अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 25 मार्च 2017
गीता दत्तचा अगदी सुरवातीचा कोवळा आवाज. तरूणपणीची देखणी मीनाकुमारी. गीताचे बोल आहेत
‘मेने नैनों मे प्रीत, मेरे होठों पे गीत,
मेरे सपनों मे तुम हो समाये
आज मन की कली फुल बनके खिली
चांदनी जैसे चंदासे हसकर मिली
बजी मुरली मोहन लगी मन मे लगन
मेरी आशा ने दीप जलाऐ’
गाण्याची चाल अतिशय मधुर. पण सगळा घोटाळा होतो तो चित्रपटाचे नाव ऐकले की. चित्रपटाचे नाव आहे ‘श्री गणेश महिमा’ (1950). बस्स मग पुढचे काहीच ऐकून न घेता रसिक पाठ फिरवतो. एस.एन.त्रिपाठी सारख्या गुणी संगीतकाराचे हे दुर्दैव. पौराणिक चित्रपटाचा शिक्का एस.एन.त्रिपाठी यांच्यावर एकदाचा पडला आणि त्यांची प्रतिभा काहीशी उपेक्षिल्या गेली.
वाराणसीत 14 मार्च 1913 ला जन्मलेल्या श्रीनाथ त्रिपाठी यांचे नशिब पौराणिक चित्रपटांशी असे काही जोडल्या गेले की त्यांना प्रचंड काम मिळाले पण सोबतच मुख्य धारेतल्या संगीतापासून ते दूर फेकल्या गेले. पंच्याहत्तर वर्षे जगलेल्या त्रिपाठींनी जवळपास तेवढ्याच चित्रपटांना (79) संगीत दिले. फक्त संगीत दिले इतकेच नाही तर 27 चित्रपटांमधून अभिनय केला, 18 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यामुळेही असावे कदाचित त्रिपाठी यांची संगीतकार म्हणून प्रतिमा रसिकांच्या मनात ठसली नाही.
पण त्रिपाठी यांच्यातील संगीतगुणांची एका मोठ्या व्यक्तीने खुलेपणाने तारीफ करून त्यांच्यावरील हा अन्याय दूर करण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. महान संगीतकार गायक उस्ताद अमीर खांन यांनी हिंदी चित्रपट संगीतातील केवळ चारच संगीतकारांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यानी नौशाद आणि वसंत देसाई यांची नावं घेणं स्वाभाविकच होतं. कारण यांना शास्त्रीय संगीताची बारीक जाण होती. एका मर्यादेपर्यंत सी.रामचंद्र यांनाही त्यांनी गौरविलं. पण चौथं नाव त्यांनी एस.एन.त्रिपाठी यांचं घेतलं. ही बाब त्रिपाठींसाठी निश्चितच समाधान देणारी होती.
त्रिपाठी यांच्या संगेताचा विचार करताना चार महत्वाच्या चित्रपटांमधील गाण्याचा विचार करावा लागेल
1941 पासून संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणार्या त्रिपाठी यांना व्यावसायिक यश आणि लोकप्रियता मिळायला तब्बल 16 वर्षे लागली. ‘जनम जनम के फेरे’ (1957) या चित्रपटात रफी आणि लताच्या गोड आवाजात ‘जरा सामने तो आवो छलिये, छुप छुपके चलने मे क्या राज है, ये छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है’ हे गाणं झळकलं. आणि बघता बघता त्याला लोकांनी उचलून धरलं. बिनाकात हे गाणं त्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आलं. या चित्रपटातील इतरही गाणी मधुर होती. मन्ना डेच्या आवाजात ‘तन के तंबोरे मे सासों की तार बोले जय राधेश्याम’ हे गाणं जे की पुढे अनुप जलोटानेही गायले याच चित्रपटात आहे. या भजनाची चालही गोड आहे.
दूसरा चित्रपट ज्याने त्रिपाठींना यश मिळवून दिले तो म्हणजे ‘रानी रूपमती’ (1959). यातील मुकेशचे ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है’ बिनाकात सहाव्या क्रमांकावर होते. रानी रूपमती च्या निमित्ताने अजून एक गोष्ट घडली. बॉक्सऑफिसवर हिट ठरलेला त्रिपाठींचा हा पहिलाच चित्रपट. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांचेच होते. हे यशच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीतील अडथळा बनले. कारण पुढे त्यांना दिग्दर्शनासाठी भरमसाठ पौराणिक चित्रपट मिळत गेले. परिणामी संगीतावर परिणाम झालाच.
‘रानी रूपमती’ मधील एक निसर्ग गीत अगदी अप्रतिम आहे. ‘फुल बगिया मे बुलबुल बोले, डालपे बोले कोयलिया, प्यार करो रूत प्यार की आयी, भवरें से कहती है कलिया’ या भरत व्यासांच्या शब्दांना लता-रफीच्या आवाजाने अजूनच रंग चढला आहे.
तिसरा चित्रपट ज्याला व्यावसायिक यश मिळालं तो म्हणजे ‘संगीत सम्राट तानसेन’ (1962). यातील मुकेशचे गाणं ‘झुमती चली हवा, याद आ गया कोई’ विशेष गाजलं. या सगळ्या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा अप्रतिम असा स्पर्श त्रिपाठी यांनी दिला होता. अर्थात ती विषयाची गरज होतीच. ‘झुमती चली हवा’ राग सोहनी वर बेतलेलं होतं. त्रिपाठी यांची ताकद म्हणजे 1960 ला प्रदर्शित झालेल्या ‘मोगल-ए-आझम’ मध्ये सोहनीचीच बंदिश ‘प्रेम जोगन बन के’ उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्या आवाजात नौशाद यांनी वापरली होती. प्रेमासाठी वापरलेला हा राग मुकेशच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्यासाठी त्रिपाठी यांनी वापरला. रागदारीचा कल्पक वापर त्रिपाठी यांनी केला आणि त्याला रसिकांनीही प्रतिसाद दिला.
त्रिपाठी यांचा अजून एक चित्रपट विशेष उल्लेख करावा असा आहे. पौराणिकतेचा शिक्का असतानाही त्यांनी लाल किला (1961) नावाचा चित्रपट केला. त्यातील बहादूरशहा जफरची प्रसिद्ध रचना ‘न किसी की आंख का नूर हू’ रफी कडून गावून घेतली. यात वाद्यांचा वापर जवळपास नाहीच. ही नज्म आहे. पण बर्याच ठिकाणी चुकून गझल असाच उल्लेख केला जातो. याच चित्रपटात बहादूरशहा जफर ची दुसरी रचना ‘लगता नही दिल मेरा उजडे दयार मे’ रफीच्याच आवाजात आहे. ही जफरची सुंदर गझल आहे.
लगता नही दिल मेरा उजडे दयार मे
किसी की बनी है आलम-ए-ना-पायेदार मे
कह दो इन हसरतों से कही और जा बसे
इतनी जगह कहां है दिल-ए-दागदार मे
याच गझलेत तो सुप्रसिद्ध शेर आहे ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो.
उम्रे दाराज से मांग के लाये थे चार दिन
दो आरजू मे कट गये दो इंतजार मे
(याच ओळींवर पुढे प्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे यांनी कविता लिहीली होती ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले, हिशोब करतोय किती राहिलेत डोईवरती उन्हाळे’.)
जफरला ब्रह्मदेशात नजरकैदेत ठेवले गेले होते. परिणामी त्याला माहित होतं की तो आता परत हिंदुस्थानात येऊ शकत नाही. तेंव्हा जफरने लिहीलं होतं
कितना है बदनसीब जफर दफन के लिए
दो गज जमि भी न मिली कु-ए-यार मे
त्रिपाठी यांची इतर गाणी आज फारशी ऐकायला मिळत नाहीत. मराठी रसिकांसाठी त्रिपाठी यांच्याबाबतचा एक छोटा संदर्भ. काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेल्या मराठी गायिका कृष्णा कल्ले यांचं एक गीत ‘तूने मुस्कुराके देखा’ हे ‘शंकर खान’ (1966) चित्रपटात रफीसोबत त्यांनी दिलं आहे. पण ते फार विशेष नाही.
28 मार्च 1988 ला त्रिपाठी यांचं निधन झालं. पंच्याहत्तर वर्षांचा आयुष्य त्यांना लाभलं. ‘मी माझ्या कैफात नांदतो ऐश्वर्याचा राजा’ असं त्यांनी आपल्या पौराणिक चित्रपटाच्या क्षेत्रात धुंदीत आयुष्य घालवलं. आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचा कधी फारसा उल्लेख केला नाही. हे त्यांच्या मनाचं मोठेपणच म्हणावं लागेल.
-आफताब परभनवी.
No comments:
Post a Comment