Friday 28 July 2017

बिमलदा-मन्नादा तीन रंगी इंद्रधनुष्य



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 22 जूलै 2017
१२ जुलै हा बिमल रॉय यांचा जन्मदिन. हे वर्षे त्यांच्या स्मृतीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. (मृत्यू ८ जानेवारी १९६६). बिमल रॉय यांच्या चित्रपटातील सामाजिक आशय जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापरही. यात मोठा वाटा अर्थातच सलिल चौधरी (‘दो बिघा जमीन’, ‘नौकरी’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘प्रेमपत्र’, ‘अपराधी कौन’, ‘परिवार’, ‘उसने कहा था’, ‘काबुलीवाला’) आणि सचिन देव बर्मन (‘देवदास’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘बेनझिर’) यांचाच राहिला आहे.
बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटांत बंगाली संगीत आणि त्यातही परत विशेषत: बाऊल संगीत, रविंद्र संगीत यांचा वापर मन्ना डेच्या आवाजात करून घेतला. हा वापर त्यांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनून राहिला आहे. भक्तीरंग-देशप्रेम-लोकसंगीत असे तीन रंग मन्ना डेच्या आवाजात बिमल रॉय यांच्या चित्रपटात दिसतात.  
बिमलदांच्या 'परिणीता'ला (१९५३) अरुण कुमार मुखर्जींचे संगीत आहे. यात एकतारीवर एक साधु गात आहे-
चली राधे रानी अखियों में पानी
अपने मोहन से मुखडा मोड के
छोड के मोहन की मिठी मुरलिया
छोड के गोकुल की ये कुंज गलिया
नैनन का नाता तोड के

भरत व्यास यांच्या शब्दांतच एक संगीत असतं. एकतारीचा आवाज, तबल्याचा साधा ठेका आणि मन्नादाचा घोटीव आवाज इतक्याच सामग्रीनं या गाण्यात पुरेपुर आर्तता भरली गेली आहे. मीनाकुमारी-अशोककुमार यांचा हा चित्रपट. यातच आशाचे लोकसंगीतावरचे लग्नसमारंभाचे गाणे ‘गोरे गोरे हाथों मे मेहंदी लगाके’ फार छान आहे. 
'देवदास' (१९५५) मध्ये सचिनदेव बर्मन यांनी मन्नादा आणि गीताचा आवाज वापरून दोन बहारदार गाणी दिली आहेत. मन्नादासोबत गीताचा जो एक अस्सल बंगाली सूर लागतो तो अफलातूनच. त्या मातीचाच काहीतरी गुण असावा. ही झाक इतरांच्या आवाजात येत नाही. एकतारीसोबत बासरीचा गोड वापर सचिनदांनी केला आहे. 
आन मिलो आन मिलो शाम सावरे
ब्रिज में अकेली राधे खोयी खोयी सी रे

पारो लहानपणी हे गाणं ऐकत आहे असा प्रसंग आहे. आधीच्याही गाण्यात राधा-कृष्णाची ताटातूट आहे. पण आधीच्या गाण्यात मिलनाची शक्यता नाही. पण या गाण्यात मात्र श्याम राधेला परत येऊन भेटेल ही आशा जिवंत आहे. हा बारकावा मन्नादांच्या गीताच्या आवाजातही दिसतो.
याच चित्रपटात अजून एक गाणं, पण अतिशय वेगळ्या भावावस्थेतील मन्नादा-गीताच्या आवाजात आहे. 
साजन की हो गयी गोरी, साजन की हो गयी
अब घर का आंगन विदेस लागे रे

लग्न ठरलेली पारो अंगणात बसली आहे. आणि ती साधु-संन्यासिनीची जोडी रस्त्यावर गाणे म्हणते आहे. अप्रतिम लावण्यवती सुचित्रा सेन हिचा चेहरा मात्र उदास आहे. ही उदासी लग्न होऊन आई-वडिलांचे घर सोडायचे आहे यापेक्षाही देवदासशी लग्न होत नाही यासाठी आहे. गाण्याचा मूड अतिशय आनंदी ठेवत त्या पार्श्वभूमीवर सुचित्रा सेनचा उदास चेहरा, शुन्यातले डोळे अशी एक वेगळी कमाल बिमल रॉय यांनी साधली आहे. गाण्याच्या शेवटी सहन न होऊन पारो (सुचित्रा सेन) पळत माडीवर जाते आणि दार बंद करून आपल्या हुंदक्याला वाट करून देते. या गाण्यात नवऱ्यासाठी ‘साजन’ शब्द वापरून साहिरनं कमाल केली आहे. म्हणजे ‘साजन की हो गयी’ असे गाण्याचे शब्द आहेत आणि प्रत्यक्षात ती साजन म्हणजेच प्रियकरापासून दूर चालली आहे. 
याच पद्धतीचे बंगाली भजन अजून एका चित्रपटात बिमलदांनी मन्नादांच्या आवाजात वापरले आहे. ‘परख’ (१९६०) मध्ये शैलेंद्रच्या शब्दांतील
क्या हवा चली रे, बाबा ऋत बदली
शोर हैं गली गली
सौ सौ चुहे खायके बिल्ली हज को चली

या गाण्याचा उपयोग मात्र कुठले वैयक्तिक दु:ख व्यक्त न करता सामाजिक परिस्थतीवर भाष्य करण्यासाठी करण्यात आला आहे. शैलेंद्रवरची डाव्या विचारांची छाप या गाण्यांत स्पष्ट दिसते. 
पहले लोग मर रहे थे भूक से, अभाव से 
अब ये मर न जाये कहीं अपने खाव खाव से 
मिठी बात कडवी लागे, गालीया भली
क्या हवा चली रे बाबा, ऋत बदली
पहिल्या तिन्ही गाण्यांत खोल कुठेतरी दु:खाची आर्तता दाखवणारा मन्नादांचा आवाज, इथे विनोदाचा सूर लावत खोल सामाजिक विषादाचा रंग आपल्या आवाजात दाखवतो. तीन संगीतकार, तीन गीतकार आणि एकच गायक यांच्याकडून आपल्या हवा तसा बंगाली भक्तिसंगीताचा वापर करून घेणे ही कमाल नक्की बिमल रॉय यांचीच. 
या बंगाली भजनांच्याप्रमाणेच मन्नादाच्या आवाजात देशप्रेमाची गाणी वापरून एक अनोखा रंग बिमलदांनी आपल्या चित्रपटात भरला आहे. पण अर्थात ही गाणी १९६० नंतरची आहेत. 
'काबुलीवाला' (१९६१) मध्ये सलिल चौधरींनी मन्नादांकडून जे गाणं गाऊन घेतलं, त्या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. एरव्ही देशप्रेमाची गाणी स्फूर्ती, जोश निर्माण करणारी, सैनिकांबद्दल आस्था निर्माण करणारी असतात. पण या गाण्यांत ‘सागरा प्राण तळमळला’सारखे एक निराळेच कारुण्य आहे. हे सुंदर गाणे आहे-
ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन
तुज पे दिल कुर्बान

देशभक्तीच्या गाण्यांसाठी हातखंडा असलेल्या प्रेम धवन यांचेच हे शब्द आहेत. रबाबसारखे अफगाणी वाद्य वापरून एक विलक्षण परिणाम सलिल चौधरींनी साधला आहे. मन्नादांच्या गळ्यातील फिरत त्या रबाबच्या सुरावटीचा पार्श्वभूमीवर वापर करत जो करुण परिणाम साधते, त्यानं अजूनच काळीज तुटते. सी.रामचंद्र, ओ.पी.नय्यर, वसंत देसाई यांच्या सारख्यांनी ताकदीने देशप्रेमाची गाणी दिली. पण जो रंग सलिल चौधरींनी यात भरला आहे, तो काहीतरी वेगळाच आहे. 
याच वर्षी आलेल्या ‘उसने कहा था’ (१९६१) मध्येही देशप्रेमाचे गाणे सलिल चौधरींनी मन्नादांच्या आवाजात दिले आहे-
जानेवाले सिपाही से पुछो
वो कहा जा रहा है

या गाण्यासाठी ट्रम्पेटचा-कोरसचा वापर करून वेगळा परिणाम साधला आहे. यात समूहमनाचा आविष्कार कसा घडेल याचा विचार केला आहे. ही रचना हैदराबादचे शायर मकदूम मोईनोद्दीन यांची आहे. मकदूम अशा मोजक्या शायरांपैकी आहेत की, त्यांच्या आठवणीत त्यांच्या गावच्या लोकांनी त्यांचे स्मारक उभारले. हैदराबादच्या निजाम सागर तळ्याच्या काठावर मकदूम यांचा देखणा पुतळा तेव्हाच्या चंद्राबाबू नायडू सरकारने उभारला आहे. 
देशप्रेमाचे तिसरे गाणे ‘बंदिनी’ (१९६३) मध्ये सचिन देव बर्मन यांनी दिले आहे. शैलेंद्रची लेखणी फासावर चढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची भावना व्यक्त करताना लिहिते-
मत रो माता लाल तेरे बहुतेरे 
जनम भूमी के काम आया मैं बडे भाग हैं मेरे 

शैलेंद्रला शब्द अतिशय वश आहेत. फासावर चढणाऱ्या शहिदाच्या तोंडी असे शब्द त्याने दिले आहेत-
फिर जन्मुंगा उस दिन जब आझाद बहेगी गंगा
उन्नत भाल हिमालय पर जब लहरायेगा तिरंगा 
एका साध्या संथ लयीत मन्नादांनी हे गाणे गायले आहे. जसा की गंगेचा प्रवाह. त्याला आपल्या प्रवासाचे प्रयोजन नीट कळलेले आहे. आता त्याला कुठलीही घाई गडबड नाही. आपण निवडलेला मार्ग बदलणार नाही, आपले प्राक्तन हेच राहणार आहे. देशासाठी लढणाऱ्या या सैनिकालाही आपल्या आयुष्याचे प्राक्तन समजले आहे. दोन पावलांवर मृत्यू उभा आहे. सगळी खळबळ संपून गंगेच्या शांत प्रवाहासारखी एक स्थिरता त्याच्या स्वरांत उमटत आहे. ही शांतताच आपल्याला ऐकताना अस्वस्थ करून जाते. जास्त तीव्र स्वरात साधला जाणार नाही असा परिणाम सचिनदेव बर्मन यांनी मन्नादांच्या आवाजात या संथ लयीत साधला आहे. 
बिमल रॉय यांच्या चित्रपटात मन्नादांच्या आवाजाचा अजून एक रंग पण फुललेला आहे. तो म्हणजे लोकसंगीताचा-शास्त्रीय संगीताचा. ‘दो बिघा जमीन’ (१९५३)मधील ‘धरती कहे पुकार के’ आणि ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ ही दोन गाणी, तसेच ‘मधुमती’ (१९५८) मधील ‘चढ गयो पापी बिछुआ’ आणि ‘परिवार’ (१९५६) मधील लतासोबतची मन्नादांची जुगलबंदी ‘जा तोसे नाही बोलत’ खूप सुंदर आहेत. पण यापूर्वीच्या लेखांत त्यांच्यावर लिहिलेले असल्याने इथे परत उल्लेख टाळले आहे.
बिमल रॉय यांना जाऊन ५० वर्षे उलटली. मन्नादांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षी सुरू होते आहे. बिमल रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त ही एक आठवण!

Monday 17 July 2017

सुमिता सन्याल- तेरे बिना जिया लागे ना!


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 15 जूलै 2017
आनंद’ हा अतिशय गाजलेला चित्रपट. राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या भूमिका तर सगळ्यांच्याच स्मरणात ताज्या आहेत. अगदी जॉनी वॉकरही लक्षात राहतो. अमिताश सोबतचा डॉक्टर मित्र म्हणून रमेश देव आणि सीमा देव ही मराठमोळी जोडीही लक्षात राहते. मुकेश (‘कहीं दूर जब दिन ढल जाये’, ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’), मन्ना डे (‘जिंदगी कैसी ये पहेली हाये’) यांचेही सूर कानात घुमत राहतात. 
या सोबतच लताच्या आवाजातील एक नितांत गोड गाणं या चित्रपटात आहे. गाणं मूळ बंगाली आहे. त्याच चालीवर गीतकार योगेश यांनी हिंदीत शब्दरचना करून दिली. ते गाणं म्हणजे,
ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कही जिया लागे ना

हे गाणं जिच्या तोंडी आहे ती नायिका हिंदी रसिकांना फारशी परिचित नव्हती. ती म्हणजे बंगाली अभिनेत्री सुमिता संन्याल (जन्म ९ ऑक्टोबर १९४५). तिचं परवा, ९ जुलैला वयाच्या ७१ व्या वर्षी कोलकात्यात हृदयविकारानं निधन झालं. 
सडपातळ अंगकाठी असलेली सुमिता अतिशय देखणी होती. बंगालीमध्ये चांगली लोकप्रियता मिळवलेल्या सुमिताचे जेमतेम चारच हिंदी चित्रपट आले.
पहिला चित्रपट होता हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आशिर्वाद’ (१९६८). सुमितासोबत या चित्रपटात अशोककुमार व संजीवकुमार यांच्या भूमिका होत्या. अशोककुमार यांचं लहान मुलांसाठीचं गाजलेलं गाणं ‘रेलगाडी’ याच चित्रपटात आहे. अजून दोन गाणी अशोककुमार यांच्याच आवाजात यात आहेत. मन्ना डे यांचं सुंदर गाणं ‘जीवन से लंबे है बंधू, ये जीवन के रस्ते’ यात आहे. 
सुमिता सन्यालच्या वाट्याला दोन गाणी लताच्या आवाजात आलेली आहेत. पहिलं गाणं आहे
इक था बचपन
छोटा सा नन्हा सा बचपन

गुलजार यांनी हे गाणं लिहिताना एक वडील आणि छोटी मुलगी/मुलगा यांच्या संबंधात अतिशय साधी, पण आशयघन ओळ लिहिली आहे -
टेहनी पर चढके जब फुल बुलाते थे
हाथ उसके वो टेहनी तक ना जाते थे
बचपन के दोन नन्हे हाथ उठाकर
वो फुलों से हात मिलाते थे
तरुणपणीचा अशोककुमार लहानग्या सुमिताला कडेवर घेऊन तिची फुलांना हाथ लावण्याची मनोकामना पूर्ण करतो. वसंत देसाईंचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. गाण्याला निसटून गेलेल्या बालपणाच्या हूरहुरीची झाक आहे. एक कारुण्य भरून राहिलं आहे. स्टुडिओत रेकॉर्डिंग म्हणून हे गाणं गाताना दाखवलं गेलंय.
याच चित्रपटातलं दुसरं पावसाचं सुंदर गाणं आहे- 
झिर झिर बरसे सावनी आखियां
सावरीया घर आ ऽऽऽ
तेरे संग सब रंग बसंती
तुझ बीन सब सुना ऽऽऽ   

गीतकार गुलजारच असल्यामुळे ‘सावनी आखियां’, ‘रंग बसंती’, ‘रेशमिया बुंदनिया’सारख्या उपमा येत राहतात. गाणं अतिशय गोड आहे. या गाण्यात लताचाच आवाज वेगळ्या ट्रॅकवर रेकॉर्ड करून लतालाच साथ म्हणून वापरला आहे. हा प्रयोगही कानाला गोड वाटतो. असा प्रयोग राहुल देव बर्मन यांनी आधी केला होता. 
सुमिताला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती ‘आनंद’मुळेच. या चित्रपटातील तिच्या वाट्याला आलेलं गाणं केवळ अफलातून आहे. लता मंगेशकरनं १९७४ ला पहिल्यांदा भारताबाहेर कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम झाला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये. पाच हजारापेक्षा जास्त क्षमता असलेला हा हॉल तेव्हा गच्च भरला होता. लताने जी काही मोजकीच गाणी या कार्यक्रमासाठी निवडली होती, त्यात या गाण्याचा समावेश होता. (‘मेंदीच्या पानावर’ हे मराठी गाणंही या कार्यक्रमात होतं.)  या गाण्याचं मूळ बंगाली गाणं या कार्यक्रमात लतानं सादर केलं होतं.
‘ना जिया लागे ना’ या पहिल्या ओळीनंतर लताचा आवाज टप्प्याटप्प्यानं जो चढत जातो, त्याला तोड नाही. हे गाणं अक्षरश: केवळ लताच आहे म्हणून गाऊ शकते. किंवा केवळ लतासाठीच हे गाणं सलिल चौधरी यांनी रचलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
गीतकार योगेश यांनी तशी फार कमी गाणी लिहिली आहेत. त्यांना दिलेल्या बंगाली गाण्याच्या चालीवर त्याच भावनेनं ओथंबलेलं हिंदी गीत लिहायचं म्हणजे खरंच कमाल होती. योगेश यांनी आपल्या प्रतिभेनं या गाण्याला पूर्ण न्याय दिला जाईल असेच शब्द लिहिले आहेत. बंगाली गाण्याची पहिली ओळ होती ‘ना मोनो लागे ना’. 
जिना भुले थे कहा याद नहीं
तुझको पाया हैं जहा सांस फिर आयी वहीं
जिंदगी हाय तेरे सिवा भाये ना

दोनच कडव्याचं छोटं गाणं आहे. दुसऱ्या कडव्यात ही उत्कटता अजूनच वाढली आहे. 
तुम अगर जावो कभी जावो कही
वक्त से कहना जरा वो ठहर जाये वोही
वो घडी वोही रेह ना जाये ना
या सगळ्या गाण्यात जी छोटी छोटी स्वरवाक्यं येत राहतात, ती आपल्या गळ्यातून काढण्यासाठी गायकाला काय कसरत करावी लागली असेल हे आपण लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येतं. अशी अतिशय थोडी गाणी आहेत, जिच्यात गायिकीचा अगदी कस लागतो. सतारीचे, व्हायोलिनचे जे तुकडे या गाण्यात येतात, ते स्वतंत्रपणे ऐकावेत इतके सुंदर आहेत. सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन आणि खय्याम हे असे संगीतकार आहेत की, ज्यांनी आपल्या संगीतात प्रचंड प्रयोग केले. विविध गायकांच्या गळ्यातून ते उत्तमरीत्या उतरवून घेतले.  
सुमिताच्या वाट्याला हे अप्रतिम गाणं आलं. ‘मेरे अपने’ (१९७१) आणि ‘गुड्डी’ (१९७१) हे दोन चित्रपट तिला मिळाले, पण यातल्या तिच्या भूमिका छोट्या होत्या. शिवाय गाणी तिच्या वाट्याला आली नाहीत. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र तिला खूप लोकप्रियता मिळाली. १९९३ पर्यंत ती बंगाली चित्रपटांत काम करत होती. 
सुमिताच्या वाट्याला तीनच हिंदी गाणी आली. ‘ना जिया लागे ना’सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनात तिला कायमस्वरूपी स्थान मिळालं. 
सुमिताच्या आत्म्याला शांती लाभो!   
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   
a.parbhanvi@gmail.com

Tuesday 11 July 2017

गीता + गीता + देवआनंद एक भन्नाट कॉकटेल


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 8 जूलै 2017

 ‘शोखियों मे घोला जाये फुलों का शबाब, उसमे फिर मिलायी जाये थोडीसी शराब, होगा युं नशा जो तय्यार, वो प्यार है’ असं नीरज यांचं गाणं  सचिनदेव बर्मन यांनी ‘प्रेम पुजारी’ (1970) मध्ये दिलं होतं. पण त्याच्या 20 वर्षे आधीच प्रेमाच्या नशे सारखीच नशा संगीताच्या बाबतीत त्यांनी घडवली होती. एक खट्याळ गीता (बाली) घ्यायची, दुसर्‍या अवखळ गीता (दत्त) चा कोवळा मस्तीवाला आवाज घ्यायचा, एक देखणा देव आनंद घ्यायचा, एकदम ताज्या तरूण रक्ताचा गुरू दत्त नावाचा दिग्दर्शक घ्यायचा, एकदम नविन कोरं करकरीत पार्श्वसंगीत वापरायचं, आपल्याच लिखाणाच्या मस्तीत बुडालेल्या साहिरचे शब्द घ्यायचे- या सगळ्याची पडद्यावर जी नशा तयार होते तिचं नाव होतं..

तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो इक दांव लगा ले

‘बाजी’ (1951) मधील या गाण्याला आता 65 वर्षे उलटून गेली. अजूनही याची नशा उतरत नाही. गीता (बाली) साठी गीता (दत्त) नं गायलेली गाणी आणि तेही देखणा देवआनंद नायक असताना हे एक अफलातूनच प्रकरण आहे.  वरच्या गाण्याची तर खुप चर्चा झाली. याशिवाय याच चित्रपटातील  दुसरं एक गाणं ‘देखके अकेली मुझे बरखा सताये’ याबाबत याच सदरात आधीच्या लेखात उल्लेख आलाही आहे (10 जून 2017). पण अजून एक मस्त गाणं यात आहे

सुनो गजर क्या गाये, समय गुजरता जाये
ओ रे जीनेवाले, ओ रे भोलेभाले
सोना ना, खोना ना

साहिर स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरूण पिढीला फाळणीच्या पारतंत्र्याच्या सगळ्या जखमा विसरून पुढे पुढे जायला सुचवतो आहे. त्या पिढीचंच तो प्रतिनिधीत्व करतो आहे. ‘बिछडा जमाना कभी हात ना आयेगा, दोष न देना मुझे फिर पछतायेगा’ असं म्हणत एक नविन दिशा दाखवतो आहे. या चित्रपटात सगळेच नविन-तरूण-ताजे होते. अगदी सचिन देव बर्मन वयानं मोठे असूनही त्यांनी एकदम नविन संगीत दिलं होतं. तोपर्यंतचा गीताचा भक्ती संगीतातला आवाज, विरही आवाज इथे वेगळाच उमटला होता. काहीतरी नविन कोर्‍या कपड्यासारखं आल्हाददायक प्रसन्न वेगळं रसिकांच्या कानावर आलं. समीक्षकांनी तेंव्हा नाकं मुरडले पण सामान्य रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. गाणी हिट झाली. सिनेमा बॉक्स ऑफिसवरही धूम चालला. किशोर कुमारची जी शैली पुढे लोकप्रिय झाली त्याच शैलीतलं पहिलं गाणंही याच चित्रपटात होतं, (तेरे तिरों मे छुपे प्यार के खजाने है). 

गीतासाठी गाणारी गीता आणि सोबत देव आनंद हे नशिलं समिकरण लगेच दुसर्‍याच वर्षी जाल (1952) मध्येही रसिकांना अनुभवायला मिळालं. अर्थात संगीत सचिनदांचंच होतं. यात लताच्या आवाजात मस्तीखोर गाणं ‘चोरी चोरी मेरी गली आना है बुरा’, निसर्गाचं अप्रतिम वर्णन असलेलं ‘पिघला है सोना दूर गगन मे’, लता-हेमंत कुमार यांच्या आवाजातील सदाबहार ‘ये रात ये चांदनी फिर कहां, सुन जा दिल की दास्तां’  पण लता-किशोरच्या गाण्याची नशा काही औरच. ते गाणं आहे

दे भी चुके हम दिल नजराना दिल का
छोडो भी ये राग पुराना दिल का   

आता यात पुराना म्हणताना जो झटका गीता (दत्त) गाताना आणि गीता (बाली) पडद्यावर देते तो निव्वळ जीवघेणा. त्याची संगीतशास्त्रात व्याख्या करणं मुश्किल. जसं की किशोर च्या गाण्यात असतं. तो मनानंच गाण्याला असं काही वळण देतो, असे काही शब्द उच्चारतो, असे काही सूर वेगळे लावतो की सचिनदासारखे संगीतकार सोडले तर इतरांची पंचाईतच व्हावी.  

गुरू दत्तनं पुढं ओ.पी.नय्यरला घेवून ‘बाज’ (1953) प्रदर्शित केला. त्यात स्वत:च नायकाची भूमिका केली. त्यातही गीतासाठी गीताची दोन गाणी आहेत. पण आधीची मजा त्यात नाही. शिवाय देव आनंद त्यात नाही.
सचिनदांच्या संगीतात परत हे सगळं जमून आलं नाही पण अनिल विश्वासनी ‘फरार’ (1955) मध्ये नायकाच्या भूमिकेत देव आनंद असताना गीतासाठी गीताचा आवाज जूळवून आणला. यातली गीताची गीतासाठीची तीन गाणी मस्त आहेत. 

‘जी भर के प्यार कर लो, अखिया दो चार कर लो
सुनो ये रात नही है एक तीन चार की
सुनो ये रात है बस दो दिलों के प्यार की

आता या गाण्यात काव्य म्हणून काहीच नाहीच. प्रेम धवनलाही गीतकार म्हणून मर्यादा आहेत. गीताच्या नृत्यालाही प्रचंड मर्यादा आहेत. या गाण्यात गीताचं नाचणं शाळकरी मुलीचं प्राथमिक वाटतं. पण गाण्यात मस्ती आहे. दुसरं गाणं अप्रतिम आहे. 

‘हर इक नजर इधर उधर, है बेकरार तेरे लिये
मेहफिल का दिल धडक रहा, है बार बार मेरे लिये’

आणि मग गीताचा आवाज जो सुटतो, 

‘हू मै इक नया तराना, एक नया फसाना, 
एक नयी कहानी हू मै, 
एक रंग रंगीली, इक छैल छबिली 
मद मस्त जवानी हू मै’ 

आणि त्यावर गीताच्या खरंचच मदमस्त अदा. क्लब मधल्या प्रत्येक टेबलापाशी जावून गीता आपल्या विभ्रमांनी तरूणांना घायाळ करते आहे आणि देव आनंद आपल्यातच मग्न एका टेबलावर एकटाच बसून आहे. 

तिसरं गाणं ‘दिल चुरा लू चुरा लू दिल मे छूपी बात, बडे बडे दिलवाले भी रेह जाये मलते हात’ छान आहे पण त्याच्या संगीतावर सी. रामचंद्रच्या ‘अलबेला’च्या संगीताची छाप जाणवत राहते. अजून एक गाणं गीताच्याच आवाजात आहे ‘इक रात की यह प्रीत’ पण ते विशेष नाही. 

गीता दत्तचा भाऊ मुकूल रॉय याच्या संगितानं नटलेल्या ‘सैलाब’ (1956) मध्ये गीतानं गायलेली एक दोन नाही तर तब्बल आठ गाणी आहेत. ओ.पी.नय्यरच्या ‘मिस कोका कोला’ (1955)  मध्येही गीता गीतासाठी गायली आहे.  पण या दोन्ही चित्रपटात देव आनंद नाही.

गीताबालीचा देव आनंद सोबतचा गीताच्या आवाजातला चौथा चित्रपट म्हणजे ‘मिलाप’ (1955). एन.दत्ताने यात गीताच्या आवाजात तीन मस्त गाणी दिली आहेत. 

‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहा
बाबूजी तूम ऐसा दिल पाओगे कहा’

साहिरसारखा प्रतिभावंत कवी असेल तर गाण्याच्या शब्दांना आपोआपच एक वजन येते. ते शब्द अगदी साधे असले तरी. साहिरच्या गीतात बर्‍याचदा आढळणारा अवघड उर्दू शब्दांचा वापर इथे नाही. परिणामी गाणं गीताच्या अवखळ आवाजात चपखल बसलं आहे. गीताबालीच्या नृत्याला मर्यादा असल्याने तिच्याकडून किमान अदांमधून  परिणाम साधायला हवा हे ओळखून तसं नृत्य या गाण्यावर बसवल्या गेलं आहे. 
दुसरं गाणं 

‘बचना जरा ये जमाना है बुरा
कभी मेरी गली मे न आना’ 

गीतानं रफी सोबत गायलं आहे. पण हा रफीचा आवाज देव आनंद साठी नसून जॉनी वॉकर साठी आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेला देव आनंद आणि त्याच्या सोबत आंधळी कोशिंबीर खेळणारी गीता बाली असा प्रसंग आहे. सोबत जॉनी वॉकर आणि मित्र-मैत्रिणींचा घोळका. जॉनी वॉकर साठी रफीनं गायलेली गाणी हे एक स्वतंत्रच प्रकरण आहे.

तिसर्‍या गाण्यात स्पॅनिश ‘ला जोटा’ नावाच्या लोकसंगीतात वापरल्या जाणार्‍या वाद्यांचा वापर फार सुरेख केला आहे. त्या काळातील काही गाण्यांमध्ये ओ.पी.नय्यर, मदन मोहन सारख्यांनी याचा अतिशय कल्पक वापर करून घेतला आहे. हे गोड गाणं आहे ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बाते’.

काळी टोपी, कोट घातलेला गरीब चेहरा करून बसलेला देव आनंद आणि त्याच्या भोवती नाचणारी गीताबाली.  या गाण्यात एन. दत्तानं गोव्याच्या लोकसंगीताचे रंग भरले आहेत. या चित्रपटातील गाण्यांवरच ऐक गोव्याची छाप आहे. साहिरच्या शब्दांतही एक वेगळेपण आहे

‘मै बहार का शौक फुल हू, अक्ल मर मिटे ऐसी भूल हू
धूली धूली है घुली घुली है राते’

या शब्दांसाठी गीताचाच खट्याळ मादक स्वर हवा. काही गाण्यांमध्ये गीताच्या आवाजात जो परिणाम साधला जातो तसा दुसर्‍या कुणाच्या अवाजात शक्य नाही. साहिर मजरूह यांच्यासारख्यांना फार चांगल्या पद्धतीनं गीतासाठी शब्द रचता आले आहेत. ओ.पी.नय्यर आणि सचिनदेव बर्मन यांना गीताच्या आवाजाचा वेगळा पैलू फार चांगला पकडता आला.   

पंकज मलिकच्या संगीतात ‘जलजला’ (1952) मध्येही गीतासाठी गीता गायली आहे. यातही देव आनंद आहे. पण यातली गाणी विशेष भावून जात नाहीत. गीताचा तो खट्याळ सूर पंकज मलिकला पकडता आला नाही म्हणूनही असावं.

दोन्ही गीता 1930 ला जन्मल्या. याच महिन्यात 20 तारखेला गीता दत्तचा स्मृतीदिन आहे. आधी 1965 ला गीता बाली गेली. आणि लगेच 1972 ला गीता दत्तही गेली. अतिशय कमी आयुष्य या दोघींना लाभले पण ‘बाजी’ पासून गीताने गीतासाठी गायलेल्या खट्याळ गाण्यांचा खळाळता झरा रसिकांसाठी मात्र आत्तापर्यंत वाहतच राहिला आहे. 


Tuesday 4 July 2017

कृष्णधवल गाण्यांतली पंचमदांची ‘रंगीत’ जादू


अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 1 जूलै 2017
२७ जून हा पंचमचा (आर. डी. बर्मन) जन्मदिवस. त्याची आठवण काढताना नेहमी ‘तिसरी मंझिल’पासून सुरुवात केली जाते. पण त्याच्याबरोबर/आधी पंचमचे जे पाच कृष्णधवल चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील गाण्यांचा फारसा उल्लेख होत नाही. आशा-किशोर-गुलज़ार आणि पंचम या चौघांनी कित्येक गाण्यांनी कानसेनांना तृप्त केलं. पण पंचमच्या सुरुवातीच्या गाण्यांत गायकांमध्ये लता-रफी आणि गीतकारांमध्ये शैलेंद्र, मजरूह, हसरत होते, हे ध्यानात घेतलं जात नाही. 
पंचमचा संगीतकार म्हणून पहिलाच चित्रपट होता ‘छोटे नवाब’ (१९६१). मेहमूदच्या या चित्रपटातील लताचं अप्रतिम गाणं, ‘घर आजा घिर आयी बरखा सावरीया’चा उल्लेख याच सदरात आधीच्या लेखात (३ जून) येऊन गेलेला आहे. दुसरं एक मस्त खट्याळ गाणं लता-रफीच्या आवाजात यात आहे-
ओ मतवाली आँखोवाले 
दिल तेरा होके रहेगा
गर तू इसे अपनाले

रफीच्या आवाजाचा वापर कसा करायचा हे पंचम सचिनदाकडे सहाय्यक म्हणून काम करत होता, तेव्हापासून चांगलं शिकलेला होता. तसंच लताच्या आवाजातील खट्याळपणाही (‘चोरी चोरी मेरे गली आना है बुरा’) ओळखून होता. परिणामी त्यानं स्वत:च्या या पहिल्याच चित्रपटात हे मस्तीभरं गाणं दिलं. मेहमूद आणि हेलनवर हे गाणं चित्रित आहे. हेलनसाठी आशा किंवा गीताचा आवाज वापरला जात असताना लताचा आवाज यशस्वीरीत्या वापरायचा हे एक आवाहनच होतं. आणि ते पंचमने आपल्या पहिल्याच चितत्रपटात पेलून दाखवलं. या गाण्यानं ‘बीनाका गीतमाला’त त्या वर्षी पाचवा क्रमांक पटकावला होता. 
खरं तर यशस्वी चित्रपट संगीत म्हणून जे जे करायला पाहिजे, ते ते सर्व पंचमने या पहिल्या चित्रपटात केलं आहे. अभिजात असं ‘घर आजा घिर आयी’ हे गाणं दिलं आहे. रफी-शमशादच्या आवाजात ‘कोई आने को है’ ही ठसकेबाज कव्वालीही दिली आहे. ‘चुरा के दिल बन रहे हो’ हा लताच्या आवाजातील मुजरा आहे. रफी-लताच्या युगलगीतात नेहमीप्रमाणे बागेत एकमेकांच्या मागे धावत फिरणाऱ्या नायक-नायिकेसाठी प्रसन्न टवटवीत असं ‘आज हुआ मेरा दिल मतवाला’ हे गाणंही दिलं आहे. 

या चित्रपटानंतर जवळपास चार वर्षं पंचमला दुसरं कामच मिळालं नाही. दुसरा चित्रपट मिळाला तोही परत मेहमूदचाच ‘भूतबंगला’ (१९६५). या चित्रपटात पंचमने स्वत: काम केलं (‘मैं भूखा हू तुझे खा जाउंगा’ या गाण्यात मेहमूद सोबत पंचम आहे). मेहमूदने दिग्दर्शित केलेलाही हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालं आणि सगळा घोळ झाला. ज्या लहान मुलांसाठी चित्रपट होता, ती मुलं येऊ शकत नव्हती आणि मोठ्या माणसांना हा चित्रपट पोरकट वाटल्याने त्यांनी मनावर घेतलाच नाही. परिणामी यातील सुंदर गाणीही बाजूलाच राहिली. 
तरी मन्ना डेच्या आवाजातील ‘आओ ट्विस्ट करे’ या गाण्यानं धूम केली. ‘बीनाका गीतमाला’त हे गाणं त्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आलं होतं. या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटात या गाण्याचं निवेदन ‘बिनाका…’मुळे सर्वत्र लोकप्रिय झालेले अमिन सयानी यांनीच केलं होतं. पहिल्या चित्रपटात गाणी शैलेंद्रची होती, तर या दुसऱ्या चित्रपटाला हसरत जयपुरीची गाणी लाभली होतील. 

हे गाणं लोकप्रिय झालं, पण त्याहीपेक्षा या चित्रपटात जे गाणं किशोरकुमारच्या तोंडी पंचमने दिलं ते गाणं अफलातून होतं. ‘आवो ट्विस्ट करे’ आज लोक विसरून गेले, पण काळाच्या कसोटीवर टिकलं ते - ‘जागो सोने वालो, सुनो मेरी कहानी, क्या अमिरी क्या गरिबी भूलो बात पुरानी’.

हे गाणं ऐतिहासिक यासाठी की, हे पंचम-किशोर या लोकप्रिय जोडीचं पहिलं गाणं आहे.  
याही चित्रपटात लताचं एक नितांत गोड गाणं आहे-
ओ मेरे प्यार आ जा बन के बहार आ जा
दिल में हैं तीर तेरा पाऊ ना चैन हाये
ध्रुवपदात पहिल्या दोन ओळी झाल्यावर परत पहिली ओळ म्हणताना लताला  ‘ओ मेरे’ या तिन्ही अक्षरांनंतर छोटा ठेहराव दिला आहे पंचमने. तसेच ‘प्यार’ या शब्दांवर गोड आलाप आहे. केवळ इतक्या साध्या बदलाने गाण्याला वेगळाच रंग चढतो. लताच्या आवाजात मस्ती, खोडकरपणा आणण्याचा हा प्रयत्न अफलातून आहे.
यातच किशोरकुमारच्या तोंडी लहान मुलांसाठीचं ‘एक सवाल मैं करू’ हे छानसं गाणं आहे. ‘छोटे नवाब’मध्येही मेहमूदने ‘हार हो के जीत हो’ हे छोट्या मुलांसाठीचं मस्त गाणं रफीच्या तोंडी घातलं आहे. 

पंचमचे ‘तिसरा कौन’ (१९६५) आणि ‘पती-पत्नी’ (१९६६) हे दोन कृष्णधवल चित्रपट या पाठोपाठच आले. पण यातील गाणी फारच सुमार आहेत. शिवाय त्यांची गीतं आनंद बक्षीसारख्या सुमार दर्जाच्या गीतकारानं लिहिली आहेत.
ज्यातील गाणी आजही ऐकाविशी वाटतात असा पंचमचा तिसरा आणि शेवटचा कृष्णधवल चित्रपट होता, कोवळ्या राजेश खन्ना-आशा पारेखचा ‘बहारों के सपने’ (१९६७).
पहिल्या दोन्ही चित्रपटांत क्लब डान्सची मस्तीवाली गाणी ‘बिनाका गीतमाला’त हिट ठरली होती. पण हा पंचमचा पहिला असा चित्रपट आहे की, लताचं अभिजात ठरावं असं गाणं, ‘तिसरी मंझिल’च्या गाण्याच्या तोडीस तोड ‘बिनाका गीतमाला’च्या स्पर्धेत टिकलं. खरं तर ‘तिसरी मंझिल’ आणि ‘बहारों के सपने’ हे जवळपास एकाच वेळी आलेले चित्रपट. दोन्हीत आपली प्रतिभा दाखवणारं संगीत देऊन एकाच वेळी पंचमने दोन गोष्टी सिद्ध केल्या होत्या. आपण संपूर्णपणे नवीन काही घडवू शकतो, नवे पायंडे पाडू शकतो, नवी लाट संगीतात आणू शकतो आणि त्याच सोबत परंपरा पूर्णपणे पचवून त्या पद्धतीची अप्रतिम अभिजात गाणी देऊ शकतो. 
या चित्रपटाला गीतकार लाभले होते मजरूह सुलतानपुरी. जेव्हा जेव्हा पंचमला प्रतिभावंत गीतकार लाभले (पुढच्या कारकिर्दीत गुलजार, जावेद ), तेव्हा तेव्हा त्याच्या गाण्यांना वेगळीच उंची प्राप्त झाली.
‘तिसरी मंझिल’च्या ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना’ आणि ‘ओ हसिना जुल्फोवाली’च्या सोबत ‘बिनाका गीतमाला’त टिकलेलं ‘बहारों के सपने’मधलं गोड गाणं होतं- 
आजा पिया तोसे प्यार दू 
गोरी बैंय्या तोपे वार दू 
किस लिऐ तु इतना उदास
सुखे सुखे होठ अखियों में प्यास
किस लिऐ ओ ऽऽऽ

आपण लताच्या आवाजातील सगळ्या शक्यता कशा वापरू शकतो, हे परत एकदा पंचमने दाखवून दिले. 
यातील दुसरं गाणं आहे मन्नादा आणि लताच्या आवाजात. सलिल चौधरींनी ‘मधुमती’मध्ये ‘चढ गयो पापी बिच्छुआ’मध्ये जसा लोकसंगीताचा अफलातून वापर केला होता, तसाच पंचमने या गाण्यात केला आहे. मन्नादाच्याच आवाजात शंकर-जयकिशनने 'तिसरी कसम'मध्ये 'चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजरेवाली मुनिया' दिलं आहे. 
चुनरी संभाल गोरी उडी चली जाये रे
मार ना दे डंख कहीं नजर कोई हाय

या गाण्यात मजरूह आहे म्हणून पुढच्या सुंदर ओळी आल्या आणि लतानेही त्याचं सोनं केलं.
फिसले नहीं चल के कभी दुखकी डगर पे 
ठोकर लगी हस दे हम बसने वाले दिल के नगर के
मजरूह-हसरत-शैलेंद्र-राजेंद्र कृष्ण-शकिल-साहिर यांशिवाय इतर कुणी लिहिलं असतं तर त्याला हे जमलं नसतं. ओ.पी.नय्यर आणि पंचम या दोन संगीतकारांनी चांगल्या गीतकारांसाठी आग्रह का धरला नाही हे उमगत नाही. त्यांची कितीतरी उच्चकोटीची गाणी केवळ शब्दांमुळे मार खातात.
या चित्रपटातलं अजून एक सुंदर गाणं आहे -‘क्या जानू सजन, होती है क्या गम की शाम’. पण हे गाणं रंगीत आहे. लताच्या आवाजातील दु:खाची आर्ततेची छटा ओळखून पंचमने तशी रचना केली आहे. 

नंतर पुढचा आलेला चित्रपट होता ‘पडोसन’ (१९६८). त्यानं जो इतिहास घडवला, तो तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर मात्र पंचमचा एकही चित्रपट कृष्णधवल नाही. मेलडीला मागे टाकून तालाला ठेक्याला पुढे नेणारा पाश्चात्य सुरावटीच्या वाद्यमेळ्याला (ऑर्केस्ट्रा) महत्त्व दिलं, असा आरोप झेलणारा पंचम शेवटच्या चित्रपटात ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’मध्ये अप्रतिम मेलडीवालं संगीत देऊन सगळ्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून निघून गेला. 
इतकी वर्षं उलटून गेली. त्याच्या विविध गाण्यांची चर्चा होत राहते, पण या सुरुवातीच्या गाण्यांवर फारसं बोललं जात नाही. म्हणून ही एक ‘भुली हुई यादें’ अशी आठवण... 
 लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   
a.parbhanvi@gmail.com