Sunday 3 June 2018

राज-नर्गिसची दुर्लक्षीत युगल गीते


दै. उद्याचा मराठवाडा 3 जून 2018

मुकेश किंवा मन्ना डेचा आणि लताचा आवाज, शंकर जयकिशनचे संगीत, शैलेंद्र-हसरत यांची शब्दकळा हा साच्या राज-नर्गिस या जोडीच्या प्रणय गीतांसाठी अगदी पक्का बनून गेला आहे. रसिकांच्या मनातही हेच सगळं रसायन कायम आहे. पण या शिवायही या जोडीची काही सुंदर मधुर गाणी आहेत. राजकपुरची पुण्यतिथी (2 जून) आणि नर्गिसची जयंती (1 जून) या निमित्ताने त्यांच्या अशा दुर्मिळ गाण्यांना उजाळा

आर.के. बॅनरच्या बाहेर राज-नर्गिस जोडीचे दोन सिनेमे प्रचंड गाजले. एक होता 1949 चा ‘अंदाज’ आणि दुसरा 1956 चा ‘चोरी चोरी’. यातली गाणी गोड आहेतच. पण ही गाणी आजही ऐकली जातात. आणि चोरी चोरी तर आर.के. बॅनरचाच चित्रपट असल्याचा रसिकांचा पक्का गैरसमज आहे. तो दुर करण्याची गरजही नाही. 

पण आर.के.मधील सहा चित्रपट आणि बाहेरचे ‘अंदाज’ व ‘चोरी चोरी’ वगळता इतर चित्रपटात काही मधुर गाणी या जोडीवर चित्रित झाली आहेत.

यातला पहिला चित्रपट आहे ‘प्यार’ (1950). सचिन देव बर्मन यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं होतं. राजेंद्रकृष्ण सारखा गुणी गीतकार यात सचिनदांनी वापरला. जवळपास कधीच न ऐकू आलेला राज साठी किशोरचा आवाज यात आहे. किशोर-गीता यांच्या आवाजातील हे खट्याळ गाणं आहे, ‘एक हम और दुसरे तुम, तिसरा कोई कही’.  एकदम साधी शब्दकळा आहे. अजून पुढचा किशोर-गीताचा खट्याळ गाण्यांचा बहराचा काळ येण्यापूर्वीचे हे गाणे म्हणून जास्त महत्त्वाचे. हा मुड पूढे देवआनंदने जास्त वापरला. खरं तर राजकपुरसाठी किशोरचाही आवाज चांगलाच चालू शकला असता. पण त्याचा वापर करणारे संगीतकार तेंव्हा राज कपुरसोबत नव्हते. सुरवातीच्या काळात म्हणजे जवळपास 1960 पर्यंत स्वत:शिवाय देवआनंदचा अपवाद सोडल्यास आपला आवाज इतरांसाठी किशोरने फारसा दिला नाही. इतकंच काय तर खुद्द किशोरच्या 14 गाण्यांसाठी त्याचा स्वत:चा आवाज नाही.   

खेमचंद प्रकाशच्या संगीतात ‘जान पेहचान’ (1950) मध्ये गीता आणि तलच्या आवाजात एक सुंदर गाणं राज-नर्गिसवर आहे. राज-नर्गिस यांच्या प्रेमाचा हा अगदी बहराचा काळ. यात शकिलने एक अतिशय सुंदर ओळ लिहीली आहे. गीताच्या स्वरात नर्गिस विचारते आहे, 

‘क्यु प्यार की दुनिया मे न हो ‘राज’ हमारा’ 
आणि त्याला तलतच्या आवाजात राज उत्तर देतो, 
‘है दिल को तेरी ‘नर्गिसी’ आंखो का सहारा’. 

खरं तर या एका ओळीवर फिदा होवून राज कपुरने आर.के.साठी किमान एखादा तरी चित्रपट शकिलला द्यायला हवा होता. पण तसं काही घडलं नाही. शकिलने बहुतांश काम नौशाद सोबत केलं. तसंच इतर संगीतकारांमध्ये हेमंतकुमार, रवी आणि गुलाम मोहम्मद. पण हेही परत राज कपुर कँप मध्ये नव्हते.  

‘बावरे नैन’ या राजकपुरच्या चित्रपटाला रोशनचे संगीत होते. पुढे राज-नर्गिसच्या ‘अनहोनी’ (1952) ला पण रोशनचे संगीत लाभले. लता-तलत हे युगल गाण्यांतील सगळ्यात गोड मखमली स्वर जोडपं. आजही तलतच्याआवाजात लताचा आवाज मिसळत गेला की सोने पे सुहागा किंवा दुधात साखर असं काहीतरी वाटत रहातं. ‘अनहोनी’ मध्ये दोन गाणी रोशननी या आवाजात दिली आहेत. पहिलं आहे, ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ हे फोनवरचं गाणं आहे.  तेंव्हा फोनवर गाण्यांची एक फॅशनच होती (‘मेरे पिया गये रंगून’ हे असंच तेंव्हाचे गाजलेले ‘फोनगीत’). 

पण यातलं दुसरं गाणं जास्त गोड आहे. ते आहे, ‘समा के दिल मे हमारे जरा खयाल रहे’. शैलेंद्रचे नाजूक शब्द बर्‍याचदा शंकर जयकिशनच्या स्वर गोंगाटात बुजतात. सचिनदा, सलिल चौधरी आणि रोशन यांनी शैलेंद्रच्या शब्दांतील नाजुकपणाला जास्त चांगला न्याय दिला आहे. हे गाणं अशापैकीच एक. आत याच गाण्यातील ही शब्दकळा बघा

ये दिल का दर्द निगाहों की प्यास धोका है
जमी पे रेह के सितारों की आस धोका है
ये सब्जो बाग है सारे जरा खयाल रहे

ही पेलायला लता तलतचे हळवे सुर आणि रोशनचं संगीतच हवं. 

‘पाकिजा’ आणि ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटांमुळे रसिकांच्या कायम स्मरणात राहिलेला संगीतकार म्हणजे गुलाम मोहम्मद. राज-नर्गिसच्या ‘अंबर’ (1952) ला त्याचे संगीत लाभलं आहे. यात रफी-लताच्या आवाजात एक दोन नव्हे तर तीन युगल गीतं गुलाम मोहम्मदने दिली आहेत. यातलं सगळ्यात गोड गाणं म्हणजे, 

हम तूम ये बहार, देखो रंग लाया प्यार, 
बरसात के महिने मे
रिमझिम ये फुहार, दिल गाये रे मल्हार, 
एक आग लिए सिने मे

रफीची कमाल म्हणजे मुकेश/मन्नदाच्या आवाजात गाण्यार्‍या राजसाठी एक वेगळाच ठेवणीतला आवाज रफी काढतो. रफी लताची एकमेकांत मिसळून गेलेली अलापीही फार गोड आहे. ही संधी मुकेश-लताच्या आवाजात संगीतकारांना भेटत नाही. गुलाम मोहम्मद खरंच दुर्लक्षित राहिलेला गुणी संगीतकार. आजही त्याची अशी गाणी ऐकताना त्याची प्रतिभा जाणवत राहते.

मदनमोहन आणि राज-नर्गिस हा योग जूळून आला होता ‘धुन’ (1953) या चित्रपटात. यात राज कपुरसाठी मदनमोहनने हेमंतकुमारचा आवाज वापरला आहे. हेमंत-लता यांच्या आवाजातील हे गाणं आहे

‘हम प्यार करेंगे हम प्यार करेंगे
हम लडके झगड के भी प्यार करेंगे’

असे भरत व्यासांनी लिहीलेल्या गाण्याचे बोल आहेत. अगदी साध्या गुरूशर्ट पायजाम्यातला राजकपुर आणि साडीतली नर्गिस. सगळ्या गाण्यातच एक साधेपणा जाणवत राहतो.

फारच कमी चित्रपटांना संगीत दिलेला फारसा परिचित नसलेला संगीतकार म्हणजे एस.मोहिंदर. राज-नर्गिस यांच्या ‘पापी’ (1953) ला त्याचे संगीत आहे. या चित्रपटात राज कपुरचा डबल रोल आहे. सगळ्या चित्रपटात रफीचाच आवाज राज कपुरसाठी वापरला आहे. ‘ले ले गोरी’ हे अवखळ गाणं फार गाजलं यातलं. याच चित्रपटात रफी-आशाच्या युगल स्वरात राज नर्गिस साठी एक गाणं आहे, ‘मेरी जिंदगी है तू, मुझसे तेरी जुस्त जू’. आशा चा आवाज राज कपुरच्या चित्रपटांत फारच थोडा आलेला आहे. त्यापैकी हा एक चित्रपट.

या शिवाय राज नर्गिसचा आर के बाहेरचा ‘बेवफा’ (1952) हा पण एक चित्रपट आहे. याला ए.आर.कुरेशी (म्हणजे उस्ताद अल्लारखां, झाकिर हुसेन यांचे वडिल) यांचे संगीत आहे. पण यात एकही युगल गीत नाही. तलतचे एक फार गोड गाणे ‘दिल मतवाला लाख संभाला’ यातच आहे. पियानोवर बसलेला राज कपुर आणि पियानोवर झुकलेली नर्गिस अशी एक तेंव्हा चित्रपटांत आढळणारी नेहमीची चौकट या गाण्याच्या वेळेस आहे. पण हे काही युगल गीत नाही. 

केवळ गाण्यांचाच विचार केला तर राज-नर्गिसच्या गाण्यांना जास्तकरून शंकर जयकिशनचे संगीत तर आहेच पण त्यांची प्रतिमा तयार होण्यासाठी तेंव्हाचे प्रतिभावंत संगीतकार नौशाद, सचिनदेव बर्मन, रोशन, खेमचंद प्रकाश, सलिल चौधरी (‘जागते रहो’ साठी), मदनमोहन, गुलाम मोहम्मद यांनीही हातभार लावला आहे. लोकप्रिय जे आहे तेच जास्त करून समोर येत राहतं. पण त्यासाठी पार्श्वभूमी म्हणून इतरही बर्‍याच बाबी असतात.  यासाठी  ही इतर गाणी कामाला येतात.

     -आफताब परभनवी.

No comments:

Post a Comment