Saturday 18 March 2017

साहिर-चोप्रा-रवी एक मधुर त्रिवेणी



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 18 मार्च 2017

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुककिन
उसे इक खुपसूरत मोड देकर छोडना अच्छा...

हा अतिशय गाजलेला शेर. साहिरची यावर मुद्रा उमटलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या काव्य प्रतिभेमुळे साहिर हिंदी गीतात उठून दिसतोच. त्यातील कवी गीतकाराला मागे टाकून पुढे निघून जातो (हेच शैलेंद्रच्या बाबत उलटं आहे). पण या गाण्याशी अजून दोन नावं जूळलेली आहेत. एक आहे संगीतकार रवी आणि दुसरं नाव म्हणजे निर्माते दिग्दर्शक बी.आर.चोप्रा. त्यांनी सुरवातीच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांत गीतकार म्हणून साहिरलाच घेतलं. साहिरच्या मृत्यूनंतरच ही संगत तुटली. संगीतकार बदलले पण गीतकार नाही. यावरील एक किस्सा माधव मोहोळकरांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकात लिहून ठेवलाय. चोप्रांना वाटलं आपण संगीतकार शंकर जयकिशनला एखाद्या चित्रपटात संगीतासाठी बोलावावं. तशी बोलणीही झाली. पण गाडी अडून बसली गीतकारावर. चोप्रा साहिरसाठी आग्रही तर शंकर जयकिशन शैलेंद्र-हसरतला सोडायला तयार नाही. शेवटी शंकर जयकिशनने चित्रपट सोडला. आणि चोप्रांनीही दुसरे संगीतकार निवडला. इतकं त्यांचं साहिरवर प्रेम होतं.

साहिरला आपल्या प्रतिभेबद्दल रास्त अभिमान होता. गायक संगीतकारांपेक्षाही तो स्वत:ला श्रेष्ठ समजायचा. परिणामी गुरूदत्तचा अतिशय गाजलेला ‘प्यासा’ (संगीत एस.डी.बर्मन) असो की बी.आर.चोप्रांचाच ‘नया दौर’ (संगीतकार ओ.पी.नय्यर) त्या संगीतकारांशी त्याचं परत कधीच जमलं नाही. 

शिवाय चोप्रांच्याही भलत्याच अटी. लता मंगेशकर, मोहम्मद रफीला जास्त महत्व देण्यास चोप्रा तयार नसायचे. पण रवीनं मात्र जूळवून घेतलं. या त्रिकुटानं (साहिर-रवी-चोप्रा) गुमराह (1963), वक्त (1965), हमराज (1967), आदमी और इन्सान (1970) आणि धुंद (1973) असे  तब्बल 5 चित्रपट दिले.

योगायोगानं या तिघांचे जन्मदिवस जवळपासचेच (साहिर- 8 मार्च, रवी- 3 मार्च, चोप्रा 22 एप्रिल). शिवाय रवीचा स्मृतीदिनही याच महिन्यातला (7 मार्च).

यातील पहिल्या तीन चित्रपटांचाच विचार करता येवू शकतो. कारण पुढे आहे तेच वळण तोच साचा रवीने गिरवला. नवीन काही निर्माण झाले नाही. 

‘गुमराही’, ‘वक्त’ आणि ‘हमराज’ या तिनही चित्रपटांत अजून एक बाब समान होती. आणि ती म्हणजे अभिनेता सुनील दत्त. महेंद्र कपुरचा आवाज त्याला असा काही चिकटला की याशिवाय त्याचा विचारच करता येवू नये. मराठी रसिकांची एक मोठी अडचण म्हणहे महेंद्र कपुर म्हटला की दादा कोंडके आणि ‘वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं’ हेच आमच्या कानात बसलं आहे. तेंव्हा स्वाभाविकच महेंद्रकपुरचा आवाज ऐकताना मन मोकळं स्वच्छ राहत नाही. 

‘गुमराह’ मधील ‘चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ या गाण्यानं या त्रिकुटाची किंवा अजूनच म्हणायचे तर सुनील दत्त व महेंद्र कपुर सगट विचार केला तर पंचतत्वाची मुहूर्तमेढ रोवली. गाणं फिल्मफेअर पुरस्कार विजेतं ठरलं. बिनाकातही हिट ठरलं. पण तरी जाणवत राहतं की यात साहिरचं श्रेय जास्त आहे. ओ.पी.नय्यर, एस.डी.बर्मन, रोशन अगदी मदनमोहन (कमी गाणी असली तरी) यांचं संगीत आणि साहिरचे शब्द तुल्यबळ वाटतात तसं रवीच्या बाबतीत घडत नाही. साहिरचाच वरचष्मा जाणवत राहतो. शिवाय महेंद्र कपुरचा आवाज. त्याला प्रचंड मर्यादा आहेत. रफीला डोळ्या समोर ठेवूनच चाली रचल्या गेल्या. आणि मग जेंव्हा रफी नको/ उपलब्ध नाही तेंव्हा महेंद्र कपुर वापरला गेला. 

याच वर्षी रोशनच्या संगीतानं नटलेलं ‘ताजमहाल’ हा चित्रपट आला. यातही साहिरचीच गीतं आहे. रफी लताचं ‘जो वादा किया वो’ किंवा ‘पाव छूने दो’ असा किंवा एकट्या लताचं ‘जुर्म उल्फतपे हमे लोग सजा देते है’ असो याला टक्कर देत रवीची गाणी बिनाकात टिकली. या शिवाय गुमराह मधील ‘इन हवाओ मे इन फिजाओं मे’ हे गाणंही बीनाकात हिट होतं. ‘आप आये तो खयाले दिले नाशाद आया’ हे महेंद्र कपुरचे गाणे आजही ऐकावेसे वाटते.

दुसरा चित्रपट होता ‘वक्त’. या चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं आहे. मल्टीस्टार असा हा पहिलाच चित्रपट म्हणून सतत सांगितलं/लिहिलं गेलं आहे. पण याच्या गाण्यांवर स्वतंत्र काही कुणी लिहिलं नाही. संगीतकार रवीवर मात करणारा गीतकार साहिर याचा सगळ्यात मोठा पुरावा याच चित्रपटात आहे. यात निव्वळ एक कविता किमान वाद्यांचा (जवळपास नाहीच) वापर करत महेंद्र कपुर-आशा भोसलेच्या आवाजात गाणं म्हणून समोर आली आहे. विशेष म्हणजे बीनाकाच्या त्या वर्षीच्या हिट गाण्यात हे आहे.

मैने देखा है फुलों से लदी शाखो मे
तूम लचकती हुई मेरे करीब आयी हो 
जैसे मुद्दते यु ही साथ रहा हो अपना
जैसे अबकी नही सदियों की शनासाई हो
(नेटवर चुकून शनासाई हा शब्द शहनाई पडला आहे. आता कुठे शहनाई आणि कुठे शनासाई. शनासाई म्हणजे परिचित. पण इतका बारकावा शोधत बसायला कुणाला वेळ आहे.)

साहिरच्या या शब्दांना रवीने जशाला तसेच ठेवले आहे. चाल देण्याचा कुठलाच प्रयत्न केला नाही. आशा भोसलेच्या आवाजातील पुढच्या ओळी तर अजूनच काव्यात्मक आहेत.

मैने देखा है के गाते हुये झरनों के करीब
अपनी बेताब-ए-जजबात कही है तूमने
कांपते होठों पे रूकती हुई आवाज के साथ
जो मेरे दिल मे थी वो बात कही है तूमने
हे गाणं ऐकलं की सहजच लक्षात येतं की रसिकांनी पसंती दिली आहे ती पहिले काव्यालाच.  
वक्तमधील इतर गाणी तर सुंदर आहेतच ‘ए मेरे जोहराजुबी’ (मन्ना डे), ‘आगे भी जाने न दू’ (आशा), ‘दिन है बहार के’ (आशा/महेंद्र). यातील रफीचे एकमेव गाणे जे की बीनाकात हिट झाले होते, ‘वक्त से दिन और रात’ जे की चित्रपटाचे शीर्षक गीतही होते. रफीचा आवाज ऐकताना लक्षात येत राहतं की महेंद्र कपुरच्या आवाजात आपण काय काय ‘मिस’ करतोय. 

या त्रिकुटाचा तिसरा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘हमराज’. यातील दोन गाण्यांनी निव्वळ हवाच करून टाकली. महेेंद्र कपुरचे जवळपास सर्वोत्कृष्ठ ठरावे असे गाणे ‘नीले गगन के तले, धरती का प्यार पले’ यातीलच. 1968 च्या बिनाकात ‘शागिर्द’ मधील लताचे ‘दिल वील प्यार फ्यार’ पहिल्या क्रमांकावर होतं आणि किशोर कुमारचे ‘पडोसन’ मधील ‘मेरे सामने वाली खिडकी मे’ दुसर्‍या क्रमांकावर होतं. मजरूह आणि राजेंद्रकृष्ण सारख्या तगड्या गीतकारांना टक्कर देत तिसर्‍या क्रमांकावर असलेलं साहिरचे ‘ओऽऽ नीले गगन के तले’ काव्याच्या दृष्टीने खरंच उजवं होतं. अगदी पहिल्या क्रमांकावर यावं इतकं. याच वर्षी याच चित्रपटातील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ बिनाकाच्या 19 व्या क्रमांकावर होतं. 

महेंद्रकपुरचं अजून एक गाणंही आजही लोकप्रिय आहे. ते म्हणजे ‘ना मु छुपाके जिओ, और ना सर झुकाके जिओ’ इतकं यश महेंद्र कपुरला नंतर कुठल्याच चित्रपटात मिळालं नाही. नाही त्याला इतकी एकल गाणी भेटली! आशा भोसलेचे एकच गाणे आणि तेही महेंद्र सोबत (तू हूस्न है, मै इश्क हू) यात आहे. जे फार विशेष नाही. लक्षातही रहात नाही.   

पुढे देशभक्तीपर गीतांसाठी महेंद्र कपुरचा वापर मनोज कुमार सारख्यांनी सढळ हाताने करून घेतला. किंबहुना महेंद्र कपुरचा गळा संगीतकारांनी अशा गीतांसाठी सढळपणे वापरू दिला. मेरे देश की धरती हे त्याचे सगळ्यात ठळक उदाहरण. याचं कारणही आहे. भावनेचे बारकावे, नाजुकता, हरकती महेंद्र कपुरच्या आवाजात स्पष्टपणे येत नाही. महेंद्र कपुरची अडचण म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष रफी या काळात भरात होता. तेंव्हा रफीची छाया किती चालणार?

याच काळात (1963 ते 1967) साहिर इतरही संगीतकारांसोबत अप्रतिम गीतं देतच होता. रोशन (ताजमहाल- जो वादा किया हो), सी.रामचंद्र (बहुरानी- उम्र हुई तुमसे मिले), जयदेव (मुझे जीने दो-रात भी है कुछ भीगी भीगी),   रोशन (दिल ही तो है-लागा चुनरी मे दाग), रोशन (चित्रलेखा- मन रे तु काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो), एन.दत्ता (चांदी कि दिवार- अश्कों ने जो पाया है), मदनमोहन (गझल-रंग और नुर की बारात), खय्याम (शगुन- तुम अपना रंजो गम, पर्वतों के पेडां पर). साहिर-रोशन हे नातं जास्तच अप्रतिम रित्या जुळलेलं याच काळात दिसून येतं. इतकंच काय पण रवीसाठी साहिरने चोप्राच्या चित्रपटांशिवाय हिट गाणीही याच काळात दिली आहेत. ‘ये वादीया ये फिजाये’ (आज और कल), ‘छू लेने दो नाजूक होठों को’ (काजल), ‘जिओ ऐसे जिओ’ (बहुबेटी) ही गाणी बिनाकात हिटही झाली. 

पुढे 1970 ला आलेल्या आदमी और इन्सान मधील आशाचे ‘जिंदगी इत्तेफाक है’,  ‘आगे भी जाने न दू’ की आठवण करून देतं. आशा-महेंद्रच्या ‘ओ नीले पर्बतों की धारा’ वर ‘नीले गगन के तले’ची सावली दिसते. 1973 च्या धुंद मधील ‘उलझन सुलझे ना’ कारण नसताना वक्तमधील ‘कौन आया के निगाहों मे चमक’ चा भास देतं. 

पण असं असतानाही साहिर-चोप्रा-रवी या त्रिकोणात काहीतरी वेगळं आहे. त्यांचं गाणं लगेच लक्षात येतं. एक जूळून आलेली भट्टी असंच म्हणता येईल.     
   
         

No comments:

Post a Comment