मोहनगरी दिवाळी २०१७
पियानोवर झुकलेली तारूण्याने मुसमुसणारी नर्गिस, तिच्या समोर मुकेशच्या आवाजात गाणारा देखणा तरूण दिलीपकुमार, नौशादच्या संगीतावर थिरकणारी कक्कु आणि मजरूहचे शब्द...
तू कहे अगर जीवनभर
मै गीत सुनाता जाऊ
मन बीन बजाता जाऊ
और आग मै अपने दिल की
हर दिल मे लगाता जाऊ
दु:ख दर्द मिटाता जाऊ
दिलीपकुमार-नर्गिस-राज कपुर यांच्या ‘अंदाज’ (1949) मधले हे गाणे केवळ गाणे नव्हते तर पुढे जवळपास 18 वर्षे चाललेल्या हिंदी गाण्यांच्या सुवर्ण काळाची ही नांदी होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. फाळणीच्या जखमा विसरून नविन काही घडवू पहाणार्या पिढीच्या डोळ्यात अनोखी स्वप्ने होती. हातात काही करून दाखवायची धमक होती. या पिढीला पडद्यावर कृष्ण धवल चित्रपटांतून रंगीत स्वप्नं दाखवायला पुढे आले तीन तरूण- दिलीप कुमार (जन्म 1922), देव आनंद (जन्म 1923) आणि राज कपुर (जन्म 1924). काय योगायोग आहे. सगळ्यात लहान राज कपुर तो आधीच गेला. त्यानंतरचा देव आनंद तोही 2011 ला गेला. आणि सर्वात ज्येष्ठ दिलीप कुमार त्याच्या आयुष्याची दोरी अजून बळकट आहे.
या तिघांचा अभिनय, त्यांच्या चित्रपटांचे इतर पैलू या पेक्षाही जास्त मोहिनी पाडणारी गोष्ट म्हणजे यांची गाणी. आपल्या हृदयातील ‘आग’ त्यांनी तेंव्हाच्या तरूणाईच्या हृदयात लावली आणि तरूणाईने ‘आह’ केले. गीतकार-संगीतकार-गायकांनी त्याला असे काही चार चांद लावले की ही गाणी अमर ठरली.
1.
राज कपुरच्या ‘बरसात’ (1949) पासून हिंदी गाण्यांचा सुवर्णकाळ सुरू होतो आणि संपतो तो राहूल देव बर्मनच्या ‘तिसरी मंझिल’ (1966) पाशी. नंतरच्या काळात चांगली गाणी आली. पण ती तूरळक होती. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये’ असं जे 1949 ते 1966 या काळात गाण्यांबाबत घडलं ते तसं नंतर घडलं नाही. त्यातही परत 1955 ते 1960 हा काळ म्हणजे तर कळसच.
हिंदी चित्रपटांचे यश मोजायची एक सरळ साधी सोपी पद्धत म्हणजे त्यांना मिळालेला बॉक्स ऑफिसवरचा प्रतिसाद. या बाबतीत दिलीप-देव-राज यांना मिळालेल यश पाहता रसिकांच्या हृदयावर यांनी राज्य केलं हेच सिद्ध होतं. दरवर्षी सर्वात जास्त कमाई करणार्या हिंदी चित्रपटांची यादी उपलब्ध आहेत. 1949-1966 या काळात 168 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. या त्रिकुटाचे यात तब्बल 51 चित्रपट आहेत. हे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
‘अंदाज’मध्ये दिलीपकुमार साठी नौशाद यांनी मुकेश तर राज कपुरसाठी रफीचा वापर केला होता. पुढे ‘बाबूल’ (मिलतेही आंखे दिल हुआ) आणि ‘आरजू’ (ए दिल मुझे एैसी जगा ले चल) मध्ये दिलीपकुमार साठी तलत चाही वापर झाला. राजकपुरच्या ‘सरगम’ मध्ये सी.रामंचद्र यांनी आपलाच आवाज राज कपुरसाठी वापरला (वो हमसे चुप है) राज कपुरसाठी मुकेशचा आवाज ‘बरसात’ पासून सुरू झाला होता. पण गाण्याची शैली जूनी होती.
या काळात देव आनंदचे कुठलेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले नव्हते.
1951 साल उजाडले आणि दिलीप-देव-रफी यांच्या गाण्यांना एक विशिष्ट दिशा सापडली. ‘आवारा’त शंकर जयकिशननं मुकेशचा अगदी चपखल वापर राज कपुरसाठी केला. शैलेंद्रचे शब्दही त्याला पोषक ठरले. पुढे राज कपुर-मुकेश असं अद्वैत निर्माण करणारं हे ऐतिहासिक गाणं होतं ‘आवारा हूं’.
दिलीप कुमार साठी नौशाद यांनी रफीचा आवाज लता सोबत वापरला. शकिलच्या शब्दांना आर्ततेची झालर देणारं हे गाणं ‘देख लिया मैने किस्मत का तमाशा देख लिया’ अमर ठरलं. तलतपेक्षाही जास्त रफीचा हा आवाज दिलीप कुमारची ओळख बनला.
याच वर्षी गुरूदत्तच्या दिग्दर्शनाखाली देवआनंदचा ‘बाजी’ प्रदर्शित झाला. त्यात देव आनंदसाठी किशोर कुमार पहिल्यांदाच सैगलच्या प्रभावातून बाहेर येवून गायला. ते गाणं होतं, ‘तेरे तिरों मे छूपे प्यार के खजाने है’. याच गाण्यात किशोरनं त्याचं सुप्रसिद्ध ऑडलिंगही केलं होतं. पुढे जवळपास 20 वर्षे देव आनंदची जी चिरतरूण प्रतिमा उभी राहिली तिचा उगम याच गाण्यात आहे.
1951 नंतर सुरू झाला एक सुरिला प्रवास.पहिलं त्रिकुट राजकपुर-मुकेश/मन्ना डे- शंकर जयकिशन, दुसरं त्रिकुट म्हणजे दिलीपकुमार-रफी/तलत-नौशाद आणि तिसरं त्रिकुट म्हणजे देवआनंद-किशोर/रफी-सचिन देव बर्मन.
दिलीप कुमारच्या 21 गाजलेल्या चित्रपटांपैकी 9 ला नौशादचे संगीत आहे. गाण्यांचा विचार केला तर त्याची गाजलेली गाणी जवळपास सगळी यातीलच आहेत. देव आनंदच्या 17 पैकी 10 चित्रपटांना सचिन देव यांचे संगीत आहे. राज कपुरच्या 13 पैकी 8 चित्रपटांना शंकर जयकिशनचे संगीत आहे. यातून हेच सिद्ध होते की या कलाकारांची विशिष्ट सांगितिक प्रतिमा तयार करण्यात या संगितकारांचा मोठा वाटा होता.
बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 168 चित्रपटांतील दखलपात्र 867 गाण्यांचा विचार केला तर त्यातील 261 गाणी या तिघांच्या चित्रपटांतील आहेत. म्हणज निव्वळ गाण्यांचा विचार केला तरी हे प्रमाण 30 टक्के इतके होते.
सुवर्ण काळाच्या कळसाचा म्हणजेच 1955 ते 1960 चा विचार केल्यास दखलपात्र 372 पैकी 238 गाणी म्हणजे तर हे प्रमाण 42 टक्के इतके ठरते. तेंव्हा नि:संशय या तिघांच्या गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं हेच सिद्ध होतं.
2.
हिंदी गाण्यांच्या सुवर्णकाळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘बरसात’ (1949) ते ‘आरपार’ (1954). ओ.पी.नय्यरच्या येण्यानं हिंदी गाण्यांना ठेक्याचं वरदान मिळालं. त्यानं लोकप्रिय केलेला टांग्याचा ठेका आधीही होताच. पण ओ.पी.नय्यरनं तो ठळक केला. त्याला लोकप्रियता मिळवून दिली.
‘फुटपाथ’(1953) मधील तलच्या आवाजातील ‘शाम ए गम की कसम, आज गमगीन है हम’ अतिशय गाजलं. या आधीही तलतचा आवाज दिलीप कुमारला शोभून दिसला होता. सोबतच दिलीपकुमारची प्रतिमा बनत गेली ती रफीच्या ‘आन’ मधील ‘दिल मे छूपा के प्यार का तूफान’ सारख्या गाण्यांनी. याच काळात ‘जाल’ (1953) मध्ये सचिन देव बर्मन यांनी देवआनंद गीताबाली साठी एक गीत संगीतबद्ध केलं होतं. किशोर-गीता यांच्या आवाजातील हे गाणं होतं, ‘दे भी चुके हम दिल नजराना दिल का’. या गाण्यातल्या किशोरच्या हरकती, गीताच्या आवाजातील अवखळपणा पडद्यावर जिवंत करायला देवआनंद- गीता बालीच हवेत. याच चित्रपटात हेमंतकुमारचे ‘ये रात ये चांदनी फिर कहां’ सारखं अवीट गोडीचं गाणं देवआनंदच्या तोंडी आहे. पण खरी रंगत चढते ती किशोरच्याच आवाजात.
देव आनंद- कल्पना कार्तिकचा ‘हमसफर’( संगीत सरोद वादक उस्ताद अली अकबर), देव आनंद-नलिनी जयवंत यांचा ‘राहि’(संगीत- अनिल विश्वास) हे याच वर्षीचे. पण या दोन्ही चित्रपटांतील गाणी विशेष नाहीत. देवआनंदचे हे दोनच बॉक्स ऑफिस हिट चित्रपट असे आहेत ज्यातील गाणी विशेष गाजली नाहीत.
राज कपुरचा ‘आह’ (1953) याच काळातला. प्रेमाच्या द्वंद्व गीतात मुकेश फारसा पोषक वाटत नाही हे राज कपुरला इथेच जाणवलं. हे गाणं होतं, ‘जाने ना जिगर’.
या पहिल्या टप्प्यात शेवटच्या वर्षी देवआनंदचा ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि दिलीपकुमारचा ‘अमर’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. राज कपुरचा कुठलाच चित्रपट या काळात आला नाही. तलतचा आवाज देवआनंदसाठी ‘जाये तो जाये कहां’ या गाण्यासाठी वापरला गेला होता. पण याच टॅक्सी ड्रायव्हर मध्ये ‘चाहे कोई खुश हो’ सारखं अवखळ गाणं रफीच्या आवाजात सचिनदेव बर्मन यांनी घेतलं आणि देव आनंदसाठी अजून एक आवाज चपखल बसतो हे सिद्ध झालं.
1954 ला देव आनंद, राज कपुरचा कुठलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. दिलीप कुमारच्या ‘अमर’ मध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेलं गाणं ‘इन्साफ का मंदिर है’ होतं. बाकी सगळी गाणी लताची होती. ‘ना मिलता गम तो बरबादी’ सारखं गाणं यातीलच.
3.
हिंदी गाण्यांच्या सुवर्णकाळाचा दुसरा टप्पा सुरू होतो 1955 पासून. याच वर्षी दहा पैकी सहा चित्रपट दिलीप-देव-राज यांचेच होते.
राज कपुरला मुकेशच्या आवाजाची ताकद माहित झाली होती. त्याची एक प्रतिमा या आवाजात आणि शैलेंद्रच्या शब्दांत फुलविण्याची जादू शंकर जयकिशन यांना अवगत झाली होती. ‘आवारा हूं’ नंतरचे मुकेशचे राज कपुरसाठी आयकॉनिक ठरलेले गाणे ‘मेरा जूता है जपानी’ याच वर्षीच्या ‘श्री 420’ मध्ये होतं. या गाण्यानं तेंव्हा सर्वत्र धूम केली. पण याच चित्रपटात प्रेमाच्या द्वंद्व गीतात मुकेश ऐवजी मन्ना डे वापरण्याचा चतुरपणा राज कपुर-शंकर जयकिशन यांनी केला. प्रेमाच्या गाण्यांत अव्वल ठरणारं हे गाणं होतं, ‘प्यार हुआ इकरार हुआ है’.
याच वर्षी दिलीप कुमारनं आपणच हिंदी चित्रपटाचे शहेनशाह आहोत हे सिद्ध केलं. कारण त्याचे एक दोन नव्हे तर ‘आझाद’, ‘उडन खटोला’, ‘इन्सानियत’ आणि ‘देवदास’ असे चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. रफी-नौशाद या जोडीनं जशी लक्षात रहावी अशी गाणी दिलीपकुमार साठी दिली ती तशी इतरांना देता आली नाहीत. आझाद, इन्सानियत मध्ये लताला अतिशय गोड अशी गाणी सी.रामचंद्र यांनी दिली. देवदास मध्येही सचिनदांनी लता, गीताला गाणी दिली. पण नायक दिलीपकुमारला अशी गाणी मिळाली नाहीत. ती मिळाली नौशादच्या ‘उडन खटोला’ मध्ये. या वर्षी दिलीपकुमारचे गाजलेले गाणे होते रफीच्या आवाजातील ‘ओ दूर के मुसाफिर’.
देव आनंदचा ‘मुनिमजी’ याच वर्षीचा बॉक्स ऑफिस हिट. लताला भरपूर गाणी असलेल्या या चित्रपटात किशोर कुमारचे एकच गाणे होते आणि तेच गाणे नेमके बिनाकात हिट ठरले. देव आनंद किशोर च्या आवाजात आपले व्यक्तिमत्व पहात होता किंवा देव आनंदच्या व्यक्तिमत्वासाठी हाच आवाज शोभत होता. पूर्वीच्या ‘बाजी’, ‘जाल’ प्रमाणे याही गाण्याचे बोल साहिरचेच होते. हे गाणे होते ‘जीवन के सफर मे राही’.
पुढे 1956 ला देवआनंदचा ‘फंटूश’ प्रदर्शित झाला. हा पहिला चित्रपट आहे ज्यात देवआनंद साठीची सगळी गाणी एकट्या किशोरला मिळाली. ‘फंटूश’ साठीही साहिरनीच गाणी लिहीली होती. ‘ए मेरी टोपी पलट के आ’ सारखं बिनाका हिट गाणंही यातच आहे. तोपर्यंत कुठल्याच चित्रपटात किशोरकुमारवर इतका विश्वास संगीतकारांनी दाखवला नव्हता. किशोर स्वत:च्या चित्रपटांमध्येच मग्न असायचा. त्याला दुसर्यांसाठी गायला वेळच नव्हता. या काळात तर खुद्द अभिनेता किशोरवरची 13 गाणी अशी आहेत ज्यासाठी रफी, मन्ना डे, महेंद्र कपुर आणि चक्क शमशाद यांनी साठी आवाज दिला आहे.
किशोरच्या आवाजात आर्त गाणी शोभत नाहीत असा एक गैरसमज तयार झाला होता. पण सचिनदांनी या चित्रपटात ‘दुखी मन मेरे सुन मेरा केहना’ सारखं गाणं त्याच्याकडून गावून घेतलं आणि हा आरोप खोडून काढला. एरव्ही किशोर गायचा ते सैगलच्या प्रभावात. नसता ऑडलिंग करत मस्तीखोर आवाजात. पण मध्य प्रवाहात त्याचा आवाज वापरून त्याची क्षमता या चित्रपटात सिद्ध झाली. (हुस्नलाल भगतराम यांनी ‘काफिला’ (1952) मध्ये ‘वो मेरी तरफ यु चले आ रहे है’ आणि अनिल विश्वास यांनी ‘फरेब’ (1953) मध्ये ‘हुस्न भी है उदास उदास’ या गाण्यांमध्ये किशोरच्या आवाजाची ही ताकद सिद्ध केली होती. पण हे चित्रपट फारसे गाजले नाहीत. परिणामी ही गाणीही बाजूला पडली.)
राज कपुरचा ‘चोरी चोरी’ याच वर्षी आला. हा पहिलाच चित्रपट ज्यात राज कपुरसाठीची तिनही गाणी मन्नाडे नी गायली आणि तीही सगळी लता सोबतची प्रेमाची गीतं. ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’ आणि ‘ये रात भिगी भिगी’ तर बिनाकात हिट ठरली. लताची एकटीचे ‘पंछी बनू उडती फिरू’ पण बिनाकात हिट होते. याच चित्रपटातील कठपुतळ्यांच्या खेळातले ‘जहां मै जाती हूं’ तर आजही कठपुतळीचा खेळ करणारे आवर्जून वापरतात.
‘आवारा हूं’ किंवा ‘मेरा जुता है जपानी’ यांमुळे तयार होणार्या प्रतिमेसोबत ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या ‘श्री 420 मधील’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील गण्यांनी राज-नर्गिस जोडी तरूणांच्या हृदयात प्रेमाचे प्रतिक बनली.
1957 ला दिलीप कुमारचा ‘नया दौर’ अतिशय गाजला. यातील दिलीप कुमारची सगळीच गाणी रफीच्या आवाजात होती. नंतर परत कधी इतकी जास्त गाणी दिलीप कुमारला मिळाली नाहीत. हळूवार प्रेमाची गाणी दिलीपकुमारच्या वाट्याला फार थोडी आली. त्यात नया दौर मधील ‘मांग के साथ तुम्हारा’ चा क्रमांक सगळ्यात वरती लावावा लागेल. ‘उडी जब जब जुल्फे तेरी’ असो की ‘साथी हाथ बढाना’ असो. इतकंच काय पण देशप्रेमानं रंगलेलं ‘ये देश है वीर जवानों का’ सारखं गाणं असो. रफीच्या आवाजानं कमाल केली आहे. दिलीप कुमारची प्रतिमा प्रेमाचे प्रतिक म्हणून फारशी तयार झाली नाही. तरी नया दौर, गंगा जमुना, मधुमती आणि लीडर मुळे वैजयंतीमाला सोबत त्याची अशी प्रतिमा काहीशी तयार होवू शकली.
राज-नर्गिस नंतर देवआनंद-नुतन ही प्रेमाचे प्रतिक बनलेली अजून एक जोडी. या जोडीचा पहिला चित्रपट ‘पेईंग गेस्ट’ याच वर्षीचा. यातील सगळीच गाणी गाजली. देव आनंदसाठी किशोरचाच आवाज सचिदांनी यात सगळ्या गाण्यात वापरला आहे. ‘माना जनाब ने पुकारा नही’ अणि ‘हाय हाय हाय ये निगाहे’ सारखी नशिली गाणी किंवा आशा सोबतचे सदा बहार ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा’ आणि ‘ओ निगाहे मस्ताना’ पण यातीलच.
या वर्षी राजकपुरचा ‘शारदा’ प्रदर्शित झाली. पण त्यात राजकपुरसाठी कुठलंच विशेष गाणं नाही. यातलं गाजलेलं गाणं ‘ओ चांद जहां वो जाये’ लता-आशाच्या आवाजात आहे.
दिलीपकुमारचा दुसरा चित्रपट ‘मुसाफिर’ याच वर्षी आला पण त्यात त्याच्यासाठी गाणी नव्हती.
1958 हे वर्ष दिलीप कुमारसाठी मोठं गमतीचं. रफीचा/तलतचा आवाज त्याच्यासाठी पोषक ठरून गेलेला आणि या वर्षी त्याच्या गाजलेल्या दोन्ही चित्रपटात मुकेशची गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. ‘मधुमती’ मधील रफीच्या आवाजातील ‘टूटे हूये ख्वाबों ने’ पेक्षा मुकेशच्या आवाजातील ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’ आणि मुकेश-लताचे ‘दिल तडप तडप के कह रहा है’ जास्त पसंत केल्या गेलं. दुसरा चित्रपट होता शंकर जयकिशनच्या संगीतातला ‘यहूदी’ आणि त्यातलं गाणं गाजलं ते परत मुकेशच्या आवाजातलं ‘ये मेरा दिवानापन है’.
या वर्षी राज कपुरचा लाडका संगीतकार शंकर जयकिशन दिलीपकुमारच्या चित्रपटाला संगीत देत होता तर खुद्द राज कपुरसाठी खय्याम ‘फिर सुबह होगी’आणि दत्तराम ‘परवरीश’ यांनी बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिले. साहिरच्या लेखणीतून उतरलेलं अप्रतिम गाणं ‘वो सुबह कभी तो आयेगी’ आणि बिनाकात गाजलेलं ‘चिनो अरब हमारा’ ही दोन्ही गाणी मुकेशच्या आवाजात साकारली होती. ‘परवरीश’ मधील मुकेशचं सदाबहार ‘आंसू भरी है जीवन की राहे’ हसरतनी शब्दबद्ध केलं होतं.
देव आनंदचा ‘कालापानी’ याच वर्षी बॉक्स ऑफिस हिट ठरला. किशोर सोडून परत रफीचा आवाज यात सचिनदांनी वापरला आहे. ‘हम बेखुदी मे तूमको’ सारखं गाणं रफीच्या आवाजामूळेच जास्त परिणामकारक ठरलं इतकं की रसिकांनी इतर गाण्यांपेक्षा यालाच बिनाकात पसंती दिली. रफी-आशाचं मस्तीखोर ‘अच्छा जी मै हारी चलो मान जावो ना’ आणि ‘ओ छुपने वाले सामने आ’ यातीलच.
1958 ची कसर राज कपुरने 1959 च्या ‘अनाडी’ मधून भरून काढली. राज कपुरसाठी म्हणून खास रचल्या गेलेलं ‘सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी’ रसिकांना जास्त भावून गेलं. सदाबहार राज-मुकेश आयकॉनिक ‘किसी की मुस्कूहारटों पे हो निसार’ यातच आहे. मुकेशचा आवाज या चित्रपटात राज कपुरला इतका भावून गेला की ‘वो चांद खिला’ सारख्या लता सोबतच्या प्रेमाच्या गाण्यातही मन्नाडे ऐवजी त्याचाच वापर करण्यात आला. दुसरंही प्रेमाचं गाणं ‘दिल की नजर से’ लतासोबतचं मुकेशलाच मिळालं.
या दुसर्या टप्प्याचा शेवट होतो 1960 ला. दिलीप-देव-राज यांचे चार चित्रपट या वर्षी बॉक्स ऑफिस हिट झाले. दिलीपकुमारचा ‘मोगल-ए-आझम’ सगळ्यात गाजला. पण त्यात दिलीपकुमारला एकही गाणं नाही. हिंदी चित्रपटातील सगळ्यात सुंदर तरल प्रेम प्रसंग या चित्रपटात होता. सलीम अनारकलीला आपल्या महालात बोलावतो. बाहेर खुल्या अंगणात झाडाखाली चांदण्या रात्रीत तो तिच्या चेहर्यावरून पीस फिरवत आहे. या पार्श्वभूमीवर उस्ताद बडे गुलाम अलींची सोहनीतील बंदिश ‘प्रेम जोगन बन के’ वापरली आहे. बडे गुलाम अलींचा अफलातून लागलेला आवाज. रूढ अर्थानं हे काही गाणं नाही पण हा सर्वोत्तम सांगितिक तुकडा आहे.
पण याच वर्षीच्या दुसर्या चित्रपटात ‘कोहिनूर’ मध्ये मात्र दिलीपकुमारसाठी सात गाणी वापरत नौशाद यांनी सगळा अनुशेष भरून काढला आहे. यातलं ‘मधुबन मे राधिका’ तर अतिशय गाजलं. बिनाकातही ते हिट होतं. दुसरं लता सोबतचे ‘दो सितारों का जमी पर है मिलन’ अजरामर आहे.
नर्गिस शिवायचा राज कपुरचा गाजलेला चित्रपट म्हणजे या वर्षीचा ‘जिस देश मे गंगा बेहती है’. एक दोन नाही तर मुकेशची तब्बल चार सोलो गाणी यात आहेत. राज कपुरसाठी आयकॉनिक ठरणार्या गाण्यांच्या पंक्तितलं ‘होठों पे सच्चाई होती है’ किंवा ‘मेरा नाम राजू घराना अनाम’ यातलंच. राज कपुरच्या कँपमध्ये कधीच न आढळणारा गीता दत्तचा आवाजही याच चित्रपटातील ‘हम भी है तूम भी हो’ या कव्वालीत रसिकांना ऐकायला मिळाला.
किशोर सोडून देवआनंद या वर्षी परत रफीकडे वळला. सचिनदेव बर्मन आणि शैलेंद्र असं एक अतिशय वेगळंच रसायन आहे. याच रसायनाची जमलेली भट्टी म्हणजे या वर्षीचा ‘कालाबाजार’. रफीची एक दोन नाही तर चार चार गाणी त्यातही परत तीन सोलो यात आहेत. ‘खोया खोया चांद’ आणि ‘अपनी तो हर आह’ यांच्यावर तर रसिकांनी बिनाकात शिक्कामोर्तब करूनच ठेवलं. पण त्यासोबत रफी किशोर शिवाय फार कमी वेळा देवआनंद साठी गायलेल्या मन्नादांचं लतासोबतचं सुंदर गाणं ‘सांज ढली दिल की कली’ यात आहे. रफीसोबत लताचा बेबनाव झाल्यामुळे ‘रिझझिम के तराने लेके आयी बरसात’ मध्ये रफी सोबत गीताचा आवाज सचिनदांनी वापरला आहे. गीतानंही आपलीच निवड कशी योग्य होती हे सिद्धच करून दाखवलं आहे.
4.
1960 ला हिंदी गाण्यांच्या बहराचा दुसरा टप्पा संपतो आणि उताराला सुरवात होते. आश्चर्य म्हणजे दिलीप-देव-राज यांचाही उतरणीचा काळ सुरू होतो. अपवाद काहीसा फक्त देवआनंद. यानंतर त्याचे ‘हम दोनो’ (1961), ‘जब प्यार किसीसे होता है’ (1961), ‘असली नकली’ (1962), ‘तेरे घर के सामने’ (1963) आणि ‘गाईड’ (1965) हे हिट चित्रपट आले. दिलीप कुमारचा केवळ ‘गंगा जमुना’ (1961) हा आणि राज कपुरचा ‘संगम’ (1964) असे एक एकच चित्रपट आले.
आता जमाना राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, विश्वजीत, जॉय मुखर्जी, धर्मेंद्र यांचा सुरू झाला होता. मधुबाला, मीनाकुमारी, नलिनी जयवंत, गीता बाली, कल्पना कार्तिक, निम्मी, बिना रॉय, नर्गिस, वैजयंती माला यांची जागा साधना, आशा पारेख, माला सिन्हा, वहिदा रेहमान, नंदा, सायरा बानो यांनी घेतली होती. शंकर जयकिशनचा थोडा अपवाद वगळता इतर संगीतकारही मागे पडत चालले होते. आता लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राहूल देव बर्मन यांनी हिंदी गाण्यांचा पट व्यापून टाकला होता.
1966 ला राहूल देव बर्मनचा तिसरी मंझिल आला. त्यातून नव्या संगीताची रसिकांच्या नव्या आवडीची चाहूल स्पष्ट झाली. ‘घिर आयी घर आजा’ (छोटे नवाब-1963) सारखं शास्त्रीय संगीतावर आधरलेलं गाणं देत सचिनदांचा वारसा सिद्ध करणारा आर.डी. आता ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ म्हणायला लागला तेंव्हा जून्या गाण्यांच्या दर्दी रसिकांना पूरतं कळून चुकलं की हे ‘आजा आजा’ आपल्यासाठी नाही. हा दुसर्याच कुण्या लोकांचा ‘प्यार’ आहे.
1949 ते 1966 या हिंदी गाण्यांच्या सुवर्ण काळात दिलीप देव राज यांचे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट
दिलीप कुमार - (1949- अंदाज), (1950- बाबूल,आरजू), (1951-दीदार), (1952-आन,दाग, संगदिल), (1953-फुटपाथ, शिकस्त), (1954-अमर), (1955-देवदास,उडन खटोला, आझाद, इन्सानियत), (1957-नया दौर, मुसाफिर), (1958-मधुमती, यहूदी), (1960- कोहिनूर, मोगल-ए-आझम), (1961-गंगा जमुना)
देव आनंद - (1951-बाजी), (1952-जाल), (1953-हमसफर, राही), (1954-टॅक्सी ड्रायव्हर), (1955-मुनिमजी, इन्सानियत), (1956-फंटूश, सी.आय.डि.), (1957-पेईंग गेस्ट), (1958-कालापानी), (1960- काला बाजार), (1961-हमदोनो, जब प्यार किसीसे होता है), (1962-असली नकली), (1963-तेरे घर के सामने), (1965-गाईड)
राज कपुर - (1949- अंदाज, बरसात), (1950- सरगम), (1951-आवारा), (1953-आह), (1955-श्री 420), (1956-चोरी चोरी), (1957-शारदा), (1958-परवरीश, फिर सुबह होगी), (1959-अनाडी), (1960- जिस देश मे गंगा बेहती है), (1964-संगम)
-आफताब परभनवी.
No comments:
Post a Comment