अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 4 मार्च 2017
तो कधीही खुप लोकप्रिय असा गायक नव्हता. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धो धो पैसे कमावले नाहीत. त्याची गाणी अंताक्षरी खेळताना आठवत नाहीत. त्याच्यासाठी संगीतकार अडून बसले, नायक त्याचा आवाज हवा म्हणून हट्ट करून बसले असंही कधी घडलं नाही. सहज ओठांवर त्याची गाणी येत नाहीत. पण एखाद्या सायंकाळी दाटत जाणार्या अंधारासोबतच व्यक्त करावं पण व्यक्त करता येवू नये असं काही तरी काळजात दाटत जातं आणि आपल्याही नकळत त्याच्या गाण्याचे सुर आपल्या मनात भरून राहतात,
शाम-ए-गम की कसम
आज गमगीन है हम
आ भी जा आ भी जा आज मेरे सनम
आणि मग मात्र काहीच दुसरं सुचत नाही. एका मागोमाग एक त्याची गाणी आठवत जातात. आपल्याही नकळत आपल्या मनाच्या तळाशी ती साठलेली असतात. सगळा तळ ढवळला जातो आणि मग पुढे बराचवेळ त्याचा आवाज आपली सगळी समज ताब्यात घेवून टाकतो. मग दुसरं काहीच ऐकायची मनस्थिती शिल्लक राहत नाहीत. फार तर त्याच्या सोबत अप्रतिम अशी लता आपण ऐकू शकतो. दुसरं काहीच नाही.
हे असं घडत जातं तलत मेहमुदच्या गाण्याबाबत. माधव मोहोळकरांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकांत तलतबाबत फार उत्कटतेनं लिहिलं आहे. विशेषत: त्याच्या आवाजाचा पोत स्पष्ट करताना, ‘कंप आणि थरथर यातील फरक असा आहे की कंप हा दोष आहे तर थरथर हे मात्र वैशिष्ट्य ठरतं.’ थरथरता आवाज हेच तलतचं बलस्थान ठरलं. ज्या संगीतकारांनी हे ओळखलं त्यांनी याचा अतिशय चपखल वापर आपल्या गाण्यांमध्ये करून घेतला.
दोनच भावना प्रामुख्याने तलतच्या आवाजातून जास्त परिणामकारकतेने प्रगट होतात. एक प्रेमातलं दु:ख आणि तेही परत कुठेही आक्रस्ताळं नसलेलं. आणि दुसरं म्हणजे निखळ अशी प्रेमाची कबुली परत तीही अतिरेकी आनंदाने व्यक्त न होणारी. दोन्हीकडेही एक शांत मध्यम सुर लागलेला असतो.
तलतच्या अगदी सुरवातीच्या काळातला बाबूल (1950) हा बॉक्स ऑफिसवर हिट झालेला चित्रपट. त्यात शमशाद सोबतचे त्याचे गाणे ‘मिलतेही आंखे दिल हुआ दिवाना किसीका, अफसाना मेरा बन गया, अफसाना किसीका’ गाजले. पण शमशाद सोबत तलतचे सुर जूळत नाहीत हे स्पष्टपणे जाणवतं. याच वर्षी नुकत्याच गाजू लागलेल्या राज कपुर- नर्गिस च्या ‘जान पेहचान’ मध्ये तलतचे गीता दत्त सोबत गाणे आहे ‘आरमान भरी दिल की लगन तेरे लिये है’ पण तेही आज विशेष वाटत नाही. पण याच वर्षी ‘अनमोल रतन’ मध्ये गुणी संगीतकार विनोद ने तलत-लता च्या आवाजात ‘शिकवा तेरा मै गाऊ दिल मे समाने वाले, भूलेसे याद करले ओ भूल जानेवाले’ हे गाणं दिलं. आणि तलतच्या आवाजाला केवळ लताचाच आवाज जूळतो हे समिकरण सिद्ध करून दाखवलं. पुढे बहुतांश संगीतकारांनी ही जोडी यशस्वीरित्या वापरली.
प्रेमात विफल झालेला किंवा जगापासून दूर जावू पाहणारा नायक, त्याचं दु:ख व्यक्त करण्यासाठी पडद्यावर दिलीपकुमारने रंगवला, त्याची ही प्रतिमा तयार करण्यात तलतच्या आवाजाचा मोठा वाटा आहे.
‘आरजू’ (1950) या तेंव्हाच्या यशस्वी चित्रपटात अनिल विश्वास यांनी तलतच्या आवाजात ‘ए दिल मुझे ऐसी जगा ले चल’ गावून घेतलं. गाणं तर लोकप्रिय झालंच पण दिलीप कुमारची ‘ट्रॅजेडी किंग’ ही प्रतिमा ठसली गेली.
‘दाग’ (1952) मध्य ‘ए मेरे दिल कही और चल’ (संगीत े शंकर जयकिशन) पडद्यावर आलं आणि दिलीपकुमारच्या या प्रतिमेवर शिक्कामोर्तबच झालं. प्रेमभंग झालेला नायक म्हणजे तलतचाच आवाज हेच पक्कं झालं.
तलतचं सगळ्यात गाजलेलं गाणं ‘शाम-ए-गम की कसम’ 1953 च्या फुटपाथ मधलं आहे. तेंव्हा नुकत्याच सुरू झालेल्या बिनाका गीतमाला मध्येही हे गाणं हिट ठरलं. दिलीपकुमारच याही चित्रपटाचा नायक होता. संगीत मात्र आता खय्याम यांचं होतं. पहिल्या दोन चार वर्षांतच तलतबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली संगीतकार कुणीही असो (अनिल विश्वास, शंकर जयकिशन, खय्याम) त्याची म्हणून एक शैली तयार झाली ती बदलता येत नाही. किंवा उलटही असेल की तलतच्या या शैलीच्या मोहातच संगीतकार पडत गेले. अगदी पुढे ओ.पी.नय्यर सारखा पंजाबी ठेकावाला संगीतकारही तलतसाठी ‘प्यार पर बस तो नही मेरा लेकिन, तु बात दे के तूझे प्यार करू या ना करू’ (सोने की चिडीया, 1958) सारख्या साहिरच्या शब्दांना नाजूक चाल देतो आणि तलतही त्याचं सोनं करतो.
‘फुटपाथ’ मध्येच एक गाणं प्रेमलतासोबत खय्यामने संगीतबद्ध केलं आहे. दु:खाच्या आर्तस्वरांसोबतच तलतच्या आवाजात प्रेमाची अस्फुट भावना आनंदी सुरावटीत शोभून दिसते हे ओळखून ‘पवन चले’ सारखं आनंदी गाणं दिलं. पण ‘शाम-ए-गम’च्या प्रचंड प्रभावात ते झाकोळून गेलं.
खरं तर याही आधी ‘सीने मे सुलगते है आरमां’ (तराना, 1951) या लतासोबतच्या गाण्यानं तलतच्या आवाजात प्रेमाची भावना सुंदर फुलते हे समोर आलं होतं. दु:खी गाण्यांसारखंच तलतचा हा सुरही सर्व संगीतकारांपाशी असाच लागतो. ‘समाके दिल मे हमारे’ (अनहोनी-रोशन), ‘दिल मे समा गये सजन’ (संगदिल-सज्ज्जाद), अपनी कहो कुछ मेरी सुनो (परछाई-सी.रामचंद्र), ‘जब जब फुल खिले’ (शिकस्त- शंकर जयकिशन) ही याच काळातली काही उदाहरणं.
गझल हा तर तलतचा खास प्रांत. तलत हा गकमेव पार्श्वगायक असा आहे की ज्याच्या गैरफिल्मी रेकॉर्ड अतिशय लोकप्रिय झाल्या आणि मग तो हिंदी चित्रपटात गायक म्हणून आला. त्याच्याासरखी गैरफिल्मी गीतांना लोकप्रियता तेंव्हा कुणाही दुसर्या गायक गायिकेला मिळाली नव्हती. या गाण्यांमध्ये गझला जास्त होत्या.
स्वाभाविकच 1954 मध्ये सुरैय्या-प्रदीप कुमार यांचा ‘मिर्झा गालिब’ पडद्यावर आला तेंव्हा त्यात तलतचा आवाज होता. गालिबच्या गझलांना बर्याचजणांनी पुढे सुंदर चाली दिल्या. त्यांना लोकप्रियताही लाभली. पण ‘मिर्झा गालिब’ मधील सुरैय्या-तलतच्या
दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है,
आखिर इस दर्द की दवा क्या है’
गझलेची मोहिनी काही कमी होत नाही.
तलतच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश लाभलं नाही. 1955 ला ‘बारादरी’ पडद्यावर आला. शौकत देहलवी नाशाद (नौशाद नाही, बर्याच ठिकाणी ही गल्लत होते) याने तलतच्या आवाजात ‘तस्वीर बनाता हू, तस्वीर नही बनती’ हे गाणे गावून घेतले. त्याला लोकप्रियताही लाभली. चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला. पण त्यानंतर मात्र तलतचा उतरता काळ सुरू झाला.
पुढे वसंत देसाईच्या ‘मौसी’ मधलं लता-तलतचे अप्रतिम प्रेमगीत ‘टिम टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ बिनाकात हिट झालं. ओ.पी.नय्यरच्या ‘सोने की चिडीया’ मधील ‘प्यार पर बस तो नही है मेरा लेकीन’ हेही बिनाकात गाजलं. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला.
एस.डी.बर्मन यांचा ‘सुजाता’ हा गाजलेला चित्रपट. यातील ‘जलते है जिसके लिये, तेरी आंखो के दिये, धुंड लाया हू वोही गीत मै तेरे लिये’ हे तलतचे गाणे बिनाकातही हिट ठरले. हे जवळपास तलतसाठी शेवटचे यशस्वी गाणे सिद्ध झाले. खरं तर नंतरही कितीतरी सुंदर गाणी तलतची आली. सलिल चौधरीचे सदाबहार ‘अहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’ हे 1960 ला आलेले गाणे तलत-लताच्या सर्वोत्कृष्ठ गाण्यापैकी एक आहे.
1964 ला मदन मोहनचा ‘जहांआरा’ पडद्यावर आला. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी तलतचे ‘शाम-ए-गम की कसम’ आलं होतं. त्याची आठवण म्हणून असावं मदन मोहनला
फिर वोही शाम, वोही गम, वोही तनहाई है
दिल को समझाने तेरी याद चली आयी है’
ची चाल सुचली. राजेंद्रकृष्ण नी तसे सुंदर शब्द लिहून दिले. आणि परत तलतप्रेमींना एक त्यांच्या आवडत्या तलतशैलीतलं गाणं भेटलं.
पिळवटून टाकणारं पण व्यक्त न करता येणारं दु:ख किंवा प्रेमाची अस्फुट गोड भावना जी अर्धवट शब्दांत मांडली जाते. किंवा जिथे शब्दच अपुरे पडतात. अशा दोनच भावनांना तलतच्या गाण्यात ठळक जागा मिळाली. इतर भावभावना त्यात व्यक्त होताना परिणाम साधत नाहीत. हेच त्याचं बलस्थानही असावं.
जेमतेम सव्वाचारशे चित्रपट गीतं, दोनशेच्या जवळपास गैरफिल्मी गझला गीतं आणि शंभराच्या आसपास आकाशवाणी आणि इतरत्र गायलेली गीतं इतकीच जायदाद मागे ठेवून गेला तलत.
‘रूप की रानी चोरों का राजा’ (1962) मध्ये देखणा देवआनंद वहिदासाठी तलतच्या सुरात गातो
तूम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर
चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर
तूमको निंद आयेगी तूम तो सो ही जाओगे
किसका ले लिया है दिल ये भी भूल जाओगे
शैलेंद्रकडून शकर जयकिशनने देवआनंदची प्रतिमा ओळखून हे खट्याळ शब्दांत लिहून घेतलं. तशी गोड चालही दिली. पण आज तलतच्या चाहत्यांना याच ओळी तलतसाठी आठवतात. 24 फेब्रुवारी 1924 ला जन्मलेला आणि 9 मे 1998 ला या पृथ्वीवरून निघून गेलेला तलत नावाचा तारा त्याच्या चाहत्यांना सदैव स्मरणात राहिन.
-आफताब परभनवी
No comments:
Post a Comment