जीचा आवाज हेमंतकुमारसारखाच मिसळून जातो

‘फिर एक बार कहो, उसी अदा से कहो
सुनो जी साजना, मुझे तो तुमसे प्यार है’

असं म्हणत असताना गाण्यात लता ‘नही नही’ म्हणत परत ‘जी हां! जी हां!’ म्हणते हे सलिल चौधरी यांनी फार नजाकतीनं घेतलं आहे. खरं तर रूढ अर्थानं धृवपद आणि कडवं अशी सरधोपट रचना सलिल चौधरी करत नाहीत. म्हणूनच त्यांची गाणी गायला फार मुश्किल असल्याचं लता मंगेशकर यांनी नोंदवलं आहे. 

शंकर जयकिशनच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ (1962) मध्ये तलते अतिशय सुंदर गाणं आहे. मिश्किल देव आनंद, लावण्यवती वहिदा रेहमानला उद्देशून म्हणतो आहे

‘तूम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर
चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर’

शैलेंद्रचे शब्द, देव आनंदचे हासरे डोळे, सुंदर वहिदा रेहमान, उसळत्या कारंज्यासारखं शंकर जयकिशनचे संगीत आणि त्यावर तलतचा थरथरचा स्वर. हेच गाणं परत लताच्या आवाजात आहे. पण तलतची सर त्याला नाही. दु:खाची आर्तता प्रकट करणारा तलतचा स्वर प्रेमाची अस्फुटतता प्रकट करतानाही कमालीचा प्रभावी वाटतो.

जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘किनारे किनारे’ (1964) मध्ये मन्ना डे यांच्या स्वरात एक गाणं आहे. देव आनंदसाठी मन्ना डे तसा फारच कमी गायला आहे. ‘चले जा रहे है मोहब्बत के मारे, किनारे किनारे किनारे किनारे’ हे गाणं तसं सरधोपट आहे. देवआनंद-मीनाकुमारीवर हे गाणं चित्रित आहे. गाणं फारसं पकड घेत नाही. 

देवआनंदची पडद्यावरच्या प्रतिमेची सांगितीक बाजू साकारण्यात सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि किशोर कुमार-रफी यांचा आवाज यांचे फार मोठे योगदान आहे. पण या शिवाय इरतही संगीतकार आणि गायकांनी ही प्रतिमा सजवली. आणि त्यातून काही गाणी लोकप्रिय-अवीट गोडीची ठरली. ही त्यातीलच काही ठळक गाणी. 

          -आफताब परभनवी.

Saturday 6 May 2017

लता-शैलेंद्र जोडीच्या मोहात काही इतरही संगीतकार


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 6 मे 2017

शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी यांच्यापुरतेच फक्त शैलेंद्रचे शब्द आणि लताचे सुर यांची मोहिनी मर्यादित नव्हती. इतरही काही संगीतकारांना या जोडीचा वापर करण्याचा मोह पडला.

संगीतकार रोशनने ‘हिरा मोती’ (1959) मध्ये शुभा खोटेच्या तोंडी एक गाणं दिलं आहे. ‘ओ बेदर्दी आ मिल जल्दी, मिलने के दिन आये, के तूझ बीन रहा न जाये’. मराठी रसिकांना ‘लटपट लटपट तूझे चालणे’ हे गाणं चांगलं आठवत असेल. त्याच्या चालीसारखी सुरावट या गाण्याच्या सुरवातीला वापरली आहे. 

महान सतारवादक भारतरत्न रवीशंकर यांनाही या जोडीचा मोह पडला होता. ‘अनुराधा’ (1960) चित्रपटात लीला नायडूवर एक गोड गाणं चित्रित आहे, ‘जाने कैसे सपनों मे खो गयी आखिया, मै तो रही जागी मोरी सो गयी आखिया’ गाण्याला अकारणच जास्तीची गती दिली गेली आहे असं ऐकताना वाटत राहतं.

सपन जगमोहन ही संगीतकार जोडी सलिल चौधरींच्या बॉम्बे युथ समुहात गायक म्हणून सहाय्यक म्हणून वावरत  होती. त्यांनी फार थोड्या चित्रपटांना संगीत दिले. त्यातीलच एक चित्रपट ‘बेगाना’ (1963). धमेंंद्रच्या या चित्रपटात एक गाणे आहे ‘बुलाती है बहार, कोयल बोले कुहू कुहू, पपीहा बोले पिहू पिहू’. या गाण्यात एका कडव्यात शैलेंद्र लिहून गेला आहे

रातों के सपने दिन मे कमल बन जल पे ये फुले
कैसी सुहानी ये राहे की राही मंझिल को भुले

हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांची एक सुरेख कविता आहे 

जो रास्ता भूलेगा
मै उसे भटकाव वाले रास्ते ले जाऊंगा
जो रास्ता भूलते नही
उनमे मेरी कोई दिलचस्पी नही. (पत्थर की बेंच, पृ. 9)

खरंच शैलेंद्र असाच आपल्याला हरवून टाकणार्‍या वाटेने नेऊ पाहतो. आपणही ओढ लागल्यागत त्याच्या मागे जात राहतो. ज्यांना रस्ते हरवायचे नाहीत त्यांनी शैलेंद्रच्या ‘वाटे’ला जाऊच नये. 
शैलेंद्रची वरील तिनही गाणी तशी विशेष नाहीत. शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी शिवाय त्याची नाळ खर्‍या अर्थाने कुणाशी जूळली असेल तर ती सचिन देव बर्मन यांच्याशीच. 
या त्रिकुटाने काही सुंदर गाणी दिली आहेत. 

देव आनंद-नलिनी जयवंतच्या ‘मुनिमजी’ (1955) मध्ये हे गोड गाणे आहे

नैन खोये खोये तेरे दिल मे भी कुछ होये
प्यार ये नही तो और क्या है

या गाण्यात सचिनदा तालवाद्यांचा मोठा सुंदर वापर करतात. सलिल चौधरीसारखीच लोकसंगीताची विलक्षण डुब सचिनदांच्या गाण्यांना असते. सोन्याचा बारीक गोफ करताना सोन्याची अतिशय बारीक तार केली जाते. अशा खुप तारा एकमेकांत गुंफून त्यांचा गोफ बनतो. लताच्या आवाजातील अशा बारीक बारीक ताना आलाप विलक्षण पद्धतीनं गुुंफून त्यांना जलतरंग, बासरी, मृदंग अशा वाद्यांची साथ देत सचिनदा गाणे तयार करतात. तेंव्हा त्याचा परिणाम वेगळाच साधल्या जातो. 

शैलेंद्रने डोळ्यांसाठी एक वेगळीच प्रतिमा या गाण्यात वापरली आहे.

नींबू की फाकी सी पाकी ये आखियां
तिखी तिखी ये जुल्मी पलखीया 

आता याचा नेमका अर्थ काय काढायचा? हिंदी साहित्याचा अभ्यास असणार्‍यांनी काही माहिती असेल तर जरूर सांगावे.
किशोर कुमार- बीना राय यांच्या ‘मदभरे नैन’ (1955) या चित्रपटात लता-शैलेंद्रचे  गोड गाणे आहे 

मनपंछी अलबेला तारों की नगरी मे गाये
मत पुछो किसकी लाये खबरीया
नयी नयी पेहचान है उसका नाम न जाना मैने
मै कैसे कहू मेरा कौन सावरीया

आता या गाण्याचे शब्दच असे आहेत की साधं वाचायला सुरवात केली तरी त्याचं गाणं बनू शकतं. अशीच स्वाभाविक चाल लताच्या आवाजात इथे आहे. 

पांव मेरी धरती पे मेरी नजर चांद को चुमे
मेरा आंचल उडे हवाओं मे मेरा तन झुमे मन झुमे
कैसी उलझी नजरीया

तिसरं गाणं ‘बंदिनी’ (1963) मधलं आहे. हा बिमल रॉय चा चित्रपट असल्याने त्यांचा कॅमेरा हा अजून एक जास्तीचा पैलू या गाण्याला जूळतो. गाण्याचे चित्रीकरण हा एक वेगळाच विषय आहे. 

जोगी जबसे तू आया मेरे द्वारे
हो मेरे रंग गये सांझ सकारे
मिठी मिठी अगन ये सह ना सकुंगी
मै तो छुई-मुई अबला रे सह ना सकुंगी
मेरे और निकट मत आ रे

आता या मोजक्या शब्दांत आख्ख्या चित्रपटाचे सार शैलेंद्र सांगून जातो. ही शैलेंद्रची ताकद वेगळीच आहे. खरं तर आशा-गीता असे आवाज सचिनदांना वापरता आले असते. त्यांनी हे आवाज ताकदीने वापरलेही. मुकेशचा अतिशय कमी वापर दादांनी केला. पण या चित्रपटांत ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ साठी मुकेश परिणामकारक रित्या त्यांनी वापरून दाखवला. 

एका विशिष्ट भावनेसाठी शंकर-जयकिशन, सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन या तिघांनाही शैलेंद्रच्या शब्दांची ताकद जाणवते आणि त्यासाठी लताचाच आवाज ते वापरतात हे सगळं अनोखं आहे. 
सचिनदांनी अतिशय कमी गाणी या जोडीची दिली. पण अतिशय ताकदीचं गाणं असं दिलं की त्याची ताकद शंकर जयकिशन आणि सलिल चौधरी इतकी किंबहूना थोडी जास्तच जाणवते. 
तो चित्रपट आहे ‘गाईड’ (1965). आणि गाणे आहे ‘आज फिर जिने की तमन्ना है’.

चित्रपट रंगीत झाला आणि रंगांचा भडक वापर सुरू झाला. त्यातील कलात्मकता, कॅमेराचा संयमानं वापर सुरवातीच्या काळात नव्हता. चित्रपट रंगीत आहे यांचेच कौतुक असायचे. पण ‘गाईड’ सारखे फार थोडे चित्रपट त्या काळातील असे आहेत की त्यांनी हा वापर अतिशय ताकदीनं करून दाखवला. 

हे गाणं रंगीत आहे पण त्यातील तरलता कुठेही हरवू दिलेली नाही. शिवाय भारतीय परंपरांची एक जाण ठेवत त्यांचा कलात्मक वापरही केलेला आढळतो. रोझी आपले जुने आयुष्य टाकून राजू गाईडच्या सहाय्याने नविन काही तरी जगू पाहते. ट्रकमध्ये बसून जाताना गाण्याच्या पहिल्याच ओळीत ती हातातील मडकं खाली रस्त्यावर टाकते. ते मडकं फुटतं आणि ‘आज फिर जिने की तमन्ना है’ म्हणत जणू काही आता परत नवा जन्म झाला आहे असे सुचित करत गाणं पुढे सरकतं. आता ही कमाल दिग्दर्शक विजय आनंदची आहे. 

शैलेंद्रचे शब्द तर काही विचारायची सोयच नाही. ‘कलके अंधेरों से निकल के, देखा है आंखे मलके मलके’ असे सुंदर अनुप्रास भरत व्यास सोडले तर कुणाच्याच गीतांत आढळत नाहीत. किंवा ‘प्यार का हिंडोला जहा झुल गये नैना, सपने जो देखे मुझे भूल गये नैना’. किंवा ‘सनन सनन हाय पावन झाकोरा'.    

जगण्याचा प्रचंड उत्साह, तो व्यक्त करण्यासाठी निसर्गाची केलेली निवड, त्याला शोभेसा लताचा मोकळा आवाज आणि याला पोषक संगीत. हे सगळं जूळून आलेलं रसायन आहे.

याच ‘गाईड’ मध्ये अजून एक गाणं लताच्या आवाजात आहे. ‘पिया तोसे नैना लागे रे’. पण हे गाणं मोकळ्या निसर्गात नाही. विविध मंचांवर कार्यक्रमांमधून सादर केल्या गेलेलं असं त्याचं चित्रण करण्यात आलं आहे. शिवाय वहिदाचे शास्त्रशुद्ध नृत्यपण या गाण्यात आहे. पण केवळ ऐकताना मात्र त्यातील प्रेमाची आनंदाची खुमारी जाणवते.

शंकर जयकिशन सोबतची 25 गाणी, सलिल चौधरीची 9, सचिन देव बर्मनची 5 आणि इतरांची 3 अशी तब्बल 42 गाणी शैलेंद्र-लता या जोडीनं वेगळी अशी दिली. हा सगळा कालाखंड 12 वर्षांचा आहे. याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. 

          -आफताब परभनवी.