Monday 19 June 2017

जुन्या गाण्यात सतत ‘नूतन’ वाटणारी नूतन




अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 17 जून 2017
चार जून हा नूतनचा जन्मदिवस. त्या दिवशी गुगलने तिचं डूडल बनवून दखल घेतली. नूतन म्हटलं की, कोणती गाणी आठवतात? कोणते चित्रपट डोळ्यांसमोर येतात? देवआनंद सोबतचे चार चित्रपट (‘पेईंग गेस्ट’, ‘बारिश’, ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’) किंवा राज कपूरसोबचे तीन चित्रपट (‘अनाडी’, ‘छलिया’, ‘दिल ही तो है’) किंवा सुनील दत्त सोबत (‘सुजाता’, ‘खानदान’, ‘मिलन’) किंवा इतर हिट चित्रपट (‘सीमा’, ‘बंदिनी’, ‘दिल्ली का ठग’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘सरस्वतीचंद्र’). अगदी सोनिक ओमीसारख्या दुर्मिळ संगीतकाराचे नूतनवरचे गाणे ‘दिल ने फिर याद किया’ही (चित्रपटाचे नावही तेच) आठवते.   
लोकप्रियतेच्या हमरस्त्यावरचे हे चित्रपट आणि त्यातली गाणी तसंच लोकप्रिय संगीतकार वगळून आपण जरा आडबाजूला वळलो तर काय दिसतं?
अजिंठ्यासारखं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असतं. त्याकडे जाणारा रस्ता गर्दीचा असतो. पण याच रस्त्याला अजिंठ्याच्या अलिकडे मुख्य रस्त्यापासून उजवीकडे जरा आत वळलं की, अन्व्याचं मंदिर सापडतं. त्यावरची अप्रतिम शिल्पकला पाहून आपण स्तिमित होऊन जातो. तसंच नूतनच्या लोकप्रिय चित्रपटांची वाट सोडून आडवाटेला वळलं की, काही गोड गाणी हाताला लागतात. लोकप्रिय संगीतकार वगळून इतर संगीतकारांकडे लक्ष जातं. आणि त्या गाण्यांची अवीट गोडी जाणवते.  
अगदी कोवळ्या वयातला माकडउड्या न मारणारा हळवा शम्मी कपूर रफीच्या नव्हे तर तलत मेहमूदच्या आवाजात आर्ततेनं गातो आहे, ‘चल दिया कारवां, लुट गये हम यहां तुम वहां, गिर पडी बिजलीया, उठ रहा है धुवां’. हे गाणं आहे नूतन-शम्मी कपूरच्या ‘लैला मजनु’ (१९५३) मधलं. यातलंच दुसरं अतिशय गोड गाणं लता-तलतच्या आवाजात आहे, ‘आसमांवाले तेरी दुनिया से जी घबरा गया, चार दिन की चांदनी, गम का बादल छा गया’. गुलाम मोहम्मदला तसं कधी व्यावसायिक यश लाभलं नाही. ‘मिर्झा गालिब’ (१९५४) आणि त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेला ‘पाकिजा’ (१९७२) हे दोनच चित्रपट अपवाद. पण 'लैला मजनू'सारख्या काही चित्रपटांना त्यानं अतिशय चांगलं संगीत दिलं आहे. 

अनिल विश्वासचे चित्रपट १९४०-५० दशकांत जास्त गाजले. पण नंतर चित्रपटांची संख्या रोडावत गेली. याच अनिल विश्वासने नूतन-प्रदीपकुमार यांच्या ‘हिर’ (१९५६) ला अप्रतिम संगीत दिलं आहे. नायिकेसाठी एकाच चित्रपटात लता-आशा-गीता तिघींनीही गाण्याची एकमेव घटना या चित्रपटात नूतनबाबत घडली.
गीताच्या आवाजातील ‘बुलबुल मेरे चमन के’,

लताच्या आवाजातील ‘कब तक रहेगा परदा’

आणि आशाच्या आवाजातील ‘छेडी मौत ने शहनाई’

ही तिन्ही गाणी अतिशय श्रवणीय आहेत. गीताच्या आवाजातील मस्ती, लताच्या आवाजातील आर्तता वापरताना आशाच्या आवाजातील एरव्ही न आढळणारी व्याकूळता अनिल विश्वास यांनी टिपली आहे. 
यातलं सगळ्यात चांगलं गाणं गीता-हेमंतच्या आवाजात आहे. पहिल्यांदा उमटतो गीताचा आर्त सूर -
ओ साजना, छुटा है जो दामन तेरा
मंझिल मंझिल है अंधेरा, ओ साजना
ही आर्तता नूतनच्या पारदर्शी चेहर्‍यावर उमटते. आणि लगेच येतो हेमंतकुमारचा आवाज -
जा दिलरूबा, तेरे साथ चला दिल मेरा
रहे प्यार निगहबान तेरा, जा दिलरूबा
लगेच नूतनचा चेहरा पालटतो. प्रियकराच्या आवाजानं ती आनंदून उठते. त्याचं प्रेम आपल्यासोबत असल्याची ग्वाही त्याच्याच आवाजात मिळते आहे. मग हा आपल्या उरात घुसलेला विरहाचा बाण आपण सहज सहन करू. खरंच काय लिहायचे तेव्हाचे कवी! (हे गाणं मजरूहचं आहे) ‘दिल की तमन्ना पुरी होने ना पाई, आके जिगर पे लगा तीर-ए-जुदाई, जरा देख तडपना मेरा, ओ साजना’. गीताने आपल्या आवाजात ज्या विविध छटा दाखवल्या आहेत, त्याला हेमंतकुमारच्या खर्जातल्या आवाजाचा भक्कम कॅनव्हास लाभला आहे. हे पडद्यावर सादर करणारी, कुठलेच दागिने न घातलेली, एकदम साधी नूतन. अनिल विश्वाससारखे संगीतकार ‘दादा माणूस’ का आहेत, हे अशा लोकप्रिय न ठरलेल्या, पण आजही ऐकताना हलवून सोडणार्‍या गाण्यांतून जास्त तीव्रतेनं लक्षात येतं.
शौकत देहलवी नाशाद (नौशाद नाही) याला संगीतकार म्हणून ‘बारादरी’ (१९५५) वगळता फारसं व्यावसायिक यश लाभलं नाही. नूतन-प्रदीप कुमार यांच्या ‘जिंदगी या तुफान’ (१९५८) ला त्याचं संगीत आहे. ‘आयेगा आयेगा आनेवाला’चा गीतकार म्हणून गाजलेल्या नक्क्षाब यांचं एक गीत तलतच्या आवाजात यात आहे. ‘जुल्फों की सुनहरी छांव तले, इक आग लगी दो दीप जले, जब पेहली नजर के तीर चले, मत पुछ के दिल पर क्या गुजरी’ या सुंदर शब्दांना आपल्या मुक अभिनयानं नूतनने पडद्यावर जिवंत केलं आहे. आणि प्रत्यक्ष ज्याच्या तोंडी हे गाणं आहे, तो प्रदीपकुमार हातात हार्मोनिअम घेऊन बथ्थडसारखा बसून गातो आहे. गाणं सगळं उलगडत जातं, ते तलतच्या सुरात, नाशादच्या संगीतात, नक्क्षाबच्या शब्दात आणि नूतनच्या अभिनयात केवळ.

नक्शाब सारखा गीतकार पुढे यायला हवा होता. या गाण्यात अतिशय साधे, पण ओघवते शब्द त्यानं लिहिले आहेत, 
इतनासा है दिल का अफसाना, 
अपना न हुआ एक बेगाना, 
नजरे तो मिली और दिल ना मिले, 
कुछ उनसे हमे शिकवे ना गिले, 
क्या खुब मिले उल्फत के सिले, 
मत पुछ के दिल पर क्या गुजरी
यातील शिकवे ना गिलेवर नूतन हलकेच दातांनी ओठ चावते. गाणं पडद्यावर जिवंत होतं म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण.
‘छबिली’ (१९६०) हा शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे नूतनच्या घरचाच चित्रपट. तनूजा यात बाल कलाकार म्हणून पहिल्यांदा आली आली आहे. यात स्वत: नूतननं एक-दोन नाही तर तब्बल पाच गाणी गायली आहेत. गीता दत्त, महेंद्र कपूर सोबत तसंच सोलो गाणीही आहेत. पण ती विशेष नाहीत. स्नेहल भाटकर यांचं संगीत या चित्रपटाला आहे. यातील एकमेव गाजलेलं गीत हेमंतकुमारच्या आवाजात आहे. नूतनची केवळ आलापी साथीला आहे-  
लहरों पे लहर, उल्फत है जवां
रातों की सहर चली आवो यहां
सितारे टिम टिमाते है तू आजा आजा
मचलती जा रही है हवाये आजा आजा 

हेमंतकुमारचा आवाज एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्या आवाजात जो धीरगंभीर खर्ज आहे, तो कुणाच्याच आवाजात नाही. पुरुषाचा खास आवाज म्हणून कितीतरी गाण्यांत हा आवाज परिणामकारक ठरला आहे. हे गाणंही त्याला अपवाद नाही. हेमंतकुमारच्या निवडक गाण्यात याचा समावेश नेहमीच असतो. 
एन.दत्ता (दत्ता नाईक) नी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलं. एक ‘धुल का फुल’ (१९५९) वगळता त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. ‘चांदी की दिवार’ (१९६४) हा नूतन-भारतभूषण यांचा चित्रपट याला एन. दत्ताचं संगीत आहे. यात मध्ये एन. दत्ताने आशा-तलतच्या आवाजात शास्त्रीय संगीताचा बाज असलेलं ‘लागे तोसे नैन’ आणि आशा-रफीच्या आवाजात ‘जो केहनेसे तुम शरमाती हो’ हे मस्तीखोर गाणं दिलं आहे. पण यातील जे सगळ्यात सुंदर गाणं आहे ते मात्र तलतच्या एकट्याच्या अवाजात आहे- 
अश्कों ने जो पाया है वो गीतों मे दिया है
इस पर भी सुना है के जमाने को गिला है
या गझलेतील साहिरचा एक शेर स्वतंत्रपणे गाजला. त्या ओळी अशा आहेत
जो तार से निकली है वो धून सबने सुनी है
जो साज पे गुजरी है वो किस दिल को पता है

एन. दत्ताचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने साहिरच्या कवितांवर मनापासून प्रेम केले आणि त्यांना अवघड असतानाही चित्रपटांमधून गीत म्हणून सादर केले. ताजमहाल सारखी साहिरची रचना गीत म्हणून खुपच आव्हानात्मक आहे. पण एन.दत्ताने ते ‘साहिरधनुष्य’ पेलले आहे. याही ठिकाणी या नाजूक गझलेला तलतचेच सूर न्याय देऊ शकतील, हे ओळखून तशी योजना एन.दत्ताने केली आहे. 
नंतरच्या काळातील रंगीत चित्रपटांतील नूतन फारसा प्रभाव पाडू शकत नाही. नंतरची गाणीही तशी नाहीत. ‘खानदान’, ‘मिलन, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’मधील गाणी गाजली. त्यांना लोकप्रियताही लाभली. पण त्यांचा प्रभाव आधीच्या गाण्यांइतका टिकला नाही. कृष्णधवल काळातील लोकप्रियतेच्या आडवाटेवरील गाणीही आज अवीट वाटतात. आणि नंतर लोकप्रिय ठरलेली गाणीही ऐकावीशी वाटत नाहीत. 
जुन्या गाण्यात सतत ‘नूतन’ वाटणारी नूतन नंतरच्या गाण्यांत मात्र ‘जून’ वाटत राहते.

No comments:

Post a Comment