Monday 29 January 2018

प्रेम गीत‘माला’


रविवार 28 जानेवारी  2018 दै. महाराष्ट्र टाईम्स, 

ती तशी नशिबानच. गुरूदत्त जीला पहात ‘हम आपकी आंखो मे इस दिल को बसा दे तो’ म्हणायचा. देवआनंद तिच्यामुळे चंद्राला ‘धीरे धीरे चल चांद गगन मे’ आळवायचा. नवखा राजेंद्रकुमार तिच्याकडे प्रेमाची याचना करायचा  ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’. धसमुसळा शम्मी कपुर ‘या अल्ला या अल्ला दिल ले गयी’ हे तिलाच उद्देशून म्हणायचा.  ती हिंदी नायिका म्हणजे माला सिन्हा. नुकतंच तिला फिल्म फेअरचा ‘जीवन गौरव’ देवून सन्मानित करण्यात आलं. माला सिन्हानं नुकतीच वयाची 81 वर्षे पूर्ण केली. म्हणजे तिचं सहस्त्रचंद्र दर्शन पूर्ण झालं. वयाच्या या टप्प्यावर तिला जीवन गौरव देवून सन्मानित केल्या गेलं हे खरंच उचितच झालं.  

तिची तशी कधीच उपेक्षा झाली नाही. सतत चांगले चित्रपट  मिळत गेले. तिच्या सोबतचे नायक नविन नायिकांसोबत चंदेरी पडद्यावर झळकत होते तेंव्हा तीही नविन नायकांसोबत झळकू लागली. हे भाग्य तिच्याशिवाय इतर कुठल्याच नायिकेला इतके लाभले नाही. 

माला सिन्हाची युगल प्रेम गीतं पडद्यावर विशेष गाजली. पहिलं तिचं अजरामर गीत ‘प्यासा’ (1957) तलं ‘हम आपकी आंखो मे इस दिल को बसा दे तो.’ साहिर-सचिनदेव बर्मन-रफी-गीता-गुरूदत्त हे सगळेच एकापेक्षा एक दिग्गज. यात कमी पडू शकत होती ती केवळ माला सिन्हा. कारण ती तेंव्हा नवखी होती. मधुबाला नाही म्हणाली आणि ही भूमिका माला सिन्हाच्या वाट्याला आली. या संधीचं तिनं सोनं केलं.

याचवर्षी आलेला माला सिन्हाचा ‘नौशेरवा-ए-दिल’ प्यासा च्या यशामुळे काहीसा बाजूला पडला. नवख्या राजकुमार सोबत या चित्रपटात सी. रामचंद्र यांनी लता-रफीच्या आवाजात एक अफलातून गोड गाणं दिलं आहे, ‘तारों की जुबां पर है मुहोब्बत की कहानी, ए चांद मुबारक हो तूझे रात सुहानी’. 'प्यासा'तील नखरेल पोशाखापुढे या गाण्यातील मालाचा अतिशय साधा पोशाख, देखण्या गुरूदत्तसमोर सामान्य वाटणारा राजकुमार. पण हे सामान्यपण लता-रफीच्या आवाजानं, सी.रामचंद्र यांच्या संगीतानं आणि माला सिन्हाच्या भावस्पर्शी चेहर्‍याच्या श्रीमंतीनं भरून काढलं आहे.

गीता दत्तचा भाऊ मुकूल रॉय हा एक गुणी संगीतकार. त्याच्या वाट्याला अतिशय थोडे चित्रपट आले. त्यातला एक होता माला सिन्हा- प्रदीप कुमारचा ‘डिटेक्टीव्ह’ (1958). मुकूल रॉय च्या गाण्याला शैलेंद्रची शब्दकळा लाभलेली आहे. हेमंतकुमार-गीताचे हे हळूवार प्रेमगीत आहे ‘मुझको तूम जो मिले, ये जहां मिल गया’.

ओ.पी.नय्यर शिवाय कोण कोणत्या संगीतकारांनी खास तुमच्यासाठीच गाणी रचली असा प्रश्‍न आशा भोसलेला विचारला गेला होता. त्याला अपेक्षा असणार आशा आर.डी.बर्मनचे नाव घेईल. पण आशाने दोनच नावं घेतली. एक होतं रवी आणि दुसरं नाव होतं मराठी संगीतकार एन.दत्ता याचे. एन.दत्ताने आशासाठी खरंच खास गाणी दिली आहेत. ‘जालसाज’ (1959) हा माला-किशोरकुमार यांचा चित्रपट. यात मजरूहच्या शब्दांना आशा-किशोर यांचा सुंदर स्वरजसाज एन.दत्ताने चढवला आहे. हे गाणं आहे ‘प्यार का जहां हो, छोटा सा मकां हो, जिसमे रहे हम, जिसमे रहे तूम, कोई न जहां हो’. आजच्या गीतकारांनी मजरूहची गाणी समोर ठेवून एकलव्यासारखी साधना करायला हवी. सोपेपणा आणि गोडवा मजरूह-शैलेंद्र यांच्याशिवाय आजतागायत कुणाला हिंदी गीतांत इतका प्रत्ययकारकपणे आणता आला नाही. 

गुरूदत्तच्या ‘प्यासा’ नंतर लगेचच माला सिन्हाला राज कपुर सोबत चित्रपट मिळाला. तो होता ‘फिर सुबह होगी’ (1959). खय्याम यांनी अतिशय मोजक्या अशा चित्रपटांना संगीत दिलं पण त्यांची दखल आवर्जून घेतली जाते कारण ती गाणीच तशी अभिजात आहेत. यातही मुकेश-आशा यांच्या आवाजात ‘फिर न किजीये मेरी गुस्ताख निगाही का गिला, देखिये आपने  फिर प्यार से देखा मुझको’ हे गाणं अतिशय गोड आहे. मुकेशच्या या पहिल्या ओळीला आशाच्या आवाजात साहिरनं दिलेलं उत्तर आहे ‘मै कहां तक ये निगाहों को पलटने देती, आपके दिल ने कई बार पुकारा मुझको’. हाच साहिर याच चित्रपटात देशप्रेमाचे ‘चिनो अरब हमारा’ लिहीतो आणि प्रेमाची अलवार गाणीही त्याच ताकदीनं लिहीतो ही कमाल आहे. 

याच वर्षी राजकपुर सोबत माला सिन्हाचा अजून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. तो म्हणजे दत्तराम वाडकर यांच्या संगीताने नटलेला ‘परवरीश’. या चित्रपटाचे नांव घेतले की मुकेशच्या आवाजातील लोकप्रिय गाणे ‘आंसू भरी है जीवन की राहे’ रसिकांना आठवतं. पण यात एक अतिशय सुरेल युगल  गीत मन्ना डे आणि लताच्या आवाजात आहे, ‘मस्ती भरा है समां, हम तूम है दोनो जवां’. लता-मन्नादाची अविस्मरणीय अशी मोजकीच गाणी आहेत. त्यात याही गाण्याचा समावेश करणे भाग आहे. 

गुरूदत्त-राजकपुर नंतर माला सिन्हानं शम्मी कपुर सोबत ‘उजाला’ (1959) मध्ये काम केलं. मालाचं नशिब म्हणजे यातही तीला एक लोकप्रिय गाणं मिळालं. हे गाणं होतं ‘या अल्ला या अल्ला दिल ले गयी’. नदीच्या पाण्यात म्हैस धुणारी माला सिन्हा आणि पाणी उडवत खोड्या काढणारा शम्मी कपुर. शंकर जयकिशनचं धडाकेबाज संगीत.  लता-मन्नादाचा आवाज. असा सगळा जमून आलेला मसाला या गाण्यात आहे. 

माला नशिबवान यासाठी की तीला सतत मोठे नायक आणि चांगली प्रेमगीतं मिळत गेली. आता हेच पहा ना याच उजाला सोबत याच वर्षी तिचा ‘लव्ह मॅरेज’ देखण्या देवआनंद सोबत प्रदर्शित झाला. याच शंकर जयकिशननं एक सुंदर प्रेमगीत माला-देवआनंद यांच्यावर यात बेतलं. रफी-लताच्या आवाजातील हे गाणं होतं, ‘धीरे धीरे चल चांद गगन मे, कही ढल ना जाये रात टूट ना जाये सपने’.माला सिन्हाचा गोलसर चेहरा, मोठ्या केसांचा आंबाडा, त्यावर वेणी, साधी साडी या प्रतिमेची अशी काही मोहिनी या काळी वर्षांत निर्मात्यांना दिग्दर्शकांना पडली होती की प्रत्येक चित्रपटात एक तरी प्रेमगीत तिला मिळालंच आहे. आणि आश्‍चर्य म्हणजे ही गाणी अविस्मरणीय अशीच ठरली आहेत मग नायक कुणी का असेना, संगीतकार कुणी का असेना, गीतकार कुणी का असेना. 

नवख्या राजेंद्र कुमारचा गाजलेला पहिला हिट चित्रपट म्हणजे माला सिन्हा सोबतचा ‘धुल का फुल’ (1959). आशा साठी विशेष गाणी रचणार्‍या एन. दत्ताने या चित्रपटातील गाजलेलं गाणं मात्र आशाच्या ऐवजी लताला दिलेले आहे. लता-महेंद्र कपुर यांचे हे गाणे आहे ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं, वफा कर रहा हूं वफा चाहता हूं’.या गाण्यांपासून पुढे महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातील गाण्यांची एक लाटच हिंदी चित्रपटांमध्ये आली. 

देवआनंद सोबत पुढे गाजलेला माला सिन्हाचा चित्रपट ‘माया’ (1961). खय्याम सारखंच अतिशय मोजकं पण अभिजात संगीत देणारा संगीताकार म्हणजे सलील चौधरी.  यातील गोड प्रेमगीत हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. कुठलंही प्रील्युड (शब्दांच्या आधीचं संगीत) नसतांना लताचा अप्रतिम स्वर-मजरूहचे शब्द उमटत जातात, ‘तस्वीर तेरी दिल मे, जिस दिन से उतारी है’ मग देवआनंदची मस्तभरी नजर मालासिन्हाच्या नजरेला भिडते. पार्श्वभूमीवर बासरीचे सुर अलवारपणे वाजतात. शांतपणे संगीत सुरू होतं. पुढचं स्वरवाक्य उमटतं, ‘फिर तूझे संग लेके, नये नये रंग लेके, सपनोंकी मेहफील मे’. हे गाणं सांगितिकदृष्ट्याही अतिशय आव्हानात्मक आहे. एका मुखड्यात ५ स्वर वाक्य आहेत.  लता-रफी सारखे गायकच हे पेलू शकतात. सलील चौधरींच्या रचना गायला सगळ्यात कठिण असतात असं लतानं एक मुलाखतीत सांगितलं आहे.

याचवर्षी ‘सुहाग सिंदूर’ (1961) मध्ये तलत-लताच्या आवाजात चित्रगुप्तनं एक मधुर गाणं दिलं आहे. राजेंद्रकृष्णने लिहीलेले बोल आहेत, ‘बागोंमे खिलते है फुल कसम तेरी आंखो की खांके, आयी समझमे जो भुल, गिरे तेरी कदमों पे आके’. मनोजकुमारच्या अगदी सुरवातीच्या काळातील हा चित्रपट फारसा माहित नाही. 

मनोज कुमार सोबतचा पुढचा ‘हरियाली और रास्ता’ (1962) मात्र खुप गाजला. त्यातली गाणीही हिट ठरली. शंकर जयकिशनने यात  दोन  गीते माला-मनोज जोडीला दिली होती. ही दोन्ही  गाणी लता-मुकेशच्या आवाजात आहेत. पहिलं गाजलेलं गाणं म्हणजे शिर्षक गीत ‘बोल तेरे तकदीर मे क्या है मेरे हमसफर ये तो बता, जीवन के दो पहलू है, ये हरियाली और ये रास्ता.’ हा चित्रपट ब्लॅक ऍण्ड व्हाईट आहे. पर्वतावरून दिसणारी हिरवळीतली सुंदर नागमोडी वाट केवळ लताच्या स्वर्गीय स्वरांतून आणि शैलेंद्रच्या शब्दांतूनच समजून घ्यावी लागते. डोळ्यांना काही हिरवं दिसतच नाही. पण शंकर जयकिशनची कमाल म्हणजे तंत्राची ही त्रुटी त्यांन संगीतानं भरून काढली आहे. दुसरं आर्त गाणं आहे, ‘लाखो तारे आसमान मे, एक मगर धुंडे ना मिला’. यात मुकेश सोबत लताच आहे. पण का कुणास ठाऊक हे गाणं केवळ मुकेशचचं आहे असं भासत राहतं. स्मरणातही केवळ मुकेशचाच स्वर शिल्लक राहतो. 

‘उजाला’ नंतर शम्मी सोबत माला सिन्हाचा दुसरा चित्रपट आला होता ‘दिल तेरा दिवाना’ (1962). यालाही उजाला प्रमाणेच शंकर जयकिशनचंच संगीत होतं. एक गाणं जुन्या माधुर्याच्या वळणाचं आणि दुसरं नविन भन्नाट शम्मीच्या धसमुसळ्या शैलीतलं शंकर जयकिशननं दिलं होतं. पहिलं गोड गीत होतं, ‘मुझे कितना प्यार हे तूमसे’ तर दुसरं भन्नाट उडत्या चालीचं गाणं म्हणजे चित्रपटाचे शिर्षक गीतच होतं, ‘दिल तेरा दिवाना है’. दोन्ही गाणी लता-रफीच्याच आवाजात आहेत.

याच वर्षी मालासिन्हाचा ‘अनपढ’ अतिशय गाजला. यातली मदनमोहनची ‘आपकी नजरों ने समझा’ सारखी गाणीही गाजली. पण त्यात एकही युगल गीत मालाच्या वाट्याला नाही. 

माला सिन्हा-भारत भुषणचा ‘ग्यारा हजार लडकियां’ (1963) आशाच्या लाडक्या एन.दत्ताच्या संगीतानं नटलेला चित्रपट होता. यात मजरूहच्या शब्दातलं एक गोडवा असलेलं गाणं रफी-आशाच्या आवाजात होतं, ‘दिल की तमन्ना थी मस्ती मे, मंझिल से भी दूर निकलते, अपना भी कोई साथी होता, हम भी बहकते चलते चलते.’ हेच गाणं एकट्या रफीच्या आवाजतही दु:खी स्वरात आहे. पण रफी-आशाच्या रोमँटिक गाण्याची मजा काही औरच.

नौशाद सोबत गीतकार म्हणून शकिलची जोडी सगळ्यात जास्त गाजली. पण त्या खालोखाल त्याची रास जूळली संगीतकार रवीशी. या दोघांनी ‘चौदहवी का चांद’ मध्ये कमाल केली आहे. या जोडीचा 1963 ला आलेला चित्रपट होता  माला सिन्हा-राजेंद्रकुमार चा‘गेहरा दाग’. यात आशा रफीच्या आवाजात एक छान प्रेमगीत आहे, ‘तुम्हे पाके हमने, जहां पा ली है, जमी तो जमी, आसमां पा लिया है’. रफीसोबत आशाचा आवाज कमालीचा खुलतो. रफीची जास्त गाजलेली द्वंद्व गीतं काढली तर ती आशा सोबत तसेच गीतासोबतच जास्त निघतील.

सी.रामचंद्रचं संगीत माला सिन्हाच्या चित्रपटांना फारसं लाभलं नाही. पूर्वी आलेल्या ‘नौशेरवा-ए-दिल’ नंतर हा योग जूळून आला गुरूदत्त सेाबतच्या ‘बहुरानी’ (1963) मध्ये. हेमंत कुमार-लताच्या आवाजात एक अविस्मरणीय मधुर गाणं या चित्रपटात आहे ‘उम्र हुई तूमचे मिले फिरभी जाने क्यूं. ऐसा लगे जैसे पेहली बार मिले हो’. हेमंत कुमार यांच्या आवाजाला एक खास असा लोच आहे. तो ओळखून मोठ्या तबियतीने वापरणारा संगीतकार असेल तर गाण्यात मजा येते. सी. रामचंद्र तर मोठे प्रतिभावंत होतेच. सोबत गाण्यार्‍या लताचा आवाजही छान खुलला आहे. 

महेंद्र कपुरचा आवाज रफीला पर्याय म्हणूनच वापरला गेला. पण बी.आर.चोप्राच्या काही चित्रपटांत तो असा काही चपखल बसला आहे की त्या गाण्यांची कल्पना महेंद्र कपुरशिवाय करता येत नाही. ‘गुमराह’ (1963) मध्ये माला सिन्हा- सुनील दत्तवरचं हे गाणं ‘इन हवाओ मे, इन फिजाओ मे, तुझको मेरा प्यार पुकारे’ हे महेंद्र-आशाच्या आवाजात रसिकांच्या स्मरणात कायम जावून बसलं आहे. याला संगीत रवीचं आहे. चोप्रांच्या त्या काळच्या बहुतांश चित्रपटांना रवीचं संगीत आणि साहिरची गीतं आहेत.

‘जहां आरां’ (1964) ला मदन मोहनचं अवीट गोडीचं संगीत लाभलं होतं. मालासिन्हा-भारत भुषण यांचा हा रंगीत चित्रपट. दोघांचं वाढत चाललेलं वय आता लक्षात येत होतं. पण गोड गाण्यानं त्यावर मात केली. लता-तलतच्या आवाजातील ‘ए सनम आज ये कसम खाये’ हे गाणं यातलंच. मदन मोहन सोबत गीतकार म्हणून सगळ्यात जास्त चित्रपट केले ते राजेंद्रकृष्ण यांनी. जहांआरा ला त्यांचीच गीतं आहेत. यातील दुसरं गाणं सुमन-रफीच्या आवाजात आहे. ‘बाद-ए-मुद्दत की ये घडी आयी, आप आये तो जिंदगी आयी’. सारंगीचा केलेला अप्रतिम वापर, जास्तीच्या हरकती न घेणारा सुमन कल्याणपुरचा संथ वाहत्या झर्‍यासारखा झुळ झुळता स्वर, आणि त्याला रफीच्या शांत आवाजाचे कोंदण. रफीची एक कमाल आहे की लता-गीता-आशा-सुमन-शमशाद प्रत्येकीसोबत गाताना त्याचा स्वर वेगवेगळा लागतो. हेच गाणं लतानं गायलं असतं तर रफीनं वेगळा आवाज काढला असता.   

मदन मोहननं ‘पुजा के फुल’ (1964) मध्ये रफी-आशाच्या आवाजात माला सिन्हा-धर्मेंद्र साठी ‘अब दो दिलों की मुश्किल आसां हो गयी है’ दिलं पण ते विशेष नाही. पण त्यानंच याच आवाजात ‘नीला आकाश’( 1965) मध्ये  ‘आपको प्यार छुपाने की बुरी आदत है’ दिलं जे फार गाजलं. मदन मोहनच्या लाडक्या राजा मेहंदी अली खानची गीतं या चित्रपटाला आहेत. हा चित्रपट रंगीत आहे. आपल्यापेक्षा तरूण नायकांसोबत माला सिन्हाचे चित्रपट येत गेले आणि गाजत गेले. पण आता गाण्यांचा दर्जा मात्र उतरणीला लागला होता.

माला सिन्हाचे ‘हिमालय की गोद मे’ (1965) आणि ‘बहारे फिर भी आयेगी’ (1966) हे चित्रपट गाण्यांसाठी गाजले पण यात तिच्या वाट्याला द्वंद्व गीतं नाहीत. पुढे माला सिन्हा- संजय खानच्या ‘दिल्लगी’ (1966) मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल ने  रफी-आशा कडून ‘अब जिने का मौसम’ हे गाणं गाऊन घेतलं. यातच मुकेश-लताच्या आवाजात ‘तुम मेरी जिंदगी हो’ हे गाणं पण आहे. पण ही गाणी लक्षात रहात नाहीत.

प्यासा पासून ते नीला आकाश पर्यंत जवळपास दहा वर्षे माला सिन्हाची अवीट प्रेमगीतं पडद्यावर येत गेली. रसिकांच्या कानांना तृप्त करत गेली. नंतरच्या गाण्यांनी तेवढा आनंद दिला नाही. आज सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने आणि फिल्म फेअरच्या ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या निमित्ताने माला सिन्हाच्या गाण्यांची ही मधुर आठवण.    

   -आफताब परभनवी.