अक्षरनामा, १८ फेब्रुवारी २०१७
प्रसंग फारच हृदयद्रावक असा आहे. गझलगायक जगजीत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर मोठा सांगितीक कार्यक्रम मुंबईला आयोजीत करण्यात आला होता. त्यात रामपुर घराण्याचे प्रसिद्ध गायक राशीद खांन यांना गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. राशीद यांनी जेंव्हा याद पिया की आये ही ठूमरी सुरू केली तेंव्हा सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमाचे चित्रीकरण चालू होते. ठूमरीच्या शेवटी कॅमेरा जगजीत यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्यावर स्थिरावला. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी नजर झुकवली.
या गायक जोडप्याचा एकूलता एक मुलगा विवेक कार अपघातात मृत्यू पावला. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. आता जगजीतही निघून गेले. चित्रा यांच्या आसवांमध्ये या सगळ्या दु:खाची तीव्रता ठासून भरलेली असावी. ही ठूमरी खरं तर बडे गुलाम अली खां यांच्यासारख्यांनी लोकप्रिय केली. पण राशीद खांचा आवाज आणि चित्रासिंग यांचे डबडबलेले डोळे आणि त्या कार्यक्रमाचा संदर्भ यामुळे राशीद खांचीच ठूमरी मनात ठसून राहते. 8 फेब्रुवारी हा जगजीत सिंग यांचा जन्मदिवस. त्यांच्या आठवणीत ही राशीद खांची ठूमरी. असं वाटत आहे की राशीद खां म्हणत आहेत ‘याद जगजीत की आये’
हिंदी चित्रपटात जगजीत यांचा आवाज पहिल्यांदा उमटला तो 1974 मध्ये बासु भट्टाचार्य यांच्या ‘आविष्कार’ मध्ये. या चित्रपटाला संगीत कनु रॉय यांचे आहे. त्यांचे सूर बासुंशी चांगले जूळले होते. ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ ही सुप्रसिद्ध ठूमरी जगजीत आणि चित्रा सिंग यांच्या आवाजात कनु रॉय यांनी वापरली आहे. कलकत्ता हॅण्डलूमच्या साध्या साडीतील शर्मिला आणि सुपरस्टारपद डोक्यात न गेलेला राजेश खन्ना यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. कुठलेही वाद्य न वापरता केवळ जगजीत चित्रा यांचा आवाज वापरण्याची कल्पना परिणामाच्या दृष्टीने कमालीची यशस्वी ठरते.
1981 मध्ये जगजीत यांचेच संगीत असलेला ‘प्रेमगीत’ हा राजब्बर- अनिता राज यांचा चित्रपट पडद्यावर आला. यातील सदाबहार ‘होठों से छू लो तूम, मेरे गीत अमर कर दो’ या गीताने जगजीत सिंग यांना खुप लोकप्रियता मिळाली. गझले शौकिनांच्या वर्तुळातून जगजीत यांचे नाव सर्वांच्या ‘कानात’ साठल्या गेले. हे गाणे गझल नसून ‘गीत’ आहे हेच बर्याच जणांना लक्षात येत नाही. तलत, जगजीत, भुपेंद्र, गुलाम अली हे जे जे गातात त्याला गझलच म्हणायची अशी आपली समज. जगजीत चित्रा यांचे दुसरे द्वंद्व गीत ‘आओ मिल जाये हम सुगंध और सुमन की तर्हा’ यालाही चांगली लोकप्रियता मिळाली. आजही हे गाणे रसिकांच्या मनात आहे. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांचीही गाणी या चित्रपटात आहेत. पण ती फारशी लक्षात रहात नाहीत. जगजीत हे गायकीसोबत संगीतकार म्हणूनही ठळकपणे यातून पुढे आले. अर्थात हिंदी चित्रपटात ते फारसे रमले नाहीत ही बाब अलहिदा.
लगेच आलेल्या साथ साथ (1983) ने अजून मोठी लोकप्रियता जगजीत यांना मिळवून दिली. पण याला संगीत जगजीत यांचे नव्हते. तर ते कुलदीप सिंग यांचे होते. जावेद यांची सदाबहार गझल, ‘तूमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तूम घना साया’ यातच आहे. जगजीतच्या आवाजाला चित्रा सिंग यांची केवळ आलापी वापरली आहे साथीला. घरची कामं करणारी कमरेला साडी खोचलेली दिप्ती नवल आणि मध्यमवर्गीय चेहर्याचा फारूख शेख यांच्यावरचे गाणे (गझल नाही) ‘ये तेरा घर ये मेरा घर’ हेही फार छान आहे. यातील काव्यही दर्जेदार आहे. ही सगळी गीतं जावेद यांची होती.
एच.एम.व्ही.ने ‘साथ साथ’ आणि त्याच्या पाठीमागे ‘अर्थ’ अशी रेकॉर्ड बाजारात आणली होती. खपाचे उच्चांक या रेकॉर्डने मोडले. ‘अर्थ’ (1983) ला जगजीत आणि कुलदीप सिंग या दोघांचेही संगीत आहे. यातील कैफी आझमी यांची दोन्ही गीतं गाजली. ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो’ हे तर आजही नं.1 ला आहे. बोलक्या डोळ्याची शबाना आणि राजकिरण यांच्यावरचे गाणे परत परत ऐकायला पहायला रसिकांना आवडते. याला संगीत जगजीत यांचेच होते. दुसरे सुंदर गाणे कुलदीप सिंग यांच्या संगीतातील आहे. आवाज अर्थातच जगजीत यांचाच.
झुकी झुकी सी नजर, बेकरार है के नही
दबा दबा सा सही दिल मे प्यार है के नही
वो पल की जिसमे मुहोब्बत जवां होती है
उस एक पल का तुझे इंतेजार है के नही
कैफी आझमी यांची प्रतिमा डाव्या चळवळीतील झुंझार कार्यकर्त्याची आहे. पण त्यांनी प्रेमाची अतिशय सुंदर कविता लिहीली आहे. हेमंतकुमार यांच्या गोड संगीतातील अनुपमा (1966) ची गाणी ऐकली तर लता/आशा यांच्या आवाजाइतकीच नजाकत कैफी आझमी यांच्या शब्दांतही आहे हे उमगते.
यानंतर मात्र संपूर्ण चित्रपटभर जगजीत यांचा आवाज आहे किंवा संगीत आहे असं घडलं नाही. त्यांची एखाद दुसरी गझल/नज्म चित्रपटात घेतल्या गेली आहे. त्यांच्या संगीताची जातकुळी तशीही हिंदी चित्रपटांशी जूळणारी नव्हतीच. कुमार गौरव, स्मिता पाटील यांच्यावर ‘आज’ (1990) चित्रपटात जगजीत यांचे गीत ‘ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, बारीश का पानी’ आहे. पण गाण्याचा नेमका भाव दु:ख असण्यापेक्षा निसटून गेलेल्या बालपणाची हूरहूर आहे हे लक्षात घेतलं नाही. परिणामी चित्रपटात गाणं दु:खी करून टाकलं आहे. हेच गाणे जगजीत-चित्रा यांच्या द्वंद्व स्वरात त्यांच्या अल्बममध्ये आहे. ते जास्त सुरेख नेमकं आणि परिणामकारक आहे.
नंतरच्या काळात जगजीत यांचे एकच गाणं अतिशय गाजलं. अमिरखानच्या ‘सरफरोश’ (1999) मधील निदा फाजली यांची गझल ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’ म्हणजे शब्द, संगीत, कॅमेरा, अभिनय यांचा सुरेख संगम. असं फार थोड्यावेळा हिंदी चित्रपटात जूळून आलं आहे. जतिन ललित यांचे संगीत तर जगजीत यांच्या आवाजाला अतिशय पोषक आहे. अमिर खान सोनाली बेंद्रे यांचा अभिनय आणि मुख्य म्हणजे या गाण्याचे चित्रांकन.
मम्मो (1994), दुष्मन (1998), तरकिब (2000), तुमबीन (2002), जॉगर्स पार्क (2003) यात जगजीत यांचा आवाज एखाद्या गाण्यापुरता वापरला आहे. पण एकूणच त्यांचा प्रभाव जाणवत नाही.
मिर्झा गालिब मालिका बनवित असताना गुलजार यांनी संगीताची सर्व जबाबदारी जगजीत सिंग यांच्यावर टाकली. त्यांनी ती समर्थपणे निभावलीही. गझलेचा ते किती बारीक विचार करत होते याचा तो सगळ्यात मोठा पुरावा.
हिंदी चित्रपटांत यापूर्वीही गालिब यांच्या गझला वापरल्या आहेत. एका गझलेचे उदाहरण तर मोठे मासलेवाईक ठरेल. ‘ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता’ ही गालिब यांची गाजलेली गझल. पहिल्यांदा मिर्झा गालिब (1954) चित्रपटांत गुलाम मोहम्मद यांनी सुरैय्याच्या आवाजात गाऊन घेतली. ही चाल धावती आहे. पुढे शंकर जयकिशनने ‘मै नशे मे हू’ (1959) मध्ये या गझलेसाठी उषा मंगेशकरचा उडता आवाज वापरला. कोठ्यावर मुजर्यासारखी ही गझल या चित्रपटात आहे. अख्तरीबाई (बेगम अख्तर) यांनीही आपल्या धीम्या लयीत या गझलेला चार चांद लावले. इतकेच काय मोहम्मद रफीच्या आवाजात हीच गझल खय्याम यांनीही गाऊन घेतली आहे जी कुठल्याही चित्रपटात नाही. पण इतकं सगळं असतानाही ‘मिर्झा गालिब’ मालिकेसाठी जगजीत यांनी चित्रासिंग यांच्या आवाजात जेंव्हा ही गझल रसिकांसमोर सादर केली तेंव्हा ती सगळ्यांपेक्षा सरस ठरली. आजही आपण सगळ्यांचे आवाज ऐकून तुलना करू शकतो.
हिंदी चित्रपटांत एकेकाळी नौशाद, मदनमोहन, रोशन, खय्याम, जयदेव यांनी गझलेचा फार सुंदर वापर करून घेतला होता. पुढे तो नंतरच्या संगीतकारांना करून घेता आला नाही. जगजीत यांची आठवण त्यांच्या गझलांसाठी तर येत राहिलच पण मोजक्याच चित्रपटांतील त्यांच्या प्रभावशाली ठरलेल्या संस्मरणीय गाण्यांसाठीही येत राहिल.
No comments:
Post a Comment