Thursday 22 April 2021

दिवंगत शशीकलाची अवीट गाणी



23 एप्रिल 2021 

जसं की खुश है जमाना आज पेहली तारीख हे एक सार्वकालीक हिट गाणं आहे तसंच एक दुसरं एक गाणं आहे वाढदिवसाचं ‘तूम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार’. हे सार्वकालिक हिट गाणं जिच्यावर चित्रीत झालं ती नायिका किती जणांना आठवते? वक्त चित्रपटांत आशा भोसलेचे गाजलेले गाणे ‘आगे भी जाने न तू’ पडद्यावर सुनील दत्त आणि साधना यांच्यावर चित्रित झालं आहे. शशी कपुर सामान्य असा पार्टीच्या बाहेर उभा आहे. पण तिसरा भाउ राजकुमार जिच्या बरोबर त्याच पार्टीत बॉल डान्स करतो ती नायिका कोण? जी पुढे खलनायिका किंवा व्हॅम्प म्हणूनच लक्षात राहिली ती देखणी मुळची मराठी असलेली नायिका शशीकला जवळकर म्हणजेच शशीकला. 

सुरवातीला नुरजहांच्या लहानपणीची भूमिका करण्यासाठी तिला घेण्यात आलं. ‘झिनत’ (1945) चित्रपटांतील केवळ स्त्रीयांनी गायलेली पहिली कव्वाली म्हणजे ‘आहे ना भरी शिकवे ना किये, कुछ भी न जुबां से नाम लिया, फिर भी न मोहब्बत छुप न सकी, जब तेरा किसीने नाम लिया’. यात पहिल्यांदा देखण्या 13 वर्षांच्या शशीकलाचा चेहरा ठळकपणे रसिकांच्या समोर आला. 

पुढे नियतीने घेतलेली चित्रविचित्र वळणे, शशीकलाच्या आयुष्यातील वादळे, तिचे स्वत:चे चुक बरोबर निर्णय या सर्वांत तिची चित्रपट कारकीर्द घडत गेली. तिच्या चित्रपटांची यादी करायला गेली तर उणीपुरी 100 ची निघते. तिच्या ‘खलनायिके’च्या रूपाचाच पुढे बोलबाला झाला पण तिच्यातील एक कसलेली नृत्यांगना आणि तिच्या वाट्याला आलेली काही गोड गाणी मात्र दुर्लक्षली गेली. आजही काही गाजलेली गाणी शशीकलावरची आहेत हे लक्षात येत नाही. 

89 वर्षांचे दीर्घ आयुष्य तिच्या वाट्याला आले. 4 एप्रिल 2021 ला तीचा मृत्यू झाला. वेडी वाकडी वळणे घेणारे तिचे आयुष्य अखेरच्या टप्प्यावर मुलगी जावाई आणि नातवंंडात सुखात गेलं.

तिच्या सुंदर अवीट गोडीच्या गाण्यात प्रामुख्याने येतं ते शर्त (1954) मधील हेमंत कुमारच्या संगीतातील गीताचे गोड गाणे ‘चांद घटने लगा, रात ढलने लगी, आरजू मेरे दिल की मचलने लगी’. गाण्याचे बोल तर राजेंद्रकृष्ण यांनी सुंदर लिहिले आहेतच पण गीताचा आवाज आणि शशीकलाचा अभिनय यांनी त्याला न्याय दिला आहे. 1954 ला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यातलंच ‘न ये चांद होगा’ हे गाणे बीनाकात तेंव्हा अतिशय गाजले होते. हेमंत कुमारच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे लता, गीता आणि आशा तिघींचेही आवाज यात वापरले आहेत.

हेलनची एक नृत्यांगना म्हणून प्रतिमा आहे. तिच्यासमोर/ सोबत नाचणं म्हणजे मोठे आवाहन. पण शशीकलाने देवआनंदच्या नौ दो ग्यारह (1957) मध्ये हे सार्थपणे पेलून दाखवलं आहे. ‘क्या हो फिर जो दिन रंगीला हो’ हे गीता/आशाचे सार्वकालीक हिट गाणे. मजरूहने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. यात आशाचा आवाज हेलन साठी तर गीताचा आवाज शशीकला साठी वापरला आहे. शशीकलाच्या अगदी दोन तीनच गाण्यांची निवड करायची झाली तर हे गाणं मी निवडेन.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढा नाही चालला पण यातील ‘आंखो मे क्या जी’, ‘कली के रूप मे’ सारखी गाणी मात्र बिनाकात गाजली. गीता आशाचे हे गाणे तर आजही अवीट असेच आहे.  

शशीकलाच्या वाट्याला आलेलं सर्वात सुंदर गीत ‘सुजाता’ (1959) मधील ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ हे आहे. लताचा आवाज एव्हाना सचिन देवबर्मन यांच्या संगीतातून गायब झाला होता. स्वाभाविकच गीता आणि आशाचा आवाज या काळात त्यांच्या संगीतात प्रामुख्याने झळाळून उठलेला दिसून येतो. मजरूहच्या या शब्दांना पडद्यावर अतिशय जिवंतपणे शशीकलाने साकारले आहे. आशाचे केवळ आलाप नुतनच्या तोंडी आहेत. संपूर्ण गाणे गीता आणि शशीकला यांनी उचलून धरले आहे.

याच सुजाता मध्ये वर ज्याचा उल्लेख केला आहे ते ‘तूम जियो हजारो साल’ हे गाणे आहे. पियानोवर बसलेली सजलेली देखणी शशीकला आणि अंधारात स्वत:ला हरवून टाकणारी नुतन असा विरोधाभास रंगवलेला आहे. गाण्याला आवाज आशाचा आहे. गाणं शशीकलाच्या तोंडी नाही पण तीच्यावर चित्रित आहे.

शशीकलाच्या वाट्याला हिट चित्रपट आले पण तिची भूमिका आता बदलत चालली होती. सहनायिका म्हणून शम्मी कपुरच्या गाजलेल्या जंगली (1961) मध्ये तिच्याही वाट्याला एक छानसे गाणे आले आहे. यातील इतर गाजलेल्या गाण्यांमुळे हे गाणे दुर्लक्षीत राहिलं. किशोर कुमारचा भाउ अनुप कुमार आणि शशीकलावरचे ‘नैन तुम्हारे मजेदार ओ जनाबे अली’ हे गाणे आशा/मुकेश यांच्या आवाजात आहे. गाजलेल्या बॉक्स ऑफिसवरच्या रंगीत  चित्रपटांतील हे तिचे पहिले गाणे.

पुढे तिच्या वाट्याला ऍटम सांग यायला लागली. पण 1964 ला ‘अपने हुये पराये’ मध्ये मनोज कुमार सोबत तिला एक छानसे गाणे मिळाले. संगीत शंकर जयकिशनचे होते. शैलेंद्रच्या शब्दांना लता आणि हेमंत कुमारच्या आवाजाची कॉपी वाटणारा सुबीर सेन यांनी गायले होते. ते गाणे होते ‘गगन के चंदा न पुछ मुझसे’. 

वक्त (1965) तेंव्हाचा पहिला मल्टी स्टारर चित्रपट. यातलं सुरवातीला उल्लेख केलेलं आशाच्या आवाजातलं गाणं ‘आगे भी जाने न तू’ यात राजकुमार सोबत नृत्य करायला शशीकलाच आहे. पण साधना-सुनील दत्त नायक नायिका असल्याने सगळं लक्ष त्यांच्यावरच खिळून राहतं.

फुल और पत्थर (1966) मधील ‘शीशे से पी या पैमाने से पी’ सारखी गाणी तिने केली. जी आयटम सांग होती. पण याच वर्षी एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आला अनुपमा (1966). हेमंत कुमारच्या संगीतात दोन अतिशय सुंदर सोलो गाणी शशीकलाच्या वाट्याला आली. कैफी आजमीचे शब्द आणि आशाचा आवाज या गाण्यांना लाभला.पहिलं गाणं होतं ‘क्यु मुझे इतनी खुशी मिली’. आणि दुसरं त्याचं जूळं भावंडं शोभावं असं गाणं होतं, ‘भिगी भिगी हवा’. आजही ही दोन गाणी ऐकताना शशीकला सारखी गुणी अभिनेत्री बाजूला पडली  याची खंत जाणवते.
 
तिच्या सगळ्यां गाण्यांतून एक छोटी यादी करायची तर हाताशी लागतात ही गाणी.

1. आहे ना भरी शिकवे ना किये, झिनत (1945)
2. चांद घटने लगा रात ढलने लगी, शर्त (1954)
3. क्या हो फिर जो दिन रंगीला हो, नौ दो ग्यारह (1957)
4. बचपन के दिन भी क्या दिन थे, सुजाता (1959)
5. तूम जियो हजारो साल, सुजाता (1959)
6. नैन तुम्हारे मजेदार, जंगली (1961)      
7. गगन के चंदा, अपने हुये पराये (1964)
8. आगे भी जाने न तू, वक्त (1965)
9. शीशे से पी या पैमाने पी, फुल और पत्थर (1966)
10. क्यु मुझे इतनी खुशी मिली, अनुपमा (1966)
11. भिगी भिगी हवा, अनुपमा (1966)

शशीकलाच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.

(सर्व गाणी  u tube वर उपलब्ध आहेत) 

-आफताब परभनवी.